‘चतुरंग’च्या १२ ऑक्टोबरच्या अंकात राधिका टिपरे यांचा ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखावर मत व्यक्त करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आल्या. कुणी या लेखाची बाजू उचलून धरली आहे, तर कुणाला तो एकांगी वाटला आहे. काहींनी आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी त्यांच्या परीने उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे. आलेल्या पत्रांतील ही काही निवडक पत्रे.
याची उत्तरे कोण देणार?
चतुरंगच्या अंकातील राधिका टिपरे यांचा लेख वाचला त्या लेखातील संदर्भावर उपस्थित होणारे काही मुद्दे – शामल यांच्या उदाहरणात श्यामल यांनी काही घरकामे मुलगा व सून दोघांत वाटून द्यायला काय हरकत असावी? मुलाला वाढवताना त्याला घरकामाची सवय लावली नाही ही कोणाची चूक?   * सुषमावर नातवंडांसाठी तिने जीवनाची पायवाटच बदलावी म्हणून कोणी जबरदस्ती केलेली का? बरे हा त्याग केला तर मग बाकीच्यांनी आपल्या त्यागाचे गोडवे गाण्याची, भेटवस्तूंची अपेक्षा संस्कृतीत कशी काय बसते? * पंजाबी फॅमिली फ्रेंडच्या कथेत ‘अशा बाबतीत सहसा पुरुष मत व्यक्त करत नाहीत’, हे कौतुकाचे बोल कशासाठी? पुरुषांनी बोलायलाच हवे! बोलून पाहा ना एकदा त्या मुलाशी व सुनेशी आणि नसेल त्यांना जमत तर निराळे राहायला सांगा किंवा मदत तरी करा ना बायकोला, म्हणजे तिची बुरी हालत जरा तरी बरी होईल. मात्र यापैकी काहीही न करणारा नवराही त्या बाईंच्या वाईट परिस्थितीला मुलगा-सुनेइतकाच जबाबदार नाही का?  * आई-वडील इतर लोकांना लांब ठेवत स्वत:चे व्यक्तिस्वातंत्र्य जपणार, मुलांना इंग्रजी शाळेत घालणार, मुले तिथे विदेशी भाषा, साहित्य वगरेतून विदेशी संस्कृती शिकणार, मग स्वत:च्या म्हातारपणी मात्र मुलांनी एकदम पुंडलिक व्हावे अशी अपेक्षा कशी काय बरोबर ठरते? * परदेशात मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी गृहीत धरलेले चालणार नाही हे सांगितल्याशिवाय समजत नसेल तर सांगायला हवेच. * आईबापांनी सर्व सुखं मुलांच्या पायाशी ओतली, प्रसंगी स्वत:च्या आवडीनिवडींना मुरड घातली, म्हणून आता मुलांनी तेच आपल्यासाठी करावे अशी इच्छा/अपेक्षा असेल तर त्यात ‘व्यवहार’ दिसतो, मग आई-बाबांची माया, प्रेम, काळजी याला जागाच कुठे उरते? * मुले हा आयुष्यातील फक्त एक भाग असतो, सगळे आयुष्य नाही; परंतु मुले म्हणजेच पूर्णता, सर्वस्व किंवा त्याशिवाय आयुष्य अर्थहीन वगरे चुकीचा अर्थ आपल्या समाजात खोलवर रुतून बसलाय, त्यामुळे मुले मोठी, स्वतंत्र होऊन घराबाहेर पडल्यावर दुसरे काहीच करण्याची सवय नसल्याने एकाकी नराश्यातून रिकामे वाटून काही महिलांची अवस्था अशी होत असावी. याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असे नाव असून या रोगावर मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने व सल्ल्याने उपचार होऊ शकतात.
– आर.जे.
जुनी नाती, नवे संदर्भ
राधिका टिपरे यांचा लेख वाचून त्या संदर्भात सध्याच्या काळातील काही चलतीच्या व्याख्या येथे देत आहे. लग्न झालेल्या मुलासाठी आणि सुनेसाठी ‘त्या’चे आईवडील म्हणजे – मल्टी व्हिटॅमिन गोळ्या – ताकद येईपर्यंत घ्यायच्या, नंतर नाही घेतल्या तरी चालतात. मोस्किटो स्प्रे – अडचणींच्या डास-चिलटांचा न्यूसन्स वाढला, की हा स्प्रे उपयोगी पडतो. च्युईंग गम – आíथक मदतीचा आणि इतर फायद्याचा रस चोखून घ्यायचा. नंतर निरस, बेचव, सुरकुतलेला गम थुंकून टाकायचा.
उत्तम दर्जाचे शॉक ऑब्झव्‍‌र्हर –  संकटांचे आणि अडचणींचे धक्के शोषून घ्यायचे असतील तेव्हा यांना तेलपाणी करायचे. एरवी गंजत पडले तरी लक्ष देण्याचे कारण नाही. मल्टी फंक्शन गॅजेट्स –  कोणतेही काम, केव्हाही केवळ एका क्लिकवर करून मिळते, पीडितांना या व्याख्या नक्कीच पटतील.
– तिमिर अंधारे
जगण्याचे संदर्भ बदलताहेत!
 ‘प्रश्नांकित उत्तरायण ‘ या  लेखामुळे काही प्रश्न निर्माण झाले. लेखिकेने दिलेली उदाहरणे मध्यमवर्गात जवळपास सर्वच कुटुंबांत कमी-अधिक प्रमाणात आढळतात. आज साठीच्या आसपास असणारी पिढी ही स्वातंत्रोत्तर काळात जन्मलेली आणि एकत्र कुटुंबात वाढलेली (४ ते ८ भावंडे) असल्याने या कुटुंबाचे फायदे-तोटे त्यांनी फार जवळून अनुभवलेले आहेत. तेव्हाही एकत्र कुटुंबात एकमेकांना धरून संसार करताना कुणाची घुसमट होत नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल; परंतु आपली विचारपूस करणारे कोणी नाही अशी स्थिती नक्कीच नव्हती.
‘त्याचबरोबर घरातील मोठय़ांची जबाबदारी आनंदाने स्वीकारली’ असे जे लेखिकेने म्हटले आहे ते वरवर पाहता खरे असले तरी त्यात संस्काराचा भाग किती आणि अपरिहार्यता किती याकडे लक्ष दिल्यास काही उलगडा होऊ लागतो. आपण मुलांचे पालनपोषण करतो, चांगले शिकवतो, त्यांना काही कमी पडणार नाही याची दक्षता घेतो आदी त्यामागे आपले अपत्य आपली म्हातारपणाची ‘काठी’ व्हावी म्हणून करतो, का त्यामागे अन्य प्रेरणाही असली पाहिजे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
एकत्र कुटुंबापासून विभक्त कुटुंबापर्यंतचा प्रवास आज एका वळणावर येऊन ठेपला आहे. अनेक घरांत आजी-आजोबा नातवंडांच्या सोयीसाठी दोन्ही मुलांकडे विभक्त राहतात किंवा आई-वडील भारतात व मुले-सुना परदेशात असे चित्र दिसते. नाती तीच असली तरी जगण्याचे संदर्भ झपाटय़ाने बदलत आहेत आणि ते लक्षात घेऊनच विचारांची दिशा तपासून पाहावी, अन्यथा उत्तरायण प्रश्नांकितच राहणारच.        
संजय उपाध्ये, भांडुप (मुंबई)
चंगळवादाचे बळी
‘प्रश्नांकित उत्तरायण’ या लेखाने मनात प्रश्नांचे काहूर माजले. आपण हे सारे कुणासाठी आणि कशासाठी करतो? ज्या मुलांना आपण तहान-भूक विसरून वाढविले ती मुले जर आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्याला एकटे टाकून जाणार असतील तर कशाला हवीत ही मुले? आणि कशाला हवा तो समाज? आज जगात वेगाने बदल घडताना दिसत आहेत. सगळ्या गोष्टींचे संदर्भ भराभर बदलताना दिसताहेत. पूर्वीच्या काळी आजोबांच्या वस्तू नातू-पणतू वापरायचे. त्या वेळी समाजाची वीण घट्ट होती. आजच्या ‘युज अ‍ॅन्ड थ्रो’च्या जमान्यात वस्तूंसह हाडामांसाच्या माणसांनाही, स्वत:च्या रक्ताच्या नात्यालाही वापरून फेकून देणाऱ्यांची ‘हायब्रीड’ पिढी निर्माण झालेली आहे. बदलत्या जगाच्या झंझावातात साऱ्या समाजाची शकले झालेली असल्याने या शकले झालेल्या समाजाकडून, त्यातील मुलांकडून, कसल्या अपेक्षा ठेवता? ‘तू तुझा, मी माझा’ ही वृत्ती आज कोणालाही स्वस्थ बसू देत नाही, कारण समाजात पसरलेला चंगळवादीपणा. या चंगळवादाने अगोदर ‘माया’ जमविली, मग इतर ‘महामायां’चा त्यात शिरकाव झाला. भारतीय समाजात अगदी खोलवर शिरला. त्यामुळे विषांच्या बिया एकमेकांच्या मनात अलगद पेरल्या गेल्या. त्या बियांचे आता वटवृक्षात रूपांतर होताना पाहण्याचे आपल्या नशिबी आलेले आहे. त्यातच सारे होरपळताना दिसताहेत.    आत्ताच्या तरुण मुलांची मात्र पंचाईत झालेली दिसते.
एकीकडे आई आणि दुसरीकडे पत्नी यांच्या कात्रीत सापडलेल्या मुलांचे ‘संॅंडविच’ व्हायला लागले आहे. मुलगा समजूतदार असेल तर दोन्ही आघाडय़ांवरील नाते टिकवत एकत्र राहण्याची कसरत करतो, पण बऱ्याच वेळा तारुण्याच्या सुवर्णकाळात असलेल्या मुलांना आकर्षक जगाची भुरळ पडली, की मग ते कायमचे आपल्या जन्मदात्यांना सोडून निघून जातात. त्यांचा संसार स्वतंत्रपणे थाटतात. आज या दोन पिढय़ांतली दरी वाढत जात आहे, रुंदावत आहे. कोणी कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. विनापाश राहण्याची एक प्रवृत्ती समाजात वेगाने वाढत चालली आहे आणि या प्रवृत्तीला कोणीही पायबंद घालू शकत नाही.
मात्र जे मातापिता आज पन्नाशीच्या पुढे आहेत त्यांचा जीव अजूनही आपल्या मुलांसाठी तिळतिळ तुटताना दिसतो. म्हणूनच ते आजी-आजोबांच्या भूमिकेत शिरून, एकत्र राहून, जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. म्हणूनच लेखिकेने म्हटल्याप्रमाणे, जमेल तोवर जोडीदाराचा हात घट्ट धरून जीवन जगल्यास आणि मुलांकडून कोणत्याही ‘अवाजवी’ अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर निश्चितच आयुष्याच्या उत्तरायणात ‘प्रश्नांकित’ जिणे जगण्याचे आपल्या नशिबी येणार नाही..! हेच खरे.
– धनराज मा. खरटमल, मुंबई
..तर हे प्रश्न टळले असते
‘प्रश्नांकित उत्तरायण’ या लेखाच्या सुरुवातीसच उल्लेख केलेल्या शामलला घरकामात अडकून पडण्याबद्दल असलेली खंत मला पटली नाही. आपल्याला सुनेच्या गळ्यात घरकाम अडकवता येत नसल्याचेच हे दु:ख वाटते. आपल्याकडे मुलगा म्हणजे म्हातारपणासाठी फिक्स्ड डिपॉझिट अशी कल्पना आहे, पण ही ठेव म्हणजे जास्त व्याजाच्या अपेक्षेने पतसंस्थेत ठेवल्या जाणाऱ्या मुद्दलासारखे आहे, कारण पतसंस्था बुडतातच हे वास्तव आहे. स्वार्थाचे परिणाम वाईटच होणार.
आमच्या पिढीतल्या अगदी नोकरी करणाऱ्या स्त्रियाही आपल्याला मुलगा झाला म्हणून जग जिंकल्याच्या आनंदात असत. जणू आयुष्यातले सगळे प्रश्न एका पुत्रजन्माने संपले, पण असे कधीही घडलेले नाही. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीचा अर्थ समजून घेतील ते भारतीय कसले? याच शामलने (आणि सुषमाने) आपल्या मुलाच्या वधुसंशोधना वेळी किंवा भावी सुनेसमोर, ‘मी तुमच्या संसारात अडकणार नाही’ हे स्पष्ट केले असते, तर मुलगा आणि सुनेने मूल जन्माला घालण्यापूर्वी नक्कीच विचार केला असता, पण सुनेचा बळी देऊन, या वृद्ध लोकांना नातवंडाचे सुख हवे असते. त्यातही सुनेने घर आणि नोकरी सांभाळावी ही अपेक्षा असते.
शिवाय ‘घरकाम केले नाही, तर घराचे हॉस्टेल होईल’ हे म्हणणे म्हणजे स्वत:चे महत्त्व वाढवून घेणे आहे, असे वाटते. या लोकांनी ‘तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही’ हे गाणे लक्षात ठेवले पाहिजे. जग कुणाच्या नसण्याने थांबलेले नाही. शामलला सून नोकरीवरून आल्यावरसुद्धा कॉम्प्युटरवर काम करत असलेली आवडत नाही. मात्र, मुलाच्या अशाच वर्तनावर तिने काय प्रतिक्रिया दिली असती? की फक्त सुनेने नोकरीवरून आल्यावरही घरकामाला जुंपून घेतले पाहिजे?  
भारतीय समाजव्यवस्था भक्कम कौटुंबिक पायावर कधीच उभी नव्हती. तसा भ्रम मात्र निखालस निर्माण केला गेला. ही व्यवस्था स्त्रीच्या शोषणावरच आधारलेली आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांवर झालेले आहेत व पर्यायाने सर्वच समाजावर झालेले आहेत. लेखिकेने पूर्वीच्या मोठय़ा कुटुंबामुळे लोकांमध्ये सहनशीलता येत असे वगरे लिहिले आहे. ही सहनशीलता व नाहक तडजोडी करून मन मारणाऱ्या परिस्थितीपेक्षा स्वत:च्या जबाबदारीवर जगण्याचा खंबीरपणा आला असता तर भारतातले अनेक सामाजिक प्रश्न व स्त्रियांचे शोषण टळले असते, असे प्रामाणिकपणे वाटते.
– स्मिता व प्रतिभा पटवर्धन, सांगली
मार्मिक लेख
‘प्रश्नांकित उत्तरायण’ अधोरेखित करणाऱ्या लेखिका टिपरे यांचे हार्दकि आभार आणि अभिनंदन. आपला लेख फारच सुंदर, सखोल, मार्मिक आणि अत्यंत हृद्य असा आहे. नवीन पिढीवर लिहिताना आपली लेखणी संयमी आणि संतुलितदेखील राहिली हे आवर्जून सांगावेसे वाटते. मी व माझी पत्नी दोघेही व्यवसायाने डेंटिस्ट आहोत व चाळिशी उलटून आपल्याच शब्दात दरम्यानची पिढी आहोत. आपण उल्लेखिलेल्या प्रश्नांची उत्तरं/समाधान शोधत आहोत. आपण नवीन पिढीला जाणीव देण्यासोबत जुन्या पिढीलाही विचारप्रवृत्त केलेत यासाठी पुनश्च धन्यवाद
– डॉ. देवदत्त कांबळे
प्रातिनिधिक लेख
राधिका टिपरे यांचा प्रश्नांकित लेख अगदी ‘प्रातिनिधिक’ वाटला. कामानिमित्ताने घराबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यापुढेही वाढत राहणार आहे. प्रश्न असा आहे की, ही अपरिहार्यता कशी स्वीकारायची? यात सर्वाचीच भावनिक ओढाताण होते आहे. शेवटी ‘कालाय तस्म नम:’ असेच म्हणायचे, दुसरे काय?
-मेघना शहा, ठाणे
टाळी एका हाताने वाजते?
मुलांच्या संगोपनातून आई-वडिलांनाही आनंद मिळत असतो. मग ‘आम्ही यांचे एवढे केले, खस्ता खाल्ल्या’ ही उपकाराची भाषा कशासाठी? मुले कमावती झाली, की त्यांच्याकडे राहत असणाऱ्या आयांना आपण स्वयंपाक, घर आणि नातवंडे सांभाळणे हे काम करून आपला वाटा उचलतोय असे वाटत असते, तर मुलाला आईला ही कामे करण्यात आनंद वाटतोय, तर तिच्या मनाप्रमाणे होऊ दे असे वाटत असते. यासाठी आईने अधूनमधून ‘आज कंटाळा आलाय, बाहेरून मागव काही तरी’ असे म्हटले पाहिजे. असे केल्याने तिला आराम तर मिळेलच, पण मुलाला, सुनेला ती करत असलेल्या कामाची जाणीव होईल.
परदेशी गेलेल्या आयांना इतर माणसे घराबाहेर गेलेली असताना कंटाळा येतो. यासाठी वाचन अथवा इतर छंद यामध्ये रमले पाहिजे. त्यामुळे एकांगी कुढणे बाजूला राहून मनाला विसावा मिळतो. बऱ्याच वेळा तरुण मुलांना आई-वडिलांनी आपल्याबरोबर सहलीला/ सिनेमाला यावेसे वाटत असते, पण पालक आपली नापसंती दाखवतात, त्यामुळे मुलांचा हिरमोड होतो. टाळी एका हाताने वाजत नसते. कायम दु:ख मनात आणून त्यांना कुरवाळत बसणे योग्य नाही.
– श्रीराम बापट
अट्टहास सोडायला हवा!
वृद्ध आई-वडिलांच्या प्रश्नांवर दृष्टिक्षेप टाकणारा ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख खूपच एकांगी वाटला. एका हाताने टाळी वाजत नाही हेच खरे. बरेचदा सुनांना घरकामात मदत करायची असते, पण हे आपल्या पद्धतीप्रमाणे नाही, आपल्याकडे हे आवडत नाही, या सबबी पुढे करून स्वयंपाकघरापासून सुनांना दूर ठेवले जाते. स्वयंपाकघर हे सासूवर्ग स्वत:चे कार्यक्षेत्र समजतात आणि सुनेने काही करणे म्हणजे त्यांना लुडबुड वाटते, पण याच सासवा मुलांकडे परदेशी जातात तेव्हा गेल्या गेल्या किचनचा ताबा घ्यायला पुढे असतात. त्यासाठी सुनेला सगळे झेपत नाही, असा टोला मारायला विसरत नाहीत. सध्याच्या युगात सुना नोकरीवाल्या असतात आणि ऑफिसातले राजकारण, कामातले ताण  या सगळ्या गोष्टींमुळे घरी आल्यावर आपण काही चांगले केले तरी नावच ठेवणार असतील तर आपोआपच अलिप्तता वाढत जाते आणि वरच्या कामाला कामवालीबाई तर असतेच. त्यापेक्षा स्वयंपाकघरातील कामे सुरुवातीपासूनच थोडीफार वाटून घेतली, सुनेच्या चुका काढण्यापेक्षा तिला कुटुंबात सामावून घेतले तर हे चित्र अधिक सुसह्य़ होऊ शकेल. माझ्या परिचयामध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत, की लग्न झाल्यावर सुनेने नोकरी करून स्वयंपाक, घरातली कामे, पाहुणे सगळे बघावे अशी सासूची अपेक्षा असते आणि सासू मात्र ‘सास बहू’ मालिका बघत बसणार, कारण आतापर्यंत तिने खूप कष्ट केले आहेत. तरुण पिढीला दोष देताना आधीची पिढी विसरते की, एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता ५० वर्षे झाली आहेत आणि त्यांनी त्यांचे फायदे-तोटे अनुभवले आहेत. हे म्हणजे असे झाले की, आम्ही नाही राहिलो आमच्या सासू-सासऱ्यांबरोबर, पण आमच्या मुलांनी मात्र राहिले पाहिजे. हा अट्टहास सोडायला हवा.
– दुर्गा
 समजूतदारपणा हवा!
‘प्रश्नांकि त उत्तरायण’ हा लेख म्हणजे सरसकट केलेले भाष्य वाटते. प्रत्येक कुटुंबामध्ये परिस्थिती वेगळी असते. कधी कधी ज्येष्ठांचा आडमुठेपणा इतका असतो की, त्यांच्याबरोबर राहणे अशक्य होते. ही बाजू कोण मांडणार? कायम नवीन पिढीवरच दोष का? भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती असली तरी आपल्या संस्कृतीमध्ये ‘वानप्रस्थाश्रम’ हीसुद्धा संकल्पना आहे याचा लोकांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.
एक उदाहरण द्यावेसे वाटते. माझे वडील कामाच्या निमित्ताने बराच काळा परदेशात असतात. त्यामुळे त्यांना आमच्यासाठीच काय, माझ्या आजोबांकडे जायलाही वेळ नसतो, पण माझ्या आजोबांनी हे समजून घेतले. त्यांना याबद्दल विचारताच ते म्हणाले, ‘‘अगं, त्याला वेळ नसतो त्याच्या कामातून, याचा अर्थ त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय असा अजिबात नाही. तो आणि तुझी आई मला फोन करतातच की रोज! आणि तुझी आई भेटूनपण जाते दर ३-४ दिवसांनी.’’ आजकाल स्पर्धा, ताण इतका असतो की, सगळ्यांनी आपल्या दिमतीला राहावं, सतत आपल्यासोबत राहावं अशी अपेक्षा करणं चूक आहे, असे वाटते. असा समजूतदारपणा बाकी पालकांनी दाखवला तर?
– श्रिया
फ्रेमचे गणित
अतिशय नाजूक विषयावरील ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख वाचला. लेखिकेने नवरा-बायको-मुले आणि आजी-आजोबा (दोन्हीकडील) या फोटोजेनिक फ्रेमला धक्का न लावता लेख लिहिला आहे. आज प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची अशी फ्रेम इतकी कठोर व टोकदार झाली आहे, कीती माणसे कधी कधी दुसऱ्या फ्रेमला नको इतकी चिकटून राहतात अथवा एखाद्या फ्रेमच्या फक्त फोटोफ्रेममध्येच दिसतात, मनात नाही. फेसबुक, स्मार्ट फोन आणि तरुण पती-पत्नी, सासू-सासरे यामुळे फ्रेमची गणिते आज बदलत आहेत. लग्न झाल्यानंतरची एक वेगळी फ्रेम असूनही कालच्या पिढीची फ्रेम या नवीन फ्रेमला स्वत:च्या फ्रेममध्ये ओढू पाहते अथवा त्या नवीन फ्रेममध्ये जाऊ पाहते.
– एक वाचक
ज्येष्ठांनी एकत्र आले पाहिजे!
‘प्रश्नांकित.’मधील माझ्यासारख्याच काही समवयस्क पुरुषांना आलेल्या अनुभवांमुळे मी अत्यंत प्रभावित झालो आहे. मीसुद्धा ज्येष्ठ नागरिक असून सद्य:स्थितीत याच परिस्थितीतून जात आहे. अशा प्रश्नांचा गुंता सोडवण्याच्या दृष्टीने एखादी सामाजिक संस्था किंवा घर असणे ही या परिस्थितीतील अत्यंत निकड आहे, असे माझे प्रामाणिक मत असून, अशा ठिकाणी एकत्र जमून, चर्चा करून या प्रकारच्या समस्यांवर काही तोडगा काढता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे असे मला वाटते. मी एक विधुर असून माझ्या समस्या अत्यंत कठीण आहेत. माझ्या दृष्टीने या समस्यांतून मार्ग शोधण्यासाठी एक पर्याय म्हणून, समदु:खी समवयीन ज्येष्ठांनी एकत्र येऊन, एकमेकांच्या आवडीनिवडी आणि प्रश्न जाणून घेऊन त्यातूनच एकमेकांसाठी काही करता आले तर पाहावे असे वाटते. माझ्या या सूचनांबद्दल आपले मत काय आहे याबद्दल जरूर कळवावे.
– लक्ष्मण गुजर
अपेक्षा नकोच!
निवृत्तीच्या आसपास पालकांना येणाऱ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अनुभवांना आमच्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल राधिका टिपरे यांचे मनापासून आभार. आपल्या संस्कृतीत आईवडील मुलांना फार महत्त्व देतात. सर्व आयुष्य आणि पैसा केवळ मुलांसाठीच, त्यांना हौसेखातरच खर्च करतात. या प्रक्रियेमध्ये स्वत:साठी जगणेच विसरतात आणि परिणामस्वरूप, वयाच्या शेवटच्या टप्प्यावर मुलांकडून आर्थिक, मानसिक आधाराची अपेक्षा करतात. या प्रश्नाचे उत्तरही तुम्ही लेखामध्ये दिलेच आहे. आपण अपेक्षाच ठेवता कामा नये..!
भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे, तृष्णा हीच खऱ्या अर्थाने जीवनातील दु:खाचे मूळ कारण आहे. अर्थात अपेक्षा नाकारणे हेच या प्रश्नाचे उत्तर नाही. पालकांनी मुलांना घडवण्यातला आनंद समजून घेतला पाहिजे. तसेच अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांना आपल्या जबाबदारींची जाणीव होईल, अशा गोष्टी आवर्जून शिकवल्या पाहिजेत.
आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेणं, जबाबदारी स्वीकारणं ही प्रत्येक, स्त्री-पुरुषाची जबाबदारी आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. आपल्या मराठीतील ‘सुखांशी भांडतो आम्ही’ हे या विषयाशी निगडित सुरेख नाटक आपण पाहिजे नसल्यास जरूर पाहावे.
– सचिन माने
कालाय तस्मै नम:
‘प्रश्नांकित उत्तरायण’ या लेखात सध्याच्या कौटुंबिक परिस्थितीचे अतिशय मार्मिक व हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. त्याबद्दल अभिनंदन. खरं तर या प्रश्नाला अचूक उत्तर सापडूच शकत नाही म्हणून शेवटी ‘कालाय तस्मै नम:’  व ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ याच समाधानात राहणे योग्य/ अपरिहार्य ठरते.
– राम देशपांडे
  इतके कृतघ्न होऊ नका!
राधिका टिपरे यांचा ‘प्रश्नांकित उत्तरायण’ आणि मोहना जोगळेकर यांचे ‘कधी संपलं हे सारं?’ हे लेख वाचून माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. माझ्या परिचयातील एका वृद्ध जोडप्याची परवड आठवली. अत्यंत पापभीरू असणारे भोळे दाम्पत्य. चौदा वर्षांपूर्वी एका रो हाऊस स्कीममधील शेवटच्या टोकाला असलेल्या घरी राहायला गेले होते. वरच्या लोकांनी नळांना जोडलेले वीजपंप बंद होईपर्यंत भोळ्यांकडे पाणी येत नसे. याविरुद्ध त्यांनी कधीही तक्रार केली नाही. पंपाने पाणी खेचून घेण्याची शक्कल लढवली नाही. उलट तुम्हा दोघांना कितीसं पाणी लागणार? दोन हंडे आमच्याकडून घेऊन जा, अशी उपकाराची भाषा त्यांना ऐकावी लागत असे. बोळात क्रिकेट खेळणाऱ्या पोरांकडून खिडकीच्या फुटलेल्या काचेविषयी विचारले, तर यांचाच निपुत्रिक म्हणून उद्धार झाला. एक गॅस सिलेंडर तुम्हाला तीन महिने जात असेल ना आजीबाई, असे कुत्सितपणे विचारले जात असे. आजोबांच्या एवढय़ा पेन्शनचे काय करता म्हणून हिशोब विचारले जात. कुणाचेही मन न दुखावणाऱ्या या जोडप्याविषयी शेजाऱ्यांची भीड दिवसेंदिवस चेपत गेली. त्यांच्या गेटसमोर आडव्यातिडव्या गाडय़ा उभ्या राहू लागल्या. कचरा जमा होऊ लागला. जाता-येता आजी-आजोबा अडखळू लागले. आपल्या स्वत:च्या वागण्याची ज्याला त्याला लाज वाटली पाहिजे, आम्ही त्यांना काय सांगणार, असे हताश उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडू लागले. पण लक्षात कोण घेतो? ‘आम्ही चौदा वर्षांचा वनवास संपवून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.’ वार्धक्यातील विविध आजारांनी हैराण झालेले भोळे दाम्पत्य सांगत होते.
   आमच्या समाजात पिकल्या पानांची घरच्यांकडून आणि बाहेरच्यांकडून होणारी परवड कधी थांबणार? आपल्यासाठी करणारं कुणी नाही या भावनेनं दु:खी होणाऱ्या निराधार जोडप्यांप्रति समाजाची, शेजाऱ्यांची काही बांधीलकी आहे की नाही? आपल्या आसपास राहणाऱ्या हळव्या झालेल्या, इतरांच्या सान्निध्यासाठी आसुसलेल्या ज्येष्ठ जोडप्यांसाठी तुम्हाला काही करायचे नसेल तर करू नका, परंतु तुमच्या वागणुकीमुळे त्यांना जीवन नकोसे वाटावे इतके कृतघ्न तरी होऊ नका.
– सोमनाथ देशमाने, अहमदनगर.