मला अपेक्षित असणारं समंजस, समाधानी सहजीवन आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीने जगतो आहोत. आयुष्याची कातरवेळ एकमेकांच्या सोबतीमुळे शांत, निरामय वाटते आहे.
३४ -३५ वर्षांपूर्वी माझ्या वयाच्या बाविसाव्या वर्षी माझं लग्न झालं. एकुलता एक, शिवाय इंजिनीअर, मोठ्ठं घर असलेला मुलगा इतकं सगळं असल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. माझा एम. ए.चा रिझल्ट लागला आणि लग्न झालं. नोकरी करणारी मुलगी सासरच्यांना नको होती. त्यामुळे नोकरीचा विचार केला नाही. लग्नानंतर दोन वर्षांत सासरी रुजले आणि एका मुलाची आई झाले. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पतीने नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. सासरे सचिवालयातून निवृत्त झाले आणि त्यांना व्यवसायात मदत करू लागले. मी मुलाच्या संगोपनात दंग झाले आणि अगदी अकस्मात एका अपघातात माझ्या पतीचे निधन झाले. तेव्हा माझं वय होतं २६ वर्षे आणि मुलाचं दोन वर्षे.
 पतीने नोकरी सोडून नुकताच व्यवसाय सुरू केलेला. सासरे निवृत्तिवेतनावर आणि मी सुशिक्षित बेकार. परिस्थिती बिकट होती. माझं वय बघून सासू-सासऱ्यांनी मला दुसरं लग्न करण्याचं सुचवलं, पण मुलाला मात्र तुझ्याबरोबर दुसऱ्या माणसाच्या ताब्यात देणार नाही ही अटही घातली. माझ्या मुलालाही आजी-आजोबांचा खूप लळा होता. त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यावर आजी-आजोबांचा साहजिकच जीव होता. मी खूप विचार केला. दुसरं लग्न केलं, तर मला नवरा मिळेल, पण माझ्या मुलाला चांगला बाप मिळेल, मायेचा आसरा मिळेल कशावरून? बरं, त्याला आजी-आजोबांकडे ठेवून, या वयात अशा अडचणीच्या काळात त्यांना एकटं टाकून लग्न केलं तर त्या नव्या संसारात मनापासून रमू कशी शकेन? अपराधीपणा, मुलाची काळजी मनाला टोचत राहणारच. त्यापेक्षा सासू-सासऱ्यांबरोबर राहिले तर एकमेकांच्या आधाराने मुलाला त्याच्या हक्काच्या घरात, मायेच्या माणसात ठेवून मोठे करता येईल. त्यासाठी आता मी फक्त बाई नाही, एका मुलाची आई आहे हे स्वत:ला पटवावं लागलं. लग्नापूर्वी मी एम. ए. झाले होते. पुढे बी.एड. करून शाळेत नोकरी सुरू केली. सासू-सासऱ्यांची आजारपणं, मुलाचं शिक्षण संगोपन, माझी नोकरी यात आयुष्य पुढे सरकत होतं खरं, पण ते सरळ मार्गाने, सुरळीतपणे नाही तर कठीण प्रसंग, मनस्ताप देणाऱ्या घटना या सगळय़ा वेडय़ावाकडय़ा वळणांच्या, खड्डय़ांच्या रस्त्यावरून.
अखेर मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. त्याला छान नोकरी मिळाली. मग मोठय़ा उमेदीने, हौसेने मुलाचं लग्न करून दिलं. त्याला त्याचं हक्काचं माणूस मिळालं. पण मी हळूहळू एकटी पडत गेले. कदाचित हा माझ्याच मनाचा खेळ असेल, पण आता माझी त्या घरातली गरज संपली आहे, असं जाणवायला लागलं. माझं एकटेपण, उदास मन:स्थिती जाणून माझ्या एका सहृदय मैत्रिणीने मला पुनर्विवाहाचा सल्ला दिला. तेव्हा माझं वय होतं ५४ वर्षे. मी आता सासूच नाही तर एका नातीची आजीही झाले होते. आता या वयात लग्न करण्याच्या कल्पनेने मला धक्काच बसला. पण नंतर शांतपणे मैत्रिणीच्या सूचनेवर विचार केला. माझं अर्ध आयुष्य संपलं असलं तरी त्याचबरोबर सगळय़ा जबाबदाऱ्या तसंच सगळय़ा नात्यांप्रती असलेली कर्तव्येही संपली होती. त्यामुळे आता उरलेल्या आयुष्यावर फक्त माझा हक्क होता. माझ्या पुनर्विवाहाच्या निर्णयाने कुणावर अन्याय होणार नव्हता. या निर्णयामुळे जे नफा, नुकसान होईल ते माझे स्वत:चेच होते, इतरांचे नव्हे. पण तरी मन पटकन तयार होईना. ते दोलायमानच होते.
मग मी डोळे मिटून, हात जोडून देवापुढे उभी राहिले. त्याची प्रार्थना केली. डोळे उघडले तेव्हा माझा निर्णय झाला होता. होय, आता लग्न करायचं. मी माझ्या मैत्रिणीला पुनर्विवाहाचा माझा विचार असल्याचं सांगितलं. तिने आणि तिच्या पतीने माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार शोधण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. माझ्या सारखाच एकटा पडलेला प्रेमळ, सज्जन असा सहचर मला मिळाला. मला अपेक्षित असणारं समंजस, समाधानी सहजीवन आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीने जगतो आहोत. आयुष्याची कातरवेळ एकमेकांच्या सोबतीमुळे शांत, निरामय वाटते आहे.
माझ्यासारख्या अनेक सख्या-सोबत्यांना मला सांगावंसं वाटतं, आयुष्याच्या या अशा वळणावर कधी आलात तर बिचकून मागे परतू नका. थोडंसं धाडस दाखवून ते वळण पार करा. कदाचित वळणापलीकडचा रस्ता जास्त सुकर, सुंदर असेल.