एक दिवस सकाळी सकाळीच गोठय़ात काही तरी गोंधळ ऐकू आला. कपिला गाय दावणीला जोरजोरात हिसके देत होती. घरमालकांऐवजी दुसराच कोणी तरी शेतातील गडी चरवी घेऊन दूध काढण्याचा प्रयत्न करत होता, पण कपिला गाय त्याला काही दूध काढू देत नव्हती. ती सारखी घराकडे मान वळवत हंबरत होती. अखेर घरमालक कसे तरी उठून बाहेर आले. त्यांना बघून कपिला मोठमोठय़ाने हंबरू लागली.. माणसांच्या शब्द-भाषेचे, स्पर्श-भाषेचे मर्म प्राण्यांना पटकन समजते.
श्रा वणातील एका ओल्या संध्याकाळी मी ओसरीवरील झोपाळ्यावर हलकेच झोके घेत बसले होते. ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ बघत सारी सृष्टीच हिरवा शालू पांघरून बसली होती. झाडांवरून पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. वातावरणातील ही प्रसन्नता माझ्याही मनात गाणं होऊन उतरत होती. एवढय़ात समोरच्या झाडावरून एका पक्ष्याचे पिल्लू खाली पडले. ‘‘अरेरे! बिच्चारं!’’ असे म्हणत मी त्याला उचलणार तोच चार- पाच पक्षी येऊन त्याच्यापासून जरासे दूर बसले आणि कलकलाट करू लागले. मी दोन पावले मागे सरकले. माणसांनी पक्ष्याला हात लावला तर पक्षी पुन्हा त्याला आपल्यात घेत नाहीत असे कुठे तरी वाचल्याचे आठवले. तरीही त्या घायाळ पक्ष्याची तडफड बघवेना म्हणून पुन्हा थोडीशी पुढे झाले. सर्व पक्षी पुन्हा कर्कश्यपणे कलकलाट करू लागले. जणू ते मला म्हणत होते, ‘‘खबरदार, पुढे आलीस तर..’’ क्षणभर मला काय करावे कळेना.
एवढय़ात माझा नातू बाहेरून खेळून धावत आत आला. त्याचे लक्ष त्या पिल्लाकडे गेले, मात्र त्याने पटकन त्याला उचलले आणि ‘‘आज्जी, बघ नं, त्याला किती लागलंय, औषध लावू या का आपण,’’ असे म्हणत तो पिल्लाला घरातदेखील घेऊन गेला. मी मग फारसा विचार न करता एका मऊ कापडाच्या घडीवर त्याला निजवलं आणि ड्रॉपरने त्याच्या तोंडात एक एक पाण्याचा थेंब घालू लागले. नंतर ओळखीच्या पक्षिमित्राला बोलावून ते पिल्लू त्याच्या सुरक्षित हातात सोपवून आम्ही निश्चिंत झालो, पण एक प्रश्न सतत घोळत राहिला. का हे पक्षी आपल्या जातभाईजवळ कुणाला येऊ देत नसतील? त्या जखमी पिल्लाबद्दल सर्व पक्ष्यांच्या संवेदनाही किती तीव्र होत्या..
    बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही एका लहानशा गावात- गाव कसलं खेडंच होते ते, राहत होतो. सगळी वस्ती शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची. त्यातल्याच एका बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या घरात दोन खोल्या भाडय़ाने घेऊन आम्ही राहत होतो. शेजारीच त्यांचा गोठा होता. गोठय़ात एके काळी कपिला गाय आणि ढवळ्यापवळ्याची बैलजाडी होती. सांजसकाळ घरमालक गायीच्या अंगावरून मायेने हात फिरवायचे, तिच्याशी बोलायचे, तिला हिरवा चारा खाऊ घालायचे आणि वासराचे पोट भरले की मगच दूध काढायचे. अगदी घरातल्या माणसासारखी माया करायचे तिच्यावर. गायही मोठी गुणी होती. भरभरून दूध द्यायची. पान्हा चोरायची नाही. तिचे धारोष्ण दूध आम्हालाही मिळायचे.
एक दिवस सकाळी सकाळीच गोठय़ात काही तरी गोंधळ ऐकू आला. काय झाले म्हणून बघायला गेलो तर.. कपिला गाय दावणीला जोरजोरात हिसके देत होती. तिच्या वासराला कुणी तरी दूर बांधून ठेवले होते आणि घरमालकांऐवजी दुसराच कोणी तरी शेतातील गडी चरवी घेऊन दूध काढण्याचा प्रयत्न करत होता, पण कपिला गाय त्याला काही दूध काढू देत नव्हती. ती सारखी घराकडे मान वळवत हंबरत होती. जणू कुणाचा तरी शोध घेत असावी. अखेर गडय़ाला तसेच परतावे लागले. मी चौकशी केली तर घरमालक तापाने आजारी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांचा मायेचा हात दुसऱ्या दिवशीही तिच्या पाठीवर फिरला नव्हता. दोन दिवस हाच प्रकार. तिने चारा खाणेही सोडले. सगळे जण बेजार, पण कपिला कोणालाही हात लावू देत नव्हती. अखेर घरमालक कसे तरी उठून बाहेर आले. त्यांना बघून कपिला मोठमोठय़ाने हंबरू लागली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. ‘‘बये, कपिले, नको गं असं करूस. नको पान्हा चोरूस. मी इथेच थांबतो बघ तुझ्याजवळ, पण गडय़ाला दूध काढू दे बाई,’’ असे म्हणत ते तिच्या पाठीवर थोपटत राहिले. त्यांची अगतिकता तिला कळली असावी, कारण तिनेही मग गडय़ाला मुकाटय़ाने दूध काढू दिले. माणसांच्या शब्द-भाषेचे, स्पर्श-भाषेचे मर्म प्राण्यांनाही किती पटकन समजते, नाही?
   एकदा मी चेन्नईला माझ्या मुलीकडे गेले होते. आता दक्षिण भारत आणि तांदूळ हे समीकरण किती दृढ आहे हे आपल्याला माहीतच आहे. तर तिच्या घराजवळच्या झाडावर एक कावळा रोज सकाळी बरोब्बर सहा वाजता येऊन काव-काव करून ‘काक-संगीत’ सुरू करायचा. माझी मुलगी ‘आले रे बाबा’ असे (अर्थातच मराठीत) म्हणून लगेच डब्यातील पोळीचे तुकडे करून गॅलरीतल्या एका ताटलीत ठेवायची आणि हे काक-स्वामी लगेच त्या पोळीचा फडशा पाडायचे. नंतर थोडय़ाशा वेगळ्या लयीत काव-काव म्हणत (कदाचित तिला ‘अन्नदाता सुखी भव’ असा आशीर्वाद देत.) उडून जायचा.
एकदा मुलगी परगावी गेली होती. मी घरीच सकाळी नेहमीप्रमाणे उठले. घडय़ाळात सहाचे ठोके पडले आणि बाहेर झाडावर काक-संगीत सुरू झाले. मी लगबगीने गॅलरीत जाऊन काक-स्वामींना पोळी वाढली आणि आत आले. (हो, उगीच कावळ्याने शाप नको द्यायला.) तरी याचे काव-काव सुरूच. पुन्हा जाऊन बघितले तर हा एकदा ताटलीकडे आणि एकदा दरवाजाकडे बघून काव-काव करतोय. आता याला पोळीबरोबर भाजी का वाढायला हवी, असे मनाशी म्हणत मी मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले, तर पाठीमागे काव-काव सुरूच. मला कुठे हा तोच कावळा आहे हे समजायला! मी तशीच पुढे चालत राहिले, तर सोसायटीच्या गेटपर्यंत कावळा माझ्या मागे काव-काव करत चालत, नव्हे हळूहळू उडत येत राहिला.
अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो मुलीची चौकशी करत असेल, असे वाटून मी ‘ती गेलीय गावाला,’ असे मराठीत सांगून टाकले. हो, मला कुठे त्यांची भाषा येत होती. त्याला कळले की नाही कुणास ठाऊक, पण नंतर मात्र काव-काव ऐकू आले नाही. घरी परत आल्यावर पाहिले तर पोळी तशीच. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार. दोन दिवसांनी मुलगी परत आल्यावर तिने त्याच्या ताटलीत पोळी घातल्यावर त्याच्या काव-कावचा स्वर वेगळाच असल्याचा मला भास झाला. अखेर पशुपक्ष्यांजवळ आपली शब्दसंपत्ती नसल्यामुळे ते विविध स्वरांचाच आधार घेत असतील ना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे जाणवलं कुठे तरी.
 तिच्या तेव्हा ४-५ वर्षांच्या असणाऱ्या मुलीला, माझ्या नातीला पशुपक्षी पाळण्याची (सर्वच लहान मुलांना असते तशी) खूपच हौस. माझ्या मुलीचा मात्र त्याला ठाम नकार. ‘‘हो, ही बया त्यांना खाऊपिऊ घालेल, त्यांचे लाड करेल, पण त्यांचे ‘बाकीचे सोपस्कार’ कोण करणार?’’ हा तिचा प्रश्न असायचा. तिच्या घरात तेव्हा एका खिडकीशी एक कबुतर रोज येऊन बसत असे. माझ्या मुलीने तेव्हा खास त्याच्यासाठी बाजरी आणून ठेवली होती आणि नात शाळेतून आली की रोज एका वाटीत त्या कबुतराला ती खायला देई. तिची परत येण्याची वेळ झाली की कबुतर तिथे हजर असे. हिने युनिफॉर्म काढायच्या आधी त्याला बाजरी दिली की गुटूर-गु, गुटूर-गु करत खाणार आणि हिचा त्याच्याशी ‘‘कबु, माझी वाट पाहात होतास? भूक लागली होती तुला? खा, खा बरं आता बाजरी’’ असा संवाद चालू असणार. हे दृश्य रोजचंच.
एवढेच नाही, तर पठ्ठीने एक दिवस एक कबुतराचं पिल्लू घरात आणलंच.
‘‘अगं, नाही म्हटलं होतं ना मी तुला कोणतंच पिल्लू आणायला?’’
‘‘आई, अगं, खाली गेटजवळ गुपचूप पडलं होतं गं ते. उडत असताना नाही पकडलं मी त्याला. तुझी शप्पथ..’’ लगेच हात गळ्याजवळ. मला हसावं की रडावं ते कळेना.
‘‘बरं.. बरं.. सोडून ये त्याला खाली गार्डनमध्ये.’’ तिच्या आईचा आदेश.
‘‘आई, त्याला बरं वाटू दे ना. मग मी खरंच सोडून येईन.’’
‘‘ठीक आहे, पण नंतर नक्की? प्रॉमिस?’’
‘‘प्रॉमिस..’’ दोघींतला समेट.
नंतर दुसऱ्या दिवशी पिल्लाच्या शुश्रूषेसाठी बाईसाहेब शाळेला दांडी मारून घरीच राहिल्या. खेळताना, झोपताना, अभ्यास करताना पिल्लू सोबतच. फोटोसुद्धा काढला त्याच्यासोबत. अखेर दोन दिवसांनी त्याला मोठय़ा जड अंत:करणाने निरोप दिला.
असाच अनुभव माझ्या बहिणीकडेही आला. ही माझी बहीण स्वभावाने शांत, सौम्य आणि मृदुभाषी. बोलणे नेहमी तोंडात खडीसाखरेचा खडा ठेवल्यासारखे. माणसांना तर नाहीच, पण पशुपक्ष्यांनाही कधीच दुखावणार नाही. परसातील झाडांवरची फुले पक्ष्यांनी, माकडांनी हिच्यासाठी शिल्लक ठेवली तर काढणार. या वेळेस बऱ्याच दिवसांनी तिच्याकडे गेलो तर एक मांजर आणि तिची दोन पिल्ले अंगणात बागडत होती. बागेच्या एका कोपऱ्यात एक जोतं, जुनी चादर, दूध पिण्यासाठी एक वाडगं असा तिचा संसार थाटलेला होता. मी म्हटलं, ‘‘काय गं, नवीन बिऱ्हाड आलेले दिसतंय तुझ्या घरात, अहं, अंगणात?’’
‘‘नवीन कसलं, इथेच असते ती. आता पिल्लं झालीत तिला.’’
‘‘मग डिंकाचे लाडू वगैरे केलेत की नाही?’’
‘‘लाडू नाही केले, पण दूध मात्र वाढवलंय रोजचं.’’
दुसऱ्या दिवशी ती गच्चीवर काही तरी कामे करीत होती. इकडे दारात मनीबाई म्याँव म्याँव करीत हजर. बहिणीला ते वर ऐकू जाताच तिथूनच ती म्हणाली, ‘‘ताई, तिला पोळी दे गं जरा खायला अन् पिल्लांना दूधही दे वाडग्यात. मी विसरले कशी आज कुणास ठाऊक!’’
‘‘बरं, बरं!’’ म्हणत मी डब्यातील कालची उरलेली पोळी मांजरीपुढे टाकली आणि आत जाता जाता म्हणाले, ‘‘घ्या मनुताई, मजा आहे बुवा तुमची.’’
थोडय़ा वेळाने बहीण खाली आली. बघितले तर पोळी तशीच आणि मांजर थोडय़ा अंतरावर बसून फक्त बघतेय त्या पोळीकडे. बहिणीला पाहताच झाले की म्याँव- म्याँव सुरू. माझी तक्रार करत असावी बहुधा.
‘‘ताई, शिळी पोळी दिलीस होय तिला?’’
‘‘हो हो, त्यात काय एवढं?’’
‘‘काही नाही. आता ही गरम पोळी नेऊन घाल तिला.’’
‘‘अग्गंबाई, आमचेसुद्धा असे चोचले नाही पुरवले हो कुणी.’’ मी पुटपुटत पोळी नेऊन दिली.
थोडय़ा वेळाने आमची जेवणे झाली. आम्ही हॉलमध्ये गप्पा करत बसलो. जराशाने मागच्या अंगणात बहिणीचा आवाज आला. ही कोणाशी बोलतेय म्हणून बघायला गेले तर.. मनुबाई जोत्यावर अंगाचे मुटकुळे करून बसल्या होत्या आणि बहिणाबाई तिच्याजवळ पोळीची ताटली घेऊन तिला समजावत होत्या. ‘‘कसं होणार बाई तुझे मने? आज मी पोळी घातली नाही म्हणून खाल्ली नाहीस होय? अगं, कुणीही दिली तरी खाऊन घ्यावी.’’ उत्तरादाखल मनीचे निषेधाचे म्याँव.
‘‘चल, खाऊन घे आता पट्कन.’’ आणि मनीने आज्ञाधारकपणे म्याँव म्हणत पोळी खाऊन टाकली. माझी चाहूल लागताच बहीण म्हणाली, ‘‘खरेच, कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध असतात या मुक्या प्राण्यांचे माणसांबरोबर, कुणास ठाऊक?’’
आणि ही एक हृदयस्पर्शी आठवण माझ्या बाबांची. माझ्या वडिलांचा अन्नदानावर फार विश्वास. कुठेही दान देताना वसतिगृहात राहणाऱ्या गरीब मुलांच्या भोजनाची सोय आपल्या दानातून व्हावी यावर त्यांचा कटाक्ष असे. एवढेच नव्हे तर दारात आलेल्या भिकाऱ्याला, गायीला, कुत्र्याला ते घरातल्या माणसांना काही तरी द्यायला लावत. फक्त अंगणात येणाऱ्या चिमण्यांना मात्र स्वत: उठून तांदूळ टाकत असत. अंगणात एक भांडे ठेवलेले असे. सकाळची नित्यकर्मे आटोपली की ओंजळीवर तांदूळ त्या भांडय़ात टाकण्याचा त्यांचा नित्यक्रम होता.
त्या भांडय़ातील तांदूळ थोडेसेही कमी झालेले त्यांना चालत नसे. चिमण्यांसाठी स्वत: जाऊन दुकानातून तांदूळ घेऊन येत असत. परगावी जातानाही सांगून जात, ‘चिमण्यांना तांदूळ टाकत जा बरं!’ विशेष म्हणजे शेजारीच राहणाऱ्या आमच्या अंगणात ठेवलेल्या भांडय़ात पोळीपासून पक्वान्नापर्यंत काहीही ठेवले तरी फस्त करणाऱ्या त्याच चिमण्या बाबांच्या अंगणात फक्त आणि फक्त तांदूळच खात. बाबांनी तांदूळ टाकले की दोन मिनिटांच्या आत २०-२५ चिमण्या तेथे जमा होत. चिवचिव करीत दाणे टिपणाऱ्या चिमण्या आणि त्यांच्याकडे समाधानाने बघत झोपाळ्यावर बसलेले बाबा हे रोजचेच दृश्य होते.
काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने बाबांचे निधन झाले. साहजिकच २-४ दिवस तांदळाच्या भांडय़ाकडे आणि पर्यायाने चिमण्यांकडे जरा दुर्लक्षच झाले. नंतर आमच्यापैकी कुणी तरी अधूनमधून त्यात तांदूळ टाकून येत असे. मात्र त्यातले तांदूळ संपतात की नाही, चिमण्या ते खाताहेत की नाही याकडे आमचे कुणाचेही लक्ष नव्हते.. आणि तेव्हा तेवढी सवडही नव्हती. १५-२० दिवस उलटल्यावर आई अंगणावरील झोपाळ्यावर येऊन जराशी टेकली. तिचे तांदळाच्या भांडय़ाकडे लक्ष गेले. भांडे तसेच भरलेले होते. त्यातले तांदूळ थोडेसेही कमी झालेले नव्हते. अंगणात, झाडांवर चिमण्या मात्र दिसत होत्या. आईला अंधूकशी कल्पना आली. तिने घरात जाऊन आणखी मूठभर तांदूळ आणले, त्या भांडय़ात टाकले आणि चिमण्यांना उद्देशून दाटल्या कंठाने, पण मोठय़ाने म्हणाली, ‘‘या बायांनो, या! तुम्हाला रोज तांदूळ टाकणारे आता पुन्हा दिसणार नाहीत, पण तुम्ही उपाशी राहू नका. त्यांना आवडणार नाही ते. या, तांदूळ खा.’’
आईचे बोलणे संपले मात्र, चिमण्या हळूहळू भांडय़ाजवळ जमा झाल्या. क्षणभर त्यांची चिवचिव थांबली आणि त्यांनी भरभर दाणे टिपण्यास सुरुवात केली..    
bharati.raibagkar@gmail.com

chatura article loksatta, true love marathi news, true love mother father
‘आई, बाबांचं तुझ्यावर प्रेम नाही का?’
March month Astrology
March Astrology : मार्च महिन्यात ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल, कुटूंबात नांदेल सुख समृद्धी
Hair Color Personality Test
Personality Traits : केसांच्या रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, तुमच्या केसांचा रंग कोणता?
Thursday 22nd February Horoscope Marathi
गुरुवार २२ फेब्रुवारी : गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भरभराटीचा; कोणाच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, पाहा…