‘कुटुंब’ हे मी ‘तुला वाढवतो’ म्हणता म्हणता कधी ‘आता तू मला पोस’ म्हणेल हे वाढणाऱ्या कुठल्याच मुलाच्या लक्षात येत नाही. सावध राहिल्याशिवाय.. मुलगा जर अगदीच बेसावध असेल तर ‘तू मला पोस’ म्हणणारं कुटुंब ‘मी तुला खातो’ कधी म्हणायला लागलं हेही त्या मुलाला समजत नाही. कर्त्यां मुलानं बाहेरच्यांच्या आधी घरातल्यांपासून स्वत:ला जपायला शिकलं पाहिजे. मी अनेक घरांमधून अशा बेसावध मुलांचे बळी जाताना पाहते आहे अगदी आजसुद्धा.
मला माझे बाबा अजूनही त्या अवस्थेत डोळय़ांसमोर दिसतात. त्यांना आसपासचं भान नसायचं. त्यांच्या हातात त्यांच्या विविध बँकांमधल्या विविध खात्यांची पासबुकं असायची. ते प्रत्येक खात्यात किती रक्कम आहे हे नुसतंच पाहात असायचे. आम्ही काही गरीब वगैरे नव्हतो. लहानपणी थोडा हट्ट केला की मला सायकल, भावाला महागडे बूट या गोष्टी मिळत होत्या. तरी आपले बाबा असे हरवल्यासारखे पासबुकात का बघत राहतात हे त्या लहान वयात कळायचं नाही. हळूहळू मोठं होताना कळत गेलं, माझे बाबा आमच्या नात्यातल्या इतरही काही कुटुंबीयांना पोसत होते. ते एकटे अनेक ठिकाणी पुरे पडू पाहात होते. त्यांनी इतक्या जणांचं इतकं काही त्यांच्या स्वत:च्या उरावर ओढवून घेतलं होतं, की त्या सगळय़ाला एकटय़ानं पुरं पडणं त्यांना सात जन्मात जमलं नसतं. त्यांनी स्वत:ला अनेक जणांच्या तावडीत सापडू दिलं होतं. त्या अडकत जाण्याच्या वाटेवर सुरुवातीला त्यांना परतीचा रस्ता दिसतही असेल कदाचित, पण नंतर मात्र ते ज्यात ज्यात अडकत गेले ती एक दलदलच होती.

‘मन मनास उमगत नाही’ (प्रसिद्धी २१ सप्टेंबर) या लेखात उल्लेख असणाऱ्या ‘ईएमआरडी’ या पद्धतीने उपचार करणाऱ्या आपल्या परिसरातील मानसोपचारतज्ज्ञांची माहिती आपण http://www.emdrindia.org या वेबसाइटवर जाऊन मिळवू शकता.

 ‘कुटुंब’ हे मी ‘तुला वाढवतो’ म्हणता म्हणता कधी ‘आता तू मला पोस’ म्हणेल हे वाढणाऱ्या कुठल्याच मुलाच्या लक्षात येत नाही. सावध राहिल्याशिवाय.. मुलगा जर अगदीच बेसावध असेल तर ‘तू मला पोस’ म्हणणारं कुटुंब ‘मी तुला खातो’ कधी म्हणायला लागलं हेही त्या मुलाला समजत नाही. कर्त्यां मुलानं बाहेरच्यांच्या आधी घरातल्यांपासून स्वत:ला जपायला शिकलं पाहिजे. मी अनेक घरांमधून अशा बेसावध मुलांचे बळी जाताना पाहते आहे अगदी आजसुद्धा. माझे बाबा हा असाच एक बेसावध मुलगा होते. आसपासच्यांची, घरातल्यांची, नातलगांची काळजी जरूर घ्यावी, पण असं बेसावध असू नये. अशा बेसावधपणात माझ्या बाबांचं एकुलतं एक आयुष्य वेळेआधीच, फार नको त्या पद्धतीनं संपून गेलेलं मला दिसत आहे.
मी लहान असताना टक लावून पासबुकांकडे बघत राहणाऱ्या बाबांनी स्वत:वर आपणहून एक पैही खर्च केली नाही. त्यांना नवीन कपडे आई आणायची म्हणून, नाही तर त्यांनी आहे तेच कपडे आयुष्यभर वापरले असते. बाबा अवघ्या सहासष्टाव्या वर्षी त्यांच्या ओढाताणीला दमून अल्झायमर नावाच्या रोगानं गेले. बाबांच्या शेवटच्या दिवसांत आणि ते गेल्यानंतर जे जे घडत गेलं ते बाबांना कळायला हवं होतं असं खूप असोशीनं वाटतं. जर ते सगळं त्यांना कळू शकलं असतं तर स्वत:चं आयुष्य ‘रिवाइंड’ करून त्यांचं त्यांनाच कदाचित वेगळं जगावंसं वाटलं असतं असं मला वाटतं. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची स्मृती गेल्यावर त्यांनी ज्यांच्यासाठी आयुष्यभर स्वत:चं रक्त आटवलं होतं, त्यांच्यापैकी कुणीच त्यांच्या आसपास फिरकले नाहीत. त्यांच्या जाण्यानंतरच्या त्यांच्या पहिल्या वाढदिवशी आम्ही घरच्यांनी एक छोटासा कार्यक्रम केला. बाबांनी कुटुंबाबाहेरच्या, पण अनेक लोकांना पैशाची मदत केली होती. त्यापैकी आम्हाला माहीत नसलेलं कुणीसं खूप लांबून येऊन बाबांनी त्यांना किती मदत केली हे सांगून हमसाहमशी रडलं. या माणसाला बाबांनी एकदाच दिलेले पैसे लक्षात ठेवून तो माणूस लांबून आला. ज्यांच्यासाठी बाबा आयुष्यभर वेडय़ासारखे पैसे पुरवत राहिले त्यांच्यापैकी एकही माणूस या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. त्यांच्यापैकी प्रत्येकाचं काही ना काही महत्त्वाचं काम निघालं होतं. हे बघून कदाचित या माणसांवर उधळलेल्या लाखो रुपयांपैकी निदान काही हजार तरी बाबांनी आयुष्यात ‘मागे’ जाऊन स्वत:वर खर्च केले असते का.. बाबांना कुणालाही पैशासाठी ‘नाही’ म्हणता आलं नाही. त्यांनी काही माणसांना अगदी ‘जवळचे’ समजून कुठल्याही कागदाशिवाय, सहीशिवाय त्या लोकांना लाखो रुपये दिले. ते ‘जवळचे’ अल्झायमरनंतर बाबांची स्मृती गेल्यावर ‘त्यांना काही आठवत नाही, त्यांनी आम्हाला इतके पैसे दिलेच नाहीत’ म्हणून शांतपणे मोकळे झाले. जे व्यवहार आईसमोर झाले ते लोक बाबा गेल्यावर आईला, ‘ते पैसे आम्ही देणार नाही. पुन:पुन्हा फोन करू नका. माझ्या बायकोला त्याचा त्रास होतो,’ असं म्हणाले. इतकंच नव्हे तर ‘तुम्हाला एवढीच पैशाची गरज असेल तर स्वत:ची गाडी का नाही विकत?’ असं म्हणून आईचा त्यांनी केलेला निर्लज्ज अपमान बाबांना बघवला असता का? मला आठवतं, लहानपणी एक शिंपी आईला काहीतरी उर्मटासारखं बोलला तेव्हा बाबांनी माझ्यासमोर त्याचं बखोटं धरलं होतं. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या ‘जवळच्यांचं’ हे वागणं पाहून त्यांनी त्या माणसाला एक पै देणं तर सोडाच, त्यांना समोर तरी उभं केलं असतं का?
बाबा फक्त एकाच माणसाला पैशासाठी स्पष्ट ‘नाही’ म्हणाले आणि तो माणूस म्हणजे ते स्वत:. त्यांची दोन्ही मुलं, बायकोसुद्धा आज भरभरून कमवत असताना त्यातलं काहीही पाहायला ते आज नाहीत. त्यांच्या शेवटच्या दिवसांत ते, मी आणि आई श्रीलंकेला गेलो होतो. तिथं जगातल्या सवरेत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या एका अत्यंत अप्रतिम हॉटेलात, आसपास उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, उंची पेयं असं सगळं असूनही अल्झायमरनं स्मृती गेलेले माझे बाबा त्या सगळय़ाकडे ढुंकून न पाहता शून्यात दृष्टी लावून बसलेले पाहून मला संपूर्ण हताश वाटलं होतं. अजूनही वाटतं.
या सगळय़ानंतर माझ्या बऱ्याच गोष्टींवरचा विश्वास उडाल्यासारखा झाला आहे. मला त्याचं वाईट वाटतं. काहीही झालं तरी आयुष्यावर पुन:पुन्हा विश्वास ठेवता यायला हवा. मला तो ठेवायचा आहे. जमत नाही अजून. जमवायचं आहे. अजूनही स्वत:वर मुक्तपणे पैसे खर्च करता येत नाहीत. अनेक देशांच्या उंची विमानतळांवर फिरताना, उंची दुकानांतल्या उंची वस्तू मोठय़ा डोळय़ांनी पाहताना त्यातली एकही स्वत:साठी घेताच येत नाही. सारखे पासबुकात हरवलेले बाबाच दिसतात. खरं तर माझ्यावर माझी सोडली तर इतर कुणाचीही जबाबदारी नाही. देवदयेनं उत्तम पैसा मिळतो आहे. पैसे साठत चालले आहेत. पण खर्च करता येत नाहीत. मला पैशाचा राग येतो. इतक्या जणांसाठी पैसे कमवता कमवताच माझे बाबा होत्याचे नव्हते झाले असं वाटतं. पैशाशी माझं नातं फक्त भीतीचं आणि कटुतेचंच राहिलं आहे.
या सगळय़ाला दुसरी बाजू आहे. नक्कीच आहे. मला सगळी कटुता बाजूला सारून ती बाजू पाहायची आहे. मी पैशावर रागावूनही तो माझ्याशी चांगलंच वागतो आहे. त्याबद्दल मी त्याची ऋणी आहे. कधी ना कधी त्याचा प्रेमाचा हात मीही प्रेमानं हातात घेईन अशी मला खात्री आहे. लुईस एल. नावाची लेखिका म्हणते, ‘एक डॉलरची नोट ही एका  गुलाबाच्या फुलाएवढी पवित्र असते. त्याहून कमी नाही, जास्तही नाही.’ हे सगळं मी माझ्या बुद्धीला समजावत असताना माझ्या मनाला एकच गोष्ट कळते, जगातल्या कुठल्याही नोटेपेक्षा माझ्या बाबांचा जीव मोलाचा होता, आहे, राहील. माझ्या बाबांचं या जगात असणं ही कुठल्याही पैशात मोजता न येणारी, सगळय़ात मोठी संपत्ती होती, आहे, राहील. ती संपत्ती मला हवी आहे, कुठलीही किंमत मोजून!
बाबा गेले त्यानंतर त्यांच्या एका मित्रानं बाबांनी त्या मित्राला लिहिलेलं एक जुनं पत्र मला पाठवून दिलं. त्या पत्रात एका संध्याकाळचं वर्णन होतं. त्या संध्याकाळमुळे त्यांना आठवत असलेली, व्याकूळ करणारी अनेक जुनी हिंदी गाणी, त्या गाण्याच्या त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्या पत्रात लिहिल्या होत्या. ते पत्र लिहिणारे माझे बाबा मला पूर्ण अनोळखी होते. माझ्या तिजोरीत, माझ्या दागिन्यांशेजारी ते पत्रं ठेवलं आहे मी. ती माझी सगळय़ात मोठी संपत्ती आहे. त्यात मला हवे असलेले माझे बाबा आहेत. पासबुकात हरवलेले नाहीत, तर संध्याकाळच्या वेळेच्या व्याकूळ केशरी आकाशात हरवलेले.
विमानप्रवास करताना विमानात नेहमी एक सूचना दिली जाते- ‘इमर्जन्सीमध्ये तुमच्यासमोर ऑक्सिजन मास्क येईल. तो आधी स्वत: लावा, मग दुसऱ्यांना मदत करा.’ इतरांसाठी झटता झटता स्वत:लाच मास्क लावायला विसरून अकाली निघून गेलेली बाबांसारखी अनेक माणसं मी घराघरांत पाहते. जाणारा निघून गेल्यावरही हे सगळं बोलण्याचा प्रपंच एवढय़ाचसाठी की एक भाबडी आशा आहे. हे सगळं कळल्यावर कुणीतरी एखादा तरी निदान स्वत: कष्टानं कमावलेले पैसे स्वत:वर खर्च करेल, स्वत:च्या मना-शरीराला थोडं तरी जपेल, थोडं तरी..त्याची मुलं भरभराट करतील, त्याच्या घरात सुख भरभरून वाढेल तेव्हा तो कुणीतरी एक तरी निदान हे सगळं बघायला या जगात असेल. निदान तो तरी असेल, ही भाबडी, वेडी आशा..    amr.subhash@gmail.com