News Flash

अंतर्मुख करणारा लेख

‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ ( १५ फेब्रुवारी) या डॉ. ऋतुजा पाटील - कुशलकर यांच्या ओघवत्या शैलीतील मनाला भिडणाऱ्या लेखामुळे अंतर्मुख झाले

| March 15, 2014 01:10 am

अंतर्मुख करणारा लेख

‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ ( १५ फेब्रुवारी) या डॉ. ऋतुजा पाटील
-कुशलकर यांच्या ओघवत्या शैलीतील मनाला भिडणाऱ्या लेखामुळे अंतर्मुख झाले. डॉ. ऋतुजा यांचे मृत्युशय्येवरील अनुभव वाचताना डोळे पाण्याने डबडबून आले. आपल्या मुलाला या सर्व घडामोडी बाहेरून वेगळय़ा स्वरूपात समजण्यापेक्षा आपणच सांगणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटले व मनावर दगड ठेवून त्यांनी मुलाला ही सगळी माहिती समजावून सांगितली. खरंच हे सगळं करताना मातृहृदयाला किती यातना झाल्या असतील? आयुष्य आपण ठरविल्याप्रमाणे पुढे जात नाही. मात्र योग्य नियोजन केले तर मृत्यूही सुसह्य़ होऊ शकतो, हे त्यांनी वाचकांना पटवून दिले आहे.
याच अंकातील दिनेश गुणे यांचा ‘देहरूपी उरावे’ हा लेखही तेवढय़ाच तोलामोलाचा आहे. मरण तर येणारच आहे, परंतु आपल्या मरणाचा दुसऱ्यांना उपयोग व्हावा ही सदिच्छा बाळगणारा सदानंद कुठेतरी मनात घर करून राहिला.. ‘ब्लॉग माझा’मधील गजानन कुलकर्णी यांचा प्रवास अनुभव आणि मंदाकिनी गोडसे यांचा ‘पा.टी.मा.’ हा विनोदी लेख आवडला. ‘टर्निग पॉइंट’मधील अर्चना देवपूरकर यांनी केलेला जबर संघर्ष व त्यातून त्यांनी मिळवलेले यश खरोखर कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे रजनी दांडेकर यांनी त्यांच्या नाना रंगांनी रंगवलेल्या संसाराचे ‘परिपूर्ण चित्र’ भावले.

शोकांतिका टळली 
‘एक अटळ शोकांतिका’
(१ फेब्रुवारी) हा आरती कदम यांचा लेख वाचून १५ दिवस लोटले तरी ते सर्व आठवले की मन सुन्न होते. असे नरमाध असतात, आहेत आणि पुढे ते राहणार, जग कितीही सुधारले तरीही! यानिमित्ताने ५५ वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात घडलेली सत्यकथा आठवली. कराडला सोमवार पेठेत खूप वाडे होते. शाळा सुटल्यावर आम्ही सर्व मैत्रिणी वाडय़ांत खेळायला जायचो. आम्हा मैत्रिणींचे वय तेव्हा १४ ते १५ होते. कुणाची कळी उमलली होती, कुणाची नव्हती. अशीच आमची एक मैत्रीण (नंतर झाली) एका वाडय़ात राहायला आली. आई आणि एक लहान बहीण, तिला वडील नव्हते. त्यांच्या शेजारी एक म्हातारा राहायचा. चार वर्षांपूर्वी बायको गेलेली, मूलबाळ नव्हते. वय वर्षे ५५. तिला म्हणाला, मी तुझी शिकवणी घेतो. नवीन शाळा, नवीन गाव तेवढीच मदत म्हणून आईलाही काही गैर वाटले नाही. थोडे दिवस ती आमच्याबरोबर खेळायला येत होती. नंतर शाळा सुटल्यावर लगेच घरी जायची. मला अभ्यास करायचा आहे म्हणायची. शिकवणीच्या वेळातच म्हाताऱ्याने तिची कळी पार कुस्करून टाकली होती. तिलाही चटक लागली. पण चार पाच महिने गेल्यावर आईला जरा संशय आला म्हणून तिने पाळत ठेवली आणि त्या माउलीला जे समजले त्यामुळे जबर धक्का बसला. नवीन गाव, दोन मुली, नवरा नाही, तिची काय अवस्था झाली असेल. कुठलाही गाजावाजा न करता तिने मुलीला घेऊन गाव सोडले. ११ वी पास झाल्यावर तिला एका मुलाने मागणी घातली. दिसायला सुंदरच होती, हुशार होती. तो तिच्या घरी गेला. तिच्या आईने त्याला सर्व घडलेली परिस्थिती सांगितली. त्याने मोठय़ा मनाने सारे स्वीकारले. दोघांचे लग्न झाले. नुकताच तिच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा झाला. तिचं नशीब थोर म्हणून आईच्या लक्षात आले, तिचे आयुष्य मार्गी लागले.
हल्ली मुला-मुलींना फार सांभाळावे लागते. टीव्हीवरील जाहिरात काय, नवरात्रीमधील दांडिया काय, मुला-मुलींपुढे फार प्रलोभने आहेत. म्हणूनच मी हल्लीच्या आई-वडिलांना एकच सांगते, मुलांच्याकडे खूप लक्ष द्या. त्यांचे मित्र बनून राहा, त्यांना मोकळेपणाने बोलते करा. पैसे द्या पण कुठे खर्च करतात तेही विचारा. आपले करियर नक्की करा, पैसा मिळवा, पण मुलांच्याकडे लक्ष द्या. एक पावसाळे पाहिलेली, चांगले-वाईट अनुभव घेतलेली आजी तुम्हाला विनंती करते आहे.
शरयू कुलकर्णी, डोंबिवली

सुसंगत चित्ररेखाटन भावले
‘एक अटळ शोकांतिका’ (१ फेब्रुवारी) हा आरती कदम यांचा लेख वाचून मन सुन्न झाले. ‘सत्यमेव जयते’ या आमीर खानच्या मालिकेतही त्याने हा विषय हाताळला होता. शरीरातील ‘डेंजर पार्ट’ मुलांना समजून सांगितले व त्याला कोणी स्पर्श केला तर ओरडायचे किंवा तसा स्पर्श करू द्यायचा नाही हे चांगले समजावले होते. ‘मधू’ला जर असा आमीर खान तेव्हा भेटला असता तर ती वेळीच सावरली असती. आयुष्याची अशी शोकांतिका झाली नसती. हा लेख वाचल्यावरसुद्धा पालक नक्कीच जागे होतील. ‘चतुरंग’ने हा महत्त्वाचा लेख दिला याबद्दल अभिनंदन. लेखातील शब्द जितके भिडले तितकेच लेखाला सुसंगत असे नीलेश जाधव यांचे चित्ररेखाटनही भिडले. सुयोग्य चित्रामुळे त्या त्या लेखाची प्रतिमा उंचावते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
नवीन वर्षांतील आजी-आजोबांसाठीचे सदरही खूपच वाचनीय आहे. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ लेखातील सुमनताईबद्दल वाचून त्यांना ऐकण्याची व भेटण्याची इच्छा झाली. लंडन ब्रायटर या ९६ वर्षांच्या आजींना तर हॅटस् ऑफ.
मनीषा नागरे, नागपूर

फॅशन का जलवा
‘ब्लॉग माझा’ या सदरातील पा.टि.मा. हा मंदाकिनी गोडसे (१५ फेब्रुवारी) यांचा, नर्मविनोदी शैलीतील खुसखुशीत लेख खूप आवडला. एखाद्या फॅशनबद्दल संबंधित कुणालाही न दुखवता, ‘नथीआडून तीर कसा मारावा’ याचा जणू हा दाखलाच!
पूर्वी प्लेग या रोगाची लागण सार्वत्रिक व फार झपाटय़ाने होत असे म्हणे. आजच्या फॅशन दुनियेची गत आणि गती काहीशी तशीच वाटते! अशी काही फॅशन पसरते की बोलता सोय नाही. आपण प्रत्यक्षात जसे आहोत त्यापेक्षा थोडे अधिक चांगले दिसावे, आपले व्यक्तिमत्त्व उठावदार व्हावे, असा मूळ उद्देश फॅशनच्या उदय होण्यामागे असावा. जो अगदी स्वाभाविक नैसर्गिक आहे, तथापि ‘पा.टि.मा.’सारखी एखादी फॅशन, स्त्री वर्गामध्ये अगदी सार्वत्रिक, सरसकट बनू लागली, तर फॅशनच्या मूळ गाभ्यालाच धक्का पोहोचत नाही काय, अशी शंका मनात येते. महिला वर्ग एवढय़ा पाठी उघडय़ा का टाकू लागला तर तो एक ‘कलंदर सौंदर्याचा आविष्कार वाटतो म्हणून’ असे उत्तर प्रस्तुत लेखात दिलेले आहे. याचा अर्थ अशा सौंदर्याचा आविष्कार हा नजरेला आनंद देण्यासाठी असतो, हे नक्की. दुर्दैवाने आपल्याकडे सुडौल, प्रमाणबद्ध शरीरयष्टीचे महत्त्व, सौंदर्य खुलविण्यासाठी त्याची गरज, याची मूलभूत जाणीवच आपल्याकडे नाही किंवा फॅशन दुनियेला ती रुचणारी, मानवणारी नसल्यामुळे दुर्लक्षिली काय न कळे. हौसेला मोल नाही म्हणावे तर फॅशन पाहणाऱ्यांचे काय? पाठीला जरी डोळे नसले तरी उघडय़ा डोळय़ांनी रस्त्यावरून वाहन चालविताना (ज्याला पर्याय नाही!) उघडी पाठ, पोट,  नजरेतून कसे चुकविणार? तेही हाताच्या अंतरावरून! सिग्नलच्या लाल दिव्यांत! यासह मालिकांमधून अशा फॅशनला प्रोत्साहनच मिळते असे चित्र आहे. अभिनय करणे हा एक व्यवसाय आहे. तसेच त्या त्या भूमिकेच्या म्हणून काही गरजा कलाकारांकडून असू शकतात. (उदा-विशिष्ट पेहराव, दागिने इ.) मात्र मालिकांच्या नित्याच्या अशा थेट जवळिकेतून नको ती फॅशन रुजते त्याचे काय? त्या त्या भूमिकांशी एकरूप होताना इतर समस्त स्त्री वर्गाचा विचार संबंधितांनी करावा असे वाटते.
प्रभा हर्डीकर, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:10 am

Web Title: response 2
टॅग : Chaturang
Next Stories
1 सदाहरित
2 जगण्यातली सजगता
3 स्त्रीत्वाचा नवा अध्याय, नवं आव्हान
Just Now!
X