ch17आज भालकरकाकांनी सुरेशरावांसमोर चक्क आरसाच धरला होता. त्यात त्यांना चाळीस वर्षांंपूर्वी मुंबईत आलेला चिरंजीव सुरेश स्पष्ट दिसत होता. ते विद्याताईंना म्हणाले, ‘आपण काळाची पावले ओळखलीच नाहीत. आपल्या लक्षातच आले नाही की पंखात बळ आल्यावर पक्षी आपलं घरटं सोडून जाणार ते.’

गेला आठवडाभर सुरेशराव आणि विद्याताई अस्वस्थ होत्या. त्यांच्या घरात काही जगावेगळी गोष्ट घडली होती अशातला भाग नाही. हल्ली बऱ्याचशा कुटुंबांतून जे घडत आहे तेच त्यांच्याही घरात घडत होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रदीप आता भारतात कधीच परतणार नव्हता. या गोष्टीचं त्यांना दु:ख आणि आश्चर्य वाटत होतं. दु:ख अशासाठी की, आता त्याची भेट दुरापास्त झाली होती आणि आश्चर्य अशासाठी की, अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी अगदी ठासून वचन दिलं होतं, परदेशी शिक्षण घेऊन कर्ज फेडून टाकलं की, मी भारतात परत येणार आणि या त्याच्या वचनावर सुरेशरावांचा आणि विद्याताईंचा दृढ विश्वास कालपरवापर्यंत होता.
इतर कुटुंबांतील मुलांपेक्षा आपला चिरंजीव वेगळा आहे, याचा त्यांना फार अभिमान वाटत होता. पण ज्यांना ज्यांना त्यांनी आपल्या मुलाचा विचार विश्वासाने आणि अभिमानाने सांगितला, त्या प्रत्येकांनी त्यांच्या या बोलण्यावर अविश्वास व्यक्त केला होता. सहा महिन्यांपूर्वी तो भारतात येऊन लग्न करून बायकोसह परत अमेरिकेला गेला. आणि हळूहळू एक गोष्ट सुरेशराव आणि विद्याताईंना जाणवू लागली की, त्याच्याशी पूर्वी रोज स्काइपवर नियमित होणारी भेट कमी होत होती. बोलणं तुटक होऊ लागलं होतं. याचं कारण त्यांना नंतर कळलं. ते म्हणजे भारतात परत कधी येणार, या वेगवेगळ्या प्रकारे विचारलेल्या त्यांच्या प्रश्नांना तो कंटाळला होता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. शेवटी गेल्या आठवडय़ात त्याच्या बायकोने ते धर्य दाखवलं आणि तेव्हापासून ही दोघं इथं अस्वस्थ झाली होती. आíथक प्रश्न नव्हताच. त्यासाठी त्यांनी आधीच तजवीज झालेली होती, दोघांचंही पेन्शन अगदी पुरेसं होतं. पण दिवसेंदिवस एक गोष्ट त्यांना जाणवू लागली होती, केवळ पसा वृद्धत्वात आपले प्रश्न सोडवू शकणार नाही.
भविष्याचा विचार करून सुरेशरावांनी राहती जागा घेतानाच अशी घेतली होती की, आपल्या एकुलत्या एक मुलाला भविष्यात मुंबईत राहत्या जागेचा प्रश्न सोडवावा लागू नये. धोरणीपणे एका मुलानंतर आपलं कुटुंब वाढू दिलं नव्हतं. काटकसर करून, पार्ट टाइम कामं करून मुलाच्या उच्च शिक्षणापर्यंतची आíथक तरतूद भक्कम करून ठेवली होती. आणि मुलगा भारतातले उच्च शिक्षण, उत्तम रीतीने पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला.
सुरेशराव आणि विद्याताई आता अगदी निश्च्िंात आयुष्य जगत होत्या. काहीही झालं तरी परदेशी शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येईन, या मुलाने दिलेल्या खात्रीमुळे ते अधिकच निश्िंचत होत सुखावले होते. पण सुनेच्या त्या फोननंतर मात्र ती दोघं विश्वासघात झाल्यासारखी दुखावली गेली होती. मुलाच्या बदललेल्या विचाराला आपली सूनच जबाबदार आहे, असे आईला पक्के वाटत होते. कारण लग्न झाल्यावरच मुलांनी आपला पवित्रा बदलला होता. जन्मदाते आईबाप, बायकोपुढे त्याला दुय्यम वाटू लागले होते आणि दोघं आता स्वत:ला दोष देऊ लागली होती. इतरांच्या अनुभवांनी आपण शहाणे झालो नाही, इथपासून आपण उगीच आपल्या इच्छा-आकांक्षा मारून, हौसमौज बाजूला सारून इतकं केलं.
बुद्धिमान आणि कर्तृत्ववान मुलाचा अभिमान बाळगावा की त्याचा स्वार्थी व्यवहारवाद निमूट सहन करावा आणि इतर जोडप्यांप्रमाणे, मनोमन स्वीकारावा, या द्वंद्वात त्यांचे दिवस जात होते. तोच पर्याय स्वीकारण्याशिवाय अन्य पर्याय नाही ही गोष्टदेखील ती दोघं मनोमन जाणून होती.
पण बरेच दिवसांनी भालकरकाका कट्टय़ावर भेटले आणि त्यांच्याशी झालेल्या संवादाने सुरेशराव एकदम भानावर आले. भालकरकाकांनी सुरेशरावांपुढे चक्क आरसाच धरला होता. त्याचं असं झालं..
भालकरकाकांची आणि त्यांची कथा एकच होती. त्यांचाही एकुलता एका मुलगा कायमचा परदेशी राहणार होता. त्याचे लग्न होऊन आता त्यांना एक नातवंडदेखील झालं होतं. भालकर पती-पत्नी येथे भारतात अगदी स्वस्थचित्त असत. भालकरकाकांनी सुरेशरावांची जीवनकहाणी विचारण्याच्या ओघात त्यांचं पूर्व आयुष्यच जाणून घेतलं, त्यातच सुरेशरावांना त्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळत गेली. माणसाच्या नियतीत काय वाढून ठेवले आहे हे परमेश्वरदेखील सांगू शकणार नाही पण त्याची नीती मात्र त्याच्या भविष्यात काय घडू शकेल याची कल्पना देत असते.
सुरेशराव चाळिसेक वर्षांपूर्वी कोकणातील अतिदुर्गम गाव सोडून मुंबईत नशीब आजमावायला निघून आले होते. मॅट्रिक झाल्याबरोबर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. त्यांच्या आईचा त्यांच्या शहरात जाण्याला विरोध होता, पण वडील मात्र त्यांच्या या निर्णयाने सुखावले होते. गावातील भिक्षुकी आणि जेमतेम एकर-दीड एकर भातशेतीत त्यांचे यापुढे दिवस निघणे कठीण होते. तीन मुली पदरात होत्या. त्यासाठी घरातील होतकरू तरुण सुरेशला कर्त्यां पुरुषाची जागा घेणं आता क्रमप्राप्त होतं. सुरेशराव मुंबईत आले. गिरगावात ओळखीच्या काकूंकडे राहू लागले. त्यांना एका चांगल्या गृहस्थांनी सल्ला दिला, सुरेशरावांनी तो मनावर घेतला, सकाळी प्रथम शॉर्टहँड /टायिपगच्या क्लासला जात. तेथून एका दुकानात कामासाठी जात. दुकानात वेळ मिळेल तेव्हा शॉर्टहँडचा सराव करत बसत. पुढे त्यांना बँकेत नोकरी मिळाली. त्यांचा पगार चांगलाच वाढला, नोकरीची चिंता कायमची मिटली होती. त्यांनी चार वर्षांत संध्याकाळच्या कॉलेजमध्ये जाऊन पदवीदेखील पदरात पाडून घेतली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत त्यांची कर्णिका नावाच्या एका सुंदर मुलीशी गाठ पडली होती. आणि मत्रीचं रूपांतर नेहमीप्रमाणे प्रेमात झालं होतं. त्यांनी जोगेश्वरीला एक लहान जागा म्हणजे एकखणी घर भाडय़ाने घेतलं. सुरेरावांनी लग्न करायचं ठरविले, पण ही गोष्ट त्यांना आईवडिलांना सांगण्याचं किंवा कळविण्याचं धाडस मात्र झालं नाही. त्या काळी प्रेमविवाह, समजाला सहजा सहजी मंजूर नसायचा हा तर आंतरजातीय विवाह म्हणजे कुटुंबामध्ये बॉम्ब फुटून परिवाराचं स्वास्थ्य पार उद्ध्वस्त करण्यासारखं होतं. कर्णोपकर्णी ती गोष्ट सुरेशरावांच्या आईवडिलांच्या कानावर पोचलीच होती. त्यामुळे आई-वडील दोघेही कष्टी झाले होते. विद्याताईंनी महापालिकेत शिक्षिकेची नोकरी पत्करली होती आणि सुरेशराव बँकेत मोठय़ा पदावर पोहचले होते. त्यांनी बोरिवलीला राहण्यासाठी मोठी जागा घेतली. सुरेशरावांनी एक गोष्ट जवळजवळ पहिली दहा वष्रे न चुकता पाळली होती. दर गुरुवारी आणि दर शनिवारी ते सविस्तर हकीकतीचं पत्र गावी पाठवत होते. आणि दर महिन्याच्या दोन तारखेची गावाला पाठविण्याची मनीऑर्डर कधीही चुकली नाही. गरजेनुसार तिच्या रकमेतही त्यांनी समजून उमजून वाढ केली. बहिणींच्या लग्नासाठी जमेल तेवढी मदत केली होती.
प्रदीपच्या जन्मानंतर मात्र यात सातत्य राहिलं नाही. असामान्य बुद्धिमत्तेच्या प्रदीपसाठी सुरेशराव आणि विद्याताईंनी आपलं सर्व चातुर्य पणाला लावून त्याला खूप शिकवलं. मध्यंतरीच्या काळात सुरेशरावांच्या वडिलांचं निधन झालं. त्याच दिवशी सुरेशराव वडिलांना अग्नी देऊन परत मुंबईला आले. कारण प्रदीपची परीक्षा सुरू होती. परत गावी जाऊन वडिलांचं दिवस-वार उरकल्यावर ते आईला म्हणाले, ‘तू एकटीच इथे राहू नकोस. आता उरलेलं आयुष्य आमच्याबरोबर आरामत राहा.’ आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ‘माझं सर्व आयुष्य या गावात गेलं. झाडा-पेडात रमले. माझा जीव तुमच्या बंद दरवाजांच्या घरात गुदमरतो, तेव्हा खरं म्हणजे तूच येथे येऊन माझ्यासोबत राहा. आता तुझी नोकरी संपली, तू निवृत्त झालास. आपलं घर-दार आहे, तुझी जन्मदाती आई आहे, तू इथे येऊन राहणे जास्त श्रेयस्कर नाही का? बघ विचार कर.’
अर्थात तो विचार सुरेशरावांना पटणारा नव्हता. ते जास्त काही बोलले नाहीत. त्यांनी आपली बॅग भरायला घेतली. रात्रीचं जेवण झाल्यावर आईंनी सुरेशरावांना जवळ बोलावून घेतलं आणि माळ्यावर ठेवलेली एक छोटी पत्र्याची ट्रंक खाली काढायला सांगितली. ट्रंकेत किती तरी जुनी पत्रं होती. मनीऑर्डरच्या स्वीकारल्याच्या पावत्या होत्या. तिने ती पत्राची ट्रंक जवळ ठेवून घेतली. सुरेशराव झोपले. सकाळी ते निघायची तयारी करून आईला नमस्कार करायला गेले. आईने रात्री शोधून ठेवलेलं एक कार्ड त्यांच्या हातात ठेवलं. आशीर्वाद दिले आणि तोंड फिरवून ती अंथरुणावर आडवी झाली.
सुरेशराव ओटीवरच्या झोपाळ्यावर बसले आणि ते पत्र वाचलं, सुरेशरावांनी पस्तीस वर्षांपूर्वी वडिलांना पाठविलेलं ते पत्र होतं. ‘ तीर्थरूप तात्या यांस कृतानेक नमस्कार, मी आता मुंबईत हळूहळू स्थिरस्थावर होत आहे, पण मी मुंबईत का आलो हे विसरलेलो नाही. माझं आपल्या घराकडे कायम लक्ष असेल याची खात्री बाळगावी. एकंदर भविष्याचा विचार करता मुंबईत सेवानिवृत्तीनंतर कायम राहणं माझ्या हिशेबाने मला शक्य होणार नाही याची मला आत्ताच खात्री वाटू लागली आहे. तुम्ही तुमच्या पुढल्या आयुष्याची चिंता अजिबात करू नका. मी केवळ आपलं कोकणातलं कुटुंब स्थिरस्थावर करण्याच्या उद्देशानं शहरात आलो आहे. पुढेमागे सर्व पुढच्या पिढीकडे सोपवून नििश्चतपणे पुढील आयुष्य तुमच्याबरोबरच काढण्याचा माझा मानस पक्का आहे. तेव्हा काळजी करू नये.’
पत्र वाचून सुरेशराव थोडा वेळ अस्वस्थ झाले, पण थोडाच वेळ. त्यांना यापुढे तिथे कायम राहणं शक्य नव्हतं. विद्याताईंचा या प्रस्तावाला कधीही होकार मिळणार नाही यांची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यांनी कठोरपणे ते पत्र परत ट्रंकेत ठेवून दिलं आणि ट्रंक परत माळ्यावर जागच्या जागी ठेवून दिली आणि जड अंतकरणाने ते मुंबईच्या वाटेला लागले. सुरेशरावांची आई शेवटपर्यंत मुंबईत आली नाही.
.. आज भालकरकाकांनी सुरेशरावांसमोर चक्क आरसाच धरला होता. त्यात त्यांना चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत आलेला चिरंजीव सुरेश स्पष्ट दिसत होता. त्यांनी मनाशी काही पक्कं ठरवलं आणि रात्री झोपी गेले. सकाळी उठल्या उठल्या विद्याताईंना हाक मारली. आणि म्हणाले, ‘अगं, आपण आता यापुढे दोघं आपला देश बघायला बाहेर पडणार आहोत. चांगली पर्यटन कंपनी त्यासाठी शोधतो. प्रदीप आता यापुढे आपल्याबरोबर असणार नाही या कल्पनेने उगीचच सरभर झालो आहोत. आपण काळाची पावलं ओळखलीच नाहीत. इतकंच काय आपण आपला भूतकाळदेखील मधल्या काळात विसरून गेलो होतो.
पंखात बळ आल्यावर पक्षी आपलं घरटं कायमचं सोडून जातो हा साधा निसर्गनियम आपल्या लक्षातच आला नाही. थँक यू भालकर काका. अगं, प्रदीपने आपल्याला ज्या ईमेलद्वारे मी भारतात नक्की परत येणार हे वचन दिलं होतं. तो ईमेल मी कायमचा डिलीट करून टाकला आहे. कारण जपून ठेवलेल्या पत्रातील किंवा सेव्ह केलेल्या ईमेलच्या मजकुराशी नियतीचं काही देणं-घेणं असतंच असं नाही. बहुतेक वेळा नसतंच. नियतीच्या लेखी असलीच तर असते फक्त परतफेड!
मोहन गद्रे