७ जूनच्या ‘चतुरंग’ पुरवणीतील पर्यावरण दिनानिमित्त सर्व लेख समयोचित आणि माहितीपर आहेत.
वीणा करंदीकरांची स्वानुभवाधारित छोटी गोष्ट खरोखरच ‘मोलाची’ आहे. त्यांनी निभावलेली जबाबदार नागरिकाची भूमिका अभिनंदनीय आहे. अर्थात अशी भूमिका घेणाऱ्या सर्वानाच उत्साहदायक अनुभव येण्याची शक्यता कमीच, तरीपण ‘निसर्गाप्रति कृतज्ञता’ म्हणून ज्याला जमेल त्याने हे व्रत घेतलेच पहिजे. आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला सांगावेसे वाटते की, मी गेली कित्येक वष्रे कोकण रेल्वेने प्रवास करताना सहप्रवाशांना खिडकीतून रिकामे ग्लास, बाटल्या टाकू नका, अशी विनंती करतो. स्वत:कडे या वस्तू जमा करून स्थानकावरील कचराकुंडीत टाकतो. या आशयाची सूचनापत्रे वाटतो.
या लेखामुळे एका समविचारी व्यक्तीचे अनुभव समजले, त्यामुळे उत्साह वाढला आहे.
-मधू घारपुरे, सावंतवाडी

केल्याने होत आहे रे
७ जूनच्या पुरवणी मधील ‘कचऱ्याचे आव्हान’ आणि वेगवेगळ्या लोकांनी व्यक्तिगत पातळीवर हे आव्हान स्वीकारून सुरू केलेल्या कामाचा गगनावेरी गेलेला वेलू हे अनुभव खूपच स्फूर्तिदायक आहेत. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ ही समर्थाची उक्ती आपण सर्वानीच ध्यानात घेणे आवश्यक आहे.
या निमित्ताने एक जुनी आठवण जागी झाली. काही कामानिमित्त एका दुकानाबाहेरील रांगेत उभा होतो. माझ्या मागे दोघेजण आजूबाजूला दिसणाऱ्या कचऱ्यावरून पालिकेला दुषणे देत होते, तर पुढील एकजण वारंवार थुंकत होता. मी मागील दोघांना म्हटले की, ‘आपण केवळ दूषणेच देत बसणार का? की निदान इतरांना असे करू नका म्हणून समजावून सांगणार की नाही? पुढे जो माणूस उभा आहे, तो सारखा थुंकत आहे, त्याला आपण समजावून सांगू या.’ आम्ही ते केलं आणि खरोखरीच या गोष्टीचा योग्य तो परिणाम साधला गेला. समाजजागृती आणि ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवले तर हळूहळू का होईना, पण नागरिकांना चांगली सवय लागेल.
यावरून आणखी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे, आपण पुढाकार घेऊन काही सांगायला किंवा करायला कचरतो, कारण कदाचित आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या बाजूने उभे राहतील की नाही ही शंका असते. पण प्रत्येकाने मनावर घेतले तर फरक पडेल.
-अभय दातार, मुंबई</strong>

पुनर्वचिार करावयास हवा
‘आदरपूर्वक पुनर्वचिार’ हा २४ मेच्या पुरवणीतील लेख म्हणजे वाचनाचा एक सुंदर अनुभव आहे. खरंच आपण सर्व एकाच दर्जाचे आहोत ही भावना आपल्या मनामध्ये रुजणे अत्यावश्यक आहे. आपण स्वत:ला अतिमहत्त्व देणंही नको आणि स्वत:ला कमी लेखणेही नको. आदर दाखवण्याच्या आपल्या जुन्या पद्धतीचा आपण नक्कीच पुनर्वचिार करावयास हवा.
– वीणा नागावकर

हृदयस्पर्शी सत्यकथा
प्रत्येक विवाहित स्त्रीला मातृत्वाची ओढ असतेच; पण दुर्दैवाने काही स्त्रियांची मुले शारीरिकदृष्टय़ा विकलांग असतात किंवा मतिमंद, गतिमंद असतात. अशा मुलाला/ मुलीला वाढवणे म्हणजे आई-वडिलांची सत्त्वपरीक्षा असते. अशाच एका जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी आईची- माधवी कुंटेंची- संपदा वागळे यांनी सांगितलेली सत्यकथा (१० मे) फक्त हृदयस्पर्शी नाही, तर प्रेरणादायीही आहे. आईची महती सांगणाऱ्या अनेक गोष्टी, कथा, कविता आपण वाचतो. पण स्वत:च्या आवडी-निवडींना मुरड घालून, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता, अपार कष्ट, त्याग, ध्येय आणि श्रद्धा यांच्या बळावर आपल्या बहुविकलांग मुलाला- अजितला स्वत:च्या पायावर ‘मानसिक’दृष्टय़ा उभे करून त्याला स्वावलंबी बनवणाऱ्या अशा असामान्य मातेचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात! या मातेने मुलांच्या संगोपनापुरते आपले विश्व मर्यादित न ठेवता समाजकार्यातही त्या आनंदाने सहभागी होतात हे विशेष.

याच पुरवणीतील जागतिक मातृदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या काही छोटय़ा छोटय़ा गोष्टी आणि ‘ब्लॉग माझा’ही आवडला. डॉ. प्रभाकर आपटे यांच्या संशोधनाला, मेहनतीला आणि कर्तृत्वाला दाद देणारा ‘इतिहासाचा शोध’ हा लेखही उल्लेखनीय. याउलट ‘सेकंड इनिंग तिच्यासाठी’ देणारे दिलीप वेंगसरकरांसारखे प्रेमळ पार्टनरही याच भारतात आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.
नारायण ताले, पुणे</strong>