अतिसामान्य कुटुंबात वाढलेल्या झ्यांगने शिक्षणाच्या मदतीने स्वत:ला एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं की ‘सोहो चायना रिअल इस्टेट कंपनी’ ही तिची छोटीशी कंपनी आज १० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती असलेली बलाढय़ कंपनी बनली आहे. चीनमधल्या बहुतेक मोठय़ा शहरांतून या कंपनीचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. व्यावसायिक आस्थापनांच्या निर्मितीसाठी रिअल इस्टेट क्षेत्रात ही कंपनी चीनमधली अग्रेसर मानली जाते. आज झ्यांग चीनमधली श्रीमंत स्त्री  म्हणून ओळखली जाते. त्या झ्यांगविषयी..

आ ज चीनमध्ये जे यशस्वी उद्योजक, कारखानदार, इतर व्यावसायिक आहेत त्यापैकी ‘सोहो कन्स्ट्रक्शन’ या सुप्रसिद्ध कंपनीची सीईओ असलेली ‘झ्यांग शीन’ हीदेखील एक! चांगले संपन्न आयुष्य जगण्याचा आणि तसे जीवनमान कमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे मानणारी आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे स्पर्शणारी झ्यांग.
ही पिढी जेव्हा तारुण्यात पदार्पण करत होती तो वैचारिक अभिसरणाचा काळ होता. दारिद्रय़, अभावाचे आयुष्य हीच आपली जीवनशैली हे यांना पटत नव्हते. ही अस्वस्थता, घुसमट झ्यांगच्या पिढीला आपल्या न्याय्य हक्कांसाठी काही तरी करण्याची प्रेरणा देत होती. आपल्या देशात हे शक्य नाही तर इथून बाहेर पडून का होईना आपले आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न अनेक जण करू लागले.
संपन्न आयुष्याची प्रचंड आस यातूनच झ्यांगच्याही मनात निर्माण झाली असावी. विख्यात ‘फोब्र्ज’ नियतकालिकाच्या मानांकनानुसार ‘झ्यांन शीन’ ही  २०१४ सालची सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये ६२ व्या क्रमांकावर आहे. वॉँट चायना टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ती स्वकर्तृत्वाने मोठी झालेली चीन मधली सहावी तर जगातली पाचवी श्रीमंत महिला आहे.  
झ्यांग चीनमधल्या एका खेडय़ात सांस्कृतिक क्रांतीच्या काळात १९६५ मध्ये एका अति सामान्य कुटुंबात जन्मली. जेव्हा झ्यांग आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई दुभाषाच्या नोकरीसाठी बीजिंगला आली. झ्यांगला आपल्यासोबत घेऊनच ती नोकरीवर रुजू झाली, पण त्यातून मिळणारी कमाई इतकी अत्यल्प होती, की झ्यांग आणि तिच्या आईला घर भाडय़ाने घेणेसुद्धा शक्य नव्हते. कधी आईच्या ऑफिसमधल्या डेस्कवर पुस्तके उशाशी घेऊन त्या दोघींनी काही वर्षे तिथे काढली.
 वयाच्या चौदाव्या वर्षी झ्यांग हाँगकाँगला नोकरीच्या शोधात गेली खरी, पण तिथेही तिच्या वाटय़ाला निराशा आली. बीजिंगपेक्षाही वाईट परिस्थितीत तिला हाँगकाँग येथे राहावे लागले. एका ‘स्वेट शॉप’मध्ये जिथे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कामगारांना दीर्घवेळ काम करावे लागते, झ्यांगला नोकरी मिळाली. इथे काम करत असताना इथून आपली सुटका कशी करून घेता येईल हेच विचार सतत तिच्या मनात घोळत असत.   
पण झ्यांग अपरिपक्व नव्हती. इथून आताच बाहेर पडलो तर उपाशी मरू हे तिला पक्के ठाऊक होते. तिने या शॉपमध्येच काही काळ  काम केले आणि लंडनचे तिकीट घेता येईल एवढी रक्कम बचत करून जमवली. लंडनला आल्यावर कसाबसा निवारा शोधून तिने माशांचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टँडवर किंवा चिप्सच्या स्टँडवर काम करून आपल्या दैनंदिन गरजा भागवल्या. ‘‘इथे लोकांशी बोलताना मला प्रचंड वैताग येत असे, कारण माझे इंग्रजी तितकेसे चांगले नव्हते.’’
पण हार मानेल तर ती झ्यांग कसली? लवकरच तिने इंग्रजी भाषेसाठी क्लास लावला आणि आपली अडचण दूर केली. मुळातच तल्लख बुद्धीच्या झ्यांगला या क्लासच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळाली आणि सुरुवातीला ससेक्स आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला. इथून तिने इकॉनॉमिक्स विषयात ‘मास्टर्स’ पदवी मिळवली.
‘‘१९९२ सालची ही गोष्ट आहे. माझ्या देशाने म्हणजे चीनने परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यास सुरुवात केली होती. मला गोल्डमन सॅश कंपनीत इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी मिळाली आणि फायनली ‘स्वेट शॉप’मध्ये काम करणाऱ्या एका गरीब मुलीला आपले उत्तम दर्जाचे आयुष्य जगण्याचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान मिळाले,’’ झ्यांग सांगते.
लवकरच झ्यांग शीनच्या लक्षात आले की, इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा आपला इलाका नाही. ती ज्या विचारसरणीच्या वातावरणात वाढली होती त्याच्या अगदीच विपरीत व्यवहार तिला या क्षेत्रात करावे लागत होते. तिने मायदेशी म्हणजेच चीनला परतायचा निर्णय घेतला. चीनला परतल्यावर अगदी काहीच दिवसांत तिची भेट पॅन शियी या तरुणाशी झाली. शियी आणि झ्यांग दोघांच्याही बाबतीत एक समानता होती. दोघेही चीनमधल्या अत्यंत गरीब स्तरातून आलेले होते. पॅन तर  झ्यांगपेक्षाही वाईट परिस्थितीतून आलेला!
पण पॅनच्या डोळ्यांत अगणित स्वप्ने होती. आपल्या देशाला  व्यवसाय क्षेत्रात खूप पुढे नेण्याची स्वप्ने बाळगून असलेला आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील असलेला युवा वर्ग मोठय़ा संख्येने चीनमध्ये उदयास येत होता. पॅन हा त्यापैकीच एक!
‘समानशीले व्यसनेषु सख्यं’ म्हणतात त्यानुसार झ्यांग आणि पॅन या दोघांच्याही डोक्यात चीनच्या समृद्ध भविष्यासाठी काही तरी ठोस करण्याचे विचार चालू होते. पहिल्या भेटीतच दोघांनाही आपण एकमेकांसाठी जन्माला आलो असल्याचे जाणवले आणि पहिल्या भेटीनंतर केवळ चार दिवसांनी पॅनने झ्यांगला लग्नासाठी विचारले.
त्या वेळचा एक किस्सा झ्यांग गमतीने सांगते. ‘‘एक दिवस पॅन मला एका उंच इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेला. या इमारतीचे बांधकाम पूर्णही झालेले नव्हते. उंचावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर मला दाखवत तो म्हणाला, ‘बघ झ्यांग, आता लवकरच बीजिंगचे म्यानहटन बनणार आहे.’ त्याच्या या बोलण्याला मी फार गांभीर्याने घेण्याची त्या वेळची परिस्थिती नव्हती. मी खळखळून हसले; पण आज वीस वर्षांनंतर आमच्या सोहो कंपनीने हा परिसर मूळ म्यानहटनपेक्षाही अधिक देखणा बनवला आहे. पॅनचे हे स्वप्न आम्ही दोघांनी मिळून साकार केले याचा मला खूप अभिमान वाटतो.’’
पॅन आणि झ्यांग यांनी विवाह केल्यानंतर अगदी सुरळीत आयुष्य पार पडले असे अजिबात झाले नाही. विवाहानंतर या दोघांनी मिळून ‘सोहो चायना’ व सोहो (Small office home office) ची स्थापना केली, पण लवकरच काही ना काही कारणांवरून दोघांत मतभेद होऊ  लागले. वैतागून झ्यांग मग इंग्लंडला निघून गेली; पण फार काळ ती पॅनशिवाय राहू शकली नाही. ती चीनला परत आली. त्यांचे मतभेद विरले होते असे नाही. म्हणून झ्यांगने काही वर्षे घरीच राहण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान तिने दोन अपत्यांना जन्म दिला.
‘सोहो’ ही दोघांनी मिळून स्थापलेली कंपनी आता चांगलीच आकाराला येऊ  लागली होती. तिने परत आपले ऑफिसचे काम सुरू करावे आणि आपल्या अनुभवाचा फायदा कंपनीला मिळवून द्यावा यासाठी पॅन आग्रही राहिला. मुले थोडी मोठी झाल्यावर झ्यांगने परत कामाला सुरुवात केली. २००५ साली पॅनने कंपनीतले शेअर्स झ्यांगच्या नावे केले. पॅन आता एक यशस्वी ब्लॉगर आहे.
आज पॅन चीनमधला रिअल इस्टेटचा प्रचंड मोठा व्यवसाय सांभाळतो आणि झ्यांग आपला वॉल स्ट्रीटचा अनुभव कंपनीसाठी परदेशातून फंड मिळवण्यासाठी वापरते. झ्यांगवर आपल्या कंपनीसाठी आर्किटेक्ट्स नेमण्याची जबाबदारी आहे. जगातील फक्त सर्वोत्तम आर्किटेक्ट्स ती आपल्या कंपनीसाठी निवडते. सुरुवातीला ‘सोहो चायना रिअल इस्टेट कंपनी’ असे नाव असलेली एक छोटीशी कंपनी आज अत्यंत कल्पक आणि खंबीर नेतृत्वामुळे १० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती असलेली बलाढय़ कंपनी बनली आहे. चीनमधल्या बहुतेक मोठय़ा शहरांतून या कंपनीचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. व्यावसायिक आस्थापनांच्या निर्मितीसाठी रिअल इस्टेट क्षेत्रात ही कंपनी चीनमधली अग्रेसर मानली जाते.
चीनमध्ये नव्याने उदयाला येऊ  लागलेल्या भांडवलशाहीच्या संकल्पना आणि त्यातून आकाराला येऊ  लागले व्यवसाय बरोबर हेरून ‘सोहो’ने सुरेख स्थापत्य आणि सर्वाना     
परवडतील अशा किमतीची आस्थापने, दुकाने व इतर व्यावसायिक इमारतींचे बांधकाम हाती घेतले. त्याचप्रमाणे ‘सोहो’ने बनवलेली मोठमोठाली हॉटेल्सदेखील त्यांच्या अभिनव स्थापत्यामुळे सर्व जगाचे लक्ष वेधून घेत राहिली. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार झ्यांगच्या ‘सोहो’ला मिळाले आहेत.
आज बीजिंगला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यात जिचा सिंहाचा वाटा आहे अशा झ्यांगची बालपणाची गरीब पाश्र्वभूमी पाहता तिला आज चीनमधले तरुणाईचे प्रेरणास्थान आणि एक लोकप्रिय ‘सेलेब्रिटी’ मानले जाते. इतक्या अफाट संपत्तीची मालकी असूनही  झ्यांगला मात्र सर्वसामान्य माणसासारखे राहणीमान अधिक भावते.
‘‘माझ्या दोन्ही मुलांनी कुठेही अगदी केएफसी किंवा मॅकडोनाल्ड्समध्ये नोकरी शोधावी, आपापल्या परीने स्वत:च्या आकांक्षांना फुलवत आपले आयुष्य घडवावे, मुले आपल्याप्रमाणेच स्वकष्टातून मोठी व्हावीत असेच मला वाटते.’’
मानसन्मान, पत, प्रतिष्ठा, ऐश्वर्यसंपन्न कौटुंबिक जीवन-  आज एवढे सगळे वाटय़ाला आल्यानंतर कोण समाधानी राहणार नाही? याचे उत्तर आहे ‘झ्यांग’! का? तर आता तिला तिच्या मुख्य ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे! चीनमध्ये संपूर्ण लोकशाही व्यवस्था नांदलेली पाहाणे हे आता तिचे स्वप्न आहे.
शिक्षणातून दारिद्रय़ निर्मूलनाचा ध्यास घेऊन ‘सोहो चायना एज्युकेशन फंड’ची स्थापना या जोडप्याने केली आहे. लौकिकार्थाने सर्व काही मिळवलेल्या व्यक्तीलाही आत्मिक समाधानाची कधीना कधी ओढ लागतेच! स्वकष्टाने मिळवलेल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर केवळ भौतिक संपन्नता मनुष्याला पूर्णत्वाकडे नेऊ  शकत नाही ही जाणीव आज जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत असलेल्या  झ्यांगला आहे हे चित्र असेच काही सूचित करणारे आहे.