६ एप्रिलच्या पुरवणीतील डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेल्या ‘मुलगा हवा’ च्या कहाण्या खरोखरच अस्वस्थ करून गेल्या. जात-धर्म, शैक्षणिक-आíथक-सामाजिक स्तर अशा कुठल्याही बाबीचा या मानसिकतेवर परिणाम होत नाही. मुलगा नसेल तर जीवन व्यर्थ, ही आस आयुष्याला इतकी व्यापून उरते की, माणुसकीचाही विसर पडतो. हे चित्र बदलण्यासाठी विचारवंत तसेच सुधारणावादी मंडळी अथक प्रयत्न करीत आहेत. त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. मात्र लंबकाच्या नियमाप्रमाणे, या टोकाकडून निघालेला लंबक हळूहळू त्या टोकाकडे जाऊ लागला आहे, असे म्हणता येईल.
‘मुलीचे स्वागत करा’ या विचाराची दुसरी बाजू अपरिहार्यपणे ‘मुलगा नकोच’ किंवा ‘मुलगा व्हावा अशी इच्छासुद्धा करू नका’ अशी असल्याचा गरसमज काहींचा झाला आहे. आपल्याला मुलगा नाही या नैराश्यातून आलेली ही प्रवृत्ती वाढीस लागते आहे. एका मुलीच्या आई तर म्हणाल्या, ‘‘मी तर देवाचे आभार मानते मला मुलगा नाही म्हणून. हल्ली मुलगे करतात बायकोची आणि तिच्या आईची ताबेदारी. आई-वडिलांना विचारत नाहीत. सुना आणि त्यांच्या आया आपल्या घरावर असं वर्चस्व गाजवतात की आपल्या घरात आपणच पाहुण्या होतो. हवेत कशाला मुलगे?’’
त्यांनी दिलेली दूषणे त्यांना स्वत:लासुद्धा लागू होतात हे त्या विसरल्या. ज्या घरात पहिली मुलगी आहे, तिथे दुसऱ्या बाळाची चाहूल लागली की घरातली माणसे वैतागून जातात. एका प्रश्नाने- काय या वेळी मुलगा का? (हा प्रश्न इतक्या विविध पद्धतीने विचारला जातो की, त्यावर एक वेगळा संशोधन निबंध व्हायला हरकत नाही.) आपल्या हाती काही नसतं, हे अशिक्षित माणसांनासुद्धा कळतं आजकाल, पण तरी विचारतात. मुलगी होण्यात काही वाईट नाही म्हणजे मुलगा व्हावा अशी इच्छासुद्धा करायची नाही असे कुठे लिहिलेय? पहिल्या नातीनंतर नातू झाला तेव्हा ‘काय अगदी खूश असाल ना आता? नातू झालाय!’ या प्रतिक्रियेने कंटाळून मी एका बाईंना सरळ विचारलं, ‘तुमच्याकडे दुखवटा पाळतात का मुलगा झाल्यावर?’ मी अर्थातच टीकेचा विषय ठरले. मुलगी झाली तर? या प्रश्नाला तर उगाचंच गíभत धमकीचाच वास येतो.   
मुलगा झाल्यावर ‘जितं मया’ अशी प्रतिक्रिया देणं आणि मुलगी झाल्यावर सर्वस्व बुडाल्यासारखं दु:ख करणं वा वर उल्लेख केलेल्या दुसऱ्या टोकाच्या मुलगाविरोधी प्रतिक्रिया देणे याव्यतिरिक्त साधी सरळ इच्छा किंवा निखळ आनंद या भावनासुद्धा माणसाच्या मनात असतात? मुलगा व्हावा अशी इच्छा करून मुलगी झाली तरी तिच्यावर तेवढंच प्रेम करणारी माणसं आहेत, हे नाकारायचं, हेसुद्धा चांगलं नाही.
    -राधा मराठे,  ई-मेलवरून

स्त्री तिरस्काराचाच हा प्रकार नव्हे काय?
६ एप्रिलच्या पुरवणीतील ‘अस्वस्थ कहाण्या..’ या डॉ. अतनुरकर व  ‘मुलासाठी वाट्टेल ते’ या डॉ. वर्षां दंडवते यांच्या लेखांमधील काही वाक्ये खटकली.
डॉ. अतनूरकर लिहितात, ‘आपल्याला एखादा मुलगा असावा अशी इच्छा असणे काही गर आहे असे मला वाटत नाही.’ एखादा मुलगा असावा असे वाटणे व मुलगाच हवा हे वाटणे या दोन्हीत अस्पष्ट सीमारेषा आहे. एखादे हुशार व गोंडस मूल आपल्याला गुंगवून ठेवते. तेथे त्या बाळाचे िलग महत्त्वाचे नसते. शिवाय भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. मग हे तथाकथित कर्तबगार पुरुष भारताला श्रीमंत का करू शकत नाहीत? ज्या देशांमध्ये ‘मुलगाच पाहिजे’ हे वेड नाही, ते देश श्रीमंत आहेत व मानवी हक्कांबद्दल जागृत आहेत. माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांना दुसरीही नातच झाली. त्यावर एरंडेल प्यायल्यासारखे तोंड करून ते मला म्हणाले, ‘काय करायचं, दुसरी मुलगीच झाली?’ त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही पुरुष स्वत:ला काय समजता? तुम्ही जन्माला येऊन काय उजेड पाडला आहे?’ यावर ते निरुत्तर झाले .
बरेच लोक मुलगी जन्माला येणं आणि मुलगा वाया जाणं याची तुलना करतात. मुलगा होऊन वाया गेला तर काय करणार होतात? मुलगी झाली यात समाधान माना. असे भाष्य करतात. अरेच्चा! चांगल्या मुलाला चांगली मुलगी पर्याय होत नाही का? आपल्याला एखादे मूल हवे वाटणे तर्कसंगत वाटते. पण एखादा मुलगा हवा असे वाटणे पूर्वग्रहदूषित विचारांचा परिणाम आहे.
तर डॉ. दंडवते लिहितात, ‘खरं तर दर वेळेस मुलगी होण्यामागे शास्त्रीयदृष्टय़ा त्याच्याकडे जबाबदारी जात असेल तरी, तो दोष त्याचा नक्कीच नव्हता.’ म्हणजे पाठोपाठ मुली होणे हा दोष असल्याचे त्यांना वाटते! अपंग मूल जन्माला आले तर तो आनुवंशिक किंवा दुसरा काही दोष असू शकतो. पण पाठोपाठ मुली जन्माला येणे हा दोष कसा? धडधाकट मुलींच्या जन्माला तुम्ही दोष म्हणाल, तर भारतीय लोक करंटेच म्हणायचे. असे बोलून धडधाकट मुलींमध्ये आपण न्यूनगंड निर्माण करतो. त्यांना मानसिकदृष्टय़ा अपंग करतो.
मी शिकत असताना एका ६७ वर्षांच्या आजींकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. आजींना तीन मुली व एक मुलगा. त्या पुण्याला राहत तर मुलगा बेंगलोरला. आजींच्या बोलण्यातून भारतीयांच्या स्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले. त्यांच्या मुलाला आठवीत असताना डोळ्यांनी दिसेनासे झाले. त्या वेळी आजी आणि आजोबांच्या मनात पहिला विचार काय आला .तर आता या मुलाचा आपल्याला काय उपयोग? पुढे तो मुलगा बरा झाला ही गोष्ट वेगळी . शिवाय, ‘मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी’ या विचाराच्या आजी मुलाकडे राहतच नव्हत्या. त्यांना मुलाकडे राहणे म्हणजे स्वातंत्र्य गमावणे वाटायचे. त्यांच्या दुखल्याखुपल्याकडे त्यांची पुण्यात असलेली मुलगीच पाहायची. मग खरंच त्यांना मुलगा असण्याचा काही उपयोग होता का? पण एवढे असूनही आजी म्हणायच्या, एखादी मुलगी असावी, पण आमच्यासारख्या तीन-तीन काय करायच्या.. म्हणजे आई-बापाची दुखणी काढायला मुलगी पाहिजे व फायदे घ्यायला मुलगा आहेच .  
म्हणून माझी दोन्ही डॉक्टरांना विनंती आहे , की आपल्या लिखाणातून जो स्त्रीच्या तिरस्काराचा सुप्त सूर निघतो आहे, तो यापुढील लेखात नसावा.
    -स्मिता पटवर्धन, सांगली</p>

सोयीस्कर सश्रद्ध असणं वाईट नाही
१३ एप्रिलच्या अंकातील ‘श्रद्धा’ हा ‘बोधिवृक्ष’ या सदरातला प्रा. मििलद जोशी यांचा लेख चिंतनीय होता. बुद्धिनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा यांच्या इतकाच जीवनात भावनांचाही पाझर असायला हवा. नाही तर जीवन रूक्ष आणि कोरडे होईल पण त्याच वेळी श्रद्धा डोळस हवी हा विचार पटण्याजोगाच होता. म्हणूनच सोयीस्कर सश्रद्ध किंवा आस्तिक असायला काहीच हरकत नाही, असे राहून राहून वाटले. त्याचे काही फायदे खालीलप्रमाणे सांगता येतील. १) श्रद्धा दाखवण्यासाठी प्रत्यक्ष देवस्थानाला भेट देण्याची दगदग करण्याची गरज नाही. त्यामुळे गर्दीचे तोटे, चेंगराचेंगरी, गुद्मरण्याचे प्रसंग, प्रवासातले धोके हे टाळता येतात.
२) माणूस उत्सवप्रिय असल्यानं देवाच्या नावावर रूक्ष जीवनात विरंगुळा प्राप्त करता येतो. अशा प्रसंगात भाग घेऊन राहत्या ठिकाणच्या माणसांच्यात मिळूनमिसळून वागण्याचं समाधान आणि त्यायोगे पाहिजे तेवढा जनसंपर्कही साधता येतो.
३) नामस्मरणानं ईश्वर बसल्याजागी अनुभवण्याची श्रद्धा ठेवली की रात्री ठरावीक स्तोत्र, प्रार्थना म्हटल्याशिवाय झोप लागत नाही. म्हणजेच आपल्या दिनचय्रेत एक सातत्यता येते, नियमितपणा येतो. आपल्या दिवसभराच्या कष्टांच्या चांगल्या फलिताचं आणि आपण धडधाकट राहिलो आहोत याचं श्रेयही अज्ञात शक्तीला अर्पण करू शकतो.
४) मी ईश्वराचा अंश आहे हे गृहीत धरून आत्मविश्वासानं कृती करण्याची प्रेरणा मिळते तीही ‘इदं न मम’ या भावनेनं केली तर त्यातून उद्भवणाऱ्या विपरीत परिणामांनी कोसळायला होत नाही.
५) ईश्वर सर्व प्राणिमात्रांत आहे हे गृहीत धरून सर्वाशी आपुलकीनं आणि नम्रतेनं वागण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे कोणाबद्दलही पूर्वग्रह किंवा अगदी वाईट शब्द वापरायचा तर ‘डूख’ धरून वागण्याची प्रवृत्ती राहत नाही. मांजर आडवं गेलं, पाल अंगावर पडली तरी सोयीस्कर श्रद्धाळू मन विचलित न होता कर्तव्य पार पाडायला तयार राहातं.
हे सारं बोलायला सोपं आहे, असा विचार अनेकांच्या मनात येईल. कारण आजकाल सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी / रात्री घरी सुखरूप येईपर्यंत जिवात जीव नसतो, उरतो फक्तईश्वराचा धावा, नाही तर इतरांच्या नजरेचा कांगावा. चांगले उच्चशिक्षित लोकही देवाधिकांच्या पाया पडण्यासाठी वर्षांकाठी एक वेळ किंवा प्रसंगी अनेक वेळा शिर्डी, शेगाव, तिरुपती वगरेंना भेटी देत असतात. अनेक उद्योजक आपली व्यावहारिक पापं धुऊन टाकण्यासाठी देवाला गुप्त दानाची लाच देत असतात. या सगळ्यात स्वार्थच असतो आणि तरीही त्याचं यथायोग्य माप योग्य वेळी त्यांच्या पदरात पडतही असतं, अशी दृढ भावना जनमानसात आहे. त्याला आपण काय करणार?
तात्पर्य ‘जगन् मिथ्या’ असा दुराग्रह न धरता सश्रद्ध मनाला विचारांचं कोंदण कायम द्यावं आणि सत्याला सामोरं जात राहावं. प्रा. जोशींनी हा बोध समर्पक शब्दात केला आहे.    
 -श्रीपाद पु. कुलकर्णी,
पुणे</p>