05 August 2020

News Flash

आदिम प्रवृत्तीची विकृती

अनेक तरुणी ‘बॉडी शेमिंग’ला बळी पडतात. आपण अनाकर्षक आहोत, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो.

पुरुषांना असणारं स्त्रीदेहाबद्दलचं आकर्षण ही आदिम प्रवृत्ती; परंतु तिची जेव्हा विकृती होते तेव्हा ‘बॉइज लॉकर रूम’सारखी प्रकरणं समोर येतात.

आरती कदम – arati.kadam@expressindia.com

अनेक तरुणी ‘बॉडी शेमिंग’ला बळी पडतात. आपण अनाकर्षक आहोत, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यात काही जणांच्या चिडवण्यानं भर पडते. अशा वेळी आपले वेगवेगळ्या ‘अवस्थां’मधले फोटो काढून ते मैत्रिणींना पाठवणं, त्यांच्याकडून ‘लाइक्स’ मिळवणं यात त्या सुप्त समाधान मिळवत राहतात. कधी हे सेल्फी ‘हॅक’ केले जातात आणि नको ते घडतं.. काही जणींच्या बाबतीत, बॉयफ्रेंडवरचा नको इतका विश्वास आणि एका गाफील क्षणी प्रेमानुनयाचा व्हिडीओ काढायला दिलेली परवानगी, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेशी ठरते. पुरुषांना असणारं स्त्रीदेहाबद्दलचं आकर्षण ही आदिम प्रवृत्ती; परंतु तिची जेव्हा विकृती होते तेव्हा ‘बॉइज लॉकर रूम’सारखी प्रकरणं समोर येतात.

शरीरसंबंध वा भिन्न देहाबद्दलचं आकर्षण ही आदिम प्रवृत्ती! अत्यावश्यक गोष्टींमधली एक! निसर्गाला जगरहाटी सुरूच ठेवायची असल्यानं त्यानं शरीरसंबंधांत आनंद निर्माण करत त्यात सातत्य राहील याची तजवीज केली. शारीरिक, मानसिक गरजेबरोबरच पुढे जाऊन हा आनंद माणसाची भावनिक गरजही बनला; पण हीच आदिम प्रवृत्ती जेव्हा विकृतीचं रूप घेते, तेव्हा मात्र ‘बॉइज लॉकर रूम’सारख्या घटना घडतात..

दिल्लीतलं ‘बॉइज लॉकर रूम’ (मुख्य लेख वरती आहेच, त्यामुळे पुनरावृत्ती नको) हे प्रकरण आत्ता उघडकीस आलं म्हणून लोकांची यावर चर्चा सुरू झाली, अन्यथा अशा प्रकारच्या गोष्टी ना आपल्या सामाजिकतेला नवीन, ना मानसिकतेला! इंटरनेट, स्मार्ट फोन, समाजमाध्यमं, विशेषत: ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वापरणाऱ्यांपैकी किमान ७० टक्के  पुरुष त्यांना आकर्षक वाटणारे स्त्रीदेहाचे फोटो, क्लिपिंग्स वाटेल त्या ‘कमेंट्स’सह एकमेकांना पाठवतातच, यात काही रहस्य राहिलेलं नाही आणि अनेक स्त्रियाही त्यांना आकर्षक वाटणाऱ्या पुरुषांचे फोटो त्या क्षणी मनात आलेल्या विचारांसह इतरांना पाठवतातच, यातही काही नवीन राहिलेलं नाही. एकूणच हा विषय पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री आणि स्त्री-पुरुष यांच्यातल्या देवाणघेवाणीचा मामला होऊनही कित्येक वर्षे लोटली.  हे सारं कसं सुरळीत सुरू असतं..  त्यात योग्य-अयोग्य काय किंवा चांगलं-वाईट काय, असे प्रश्न ना उद्भवत, ना विचारले जात; पण एक दिवस असा येतोच.. आणि या प्रवृत्तीचीच विकृती होते. त्यात अनेक आयुष्यं पणाला लागतात. नात्यांचे खरे रंग दिसतात..

‘चतुरंग’मध्येच २०१५ मध्ये मी लिहिलेल्या ‘रिव्हेंज पॉर्न’ या  लेखाची यानिमित्तानं आठवण झाली. २०१० मध्ये हंटर मूर यानं isanyoneup.com नावानं एक संकेतस्थळ सुरू केलं आणि त्यावर लोकांकडून मागवलेली मुलींची अनावृत, अर्धनग्न छायाचित्रं टाकायला सुरुवात केली. ज्या ज्या पुरुषांचं ‘ब्रेकअप’ झालं होतं त्यांनीच नाही, तर गर्लफ्रें डशी पटत नाही, बायको सोडून गेली, अशांनीही आपल्या जोम्डीदारांची अशी छायाचित्रं केवळ सूड भावनेनं पाठवायला सुरुवात केली. जगभर हे संकेतस्थळ इतकं लोकप्रिय झालं, की त्यातून हंटर दर महिन्याला वीस हजार डॉलर्स कमवायला लागला. अर्थात यातली अनेक छायाचित्रं ही ‘मॉर्फ’ केलेली, म्हणजे ‘फोटोशॉप’मध्ये तयार केलेली असायची, तर काही मात्र एका ‘इंटिमेट’ क्षणी काढू दिलेली छायाचित्रं असायची. अनेक तरुणींबरोबरच अनेक गृहिणी, प्रौढाही यातून सुटल्या नाहीत. एका मुलीच्या आईनं मात्र याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आणि जंग जंग पछाडल्यानंतर शेवटी हे संकेतस्थळ बंद करण्यात तिला यश आलं; पण या दरम्यान भरून न निघणारी हानी होऊन गेलेली होती. यात बळी गेलेल्या स्त्रिया ९० टक्के  होत्याच, पण १० टक्के  पुरुषही होते, हीसुद्धा लक्षात घेण्यासारखी बाब!

अर्थात एक संकेतस्थळ बंद झाल्यानं अशा घटना घडणं बंद झालेलं नाही, हे पुन्हा एकदा ‘बॉइज लॉकर रूम’सारख्या प्रकरणानं सिद्ध केलेलंच आहे आणि हे हिमनगाचं फक्त टोक आहे. समाजमाध्यमं जसजशी वाढत गेली आणि त्यात अनेक गोष्टी ‘व्हायरल’ होत गेल्या तसतसा त्याचा वापरही वाढत गेलाच. त्यामागे मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे ती आदिम प्रवृती. याचा पुरेपूर वापर सगळ्याच माध्यमांनी केला. चित्रपट आणि आता ‘वेबसीरिज’ याविषयी  बोलायला नकोच, पण अनेक मासिकं, वृत्तपत्रांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूही ‘टॉपलेस मॉडेल’ किंवा अर्धनग्न स्त्रिया असतात हेही नवीन राहिलेलं नाही. स्त्रीदेहाच्या या अपमानाविरुद्ध वेळोवेळी कडाडून विरोधही के ले गेले; पण आजही सर्व विनाव्यत्यय सुरू आहेच. यानिमित्तानं एक मोहीम आठवतेय. १९७० पासून ‘द सन’मध्ये पान ३ वर प्रसिद्ध होणाऱ्या याच ‘टॉपलेस मॉडेल्स’च्या विरोधात २०१५ मध्ये ‘नो मोअर पेज थ्री’ नावानं एक आंदोलनच उभं राहिलं होतं. वयात येण्याच्या काळात प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वत:च्या देहाचं एक वेगळं कुतूहल असतं  ‘द सन’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या ‘टॉपलेस मॉम्डेल’ अनेक मुलींच्या न्यूनगंडाचं कारण ठरू लागल्या होत्या, तर काहींना घरातही ते वर्तमानपत्र उघडायची लाज वाटू लागली होती. शेवटी ल्युसी अ‍ॅन होल्म्स या ब्रिटनमधल्या तरुणीनं याविरोधात इतकी जोरदार मोहीम उघडली की, त्यावरून राजकारणही तापलं. काही काळ ती छायाचित्रं येणं बंद झालं; पण नंतर, ये रे माझ्या मागल्या.. काढणारे छायाचित्रं काढतात, काढणाऱ्या काढू देतात, छापणारे छापतात.. अर्थात त्यात आर्थिक व्यवहार जास्त असतो;

पण अलीकडे स्मार्टफोनमुळे सोपं झाल्यामुळेही असेल, असंख्य सर्वसामान्य तरुणी वा स्त्रियाही आपल्या देहाचे असे फोटो काढतात, काढू देतात. त्यामागचं आणखी एक कारण आहे, ‘बॉडी शेमिंग’. अनेकींचा आपण बेढब, जाडी, काळी-सावळी, थोडक्यात, अनाकर्षक आहोत, यावर ठाम विश्वास असतो. म्हणूनच, कुणी माझ्या प्रेमात पडत नाही, मी कुणाला आवडत नाही, असा ग्रहही केला जातो. अर्थात त्यात काही जणांच्या चिडवण्यानं भरही पडतेच. अशा वेळी आपले वेगवेगळ्या ‘अवस्थां’मधले फोटो काढून ते मैत्रिणींना पाठवणं, त्यांच्याकडून ‘लाइक्स’ मिळवणं यात त्या सुप्त समाधान मिळवत राहतात. कधी हे सेल्फी ‘हॅक’ केले जातात आणि नको ते घडतं.. काही जणींच्या बाबतीत, बॉयफ्रेंडवरचा नको इतका विश्वास आणि एका गाफील क्षणी प्रेमानुनयाचा व्हिडीओ काढायला दिलेली परवानगी, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेशी ठरते. थोडक्यात, आपल्याच शरीराबद्दल असणारं असमाधान, चित्रपट तारकांच्या कमनीय देहाशी केली गेलेली तुलना, बॉयफ्रें डवरचा नको इतका विश्वास यात अनेकदा फसत जाते, ती तीच..

हा खेळ, शरीराच्या म्हटलं तर आकर्षक, आनंददायी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या आदिम प्रवृतीचा..पण तोच विकृतीत केव्हा बदलेल हे माहीत नसल्यानं उद्ध्वस्त करणाराही.. म्हणूनच त्यात उद्ध्वस्त व्हायचं की विकृतीला तिथंच रोखायचं, हा निर्णय तिचा तिनंच  घ्यायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:14 am

Web Title: risk involved in girls sending own photos on social media to gain likes boys locker room internet and sex dd70
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : सराव हाच कळीचा मुद्दा
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : विद्यार्थ्यांची आर्थिक संजीवनी
3 महामोहजाल : जबाबदार पालकत्व
Just Now!
X