‘‘तुम्ही मोठय़ा आहात माझ्यापेक्षा- वयानं, मानानं, शिक्षणानं. एकेरी नावाने हाक मारणं मला बरं नाही वाटत.’’ मी डॉक्टर ह्य़ुबरना म्हटलं, तर त्या म्हणाल्या, ‘‘नेम हॅज नथिंग टू डू विथ रिस्पेक्ट, डीयर.’’ विचार आला, ‘‘कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किंवा मी कुणाला तरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी नव्हे का? एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर ते आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटलंच तर ते मनोमन झालो तरी पुरे!

ती न वर्षांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेत गेल्या गेल्या दुसऱ्याच दिवशी मला माझ्या गाईडला भेटायचं होतं. मी जेव्हा त्यांच्या ऑफिसपाशी पोहोचले तेव्हा नेमकं काय आणि कसं बोलायचं, फॉर्मल भाषा कशी वापरायची या सगळ्याचा मनोमन सराव चालू होता. ‘आधी गुड मॉर्निग.. मग शेकहँड की आधी शेकहँड? की दोन्ही एकाच वेळी?’ नुसता गोंधळ उडाला होता. मी बाहेर उभी असल्याचं त्यांना कळलं आणि त्याच पटकन बाहेर आल्या आणि मला छान मिठी मारून त्यांनी माझं स्वागत केलं. माझं उजळणी केलेलं फॉर्मल भाषण तिथल्या तिथे विरून गेलं.
‘‘गुड मॉर्निग डॉ. ह्य़ुबर’’ मी तेवढय़ात मला आठवत असलेलं पहिलं वाक्य बोलून घेतलं. ‘‘वेलकम डीयर! कॉल मी लीसा. नो नीड टू से डॉक्टर ह्य़ुबर.’’ वयानं, मानानं, शिक्षणानं या एवढय़ा मोठय़ा बाईंना मी ‘ए लीसा’ म्हणायचं.? त्यांना ‘लीसा’ वगैरे म्हणायला माझी जीभ रेटेना आणि असं एकेरी संबोधन लिहायला हात काही धजावेना. पुढचे काही दिवस मी त्यांना ‘डीयर डॉ. ह्य़ुबर’ असेच ई-मेल पाठवत राहिले आणि प्रत्येक मेलला उत्तर देताना त्या ‘लीसा’ म्हणून उत्तर देत राहिल्या.
मी मराठमोळ्या वातावरणातून तिथे गेले होते, जिथे शिक्षकाला एकेरी नावानं हाक मारणं योग्य समजलं जात नाही. अर्थात, हा आपल्या इथल्या सामाजिक संकेतांचा आणि भाषेचाही प्रभाव होता. एक दिवस मी न राहवून डॉ. ह्य़ुबरना हे सगळं समजावून सांगितलं. ‘‘तुम्ही मोठय़ा आहात माझ्यापेक्षा- वयानं, मानानं, शिक्षणानं. असं एकेरी नावाने हाक मारणं मला बरं नाही वाटत. मला सवयच नाहीये.’’ त्या हसून म्हणाल्या, ‘‘ओके! कॉल मी लीसा ओन्ली व्हेन यू फील कंफर्टेबल.’’ त्यांचा पुढचा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता, ‘‘नेम हॅज नथिंग टू डू विथ रिस्पेक्ट, डियर.’’ मी एकदम जागी झाले. पुढच्या दोन वर्षांमधला माझा ‘डॉ. ह्य़ुबर’ असं म्हणण्यापासून ‘लीसा’ म्हणण्यापर्यंतचा प्रवास आमच्यातलं नातं अधिक प्रेमाचं आणि अधिकाधिक समतोल करणारा होता.
 एखादी वेगळी संस्कृती अनुभवली की आपण आपल्या संस्कृतीकडे तटस्थपणे पाहू शकतो. दोन संस्कृतींची तुलना करत दोन्हींमधले गुण-दोष जाणू शकतो. लीसाबरोबर निर्माण झालेल्या आदरयुक्त मैत्रीचा माझ्यावर खोल परिणाम झाला. आदर ही केवळ काही शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे, हे यातून प्रकर्षांनं जाणवलं.
माझ्या मनात हे कुठेतरी पक्कं बसलेलं होतं की माझ्या मनात जर एखाद्या व्यक्तीविषयी आदर असेल तर तो ‘दाखवायला’ हवा. जसं ते माझ्या मनात होतं तशीच ती माझ्या आजूबाजूच्या समाजाची अपेक्षाही होती. पूर्वी मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते तिथे ट्रीटमेंटबाबतची प्रत्येक लहानसहान गोष्ट मला ‘सीनियर’ डॉक्टरांना विचारून करावी लागायची. कोणतेही निर्णय घेण्याचं मला स्वातंत्र्य नव्हतं. महत्त्वाच्या किंवा काही नाजूक आजारांमध्ये सगळं विचारून करणं एकवेळ मान्य, पण कुठलीही छोटी गोष्ट नेहमी विचारूनच करायची? मी मिळवलेल्या पदवीनं मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं नव्हतं, तर मला माझ्याहून वयानं आणि पदवीने वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीपुढे अधिक ठेंगणं बनवलं होतं. ही सतत कुणापुढे तरी ठेंगणं असल्याची भावना मला कधी कधी निष्कारण आदर दाखवण्यास भाग पाडत होती.
मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलेला एक प्रसंग लख्ख आठवतो. बाई वर्गात आल्या की सगळ्यांनी उठून उभं राहायचं, असा त्यांच्या शाळेत अलिखित नियम होता. एकदा बाई वर्गात आल्या आणि एक मुलगी तिनं काढलेलं फुलपाखरू रंगवण्यात मग्न होती. बाई वर्गात आल्याचं तिच्या लक्षातच आलं नाही. ती सोडून बाकी सगळ्या मुली उठून उभ्या राहिलेल्या होत्या. बाई त्या मुलीकडे एकटक पाहत उभ्या राहिल्या. तिनं उठून उभं राहून त्यांना ‘सॉरी’ म्हणेपर्यंत! नेमकं काय घडलं असेल यातून? कामापेक्षा व्यक्तीला मान देणंच महत्त्वाचं, असा संदेश विद्यर्थिनींना गेला असेल का?
अशीच एक घटना आठवते. एका हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाला बहुधा ‘मोठे डॉक्टर आले की उठून उभं राहायचं’, असे आदेशच मिळाले असावेत. हॉस्पिटलमधले मोठे डॉक्टर त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि एकदम सगळं बिलिंग डिपार्टमेंट उठून उभं राहिलं. डॉक्टर आत गेले- डिपार्टमेंट खाली बसलं- डॉक्टर पुन्हा बाहेर आले- डिपार्टमेंट पुन्हा उभं! या ‘उठाबशा’ पाहून तिथे बसलेल्या रुग्णांची चांगलीच करमणूक होत होती. या ‘उठाबशा’ अत्यंत यांत्रिकपणे चालू होत्या. गंमत म्हणजे या यंत्रवत दाखवल्या जाणाऱ्या आदराकडे त्या डॉक्टरांचं बिलकुल लक्ष नव्हतं. ते आपले त्यांच्या फोनवर बोलण्यात मग्न! हे पाहताना माझ्या मनात आलं की ‘बिलिंग डिपार्टमेंट’मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचं कामातलं तादात्म्य महत्त्वाचं की हे आदर दाखवण्याचे उपचार महत्त्वाचे? लहानपणी खेळल्या जाणाऱ्या ‘शिवाजी म्हणतो, उठा ऽऽऽ’ या खेळाच्या मानसिकतेतून आपण बाहेर कधी येणार?     
‘दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणे’ ही आपल्याला लागलेली सवय आहे की आपली गरज आहे? ऑफिसमध्ये चहा/कॉफीचं यंत्र बसवलेलं असूनही बॉसला स्वत:चा चहा स्वत: घ्यावासा वाटत नाही, ही कित्येक ऑफिसमधली वस्तुस्थिती आहे. ही सवय मोडण्याची जबाबदारी कुणाची, हा खरा प्रश्न आहे. आपल्यापैकी अनेकांना स्वावलंबी असण्याचा अभिमान वाटत नाही, असं का बरं? मान इतरांनी द्यायचा, कामं इतरांनी करायची, चहा, पाणी हातात आणून द्यायचं आणि शब्दांशब्दांतून आदर व्यक्त करायचा, अशा परावलंबी मन:स्थितीतून आपली कार्यसंस्कृती कधी बाहेर येणार?
बेथ मायरसन ही आमच्या विद्यापीठातली एक अत्यंत कडक शिस्तीची आणि विद्यर्थीप्रिय प्राध्यापक. एकदा तिनं खूप उत्साहानं एका प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली आणि आम्ही त्या प्रकल्पात कशा प्रकारे सहभागी होऊ  शकतो याविषयी कल्पना सुचवल्या. ती अतिशय उत्साहात, आनंदी होऊन आणि स्वत:च्याच कल्पनेवर खूश होऊन बोलत होती. आमच्या वर्गातली केथलीन नावाची मुलगी एकदम उठून उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘बेथ, आय रियली डोन्ट थिंक दॅट इज गोइंग टू डू एनी गुड टू अस.’’ शिक्षकाच्या कल्पनांना छेद देण्याचं काम केथलीननी अगदी शांतपणे आणि आत्मविश्वासाने केलं. त्यात कुठेही उर्मट स्वर नव्हता की कुठे हेटाळणी नव्हती. तिनं केवळ तिचं म्हणणं मांडलं. मुद्देसूदपणे समजावून सांगितलं आणि बेथशी बराच वेळ याबाबत चर्चा केली. बेथनं तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि ‘‘गुड पॉइंट्स. आय नीड सम टाइम टू थिंक अबाउट धिस.’’ असं म्हणून तिच्या मुद्दय़ांना मानही दिला.  
असे काही प्रसंग आठवले की मनात येतं की हुद्दा, वय आणि शिक्षण या त्रयींचं आपण स्तोम माजवतो आहोत का? या त्रयींचा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजं बनवतो आहे का? असे कित्येक अनुभव आपल्या वैयक्तिक जीवनातही येतात. लग्न होऊन सासरी गेलेल्या माझ्या मैत्रिणीला हे ऐकून माहीत होतं की सासरकडचा एक लांबचा नातेवाईक खूप दारू पितो आणि त्याच्या बायकोशी बराच भांडतो. त्या व्यक्तीला भेटल्यावर ती त्याच्या पाया पडली नाही आणि नंतर तिनं तिची ही भूमिका सासरच्या माणसांकडे स्पष्ट केली; तेव्हा ‘प्रत्येक व्यक्तीत काही गुण-दोष असतातच. आपण गुणांकडे पाहून पाया पडायचं’, असा प्रेमाचा (की धाकाचा!) सल्ला तिला मिळाला.’ ‘म्हणजे ज्या व्यक्तीचे अनेक दोष मला धडधडीत दिसत आहेत त्याही व्यक्तीतले गुण शोधून काढून मी त्याच्या पाया पडायचं? कशासाठी?’ ती त्रस्त होऊन विचारत होती.
वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे, पण तो आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीची जी सक्ती लादली जाते, ती जाचक वाटू शकते. खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर ते आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटलंच तर ते मनोमन झालो तरी पुरे!
माझ्या नवऱ्याचा, सागरचा एक प्राध्यापक हा वृत्तविद्या आणि संशोधन या क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मानला जातो. मास्टर्स करीत असताना तो सागरची ओळख ‘माझा विद्यार्थी’ अशी करून देत असे. सागरचं मास्टर्स पूर्ण झाल्यावर लगेचच एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात तो त्याला भेटला. त्यावेळी मात्र त्यानं सगळ्यांना सागरची ओळख त्याचा ‘कलीग’ म्हणून करून दिली. या बरोबरीच्या दर्जानं सागरला त्याच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. एका मोठय़ा वटवृक्षाच्या सावलीत केवळ एक खुरटं झुडुप बनून राहण्याची त्याला परवानगी नव्हती, हे त्याला जाणवलं. कामाच्या ठिकाणी आपण एकमेकांना जितकं समान दर्जानं वागवू तितकं जबाबदारीचं विकेंद्रीकरण होतं. प्रत्येकाला एक भूमिका मिळते. उतरंडीतून निर्माण होणारा ताण टाळता येतो. भारतातील कित्येक संस्था आणि कामाची ठिकाणं आता अशा विचारांची कार्यसंस्कृती आमलात आणत आहेत. एकमेकांना नावाने हाक मारणं, कार्यपद्धती ‘पिरॅमिड’सारखी ठेवण्यापेक्षा ‘समपातळी’ची ठेवणे, संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कामाकरिता ‘बॉस’ म्हणून नेमणे, मीटिंगमध्ये गोलाकार बसताना खुच्र्याची नेमणूक न करणे इत्यादी छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांतून कामाचं ठिकाण अधिक मैत्रीपूर्ण, खेळीमेळीचं करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या प्रयत्नांना वेग येण्याची गरज आहे.
कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किंवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसातील निखळ नात्याला पारखे होत जाऊ, अशी भीती वाटते. आपण आपल्या मनाला सतत हे सांगत आहोत की ‘आपण सर्व एकाच दर्जाचे नाही’, हे सर्वात आधी थांबायला हवं. स्वत:ला अतिमहत्त्व देणंही नको आणि स्वत:ला मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको! खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा आपण ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा, नाही का?