नवीन वर्षांतील ‘चतुरंग’ वाचून समाधान वाटले. ‘शांतता टोमणे सुरू आहेत’ हा मंदार भारदेंचा लेख वाचून निखळ मनोरंजन झाले. ‘स्मृति आख्यान’ कंटाळवाणे न वाटता उपदेशपर वाटले. ‘अल्झायमर’ होऊ नये म्हणून काय करायला हवे, ते साध्या सोप्या शब्दांत सांगितले आहे. नवीन माध्यमांशी प्रत्येक जण जुळवून घेईल, तर आयुष्य नक्कीच सुखकर होईल. ‘सावित्रीच्या लेकीं’विषयी खूप वाचले आहे, पण जोतिबांच्या लेकांविषयी आता समजून येईल. खरे तर स्त्रीला सामाजिक प्रवाहात आणण्याचे कार्य आपल्याकडे पुरुषांनी सुरू केले हे विसरून कसे चालेल. ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन रिलेशनशिप’ मात्र आपल्या समाजाच्या पचनी पडायला बराच काळ जावा लागेल. कारण आपली मानसिकता या विचाराची नाहीये. मानसोपचारतज्ज्ञ

डॉ. आशीष देशपांडे यांच्यासारख्यांच्या सल्ल्याची आज खूप गरज वाटते. ‘गद्धेपंचविशी’तून आजच्या धडपडणाऱ्या तरुणांना शिकण्यासारखे खूप आहे. एकंदरीत, नवीन वर्षांची सुरुवात छान झाली आहे. असेच विविध लेख वाचायला मिळू दे!

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

– अंजली अरविंद भातखंडे,

अलिबाग, रायगड ‘पुरुषांचे प्रांजळ मनोगत’ नेमके !

‘पुरुष हृदय बाई’ सदरातील सुनील सुकथनकर यांचे ‘आम्हा पुरुषांचे प्रांजळ मनोगत’ वाचले आणि पोट धरून हसले, मनापासून! त्यांनी नेमके, मोजके लिहिले आहे याबद्दल अपार आनंद आहेच, पण पुरुषप्रधान संस्कृतीचे खरे रूप या लेखात उमटले आणि ते एका पुरुषाने लिहावे याचेही कौतुक आहे.

एरवी आम्ही अनेक जणी स्त्रीवादी लेखन करत असतो अन् समाजाकडून आणि कधी कधी आमच्या भगिनींकडूनही ‘ट्रोल’ होत असतोच. पण अशा परिस्थितीत सगळ्या शक्यता धरूनही आपण लेखात पुरुषप्रधान संस्कृतीचे सगळे गुणावगुण अचूक लिहिले. याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच. असे बऱ्याच पुरुषांना कळेल तो सुदिन!

– उमा मोकाशी, पुणे</strong>

स्त्रीच्या घरकामाचे मोल, मूल्य आणि मान!

‘घरकामाचे मोल’ हा स्त्री चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यां लता भिसे सोनावणे यांचा लेख (१६ जानेवारी) वाचताना टीव्हीवरील आईविषयीच्या सध्या गाजणाऱ्या एका मालिकेची आठवण झाली. गृहीत धरलेल्या गृहिणीची व्यथा त्यात योग्य रीतीने मांडली आहे. परंतु घरकामाचे मोल मूल्यात करून आम्हाला मोलकरीण करू नका, असेच सारासार मत गृहिणींचे असावे असे वाटते.

‘घरकामाचे मूल्य स्त्रीचा पती कार्यालयात जाऊन करत असलेल्या कामाच्या तुलनेत कमी नाही,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले, हे बरोबर. पण घरकामाला मोबदला पतीने दिला तर तो ताटातला वाटीत असाच होईल. हे राष्ट्रीय उत्पन्नात कसे धरणार? हा मोबदला (पगार) प्राप्तिकर विभाग तिचे उत्पन्न म्हणून मान्य करेल का? याउलट मोल आणि मूल्य यात फरक केला तर मान (आदर) राहील का? ‘ती आहे म्हणून आम्ही आहोत. ती नसते तेव्हा कळते ती आहे,’ ही जाणीव आणि आदर कुटुंबात महत्त्वाचा. ती जगाला आत्मिक समाधानाने सांगते, ‘दु:ख नाही याचे मी आहे गृहिणी, फक्त बदला तुम्ही तुमची विचारसरणी!’  समाधानाची बाब म्हणजे हल्लीचे तरुण चहाच्या पहिल्या कपाबरोबर वृत्तपत्र वाचण्याचे भाग्य तिला देतात, असे आढळून येते. भले जुनी पिढी (ज्येष्ठ नागरिक) याकडे कुत्सितपणे बघेल! जमाना हळूहळू का होईना बदलतो आहे, हेही नसे थोडके.

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई</strong>

‘मी, रोहिणी’ उत्सुकता वाढवणारं

प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे ‘मी, रोहिणी..’ सदर वाचले. त्यांच्या अभिनयाबद्दल खूप लिहिलं गेलं असलं तरी त्यांच्या आयुष्याबद्दल फार काही वाचलेलं नाही. त्यांची जीवनकहाणी वाचायला उत्सुक आहोत. सदराचा प्रत्येक भाग वाचल्यावर पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता वाढीस लागते.

‘गांधी’ चित्रपटासाठी नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांनी ‘ऑडिशन’ दिली होती हे वाचले होते, पण जॉन हर्ट आणि भक्ती बर्वे ही जोडीसुद्धा ऑडिशनला होती, हे नव्याने कळले. नसीरजी आणि स्मिता पाटील यांचे ऑडिशनच्या वेळचे छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे, पण भक्ती बर्वेचे त्या वेळचे छायाचित्र उपलब्ध नाही. रोहिणीताईंचा लेख म्हणजे त्या काळाचा दस्तावेज जणू! वर्षभर ही वाचनीय मेजवानी लाभणार याचा आनंद आहे.

– मंगेश शशिकला पांडुरंग निमकर, कळवा

कुटुंबीयांची मानसिकता बदलावी

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या वटवृक्षाच्या खोलवर रुजलेल्या पाळामुळांच्या बरोबरीने आता स्त्रीवर्गाच्या जाणिवेच्या पारंब्याही जमिनीकडे रुजण्यासाठी झेपावू लागल्याचे पाहायला मिळत आहे. गृहिणींचे काम हे पतीच्या कार्यालयीन कामाइतकेच महत्त्वाचे असते, या न्यायालयाच्या दाखल्याने कागदोपत्री पुरुषांच्या बरोबरीने मूल्यमापन केले गेले ही गोष्ट स्वागतार्ह म्हणावी लागेल. ही समानता कौटुंबिक व्यवस्थेत सर्व पातळ्यांवर झिरपणे गरजेचे आहे. ‘हाऊसवाइफ’ शब्दाची जागा ‘होममेकर’ने घेतली हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल.

कधी नव्हे ते ‘करोना’मुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना सक्तीने घरी बसावे लागले, त्यातच घरी कामाला मदतनीस येणे बंद झाल्याने घर चालवण्यातील अडथळ्यांची शर्यत सर्वाना पाहायला मिळाली. ‘घी देखा था बडगा भी देख लिया’ अशी अवस्था सर्वाची झाली. घरातील स्त्रियांची ओढाताण पाहायला मिळाली आणि आपोआपच  सर्वाना मदतीचा पाझर फुटला. नोकरी न करता पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या पत्नीला आणि कुटुंबीयांनाही जेव्हा ‘या काय करतात?’ या प्रश्नाला ‘काही नाही, घरीच असते’ असे उत्तर द्यावेसे वाटते, तेव्हाच स्त्रियांचे अवमूल्यन झाले असे म्हणावेसे वाटते. पुरुष जेव्हा घरातील सर्व दायित्व पत्नीवर सोपवतात आणि त्या ते समर्थपणे निभावतात, त्या वेळी सर्व कामांचे मूल्यमापन पैशांत करणे शक्यच नसते. त्या भक्कम आधारावर पुरुष आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहू शकतात. कुटुंबीयांची मानसिकता जोखून, समस्या जाणून, त्यांना मानसिक आधार देत त्यांना एकत्र गुंफण्याची जबाबदारी गृहिणी पार पाडत असते. आर्थिक सुस्थितीसाठी पत्नीची नोकरी अपरिहार्य ठरू लागली आणि घर, नोकरीची दुहेरी जबाबदारी झेलताना स्त्रियांची ओढाताण वाढली. अशा परिस्थितीत तर स्त्रियांच्या मदतीचे मूल्यमापन दुपटीकडे झुकलेले मान्य करायला हवे. जेव्हा आर्थिक भार उचलण्याची अपेक्षाही घरातील स्त्रीकडून केली जाते, तेव्हा तर त्यांचा मानसन्मान नक्कीच वाढलेला लक्षात घ्यायला हवा. हळूहळू ही सुधारणा घडत आहे, या विषयावर गांभीर्याने चर्चा होत आहेत. तरीही न्यायालयाच्या निर्णयापेक्षा कुटुंबीयांची मानसिकता बदलणे गरजेचे ठरते.

– नितीन गांगल, रसायनी

‘जगणं बदलण्याचा’ वेग अफाट

नववर्षांतील ‘चतुरंग’ वाचनीय आहे. ‘जगणं बदलताना’ सदरातील अपर्णा देशपांडे यांचा ‘ही पहाट वेगळी आहे’ हा लेख विशेष आवडला. अगदी शीर्षकसुद्धा चपखल आहे. सध्या पन्नाशीच्या पुढेमागे असलेल्या पिढीसाठी खरोखरच बदलांचा वेग खूप जास्त आहे. एखाद्या वेळी मती गुंग होऊन जावी इतका जास्त! त्याच्याशी जुळवून घेताना होणारी कसरत अपर्णाताईंनी खुसखुशीतपणे मांडली आहे. आणि हो, बदल ‘पॉझिटिव्हली’ स्वीकारायचा असतो, हेही त्यांनी उपदेश न करता, हलक्याफुलक्या शैलीत सांगितले आहे. लेखातील नवऱ्याला दिलेली पाघळलेल्या लाडवाची उपमा तर अफलातून!

– अंजली जयंत कुलकर्णी

आजच्या पिढीची पहाट वेगळीच!

अपर्णा देशपांडे यांच्या ‘जगणं बदलताना’मधील लेखाच्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले, ‘ही पहाट वेगळी आहे’. जगण्यातील संघर्ष कितीही अटळ असला तरी त्यातूनही आनंद घेणे जमले पाहिजे हे मान्य. आजच्या पिढीची पहाट वेगळी आहे हे तर खरेच, पण आपण ती रम्य करायची की निरस हे आपल्या हातात आहे. हे सदर वाचायला निश्चित आवडेल.

– अर्चना सातपुते