|| डॉ. राजन भोसले

शारीरिक भूक ही कितीही नैसर्गिक जरी असली तरी ती ‘जबाबदार’ असणं हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन व जबाबदार लैंगिक वर्तन यातला नेमका फरक काय हेच अनेकांना माहीत नसतं. अशा अज्ञानामुळे सरसकट तमाम लैंगिकतेचाच समूळ अव्हेर करण्याचे अनैसर्गिक सल्ले पालकवर्ग मुलांना देत राहातात व असे सल्ले पाळले जातील अशी भ्रामक समजूत करून घेतात.

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

बारावीची परीक्षा संपताच मुकुंद सोसायटीमधल्या सहा समवयस्क तरुण-तरुणींनी गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवला. यामध्ये चार मुलगे व दोन मुली. सर्वजण एकमेकांचे जुने व चांगले मित्र. सर्वाचे आई-वडील सुखवस्तू, सुशिक्षित, एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे व आधुनिक विचारसरणीचे असल्यामुळे मुला-मुलींना ट्रिपसाठी परवानगी मिळवताना काहीच अडचण आली नाही. त्यात या सहाजणांमध्ये केवळ मैत्री.. प्रेम प्रकरण वगैरे असं काहीच नाही याची सर्वानाच खात्री होती. पाच दिवसांची ट्रिप ठरली.

पाच दिवसांनी जेव्हा हा कंपू गोव्याहून परत आला त्यावेळी कमलच्या आई-वडिलांना मुलांच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल सर्वप्रथम जाणवला. दोन-चार दिवस जाऊ देऊन कमलच्या वडिलांनी कमलजवळ हळुवारपणे याची विचारणा केली. कमलचे वडील हे जीवशास्त्राचे प्राध्यापक. स्वभावाने शांत व मृदुभाषी. गोव्यावरून परतल्यावर कमलच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल त्यांना प्रकर्षांने जाणवला होता. कमल आईपेक्षा वडिलांची लाडकी. वडिलांनी एकांतात समंजसपणे विचारताच कमल बोलती झाली. ‘‘गोव्याला असताना आमच्या ग्रुपमधल्या अलका व चारपैकी दोन मुलांमध्ये अनेकदा शारीरिक जवळीक घडली.’’ हे कमलने वडिलांना सांगितलं. स्वत: मात्र ती या प्रकारापासून अलिप्त राहिली हेसुद्धा तिने वडिलांना स्वत:हून सांगितलं. कमल खरं बोलत होती व वडिलांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.

कमलकडून ही गोष्ट कळताच तिच्या वागण्या बोलण्यात झालेल्या बदलाचं कारण आता आपल्याला कळलंय असं तिच्या वडिलांना वाटलं. ‘जवळच्या मित्रांमध्ये झालेले शारीरिक चाळे बघून कमल विचलित झाली असावी.’ असं अनुमान वडिलांनी सहजपणे केलं. कमलच्या नैतिक धारणांना हे प्रकार रुचले नसावेत व त्यामुळेच ती अस्वस्थ झाली असावी असा काहीसा समज तिच्या वडिलांनी सहज करून घेतला. उलट तिने पाळलेल्या संयमाबद्दल तिची खास पाठ थोपटावी अशा उद्देशाने वडील तिला समजावू लागले. पण वडिलांच्या या समजवण्याने कमल अधिकच विचलित होते आहे हे त्यांच्या लवकरच ध्यानात आलं. थोडं थबकून व विचार करून वडिलांनी कमलला याची विचारणा केली. त्यावर कमल जे बोलली ते मात्र वडिलांना अगदीच अनपेक्षित होतं.

अलकाला एकटीलाच ही मजा अनुभवायला मिळाली. आपल्या वाटय़ाला यातलं काहीच आलं नाही. मित्रांना अलका हवी होती. त्यांना ती आकर्षक वाटत होती. त्यांचा सर्व ओढा अलकाकडे होता. – या गोष्टींमुळे कमल विचलित झाली होती. अलकाबद्दल तिला मत्सर वाटत होता. आपल्या वाटय़ाला मुलांकडून मिळणारं ‘अटेन्शन’ आलं नाही याची खंत कमलला बोचत होती. नैतिक धारणा, मूल्य किंवा संयम यांचा लवलेशही तिच्या बोलण्यात किंवा ध्यानीमनी नव्हता. जे अलकाला मिळालं ते आपल्याला मिळालं नाही याचं दु:ख तिला झोंबत होतं. एक कमीपणाची भावना. एक संधी गमवल्याची उणीव कमलला आतून खात होती.

कमलचा हा अनपेक्षित ‘आलाप’ व्यक्त होताच तिचे वडील थोडे सावध झाले. आपण एका वेगळ्याच प्रकाराचा सामना करतोय हे त्यांच्या लक्षात आलं. एका बाजूला कमलने अशा प्रकारात पडू नये व संयम बाळगावा हे त्यांना वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला ते न मिळाल्यामुळे केविलवाणा चेहरा करून व्यथित झालेली कमल त्यांना समोर दिसत होती. थोडा खोल विचार करून सावधपणे कमलच्या वडिलांनी कमलशी हा विषय बोलायचं ठरवलं.

शारीरिक संबंध कितीही सुखदायक असले तरी त्यामागचे संभाव्य धोके, त्यातून उद्भवणारी विकल्पित भावअवस्था, शरीराला सोसावे लागतील असे त्याचे संभाव्य परिणाम, समाजाच्या नैतिक घडीला विस्कळीत करू शकतील अशी त्याची शक्यता हे कमलच्या वडिलांनी तिला समजवायचं ठरवलं. जो प्रश्न कमलच्या वडिलांना पडला तो अनेक पालकांना पडताना आजकाल दिसतो. त्याचंच स्पष्टीकरण इथे मी करणार आहे.

पौगंडावस्थेत पोहोचताच मुलांच्या शरीरात काही नवीन संप्रेरकांचा (हॉर्मोन्स) संचार सुरू होतो. या संप्रेरकांचा परिणाम मुलांच्या शरीरावर, मनावर, विचार करण्याच्या प्रक्रियेवर व भावनांवर झपाटय़ाने होऊ लागतो. त्यामध्ये वारंवार लैंगिक भावना उफाळून येणं, तीव्र कामुक विचार मनात येणं, दुसऱ्याबद्दल अगम्य शारीरिक आकर्षण निर्माण होणं – यांचा मोठा समावेश असतो. अचानक एखादं वादळ यावं असाच हा प्रकार असतो.

नेमक्या याच बदलांबाबतची कसलीही पूर्व कल्पना व माहिती अनेक वेळा मुलांना अधिकृतपणे पालक किंवा शिक्षक यांनी दिलेली नसते. एकीकडे लैंगिकतेविषयी त्यांच्या मनात अनेक आवेग-प्रत्यावेग, विचार-विकल्प, शंका-संभ्रम उफाळत असतात पण दुसरीकडे त्याचं परिमार्जन कसं आणि कुणापाशी करावं हे त्यांना ठाऊक नसतं. अशा वेळी मित्र व इंटरनेट हेच दोन पर्याय त्यांना उपलब्ध दिसतात. इंटरनेटमधून मिळणारी माहिती व एक्स्पोजर यावर कसलीच सेन्सॉरशिप नसल्याने त्यातून मिळणारे संकेत व संदेश हे अनेक वेळा बाधक व घातक असू शकतात.

मित्र हा दुसरा पर्याय. समवयस्क मित्रांची अवस्थाही तीच असल्याने अपरिपक्व व परिणामांचं तारतम्य नसलेले, भावनेच्या भरात निर्णय घेण्याकडे मुलांचा कल असतो व इथेच चूक होण्याचा मोठा धोका टपून बसलेला असतो.

ही वेळ येण्याआधीच जर मुलांना पालकांकडून लैंगिकतेबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन मिळालं असेल व वेळोवेळी उफाळणाऱ्या लैंगिक विचार व भावनांचा निचरा कसा होईल याचं प्रासंगिक स्पष्टीकरण जर मुलांना दिलं गेलं असेल तर मग थोडा संयम व थोडा धीर धरून ते या अस्थिर स्थित्यंतराला नेटाने पार करू शकतील.

शारीरिक भूक ही कितीही नैसर्गिक जरी असली तरी ती ‘जबाबदार’ असणं हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन व जबाबदार लैंगिक वर्तन यातला नेमका फरक काय हेच अनेकांना माहीत नसतं. अशा अज्ञानामुळे सरसकट तमाम लैंगिकतेचाच समूळ अव्हेर करण्याचे अनैसर्गिक सल्ले पालकवर्ग मुलांना देत रहातात व असे सल्ले पाळले जातील अशी भ्रामक समजूत करून घेतात.

जबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे नेमकं काय असा प्राथमिक स्तरावरचा प्रश्न काही पालक विचारतात. याचं उत्तर सरळ आहे. ज्या वर्तनाच्या सर्व संभाव्य परिणामांची पुरेपूर जाण व्यक्तीला असते व अशा वर्तनाच्या तमाम परिणामांची जबाबदारी घेण्याची क्षमता व तयारी जेव्हा व्यक्तीमध्ये असते तेव्हाच त्याला ‘जबाबदार लैंगिक वर्तन’ असं म्हटलं जातं. योग्य ती माहिती व क्षमता नसताना, केवळ शारीरिक आवेगाच्या अधीन होऊन बेभान होणं व आपल्या वर्तनाच्या परिणामांची तमा न बाळगता त्याला बळी पडणं यालाच ‘बेजबाबदार’ लैंगिक वर्तन म्हटलं आहे.

अविचाराने भावनेच्या भरात केलेल्या लैंगिक चुका कधी शरीरावर, कधी मनावर, कधी व्यक्तिमत्त्वावर  तर कधी व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर कायमस्वरूपाचे घाव करू शकतात याची सावध कल्पना असणं यालाच ‘परिणामांचं तारतम्य’(Consequential Thinking) असणं’ असं म्हणतात. हे तारतम्य वाढीच्या वयात मुलामंध्ये विकसित करण्याच्या दृष्टीने सुजाण पालकांनी कार्यरत राहाणं हे आत्यंतिक गरजेचं आहे. त्यासाठी मुलांबरोबर जीवनाच्या सर्व अंगाबद्दल सतत व सहज असा सुसंवाद होत राहाणं गरजेचं आहे. अशा सुसंवादामध्ये लैंगिकतेबाबतची चर्चा समाविष्ट असणं हे साहजिकच अपेक्षित व अगत्याचं आहे. त्यासाठी आधी आपली स्वत:ची पूर्व तयारी असायला हवी. ही तयारी करताना मार्गदर्शक ठरू शकतील अशी उत्तम पुस्तकं वाचणं व संग्रही ठेवणं गरजेचं आहे. पालकांना मार्गदर्शक ठरू शकतील अशी या विषयावरची काही पुस्तकं मी लिहिली आहेत. ती लिहिताना आपली मूळ संस्कृती कशी योग्य प्रकारे त्यात येईल व नैतिक मूल्यं कशी जोपासली जातील याचं पूर्ण भान मी माझ्या लिखाणात नेहमी ठेवलं आहे.

इंटरनेट येण्याआधीच्या काळात माहिती व मूल्य शिकण्याचं केंद्र पालक व शिक्षक असत. आज हे समीकरण बदलेलं आहे. माहिती मिळवणं इंटरनेटच्या मदतीने आज अधिक सुलभ जरी झालं असलं तरी मिळालेली माहिती किती योग्य किंवा अयोग्य हे ठरवणार कोण? हा खरा प्रश्न आहे. शिवाय मूल्य व ‘परिणामांचं तारतम्य’ या गोष्टी वाचून शिकायच्या नसतात तर वागणुकीत पाहून शिकायच्या असतात. म्हणूनच पालकांची जबाबदारी आता खरं तर वाढली आहे.

मूल्याधार शिक्षण हे विज्ञानाशी सुसंगत असावं. कर्मठ व एकतर्फी नियमांमध्ये ते गुरफटलेलं नसावं. शांत व समंजस चर्चेतून, सर्व वाद-प्रवाद निर्भीडपणे एकमेकांसमोर मांडून, परस्परांच्या भावना व विचारांचा समान व समर्पक आदर बाळगून जर नियम बनवले गेले तरच ते पाळले जातील याची जाणीव पालकांनी ठेवण्याची आता वेळ आली आहे.

rajanbhonsle@gmail.com

(लेखात चर्चिलेली घटना सत्य आहे, मात्र त्यातली नावं बदललेली आहेत.)