25 October 2020

News Flash

निरामय घरटं : निकोप स्वातंत्र्य

प्रत्येक माणसाचे स्वत्त्व, स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य, याबाबतचे विचार सापेक्ष असतात.

आपलं स्वातंत्र्य हे दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही याबद्दल सतर्कता निर्माण करायचा प्रयत्न घरातून व्हायला हवा.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

प्रत्येक माणसाचे स्वत्त्व, स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य, याबाबतचे विचार सापेक्ष असतात. आपलं स्वातंत्र्य हे दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही याबद्दल सतर्कता निर्माण करायचा प्रयत्न घरातून व्हायला हवा. केवळ आर्थिक आत्मनिर्भरता ही स्वातंत्र्याची अपुरी संकल्पना आहे. मुलांना शैक्षणिक आणि व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासोबत ‘माणूस घडवणं’ ही कुटुंबाची मूलभूत जबाबदारी आहे. परस्परपूरक स्वातंत्र्याशी बांधील अशी आपल्या घरटय़ाची मजबूत बांधणी करू  या..

‘ओळखलंत का?’’  घरच्या वाटेवर असताना एका युवकानं मला थांबवून विचारलं. काही क्षण मी बघत राहिले. पटकन ओळख लक्षात येईना. ‘‘तुम्ही आमच्या शाळेत यायचात. कशा ओळखणार?  मी केस वाढवले आहेत,’’ तोच हसून म्हणाला, ‘‘ तुम्हाला तर माहितीच आहेत शाळेचे कडक नियम.. केस बारीक कापलेले, गणवेश नीटनेटकाच.’’ तो पुन्हा हसला. एकमेकांची विचारपूस झाली आणि तो त्याच्या वाटेनं पुढे गेला. आणि मी माझ्या वाटेनं निघाले. पण त्याचं बोलणं विचारात पाडणारं होतं..

दहावीपर्यंत ‘शाळकरी’ दिसणारी मुलं अकरावीत, महाविद्यालयात शिरली नाहीत, की चेहरामोहराच बदलून टाकतात. शाळेच्या नियमांतून सुटका झाल्यावर एकदम सुटतातच.  विचार के ला तर कशासाठी असतात शाळेतले नियम? मुलांना त्याचा अर्थ शिक्षक किंवा पालक कुणी उलगडून देऊ शकतात का? अभ्यासात आणि व्यक्तीच्या घडणीवर लक्ष केंद्रित व्हावं, अन्य व्यवधानं आणि प्रलोभनांपासून विद्यार्थीदशेत मुलांनी विचलित होऊ नये, हा मुख्य उद्देश केंद्रस्थानी ठेवून आवश्यक ते नियम आखले जातात. जखडणं हा हेतू नसतो, हे त्यांना त्या वयात लक्षात येतं का?  शिकण्यासाठी मुलांची मानसिक तयारी हा संस्कार असतो. शाळेबाहेर वावरतानाही जेव्हा योग्य राहणीमान स्वीकारलं जातं, तेव्हा तो कुणीतरी लादलेल्या नियमापलीकडचा आचरणात उतरलेला संस्कार होतो. मग कुणी आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणली, असं वाटायचा प्रश्न येत नाही. नियम पाळण्यात अडकलेपणाचा गाजावाजा न होता आपलं हित अधोरेखित व्हायला हवं.

एका नातेवाईकांच्या घरी जेवणानंतर सगळ्यांना वेगवेगळ्या वाटीत आइसक्रीम दिलं गेलं. छोटय़ा युगंधरला मात्र आई स्वत:च्या वाटीतून भरवू लागली तर युगंधर घास घ्यायला तयार होईना. त्यालाही त्याची वाटी हवी होती. लहान वयातही स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव व्हायला सुरुवात होते. स्वतंत्र अस्तित्वाचा आवश्यक तो आदर, व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिवादाचं अनावश्यक प्रस्थ यातलं नेमकं अंतर स्पष्टपणे राखता येतं. शौनक आणि रोनक हे सख्खे भाऊ. एकाला संगीताची जाण, तर दुसऱ्याला संगीताची जराही आवड नाही; तो प्राण्यांमध्ये रमणारा. या भावंडांच्या व्यक्तिगत रुचींचा आदर त्यांच्या घरानं कायम केला. व्यक्तिगत आवड जोपासण्याचं स्वातंत्र्य घरानं त्यांना दिलं. शौनकचा संगीत रियाज रोनकला आवडत नाही, म्हणून दोघांच्या खोल्या मात्र स्वतंत्र केल्या नाहीत. आवडीनिवडी स्वतंत्र असू शकतात. एकमेकांशी जुळवून घेणं व्यक्तिस्वातंत्र्याला छेद देणारं नसतं. आधुनिक जीवनशैलीत हा संस्कार करण्याचा आग्रह प्रत्येक घरानं धरावा.

आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आत्मनिर्भर करायचं, असं दिनेश आणि दीपालीनं ठरवलं होतं. साधारणपणे कुमारवयात मुलांची स्वतंत्र अस्मिता ठळकपणे पुढे येते. ‘मी माझं बघून घेईन, तुमची लुडबुड नको,’ असं ते बेफिकिरीनं सांगणारं वय पेलायला दिनेश आणि दीपालीला जड जात होतं. अशातच औपचारिक शिक्षणाभोवती मुलांचा आणि त्यांचा सारा दिनक्रम फिरत होता . मनुष्य घडणीची ही महत्त्वाची र्वष होती, याकडे काहीसं दुर्लक्ष होत होतं. व्यवहारातलं स्वावलंबन आणि सामाजिक जगण्यातलं परस्परावलंबन शिकायला अवधीच नव्हता. परीक्षेत उत्तम यश मिळवून त्यांच्या हर्षदनं चांगल्या विद्यापीठात प्रवेशही मिळवला. पण गजर लावून सकाळी वेळेत उठायचं, हे शिकायची वेळ वसतिगृहात गेल्यावरच आली. मागे लागून उठवायला कुणी जवळ नसल्यानं उठायला उशीर झाला, वर्गातले काही तास बुडले, तेव्हा हर्षदला स्वावलंबनाचा नवीन धडा मिळाला. पुरेशी आर्थिक कमाई होऊ शकेल अशी पातळी त्यांच्या मुलीनं- मधुरानं गाठली. पण संसार सांभाळून स्वत:च्या कामाचं स्वतंत्र विश्व पेलतानाच्या कसरतीत ती काहीशी गोंधळून गेली. लहानपणापासून आपली खोली भावंडं, आजी-आजोबांसोबत वापरायची मधुराला सवय नव्हती. लग्न झालं म्हणून जादूची कांडी फिरवल्यासारखं एकमेकांशी जुळवून घेणं सहज कसं जमणार? या परिस्थितीशी जुळवून घेताना लहानपणी कुटुंबात जर परस्परावलंबन अनुभवलं असतं तर ते मदतीला आलं असतं. दीपालीची  मैत्रीण त्यांना आपुलकीनं आणि वडीलकीच्या नात्यानं सांगायची, ‘‘मुलांना अभ्यासाबरोबर घरातली कामं करायची सवय असू देत. परीक्षा, मित्रमैत्रिणी यापलीकडे त्याचं विश्व इतरांनाही सामावणारं असू देत.’’ पण दिनेश, दीपालीला तेव्हा त्याला प्राधान्य देण्याचं गांभीर्य वाटलं नाही. सध्याच्या काळात आर्थिक आत्मनिर्भरता ही सामान्य माणसाची मूलभूत गरज आहे. पण मुलांना शैक्षणिक आणि व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासोबत ‘माणूस  घडवणं’ ही कुटुंबाची मूलभूत जबाबदारी! केवळ आर्थिक आत्मनिर्भरता ही स्वातंत्र्याची अपुरी संकल्पना. म्हणूनच ती निकोप नाही.

राहणीमानातल्या बदलांमुळे व्यक्तीगणिक मोबाइल, घरटी एकापेक्षा जास्त वाहनं, ही शहरी जीवनात कदाचित चैन नाही, तर सोय झाली आहे. या साधनांकडे जोपर्यंत दळणवळणाची साधनं म्हणून पाहिलं जातं, तोपर्यंत अडचण नसते. पण ही साधनं व्यक्तिगत परीघ ठरवतात. त्या परिघाच्या आत कुणी नुसतं डोकावलं, तरी ‘तू माझ्या मोबाइलला हात का लावलास’ हा जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्यातला हस्तक्षेप वाटतो तेव्हा गोंधळाला सुरुवात झाली असं समजावं. स्वातंत्र्याची आपली व्याख्या किती संकुचित ठेवायची याला नक्कीच मर्यादा आहे.  स्वातंत्र्याची व्यापक आणि खोल समज हे मनाच्या समृद्धीचं एक लक्षण मानता येईल. देश स्वतंत्र होण्यासाठीच्या लढय़ात अतिशय कठीण परिस्थितीत स्वत: कोठडीत बंदिस्त राहायला हसतमुखानं तयार झालेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांची धारणा काय होती? ते स्वत:चे फाजील चोचले पुरवण्यापासून, स्वत:ची प्रौढी मिरवण्यापासून किती लांब होते हेही लक्षात घ्यायला हवं, कारण देश पारतंत्र्यात असला तरी ते वीर मनानं निकोप स्वतंत्र होते. कारागृहातही काव्यरचना आणि लेखन करत, इतर कैद्यांची प्रेरणा बनत देशाला स्वातंत्र्य मिळेलच हा दुर्दम्य आशावाद बाळगून होते. दृढ विश्वास ढळू न देता हालअपेष्टा सोसत बंदिस्त असूनही ते मुक्त होते.

एकीकडे संघर्षांनं आणि बलिदानानं मिळवलेलं देशाचं स्वातंत्र्य, जागतिक इतिहासात माणसांनी अनुभवलेली गुलामगिरी आणि भेदभावाची वागणूक, काही स्त्रियांच्या अजूनही वाटय़ाला येणारं पदोपदी जाचक बंधनाचं रोजचं जगणं, तर दुसरीकडे सधन, सुशिक्षित समाजात अनाठायी मागितल्या जाणाऱ्या सवलती, स्वैराचाराकडे झुकणारं वागणं आणि व्यक्तिवादासाठी आरडाओरड. आपल्या स्वत:ला, मुलांना, कुटुंबाला, स्वातंत्र्य म्हणजे काय वाटतं? याचा मुळापासून समग्र विचार करणं, आणि जबाबदारीनं रोजच्या व्यवहारात जगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ते चोख बजावतच आपण आपल्या हक्कांबद्दल आग्रही राहू शकतो.

घरातल्या एकाचं मनोरंजनाचं साधन दुसऱ्याच्या कामातल्या एकाग्रतेला व्यत्यय आणत नाही ना, कुणाची घरी परतायची वेळ मनमानीनं ठरवण्यामुळे पूर्ण घराची घडी विस्कळीत होत नाही ना, अशा रोजच्या व्यवहारांबाबतही परस्पर स्वातंत्र्याची काही पथ्यं बऱ्याच घरांत पाळली जातात. घरातल्या कुणा एकानं कुटुंबासाठी आपले पंख आवरते घेणं आणि बाकीच्यांनी स्वच्छंदी विहरणं ही तफावत होत नाही ना, इथपर्यंत; आणि कुटुंबासाठी चौकट आणि चौकटीबाहेरची मोकळीक, अशा सामाईक स्वातंत्र्याचा विचार घराघरांत आवर्जून व्हावा.

मोकळीकीमुळे गैरकृतींकडे चुकूनही न वळणं, याचं गांभीर्य आपण स्वत:पासून सुरुवात करत कुटुंबापर्यंत पोहोचवूया. वाढती स्वकेंद्री, उपभोगवादी वृत्ती ही आपल्या कुटुंबाला चिंताजनक भासते ना?, निर्णयाचं स्वातंत्र्य असलं, तरी वाईटापासून अलिप्त राहणं आपल्याला जमतं ना?, याचाही विचार कटाक्षानं करूया.  सारासार विचार करत संयमी राहून निकोप स्वातंत्र्य जपणं आणि जोपासणं आपल्या हातात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 1:08 am

Web Title: real freedom niyamanch gharta dd70
Next Stories
1 सूर निरागस हो!
2 विस्कटलेली घडी सावरताना..
3 गुंतवणुकीचा फेरविचार करताना..
Just Now!
X