News Flash

जगणं बदलताना : बाबा तुम्ही राहू द्या!

‘‘हा नेहमी असा नाइट क्लबला जातो? मला काहीच बोलली नाहीस तू.’’

अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com

घरातले बाबा किं वा आई, कुणी तरी परगावी वा परदेशी नोकरीला असणं, महिन्या दोन महिन्याने घरी येणं, ही सामान्य गोष्ट झालीय. पण त्या  व्यक्तीचं आपल्याच घरात कसं स्वागत होतं? ती व्यक्ती घरी आली आणि  कुटुंबीयांबरोबर काही वेळ एकत्र घालवला की प्रत्येक जण आपल्या कामाला निघून जातो आणि त्या व्यक्तीला आपल्याच घरात परकं  वाटायला लागतं. कारण प्रत्येकाचं रूटिन ठरून गेलेलं असतं. घराची गरज म्हणून त्या व्यक्तीनं परदेशी वा परगावी जायचा निर्णय घेतलेला असतो खरा, पण त्यामुळे तिला आपलं घरच परकं  होतं का?

आज मला कवी नारायण सुर्वे यांची एक कविता आठवतेय.. ‘असं पत्रात लिव्हा’. ही कविता म्हणजे कामानिमित्त दूर गावी गेलेल्या कुटुंबप्रमुखाच्या गावाकडे राहाणाऱ्या पत्नीचं अत्यंत साधं, सोपं, मनाला भिडणारं मनोगत आहे. दुसऱ्या एका कवितेत भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली म्हणताना सुर्वे यांनी चार शब्दांतच जगण्याचा लढा समोर मांडलाय. कुटुंब मागे ठेवून शेकडो मैल दूर जाणाऱ्यांसाठी काळानुरूप फक्त गरजा बदलल्या, पण जगणं आहे तोपर्यंत हा लढा राहाणारच.

माझाही गेल्या पंधरा वर्षांपासून असाच एक लढा सुरू आहे. मी कोण म्हणता?.. मी सुमित. नोकरीनिमित्त गुजरात- अहमदाबादला असतो. बाकी कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात. मी दोन-तीन महिन्यांतून एकदा दोन दिवसांसाठी पुण्यात येत असतो, तसा आताही आलोय. मुलं भेटायला आसुसलेली असतात आणि मी आणत असलेल्या भेटवस्तूंची वाटही बघत असतात. मलाही प्रचंड ओढ असते घराची. वाटतं कायम इथेच राहावं. पण काय करणार ना, शेवटी नोकरी आहे तर भाकरी आहे.

घरात माझं जोरात स्वागत झाल्यावर पहिला अर्धा तास गप्पांत जातो आणि मग हळूहळू एकेक जण त्यांच्या कामाला लागतात. इथे मी जरी सुट्टीवर येत असलो तरी बाकीच्यांना आपापली कामं असतातच ना. मुलं लहान होती तेव्हा मी आल्यावर सतत मला चिटकून बसलेली असायची. त्यांच्या सगळ्या   छोटय़ा-मोठय़ा गोष्टी मला माहिती असायच्या. आता तसं होत नाही. हल्ली आपल्या साचेबंद दिनक्रमाला धक्का लागलेलं आवडत नाही कुणाला. मुलांचे आपापले कार्यक्रम ठरलेले असतात. आईच्या पण भजनी मंडळाचे कार्यक्रम, सहली असतात. मी अचानक आलो की त्यांचं ‘शेडय़ुल’ बिघडतं. इथली अशी म्हणून एक घडी बसलेली असते. मग माझ्याच घरात विनाकारण मला पाहुण्यासारखं वाटतं. शिवाय आताशा मुलांना मी कशाबद्दल टोकलेलं आवडत नाही. मला पटत नाहीत बऱ्याच गोष्टी, पण इथल्या दुर्मीळ मुक्कामात मुलांची मनं दुखवायची नसतात मला. नाहीतर माझा इतकासा सहवासही त्यांना नकोसा होईल. आम्ही दोघंही आमच्या नात्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी जमतं, कधी नाही. आता कालचीच गोष्ट. लाटसाहेब रात्री खूप उशिरा घरी आले. एकंदर रागरंग पाहून क्लब पार्टी करून आला असावा. मी टोकलं, तर ‘खूप आधीच ही पार्टी ठरली होती. आईला माहितेय,’ असं म्हणाला. मला विचारणं तर दूर, सांगितलं पण नव्हतं कुणी. म्हणून मग त्याच्या आईजवळ विषय काढला.

‘‘हा नेहमी असा नाइट क्लबला जातो? मला काहीच बोलली नाहीस तू.’’

‘‘नाही हो. गेल्या काही दिवसांपासून सारखा मागे लागला होता. मग केव्हातरी हो म्हणावंच लागतं.’’ बायको म्हणाली.

‘‘पण हे असं इतक्या रात्री..’’

‘‘हे बघा, तुम्ही इथे नसता. काही बाबतीत मुलांना वडिलांचाच धाक असावा लागतो. पण इथे मला एकटीला हाताळावं लागतं सगळं. त्याला काही बोलू नका. सध्या प्लीज तुम्ही राहू द्या.’’ मग मी विषय न वाढवता गप्प बसलो.

आता घरात आपली पूर्वीसारखी जागा राहिली नाही की काय, या विचारानं हललो पार आतून. म्हणजे आल्या आल्या माझे बूट उचलताना ‘तुम्ही राहू द्या’ म्हणण्यात मुलाचा सेवाभाव होता असा गैरसमज झाला का माझा? मी झटकन वळून तिकडे बघितलं, बुटांच्या रॅकमध्ये माझ्या बुटांना जागाच नव्हती. त्यामुळे ते दुसरीकडे ठेवलेले होते. हे कारण होतं का मुलानं माझे जोडे उचलण्याचं? माझ्या इथे असण्याची सवयच राहिली नाहीये कुणाला.

आईलाही औषधं हवी होती, तर तिनंही सवयीनं सुनेलाच सांगितलं. संवादही सहवासाचा गुलाम असावा बहुदा, कारण आधी आई कशी आतून भरभरून बोलायची. आताशा तिला विषय आठवावे लागतात. मला मात्र खूप काही सांगायचं असतं. पण गप्पा मारायला बायकोला निवांतपणाच नसतो. वाटतं, की आमच्या एकमेकांच्या सोबत नसण्याचीच सवय झालीय का आम्हाला? पण आमचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर. फक्त नात्यात कृत्रिमता येऊ नये म्हणून नीट बसून काही गोष्टी बोलण्याची गरज आहे इतकंच.

चार दिवस राहून, मुलाच्या फीची, मुलीच्या महागडय़ा लॅपटॉपची सोय लावून मी आता माझ्या जगात परत जातोय.. माझ्याच संसारात माझी नेमकी जागा कोणती याचा विचार करत. दोष तरी कुणाला देणार? जास्त पगाराच्या नादात मीच बाहेर पडलो.  कुटुंबाला सोडून दूर राहायचं म्हणजे खरंतर काळजावर दगड ठेवावा लागतो. घरच्या अन्नाला मुकावं लागतं. इलाज नाही. कारण आजच्या जगण्याचा ‘आ’ फार मोठा आहे. आपल्या गरजा आपण अशा वाढवून ठेवल्यात, की ही तडजोड आता अपरिहार्य! बायकोदेखील आपली नोकरी सांभाळत इथला व्याप सांभाळते. मुलांना तिच्या मताप्रमाणे वागण्याची सवय झालीये आता. मग मुलं मला म्हणणारच ना, ‘बाबा तुम्ही राहू द्या!’ याचा अर्थ घरच्यांना माझ्याबद्दल प्रेम नाही असं मुळीच नाही बरं का. आणि प्रेम तरी नेमकं काय हो? आपल्या माणसाची काळजी घेणं, त्याला आनंद वाटेल असं वागणं, हेच तर प्रेम!

सतत एकमेकांच्या सोबत असण्याची सवय म्हणजे प्रेम असतं का? माझ्या मते नाही. अंतर फक्त राहण्याच्या ठिकाणात आहे, आमच्या मनात नाहीये हे नक्की! म्हणूनच एक दिवसाआड व्हिडीओ कॉल करतो आम्ही. त्यानं रोजच्या घडामोडी समजतात. किमान सगळ्यांचे चेहरे दिसतात. मुलं त्यांना काय हवं-नको सांगतात. हिला वाटतं, की मी महागडय़ा भेटवस्तू आणू नयेत. असं कसं बरं? मी दोन दिवसांसाठी घरी जाणार, त्यातही त्यांना नाराज करून काय मिळणार मला? त्यांच्या सुखासाठीच तर दूर राहतो ना मी? इतकी वर्ष काढली, तसंच अजून काही वर्ष! बस, अजून काही वर्षच!

काय मंडळी, वाचून पोटात कालवाकालव होते ना? पण आज हे बऱ्याच कुटुंबांचं वास्तव आहे. मायेचे पाश तोडून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी घराबाहेर पडावंच लागतं आणि त्यासाठी जबरदस्त किंमतही मोजावी लागते. पती-पत्नीस दोन्ही बाजूनं सहजीवनाचा त्याग करावा लागतो. जीवनानं जीवनाशी केलेली फार मोठी तडजोड असते ही. एकमेकांची भूमिका समजावून घेण्यासाठी इथे घरातील सदस्यांचा एकमेकांशी खूप मोकळा संवाद होणं आवश्यक असतं. काही आमचं ऐका, काही तुम्ही सांगा.. हे म्हणणं खरंच गरजेचं आहे.

आपण सुमितची बाजू बघितली, चला आता दुसरी बाजू बघू या..

..मी सुवर्णा. कोण म्हणता? अहो, सुमितची बायको. बिचारा माझा नवरा! चार पैसे जास्त मिळतील म्हणून गुजरातला गेला. जावंच लागलं. कसं भागवलं असतं कमी पैशात? आणि फक्त त्यालाच बिचारा तरी कसं म्हणू? दोन लहान मुलं, त्यांची आजी, सगळ्यांचं दुखणं खुपणं, शिक्षण आणि सतरा भानगडी मी एकटीनं सांभाळल्या. तेही नोकरी करून. तसं सुमित तिथून बरंच लक्ष ठेवून असतात, नाही असं नाही. ऑनलाइन बिलं भरणं, अ‍ॅडमिशन फॉर्म भरणं, शैक्षणिक संस्थांची माहिती काढणं वगैरे. पण त्याला खूप मर्यादा येतात. मग मला तिथून भारंभार सूचना देतात. त्यांना काय होतं तिथून सूचना द्यायला? आताशा तर वाटतं, की त्यांना एकटं राहाण्यातलं स्वातंत्र्य हवंहवंसं वाटत असावं. ऑफिस झालं की मोकळं. घरची कटकटच नाही!

मुलांचं मोठं होणं, त्यांचा अभ्यास, आजारपण, त्यांना वाईट सवयींपासून दूर ठेवणं, नातेवाईक, लग्नकरय, सणवार, घराच्या दुरुस्त्या.. कशाशीही संबंध नाही! दोन-चार दिवसांकरता यायचं आणि माझी सगळी शिस्त धाब्यावर बसवून वाटेल त्या महागडय़ा वस्तू घेऊन द्यायच्या. मुलांना खरंच त्याची गरज आहे की नाही, याचा विचार न करता सरळ समोर आणून टाकायच्या. मुलांशी भावनिक जवळीक राखण्याचा सोपा मार्ग ना हा! मग बाबा तर सढळ हातानं देतात, आईच कंजूषपणा करते, असं वाटतं मुलांना. त्यांना वडिलांची खूप ओढ असते, पण त्याचा मुक्काम वाढला की घरात कुरबुरी सुरू होतात.

सुमित येणार असले की मुलांना मुद्दाम घरी राहायला सांगावं लागतं. सांगण्याची वेळच यायला नको खरं तर. एकदा आमच्या कन्येच्या बाबतीत असंच झालं.

‘‘सोनू, या शनिवारी बाबा येतायत, कुठे जाऊ नका हं.’’ मी आठवण करून दिली.

‘‘मॉम, शिवानीकडे ‘नाइट आऊट’ ठरलंय. आत्ताच यायचंय का बाबांना?’’

‘‘मागे तुझा अपघात झाला होता तेव्हा अंगात ताप असतानाही अध्र्या रात्रीतून मिळेल त्या वाहनानं बाबा इथे आले होते. तेव्हा त्यांनी असंच म्हणायला हवं होतं नाही, की आत्ताच का?  बाबा काय फक्त पैसा छापणारी मशीन आहे का?’’ तेव्हा ती वरमली होती. आधी आपली स्वत:ची सोय बघायची सवय लागतेय सगळ्यांना, हे बरोबर नाही. बाकी नातं कुठलंही असो, सहवासानं प्रेम वाढतं म्हणतात तेच खरं. इतर कुटुंबांमध्ये तरी मोठय़ा वयाची मुलं काय आई-वडिलांच्या भोवती भोवती थोडीच असतात? पण सुमित इथे कधीतरी येतात ना, म्हणून मला आपलं वाटतं!

मनाच्या आतल्या कप्प्यातल्या गोष्टी मुलं

कधी कधी माझ्याजवळ बोलतात, पण त्यांच्याजवळ नाही, याचं फार वाईट वाटतं त्यांना. पण तेवढय़ासाठी इथेच राहा, असं तरी कसं म्हणू?

प्रामाणिकपणे सांगायचं, तर मुलांची महागडी शिक्षणं करायची म्हटलं तर त्यांनी तिथेच राहून सिनिऑरिटी राखून पगारवाढ घेण्यातच आमचं सौख्य आहे. अजून काही वर्ष फक्त. बस, अजून काही वर्षच! मग आम्ही जगू आमच्यासाठी.

सुमित आणि सुवर्णासारख्या अनेक जोडप्यांचं हे प्रांजळ मनोगत आहे. एक मात्र नक्की, की खूप प्रेम, विश्वास, त्याग, सहवासाची प्रचंड ओढ, सकारात्मकता आणि अनेक तडजोडी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर एकमेकांना सांभाळताना नात्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागता कामा नये. तिथे निरपेक्ष सहजता असावी. आई वडिलांच्या त्यागाची जाणीव मुलांना असायलाच हवी आणि मुलांना जाणवणारी भावनिक कमतरता पालकांनी समजून घ्यावी. बहुतांश कुटुंबात हा समतोल असतोच, पण घरात सतत एकमेकांच्या ‘असण्याची’ सवय राहिलेली नसते. त्या पातळीवरचा एक समंजसपणा सगळ्याच सदस्यांना अंगी बाणवावा लागेल. नाहीतर आसुसलेल्या मनानं घरी आलेल्या बाबांना ऐकावं लागेल, ‘बाबा तुम्ही राहू द्या!’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:04 am

Web Title: relationship affected by overseas job overseas job and family life zws 70
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : अपलापकाळातली मानव संकल्पना   
2 जोतिबांचे लेक  : नोकरीचं आश्वासक ठिकाण
3 गद्धेपंचविशी : नाटक नावाचा तराफा
Just Now!
X