२१ फेब्रुवारीच्या अंकात, ‘उरले जगणे. मरणासाठी..’ 

हा नारायण कृष्णाजी लवाटे यांच्यावरचा दिनेश गुणे यांचा लेख प्रसिद्ध झाला आणि वाचकांकडून त्याला पाठिंबा देणाऱ्या, विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया भरभरून आल्या. त्यातल्या या काही निवडक प्रतिक्रिया..
उरलो उपकारापुरता?
‘उरले जगणे. मरणासाठी’ हा लवाटे आजोबांच्या इच्छामरणाच्या ‘तगाद्या’वरचा लेख वाचून सुन्न झालो. माणसं इतक्या टोकाच्या विचारापर्यंत जाण्यासाठी आयुष्यातले क्षण वेचतात हेच धक्कादायक आहे.
अपघातानं मुलं गमावलेल्यांच्या डोक्यातही हा विचार येणं अवघड. हे आजोबा-आजी तर मुलाबाळांचा पाश नसलेले. म्हणजे आहे तो पैसा पर्यटन, आवडीचे छंद, नाटक, सिनेमे, पुस्तकं यांत खर्च करून सारी सुखं, शेवटपर्यंत म्हणजे उपभोगण्याची ऊर्जा असेपर्यंत, मिळवण्याचा सोस करता येईल असे. पण ते झगडताहेत इच्छामरणाच्या कायद्यासाठी.
लवाटे आजोबा समाजोपयोगी लढे देत आहेत, दुसऱ्यांना त्यांचे हक्कमिळवून देत आहेत. त्या सर्वाचं समाधान, त्यांच्या शुभेच्छा यांची जमवलेली शिदोरी त्यांना पांगळं होऊ देणार नाही, ही भावना बाळगता येईल ना?
तरीसुद्धा कुणावर आर्थिक भार येऊ नये असं वाटत असेल तर ‘इच्छापत्र’ नोंदणी करून आपली गात्रं शिथिल झाल्यावर आणि उपचारांना शरीर साथ न देऊ शकण्याची स्थिती निर्माण झाल्यावर अधिक उपचार न करता शांतपणे मरू द्यावं, अशी इच्छा लिहून ठेवून सुवर्णमध्य गाठता येईल ना?
शेवटी आयुष्य हे सुख-दु:खांची वाटणी आणि प्रेम-आनंद यांची देवाणघेवाण यातूनच वाहतं राहतं. खळाळत्या पाण्याला एकदम बांध घालायचा प्रयत्न करूनही त्याचं झिरपणं थांबत नाही तसंच आपण उपकारापुरते उरलो आहोत, असं समजणाऱ्या लवाटे आजोबांसारख्या माणसांनी या आपल्या संपर्कात आलेल्या माणसांच्या आपलेपणाच्या ओलाव्याचं झिरपणं अनुभवावं होईल तेवढं. त्यांची इच्छामरणाची महत्त्वाकांक्षा सरकारदरबारी फलद्रूप झाली तर चांगलंच आहे. पण तोपर्यंत संपर्कातल्या माणसांच्या हातीच ‘इच्छापत्र’ सोपवावं आपल्याला ‘खितपत पडून देऊ नये’ असं.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

हास्यास्पद विचार
जगणे ही एक मूलभूत प्रवृत्ती आहे. काहीही आजार नसताना आणि प्रकृती ठणठणीत असताना, इच्छामरण हवे असणारे लोक कोणत्याही समाजात अपवादानेच सापडतात, तेव्हा इच्छामरणाचा कायदा झाल्यास लोक भराभर इच्छामरण स्वीकारतील, असे समजणे हास्यास्पद आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येवर इच्छामरण हा एक तोडगा आहे, असे समजणे त्याहूनही हास्यास्पद आहे. व्याधिग्रस्त आणि असह्य़ यातना होत असताना सुलभ आणि वेदनारहित मृत्यू हा मुळात इच्छामरणाचा हेतू आहे आणि इच्छामरणाला विरोध सगळ्याच देशात धार्मिक संस्थांकडून झालेला आहे. कर्मभोग, संचित, पुनर्जन्म इत्यादी कल्पना असणाऱ्या आपल्या देशात तो अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
लेखात सुचविल्याप्रमाणे सरकारने हा कायदा करून हे काम करावयाचे ठरविल्यास एक वेगळा विभाग निर्माण करावा लागेल- मृत्युदान विभाग. आणि त्यासाठी कोणीही डॉक्टर हे करावयास तयार होणार नाही. अमेरिकेत लिथल इंजेक्शन मृत्युदंड देण्यासाठी वापरतात. ते देताना भूलतज्ज्ञांची उपस्थिती आवश्यक असते पण भूलज्तज्ञ ते काम करण्यास तयार नसतात आणि करतात ते अनिच्छेनेच. वैद्यकीय नीतीला ते धरून नाही, असेच साधारणपणे समजले जाते. संततिनियमन आणि इच्छामरणाचा संबंध जोडणे विचित्रच आहे. त्याहून विचित्र म्हणजे गॅस चेंबरमध्ये भविष्यात वृद्धांना मारावे लागेल अशी कल्पना. जपानमध्ये वृद्ध जास्त प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे जागाही कमी आहे पण अजून कोणी चेंबरचा तोडगा दिलेला नाही.
म्हणूनच, इच्छामरणाची चळवळ होणे अशक्यप्राय आहे. वेदनारहित मृत्यू शक्यप्राय आहे. इच्छामरणाचा ध्यास असणाऱ्यांसाठी ‘फायनल एक्झिट’ हे पुस्तक उपलब्ध आहे.
-डॉ. रघुनाथ बोराडकर, पुणे

लवाटेंना यश मिळो
नारायण कृष्णाजी लवाटे यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. आम्ही फक्त विचार करतो, इतरांशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण लवाटे अत्यंत पोटतिडिकीने हा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करताहेत. त्यांना यश मिळो. आता तरी सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा.
आपल्या आसपासच्या नव्वदी पार केलेल्या वृद्धांच्या तोंडची वाक्ये आजही कानात घुमत असतात, ‘‘देवाला सांग गं, या म्हातारीला ने बाबा. आता पुरे हे जगणं!’’ अशा वेळी लवाटेंचे शब्द खोलवर परिणाम करतात. मला खात्री आहे, आमच्यासारखे सत्तरीला आलेले वा पार केलेले सर्व जण मनातल्या मनात असेच म्हणत असतील. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यात, शरीर धडधाकट आहे, पण पुढचे काय? त्यापेक्षा नवीन सरकार आले आहे, त्यांनी तरी गांभीर्याने विचारात घेऊन हा कायदा करावा. लवाटेंना धरणे उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये.
-सुवर्णा अडावतकर, नागपूर</strong>

…तर ही वेळ आली नसती.
या लेखात म्हटल्याप्रमाणे लवाटे हे शारीरिक आणि आर्थिकदृष्टय़ा अजूनही सक्षम आहेत. गेली २५ वर्षे ते इच्छामरणाचा कायदा व्हावा, म्हणून प्रयत्नशील आहेत. या २५ वर्षांत त्यांनी अनेक पत्रव्यवहार आणि भेटीगाठी केल्या, परंतु हा बहुमूल्य वेळ, त्यांनी समाजासाठी दिला असता, त्यांचे सामाजिक कार्यात योगदान आहेच, पण त्याहून अधिक दिले असते तर ‘जगण्याला अर्थ आहे का काही?’ असे म्हणण्याची वेळच आली नसती.
आज अनेक संस्था आहेत, ज्या केवळ समाजाच्या भल्यासाठी कार्यरत आहेत. अशा एखाद्या संस्थेशी स्वत:ला जोडून घेता आले असते. मरणोत्तर देहदान करून समाजाचा फायदा (?) करण्यापेक्षा परमेश्वराने दिलेले आयुष्य समाजाचे भले करण्यात जायला हवे.
-वैदेही केळकर, दहिसर (प)

समाजाला तुमची गरज
वास्तविक सर्वानाच मरणाची भीती वाटते. अगदी अंथरुणावर गलितगात्र होऊन पडलेल्या माणसालासुद्धा मरण नकोच असते. अर्थात ही देहात्मबुद्धी, माया, अज्ञान यामुळे मृत्यूला कवटाळणं अगदी जिवावर येते, प्राण जात नाही. इच्छामरण हवे असेल तर आत्महत्या करणे हा मार्ग आहे. पण आत्महत्या करणे हे आपल्या हिंदुधर्मात पाप समजतात. समजा असा इच्छामरणाचा कायदा केला तर किती लोक इच्छामरणाला तयार होतील? मग या कायद्याचा काय उपयोग? लवाटे म्हणतात, सरकारी अधिकाऱ्यांदेखत हॉस्पिटलमध्ये विषाचे इंजेक्शन देऊन आम्हाला मारून टाकावे. पण असे करण्यास कोणीच तयार होणार नाही. कारण एखाद्याला मुद्दाम मारणे हे पाप समजले जाते.
लवाटे यांनी विचारपूर्वक मूल जन्माला न घालण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे म्हातारपणी आपले कोण करणार? ही भीती त्यांना वाटत असावी, पण ‘ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.’ अहो लवाटेसाहेब! तुमची आणि पत्नीची प्रकृती उत्तम आहे. तुमच्याजवळ पैसाअडका, घरदार सर्व काही आहे. तेव्हा हे कशासाठी? अहो १०० वर्षे जगा. हे जीवन अनमोल आहे. मनुष्यजन्म लवकर मिळत नाही. तेव्हा तुम्ही समाजकार्य करतातच आहात तर तुम्हाला आनंद मिळेल असे आणखी समाजकार्य, वृद्धांची सेवा, आंधळय़ा, मुक्या, बहिऱ्या, पांगळय़ा, अनाथ यांच्या अनेक संस्था आहेत. त्यांचेसाठी काही करता येण्यासारखे काम असेल तर करा व तुमचे जीवन सार्थकी लावा.
-पुष्पा चितांबर, अहमदनगर</strong>

घटनेने मृत्यू हा गुन्हाच
नारायण लवाटे यांचे विचार कळले, मात्र त्यांनी हे लक्षात घेतलेले दिसत नाही की, आपल्या देशाची घटना, नागरिकांना इच्छामरणाची परवानगी देऊ शकत नाही. ती जगण्याचा हक्क देते. आत्महत्या, खून या कृती बेकायदेशीर असून तो गुन्हा मानला जातो. त्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर फाशी झालेल्या व्यक्तीलाही दाद मागण्याची तरतूद कायद्यात आहे. कोणता डॉक्टर विषाचे इंजेक्शन देऊन एखाद्याचे जीवन संपवण्यास मनापासून तयार होईल? हॉस्पिटल, दवाखाने जगविण्यासाठीच असतात, मारण्यासाठी नाहीत. लवाटे यांच्या या मागणीला किती जणांचा पाठिंबा मिळेल, याचाही विचार व्हायला हवा.
-विजय खेर, रत्नागिरी

दृष्टिकोन वाखाणण्याजोगा
नारायण कृष्णाजी लवाटे यांची मुलाखत वाचून मन सैरभैर झाले. त्यांचा व त्यांच्या पत्नीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरोखर वाखाणण्याजोगा आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी मनात नैराश्य न येऊ देता, आपल्या मनासारखे होण्यासाठी, नाउमेद न होता, सतत प्रयत्न करीत आहेत. त्याबरोबर या वयात अडल्या-नडलेल्यांना तत्परतेने मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची वृत्ती पाहून मन प्रसन्न झाले.तुम्हाला त्रिवार सलाम !
-प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा, मुंबई

मृत्यू आपल्या हाती नाही!
इच्छामरणाच्या मागणीचा विचार केला तरी प्रश्न असा आहे की मानवाला जन्माला घालणे व त्याला मृत्यू प्रदान करणे हे दोन अधिकार ईश्वराने आपल्याकडेच राखून ठेवले आहेत. भारतातील कारभार मानवतेच्या दृष्टिकोनातूनच केला जातो. त्यामुळे खुनाच्या खटल्यातही न्यायाधीश फाशीची शिक्षा सुनावताना अत्यंत दक्ष असतात. अत्यंत निर्घृण गुन्हा असेल तर आणि तरच गुन्हेगाराला फासावर लटकावे, असा न्यायाधीशांचा प्रयत्न असतो. तेव्हा अशा स्थितीत एखादा रुग्ण आजारपणामुळे कितीही कंटाळला असला तरी तो म्हणतो म्हणून त्याला मृत्यू देणे हे मानवतेला धरून होणार नाही.
लोकसंख्या विस्फोटाची भीती कोणीही बाळगू नये. कारण परमेश्वर या लोकसंख्येवरही नियंत्रण ठेवत असतो. म्हणूनच त्सुनामीसारख्या घटना, प्रचंड जलप्रलय, धुवांधार पावसामुळे घरेच्या घरे कोसळणे, भूकंपाच्या धक्क्याने शहरेच्या शहरे उद्ध्वस्त होणे असे प्रकार जगभरात चालूच असतात. अत्यंत आजारपणामुळे वैतागलेला रुग्ण कधी कधी ‘मला जिवाचा कंटाळा आला देवा, मला लवकर का मृत्यू देत नाही’ असे म्हणतो, पण तरीही त्याला जगायचे असते. तेव्हा अशा माणसाला तू मरणार नाही, असा दिलासा देणेच उचित होईल.
मी येत्या दोन-तीन महिन्यांत सत्याण्णव वर्षांत पदार्पण करणार आहे. ३७ वर्षे सेवा करून शासकीय कार्यालयातून निवृत्त झाल्यावर, जवळजवळ २५ वर्षे समाजसेवा केली. आताही फलज्योतिष शास्त्र व हस्त सामुद्रिक शास्त्र शिकून लोकांचे हात व कुंडल्या तपासतो. संध्याकाळी सोसायटीच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिक मित्रांबरोबर गप्पा मारतो. परमेश्वराने कृपावंत होऊन आपल्याला दीर्घायुष्य दिले आहे. ते योग्य प्रकारे कारणी लावावे यातच आपले हित आहे. तेव्हा ‘इच्छामरण’ कायदा हा भारतात येणेच शक्य नाही.
कायदाच जर करावयाचा झाला तर मृत्यूनंतर नातेवाइकांनी मृताच्या देहाचे व नेत्राचे दान करावे, असा बंधनकारक कायदा केला तरच मृतांच्या आत्म्याला शांती मिळू शकते.
-द.के. दिघे, मुंबई

त्यांच्या प्रयत्नांना यश येवो
नारायण लवाटे यांचे छायाचित्रासकटचे पत्र वाचून थरारलो. मी याच विचारांनी सतत भारलेला असतो. प्रकटीकरण मात्र झाले नव्हते. माझे सभोवताल मात्र लवाटे यांच्याहून वेगळे, गजबजलेले आहे. मात्र तरीही आजवर आयुष्य मूकपणेच गेले. विचार दुसऱ्या कुणापर्यंत पोचलेच नाहीत. म्हणूनच समविचारी लवाटे यांचे विचार वाचून फार बरे वाटले. मला वाटते, असेच पुष्कळांना बरे वाटले असेल.
देहदान, सैन्यातील इमर्जन्सी कमिशन, बौद्ध भिक्षू हे माझे आकर्षणाचे विषय. मी दधिची देहदान मंडळाचा सभासद आहे. त्यांच्या पत्रिकेतील ‘संतुष्टावस्थेतील आत्मत्याग’ या विचारांशी माझी सहमती आहे. जास्तीत जास्त अवयव दान अवश्य आपल्याकडूनही घडावे असे सतत वाटते. माझेही वय ८३ पूर्ण झाले आहे. होण्यासारखे काही राहिले नाही. ‘जगण्यासारखे काही पदरी असेपर्यंतच मरणे उत्तम’ या उक्तीप्रमाणे मनाची तयारी होत आहे.
अपघाती मरणामुळे देहदान होत नाही, तसेच सायनाईड, विष, इलेक्ट्रिक शॉकमुळे ही शरीरातील इंद्रिये नाकाम होऊन जातील, पण हा अधिकार तज्ज्ञांचा!
लवाटेंच्या प्रयत्नांना लवकर यश येवो, ही प्रार्थना! झोपेसारख्या अलिप्तावस्थेत मृत्यू यावा, असेच वाटते. मायबाप सरकारकडून ‘न यास्यति इति अभिधाय, विदधे रक्षणमुत्तमम्!’ असे सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांसारखे होऊ नये, म्हणजे झाले!
-रघुनाथ गायधनी, अंधेरी

काही गोष्टी घडणारच
आमच्या लग्नाला ५६ वर्षे पूर्ण झालेली आहेत. दोन मुली, दोन मुले आणि सुना-जावई व पाच नातवंडे म्हणजे एकूण १५ माणसांचं आमचं कुटुंब आहे. एकत्र कुटुंब पद्धतीच्या मी विरुद्ध आहे. म्हणून मुला-मुलींची लग्न होताच मी सर्वाना स्वतंत्र राहण्याचे सुचविले. आम्ही गेली २२ वर्षे स्वतंत्र राहातो, परंतु गेली दोन वर्षे आमची चर्चा चालू आहे. माझे वय ७८ आहे, पत्नी इंदूमती ७६ वर्षांच्या आहेत. दोघेही आजारी असतो. मी आधी मरण पावल्यास ती मागे काय करेल किंवा ती आधी गेल्यास मी कसं काय करणार? पण जोडी मात्र फुटणार हे १०० टक्के सत्य आहे. सांगण्याचा मुद्दा- लवाटे यांनी स्वत:चा विषय उघड केला. मुलामुलींचा काहीएक उपयोग नसतो, याचा आम्ही दोघे अनुभव घेत आहोत.
-हरीभाऊ दहातोंडे, भांडुप, मुंबई

वेबसाइटवरील प्रतिक्रिया
या लेखातील लवाटे दाम्पत्याचे विचार अतिशय प्रगल्भ असे आहेत. मुख्य म्हणजे हे विचार आज आयुष्याचा कंटाळा आल्यानंतरचे नसून १९८७ पासून म्हणजे साधारणत: त्यांच्या वयाच्या ५५ ते ५६ म्हणजेच निवृत्तिपूर्व काळापासूनचे आहेत. याचाच अर्थ पूर्णत: दूरदृष्टीने, पूर्णत: भानावर असताना घेतलेले आहेत. हे विचार सामाजिक जाणिवेने परिपूर्ण आणि अनेकांना जीवनाविषयी मार्ग दाखवणारे आहेत. आपल्या अभिमानास्पद विचारांबद्दल आपणास सलाम!
-एक वाचक

जगा समाजासाठी…
या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा आपल्या मनात मरणाचे विचार येतात तेव्हा आपल्या जीवनाचा विचार सोडून द्यावा. आपल्या भोवताली असलेल्या जिवांना कसे सुख मिळेल याचा विचार करावा. आपल्या व्यक्तिगत जीवनाचा त्याग करून समाजासाठी, समाजातील दु:खी व्यक्तींना आधार द्यावा असे वाटते. पुढे जीवन दुखी होईल, हे मनातून काढून टाकावे. आपल्या जीवनविषयक अपेक्षांचा त्याग करणे हेही एक प्रकारचे मरणच आहे. तेव्हा शारीरिक मरणाचा विचार न करता जीवनविषयक मोहाचा त्याग करून उरलेले जीवन इतरांसाठी व्यतीत करावे असे मला वाटते.
-सुनंदा नारखी

-पुष्पा चितांबर, अहमदनगर