News Flash

पडसाद : पालकत्वाच्या निर्णयाची चिकित्सा गरजेची

वृषाली मगदूम यांचा ‘‘डिंक’ स्वीकारताना..’ हा लेख वाचला. विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य मार्गाचा शोध घेण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर आपल्याकडे मूल्यांकन आणि समुपदेशन सत्रे असतात.

(संग्रहित छायाचित्र)

वृषाली मगदूम यांचा ‘‘डिंक’ स्वीकारताना..’ हा लेख वाचला. विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य मार्गाचा शोध घेण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर आपल्याकडे मूल्यांकन आणि समुपदेशन सत्रे असतात. त्याचप्रमाणे विवाहित जोडपी भावनात्मक, शारीरिक आणि आर्थिकदृष्टय़ा नवीन जीवाची जबाबदारी घ्यायला तयार आहेत की नाहीत, हे ठरवण्यासाठी अशी पद्धत का लागू होत नाही?

जर वैज्ञानिकदृष्टय़ा पाहिले, तर कोणत्याही सजीवाच्या नवजात शिशूंची संख्या अन्नसाखळीतील स्थिती आणि त्यांची निसर्गात टिकून राहण्याची क्षमता यावर अवलंबून असते. मानवाने हा नियम कधीच मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार असे आढळले आहे, की मानवाला दरवर्षी जगण्यासाठी आवश्यक असणारी नैसर्गिक संसाधने केवळ पहिल्या पाच महिन्यांतच वापरली जातात, त्यामुळे आपण भविष्यातील पिढय़ांच्या हक्काचे नैसर्गिक स्रोत आजच संपवत आहोत.

भारतात बहुतेक निर्णय, जे लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम करतात (अप्रत्यक्षपणे कुटुंब आणि समाजावरदेखील), ते सामाजिक दबावाअंतर्गत घेतले जातात. उदा. दहावीनंतर विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेची निवड, नोकरी करायची की व्यवसाय, लग्नाचे वय इत्यादी. याप्रमाणेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकत्व. वैयक्तिक निवडीचा विचार न करता पालकत्वासंबंधीचे निर्णयदेखील लादले जातात, एक तर कुटुंबाकडून किंवा कुटुंबीय समजूतदार असतील तरी समाज काय म्हणेल यामुळे.

जर आपल्या सभोवतालच्या परिसराकडे पाहिले, तर भारतीय शहरांत मुले खेळू शकतील आणि सामाजिक वेळ घालवू शकतील अशी किती उद्याने किंवा खेळाची मैदान आहेत? दिल्लीसारख्या शहरांमध्ये, जेथे प्रदूषणामुळे दरवर्षी दोन महिने शाळा बंद असतात, अशा शहरांमधे सामाजिक दबावाखाली मुलांना जन्म देणे, हा त्या पालकांवर आणि मुलांवर अन्याय नाही का?

ज्या जोडप्यांना मूल होऊ शकत नाही त्यांच्या भावनिक, शारीरिक आणि आर्थिक घुसमटीबद्दल भारतीय समाज विचारदेखील करत नाही, कारण आपल्याकडे पालकत्व हे दैवी म्हणून मानले जाते. किमान भारतात तरी (आजची लोकसंख्या सुमारे १३५ कोटी आणि २०५० पर्यंत १६५ कोटी) पालकत्वासंबंधीचा निर्णय समाजच घेत आहे. अशा सर्वात महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात चर्चा होत नाही. सध्याच्या परिस्थितीत महागाई, प्रदूषण, जीवनशैली या विषयानुरूप मूल होऊ द्यावे की नको, यावर विचार केला जात नाही. लग्न झाले म्हणजे मूल व्हायलाच हवे, ही संकल्पना. घर, गाडी, जमीन या निर्जीव वस्तू घेतानादेखील विचार केला जातो, पण अपत्याविषयी पती-पत्नी तरी एकमेकांशी बोलत असतील की नाही, शंकाच आहे. एकविसाव्या शतकात पालकत्वाबद्दलच्या संकल्पनेवर वेगळा विचार झाला पाहिजे.

– सचिन आणि अर्चना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:44 am

Web Title: readers response chaturang 041220202 dd70
Next Stories
1 ‘मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठी’
2 जीवनदायी पान्हा!
3 गर्जा मराठीचा जयजयकार : मराठी शाळा आधुनिकतेशिवाय पर्याय नाही!
Just Now!
X