News Flash

नात्यांची उकल : नाते स्वत:चे स्वत:शी..

रोजच्या जगण्यात स्वत:लाच सांगितले पाहिजे की, ‘माझे माझ्यावरच प्रेम आहे. माझे स्वत:शीच एक अखंड नितांत सुंदर नाते आहे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

रोजच्या जगण्यात स्वत:लाच सांगितले पाहिजे की, ‘माझे माझ्यावरच प्रेम आहे. माझे स्वत:शीच एक अखंड नितांत सुंदर नाते आहे. ते जितके सुंदर टिकवता येईल त्यातूनच मला माझ्या आजूबाजूला एक सुदृढ जग निर्माण करता येईल.’ त्यासाठी स्वत:चे स्वत:शी घट्ट नाते जोडणे आवश्यक आहे, मग स्वत:मधील सकारात्मक गोष्टींबरोबरच नकारात्मक गोष्टीही लक्षात येतील आणि स्वत:ला बदलवत प्रगल्भ होता येईल.

आज आपण एका प्रश्नाने सुरुवात करू या. तुमचं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे, अशा पाच व्यक्तींची नावं काय आहेत? दोन क्षण डोळे मिटून याचा विचार करायचा आणि उत्तर द्यायचं.

..यादी तयार झाली? आता, यात तुमचं स्वत:चं नाव आहे का? आपल्यापैकी किमान ९० टक्के लोकांनी यात आपलं स्वत:चं नाव निश्चितच घातलं नसेल, तसा विचारसुद्धा केला नसेल. यासाठी एक युक्तिवाद असाही पुढे येईल, की यादीतल्या व्यक्तींवर माझं माझ्यापेक्षाही अधिक प्रेम आहे. मान्य, परंतु अगदी प्रामाणिकपणे विचार करायचा म्हटलं, तर पुढे अनेक प्रश्न उभे राहतील. प्रेमाचा विचार येतो तेव्हा माझं खरोखर माझ्यावर प्रेम आहे का? जर ते असेल तर त्यासाठी माझ्याकडून काही विशेष प्रयत्न केले जातात का? मुळात असं स्वत:वर प्रेम करणं योग्य आहे का? असं तर नाही, की असे विचार खूप स्वार्थीपणाचे आहेत? मला माझं स्वत:सोबत असलेलं नातं लक्षात येतंय का? ते मला मान्य आहे का? याचा मी डोळसपणे विचार केलाय का?

संगीता, वय ३८. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कपडय़ांचा व्यवसाय करणारी ही मुलगी. त्यात यश मिळायला लागून स्थिरस्थावर झाल्यावर तिने तिच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा घरच्या मंडळींसमोर ठेवल्या. तिला खूप फिरायचंय, वेगवेगळ्या जागा, प्रदेश अनुभवायचे आहेत. ती कमावत असलेला पसा ती यासाठी वापरणार आहे. इतक्यात लग्न वगरे करण्याचा तिचा विचार नाही; परंतु तिच्या कुटुंबाला हे ऐकून धक्का बसला. काही तरी टोकाचे विचार ती करतेय आणि हे कसे चुकीचे आहेत याविषयी सगळेच जण तिला समजावून सांगू लागले. तिच्या म्हणण्यानुसार, तिला स्वत:ला जर काही काळ कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात करण्याआधी स्वत:ला वेळ द्यायचा असेल, स्वत:सोबतच जगून पाहायचे असेल तर त्यात गैर काय? तिची शंका अगदीच रास्त.

मिलिंदबाबतही असेच. त्याच्या कामाच्या व्यापात त्याने काही छंद काळजीपूर्वक जोपासले आहेत. त्याच्या कुटुंबाची कायमची तक्रार अशी की, हा कायम आपल्याच नादात असतो. कुटुंबाच्या लेखी त्याच्या स्वत:च्या ठरलेल्या गोष्टींमध्ये बदल करणे त्याला आवडत नाही आणि फारसे जमतही नाही. पहिल्यापासूनच जरासा अबोल असलेला मिलिंद प्रत्येक सुट्टीत केवळ नातेवाईकांना भेटण्यापेक्षा, त्याच्या छंदांना जाणीवपूर्वक वेळ देतो. हे सगळं तो त्याची पत्नी, मुलं, काम सांभाळून करतो. तरीही त्याच्याविषयी तक्रार आहेच.

सत्तरीत असलेले शामकाका निवृत्त झाल्यानंतर नातवंडांत रमण्यापेक्षा वेगवेगळे नवनवीन काही तरी शिकण्यात स्वत:ला रमवतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मात्र त्यांनी जबाबदाऱ्या झटकून टाकल्या आहेत. ही आणि अशी कित्येक उदाहरणं पाहिली, की आपल्याकडे कुटुंब किंवा एकंदरीत सर्व प्रकारची नाती म्हणजे काही नियमावली गृहीत धरून ती पाळत राहून, ती म्हणजे जगण्यावर येणारी बंधने आहेत का? असा प्रश्न कोणाला पडला तर त्यात फार काही वावगे वाटू नये.

इथे आता लगेचच एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे, कुटुंब टिकवण्यासाठी, त्यात आनंद, समाधान राखण्यासाठी, प्रत्येकालाच तडजोड करावी लागते. सतत ‘मी-माझे’ असा विचार एकंदरीतच मानवणारा नाही. हे योग्यच; पण या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा; महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थात त्यात असलेली प्रत्येक व्यक्ती केवळ बंधने पाळत किंवा सातत्याने आपल्याला काय वाटते, काय इच्छा आहेत, यांना मुरड घालत जगत असेल, तर याचा एकत्रित परिणाम म्हणून ते कुटुंब, सुखी, समाधानी कसे म्हणता येईल? याचाच सोपा अर्थ असा, की प्रत्येक व्यक्तीच्याच आनंदाचा, समाधानाचा आणि ते मिळवण्यासाठी लागणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सखोल, डोळस, परिपूर्ण विचार होणे गरजेचे.

मग आता स्वातंत्र्याचा विचार करू. खरी मेख इथेच आहे. कारण आपल्या स्वातंत्र्याचा विचार हा कायम ‘दुसऱ्या/ समोरच्या/ भवतालच्या’ बाजूने व्हावा, ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा, नाही का? उलटपक्षी त्याचा विचार, उगम, हे त्या-त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणजे, आपले स्वत:वर असणारे डोळस प्रेम, त्यातून आपली कर्तव्ये काय आहेत याचसोबत हक्क काय आहेत, याची असणारी उघड जाणीव. ही गोष्ट केवळ हे माहीत आहे इथे थांबत नाही तर, त्यासाठी आपण काय करतो? हे सारं जिवंत ठेवण्यासाठी मुद्दाम म्हणून प्रयत्न करतो का? आणि त्यातून आपण स्वत:लाच असे कितीदा सांगतो की, ‘माझे माझ्यावरच प्रेम आहे. माझे स्वत:शीच एक अखंड नितांतसुंदर नाते आहे. ते जितके सुंदर टिकवता येईल त्यातूनच मला माझ्या आजूबाजूला एक सुदृढ जग निर्माण करता येईल.’

हे स्वत:शी असणारं नातं नेमकं फुलवायचं तरी कसं?

* माझं माझ्याशी नातं आहे, याचाच अर्थ, मला इतरांसोबत जे आणि जसे वाटते, तसेच स्वत:विषयी वाटले पाहिजे किंवा तसे वाटणे क्रमप्राप्त आहेच. यात सगळ्या भावना लागू होतीलच. याची सुरुवात स्वत:ला जसेच्या तसे स्वीकारण्यापासून होईल. आपण जसे आहोत त्यात आपल्याला बऱ्याचदा काही बदल घडवण्याची इच्छा असते किंवा व्यक्तिमत्त्वातील काही शक्तिस्थाने किंवा वैशिष्टय़े खास ठळक करावीत, त्यांना धार लावावी असेही वाटतेच. याची सुरुवातीची पायरी म्हणजे स्वत:कडे निकोप दृष्टिकोनातून पाहणे, म्हणजेच आपल्याला सतत दिली गेलेली बिरुदे वगरे सोडून देऊन. यात कौतुकाने म्हटल्या गेलेल्या काही हव्याहव्याशा वाटणाऱ्या ‘पदव्या’ही आल्याच. म्हणजे आपण हुशार आहोत की मठ्ठ, समजूतदार आहोत की रागीट, शीघ्रकोपी, मिळून- मिसळून वागणारे की एककल्ली, माणूसघाणी इत्यादी.. हे एकदा डोक्यात पक्कं झालं, की आपण स्वत:च आपल्याला आरशात पाहिल्यासारखे दिसायला लागू. जसे आहोत तसे.

* आता इतरांसारखंच माझं स्वत:शी नातं आहे हे ठरल्यानंतर आपसूक हेसुद्धा लक्षात येईल, की आपल्या स्वत:शी वागतानाही परिस्थितीजन्य बदल, आपल्यालाही लागू आहेत. म्हणजे कधी स्वत:वरच होणारी चिडचिड, स्वत:चाच येणारा राग, स्वत:च्या एखाद्या अपूर्ण कामाविषयी वाटणारा वैताग, कधी तरी स्वत:चाच कंटाळा येणे किंवा स्वत:चं खूप कौतुक करावंसं वाटणे. एखाद्या प्रसंगात इतरांप्रमाणेच आपण स्वत: नेमके कसे वागू याविषयी सुतराम कल्पना नसणे किंवा अनपेक्षित काही तरी घडून जाणे किंवा काही प्रसंगांत स्वत:लाच आधार देऊन उभे करावेसे वाटणे.

संपूर्ण विचार करता, पुढे हेसुद्धा हळूहळू आपल्यालाच समजायला लागेल, की कधी तरी, आपल्या स्वत:सोबतच आपण फारच रुक्ष वागलो, गरज नसताना स्वत:लाच दुर्लक्षित करून बसलो आणि असे का? असे प्रश्नही पडले. मात्र जितके वाटतात तितके सहज हे प्रश्न पडत नाहीत, म्हणूनच आपली स्वत:शीच फारकत होत जाते.

कित्येकदा एखाद्या प्रसंगात आपल्याला नेमकं काय हवंय याचं उत्तरदेखील त्याचमुळे मिळत नाही. उदा. साधा प्रश्न- काय खायला आवडेल? कुठे जायला आवडेल? कोणता रंग आवडेल? वरवर साधे दिसणारे प्रश्न फार गोंधळ उडवू शकतात.

त्याचं महत्त्वाचं कारण, आपण स्वत:चाच सखोल विचार करणे टाळलेले असते किंवा आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो. त्याला बरीचशी परिस्थितीजन्य कारणं असणं साहजिकच. पण म्हणून, जसे आपण इतर नाती संपू देत नाही, डोळ्यात तेल घालून त्यांना वाचवतो, वाढवतो, तसेच यासुद्धा नात्याबाबत असायलाच हवे, नाही का? याची एक गंमत पहा, आपल्या बालवयात मात्र आपण अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी पटकन देऊ शकतो. ही अशी उत्तरं आपल्या आजूबाजूची मुलंसुद्धा सहज सांगतात. कारण तिथे ‘लोक काय म्हणतील? माझं वागणं योग्य की अयोग्य?’ असे प्रश्न भेडसावत नाहीत. वागण्यात एक सहज-सोपेपणा, सुलभता, नैसर्गिकपणा असतो.

आपलं स्वत:शी घट्ट नातं तयार झालं, ते दिवसेंदिवस तसंच राहिलं, की कोणत्याही वयात आपल्याला असंच जगता येईल. अर्थात, लहानग्यांसाठी आपले असणारे नियम आणि आपल्या प्रौढ म्हटल्या गेलेल्या जगासाठी असणारे नियम वेगळे असतात. तरीही, सतत त्या नियमाचा विचार करत जगण्याची निश्चितच गरज नसते. शिवाय या नैसर्गिक वागण्यासोबतच कुठे, काय आणि कसं याचीही आपल्याला प्रौढ म्हणून लहानग्यांपेक्षा अधिक जाण असतेच की!

* आपलं नातं जसं प्रगल्भ होत राहतं तसतसे आपल्या स्वत:मधले दोष जास्त प्रखर, स्पष्ट दिसायला लागतात. त्याचबरोबर ते काढून टाकण्याचे, सुधारण्याचे मार्गसुद्धा. उदा. आपल्या आळशीपणामुळे सतत काही कामांत होणारा उशीर, स्वत:शी नीट संवाद साधून आपल्या सवयीत बदल करून कायमचा टाळता येतो. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नदेखील करतो, तेसुद्धा कोणीही न सांगता किंवा कोणाचाही ससेमिरा पाठीशी न लावून घेता.

* स्वत:सोबत नातं घट्ट करायचं म्हणजे स्वत:ला वेळ देणं हे ओघानं आलंच. तो वेळही सकारात्मक, काही तरी सर्जनात्मक किंवा चिंतनात्मक असेल तर उत्तमच. कधीकधी काहीही न करता स्वत:सोबत नुसतेच ‘असणे’ हेसुद्धा महत्त्वाचेच. तोसुद्धा सकारात्मक घालवलेला वेळच. त्यामुळेच आपले छंद, आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी, अभ्यास, हे सर्व ‘फावल्या’ वेळात करण्याच्या किंवा वेळ घालवण्यासाठी करण्याच्या गोष्टी नसून, त्यासाठी मुद्दाम व्यग्र आयुष्यातून हक्काची योजलेली जागा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे.

त्यामुळे, आपल्याला करावीशी वाटणारी भटकंती, काही धाडसी, साहसी खेळ, वाचन, लिखाण, चित्र काढणे, निरनिराळ्या कला जोपासणे हे केवळ छंद न राहता, आपले स्वत:चे स्वत:शीच जोडले जाण्याचे मार्ग होऊ शकतात. अगदी हेच आणि असेच, स्वत:साठी खास म्हणून काही तरी उत्तम खायचा पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेणे किंवा स्वत:ला आवडते म्हणून विशिष्ट फुले विकत घेणे, याचेही. याची एक छान सवय जडली, की अधेमधे डोके वर काढणारी एकटेपणाची भावना कायमची गळून पडते. ‘सतत कोणा इतरांची सोबत हवीच.’ हा विचारही नाहीसा होतो. यालाच ‘स्वत:सोबत अधिकाधिक जोडले जाणे’ म्हणता येईल.

* स्वत:ला वेळ देणे आणि आत्मकेंद्री होणे यात एक पुसटशी मर्यादारेषा, सीमारेषा असते, ती मात्र विसरून चालणार नाही. स्वत:शी नाते तयार करणे याचा अर्थ, केवळ सातत्याने स्वत:चा, स्वत:च्या सुखाचा, आनंदाचा विचार करणे, असे नक्कीच नाही. जसे आपण इतर बाबींमध्ये प्राधान्य ठरवतो, तसेच याचेही असणारच. जिथे आपले असणे किंवा जाणे किंवा काम करणे अनिवार्य आहे, तिथे अर्थातच, आपण काही काळ स्वत:ला विसरून तिथे आपला कार्यभाग करणे हे आपले कर्तव्यच.

अशा वेळेस, जशी घट्ट नात्यातली माणसे, स्नेही, आपण एखादवेळेस जास्त वेळ भेटू-बोलू शकलो नाही म्हणून दुखावत नाहीत, तसेच आपल्या स्वत:चेसुद्धा न दुखावणे, समजून घेणे अपेक्षित. त्याचबरोबर आपण जसे आखलेले, काही कार्यक्रम, ठरलेल्या गोष्टी, याबाबत प्रामाणिक राहातो, त्या कोणत्याही अनिवार्य कारणाशिवाय टाळत नाही, तेच हे प्राधान्य ठरवताना लक्षात असणे गरजेचे.

* स्वत:सोबतचा वेळ काय आणि कसा, यातून खरे तर हा प्रवास अधिक सुखकारक बनतो. कारण केवळ वेगवेगळ्या ऐहिक गोष्टींमध्ये गुंतवून, म्हणजे प्रचंड खरेदी, स्वत:वरच वारेमाप पैसे उधळणे किंवा विविध इलेक्ट्रॉनिक साधनांत स्वत:ला गुंतवणे, म्हणजे स्वत:ला वेळ देणे असे वाटत असेल, तर मात्र या संकल्पनेविषयी आपली नक्कीच गल्लत होत आहे. स्वत:सोबत नाते तयार करण्यासाठी, यातील कोणत्याच गोष्टीची गरजच नसते. तिथे आपले स्वत:चे दक्ष असणे, त्याची जाणीव असणे इतकेच गरजेचे.

* जिथे आपण असे सकारात्मक स्वत:सोबत आहोत, वेळ देत आहोत, त्याविषयी चुकूनही सल निर्माण होऊ नये. अपराधीपणाची भावनाही घातकच, कारण त्यातून मग आपण आपसूकच या बाबी पुन्हा करणे टाळायला लागतो किंवा आपल्याला तो हक्क नाही असे सतत बजावायला सुरुवात होते. कुटुंबातील मंडळी, त्यांच्यासाठी, समाजात राहताना म्हणून समाजासाठी असणारी कर्तव्यं याची जाण उत्तमरीत्या असेल तर स्वत:सोबत घालवलेला एकही क्षण खटकणार नाही.

महत्त्वाचे, आपल्या मनात आपल्याविषयीच एक आदराचे स्थान निर्माण होईल. जिथे कोणताही दुरभिमान नाही, परंतु समाधान आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही; ‘असे माझेही नाते असावे’ अशी एक प्रकारची प्रेरणाच मिळू शकेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे, समाजातील प्रत्येक व्यक्तीचे, असे नाते स्वत:सोबत तयार झाले, त्यातून ती प्रत्येक व्यक्ती आनंदी झाली, तर कदाचित बरेचसे ताणतणाव किंवा गैरसमज कमी व्हायला मदत होईल!

आपल्याकडील प्राचीन योगशास्त्राचा गाभादेखील स्वत:चे स्वत:सोबत नाते यावरच भर देतो, नाही का?

* या स्वत:सोबतच्या नात्यात एक नक्कीच आहे, इथे खोटेपणा नाही. त्यामुळे सातत्याने स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवताना मोजमापही आपलेच आहे. हे नाते नसले तर त्याची सुरुवात करू या आणि असेलच तर त्याविषयी शंका न घेता ते वृद्धिंगत करू या. आता सुरुवातीचा प्रश्न पुन्हा विचारला तर त्या यादीत आपले नाव असायला हरकत नाही.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:03 am

Web Title: relationship with yourself author dr urjita kulkarni abn 97
Next Stories
1 आभाळमाया : अमीट ठसा
2 अवकाशवाटेवर..
3 अवघे पाऊणशे वयमान : जगलेल्या क्षणांतला आनंद
Just Now!
X