26 September 2020

News Flash

ऋतुपर्ण..

ऋतु अजून खूप जगायला हवा होता. एकोणपन्नास हे जाण्याचं वय नव्हे. त्यानं अजून खूप निर्माण केलं असतं. माझा तो नाटक लिहिणारा मित्रही अचानक अकाली गेला.

| June 15, 2013 01:01 am

ऋतु अजून खूप जगायला हवा होता. एकोणपन्नास हे जाण्याचं वय नव्हे. त्यानं अजून खूप निर्माण केलं असतं. माझा तो नाटक लिहिणारा मित्रही अचानक अकाली गेला. अशा वेळांना विजय तेंडुलकरांचं ‘शांतता कोर्ट चालू आहे!’ आठवतं. अगदी सहज दुसऱ्याला फिदीफिदी हसणारे, हिंसक पण आतून घाबरट असे हे लोक म्हणजे तेंडुलकरांची ‘शांतता’ मधली पात्रंच वाटतात. तेंडुलकर नेहमी म्हणायचे, ‘स्वत:ची कधीही ‘बेणारे’ होऊ देऊ नकोस. साळिंदरासारखे काटे काढायला शीक.’ पण साळिंदरासारखे काटे काढत राहाणं फार दमवणारं असतं.
मीलहान होते तेव्हा. राजस्थानमध्ये, उदयपूरला लहान मुलांच्या चित्रपटांचा एक महोत्सव भरला होता. तिथे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘चाकोरी’ नावाचा माझा चित्रपट होता. त्यांच्याबरोबर मलाही त्यांनी हा महोत्सव बघायला नेलं होतं. तिथे, त्या महोत्सवात तो मला पहिल्यांदा दिसला. कुरळे केस, निळा टी शर्ट, काळी ट्रॅक पॅन्ट, काळा चष्मा, सावळा रंग आणि खांद्यावर शबनम. तो चालत चालत सुमित्रा भावेंशी काहीतरी बोलण्यासाठी आला, तेव्हा त्याच्या त्या ‘वेगळ्या’ चालीनं माझं त्याच्याकडे लक्ष वेधलं. त्याने बोलायला सुरुवात केली तेव्हा मी थोडी दचकलेच. एखादी स्त्री हेलकावत बोलेल तसं बोलणं, हातवारे, त्याचं इंग्रजी उत्तम होतं. नंतरही तो जिथे तिथे दिसत राहिला. त्या महोत्सवात त्याच्या बोलण्या चालण्याच्या बायकी पद्धतीमुळे हळूहळू त्याची टर उडायला लागलेली होती. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे माझे दिग्दर्शक सोडले तर कुणीही त्याच्याकडे लक्षसुद्धा देत नव्हतं. सुमित्रा भावे, तिला मी सुमित्रा मावशी म्हणते, ती मात्र त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकायची. त्या दोघांची महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटाविषयी खूप छान चर्चा व्हायची. तो बंगाली होता. त्यानं दिग्दर्शित केलेला ‘हिरेर अंगठी’ नावाचा पहिलाच चित्रपट या महोत्सवात होता. त्या चित्रपटाच्या शोच्या दिवशी तो अचानक कुडता, चुडीदार आणि त्यावर ओढणी घेऊन आला. त्या दिवशी त्यानं सुमित्रामावशी आणि सुनीलला विचारलं, ‘मी हे असे कपडे घालणं तुम्हाला चुकीचं वाटतं का?’ यावर ते म्हणाले, ‘कुणीही आपल्याला आवडेल असा पोषाख करण्यात काय चुकीचं आहे?’ त्यावर तो म्हणाला, ‘यापूर्वी मला कुणीही असं म्हटलं नव्हतं.’ महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तो निघायच्या आधी सुमित्रामावशीच्या खोलीत आला. पाय पसरून तिच्या खोलीत बसला आणि तिला म्हणाला, ‘आज संध्याकाळच्या पुरस्कार सोहळ्यात तुमच्या ‘चाकोरी’ला नक्की बक्षीस मिळेल, पण तेव्हा मी परतीच्या रेल्वेत बसलेलो असेन..’ मग कसनुसा होऊन म्हणाला, ‘निघायचं आहे आज, पण बॅग भरायची सवयच नाही गं.. आईच भरून देते नं.. काय करू..? सुमित्रामावशीनं त्याची परतीची बॅग भरून दिली होती..
या महोत्सवाच्या वेळी त्याचं नावही कुणाला माहीत नव्हतं. त्यानंतर परवा त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी वर्तमानपत्रात वाचेपर्यंत मध्ये बरंच काही घडवलं होतं त्यानं. अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप घेण्याआधी त्याच्या नावावर अकरा राष्ट्रीय पुरस्कार जमा झाले होते. त्या महोत्सवात ज्याच्याकडे कुणी ढुंकून पाहात नव्हतं त्या मुलाचा ऋतुपर्ण घोष नावाचा मोठा दिग्दर्शक होऊन बसला होता. त्या महोत्सवानंतर आमची कधीच भेट नाही झाली, पण त्याच्याविषयीच्या बातम्यांमधून तो मला दिसत होता. त्याचे सिनेमे बघून एकदा तरी त्याच्याबरोबर काम करायला मिळावं असं वाटत होतं. तो नेहमीच चर्चेत राहिला. तो त्याचं जे काही ‘असणं’ होतं ते मोकळेपणाने स्वीकारण्यासाठी धडपडत होता. त्याने स्त्रियांचे कपडे घातले, स्त्री होण्याच्या जितक्या जवळ ज्या ज्या पद्धतीने जाता येईल त्या पद्धतीने तो जात राहिला. त्या सगळ्याबरोबरच त्याचं ‘असणं’ तो त्याच्या सिनेमांमधून पण शोधत राहिला.
मध्यंतरी मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलकत्त्याला जाणार होते. तेव्हा आवर्जून सुमित्रामावशी, सुनीलला फोन करून ऋतुपर्णचा नंबर घेतला. सुनील म्हणाला, ‘नक्की भेट त्याला. तो अजूनही आपली उदयपूरच्या महोत्सवातली ओळख विसरलेला नाही. मागे त्याच्या ‘उनिशे एप्रिल’ चित्रपटाच्या शोच्या वेळी सुमित्रामावशीला भेटला तर तिला म्हणाला, ‘सिनेमातली ती तमूक वस्तू आठवतेय ना, आपण उदयपूरला एकत्र खरेदी केली होती.!’ कलकत्त्याला पोचले आणि त्याचा फोन फिरवला. त्यानं उचलला. पलीकडून अतिशय अस्वस्थ आवाज आला. स्त्रीचा वाटावा असा. ‘येऽऽस?’ मी त्याला माझी ओळख सांगायला लागले. सुमित्रामावशी, सुनीलचं नाव घेतलं. तो एकदम संथपणे म्हणाला, ‘दे आर सच लव्हली पीपल.’ मग अचानक म्हणाला, ‘यू नोऽऽ आय अ‍ॅम नॉट वेऽऽल!.’’  वाटलं, त्याला असे कितीतरी फोन येत असणार. त्याला मी त्रास देतीये का.. पण त्याचं ते वाक्य, ‘आय अ‍ॅम नॉट वेऽऽल’ अगदी लहान मुलासारखं उच्चारलेलं.. मला तो बहाणा नाही वाटला. त्याचा तो स्वर.. मी ऐकला आहे, बऱ्याचदा.. ‘खूप मोठं’ झालेल्या माणसांमधे.. तो स्वर.. खूप दमलेला. ‘खूप मोठी’ झालेली माणसं कधीकधी खूप एकटी आणि दमलेली असतात. आपण त्यांना ‘खूप मोठ्ठी’ म्हणून पाहात असतो, पण ती खूप निरागस आणि लहान मुलांसारखी वाटतात अवचित. त्यांना कुणीच नाही आहे, त्यांना कुणाचा तरी आधार हवा आहे असं वाटतं. त्यांच्या खूप आतलं काहीसं ते पहिल्या भेटीतच आपल्याला सांगतात. एका हळव्या सैरभैरपणे. त्यांचा ‘प्रसिद्ध’ असलेला भाग सोडूनही कितीतरी खूप मोठा भाग त्यांच्या आत तसाच पडून असतो. अप्रसिद्ध, एकटाच. त्यामुळे तेही एकटेच वाटतात. ते एकटेपण त्यांच्या एखाद्या वाक्यात, एखाद्या सुरात किंवा त्यांच्या नुसत्या बघण्यातही येऊन जातं. ऋतुच्या फोनवरच्या त्या एका वाक्यात त्याचं ते अप्रसिद्ध, पोरकं एकटेपण सैरभैर होत बाहेर आल्यासारखं वाटलं. अस्वस्थ वाटलं. ‘मी फोन ठेवते,’ म्हटलं तर म्हणाला, ‘विल यू कॉल मी अगेऽऽन?’ म्हटलं, ‘जमलं तर करते.’ त्याच्या आवाजातलं रडवेपण विसरता येईना. तो खूप डिप्रेस्ड असेल असं वाटलं.. मी नाही केला त्याला फोन.
कानातले घालणं, स्त्रीवेष करणं, या सगळ्यासाठी चर्चेत असलेला ऋतु, उदयपूरला तो आला की खुसफुसत त्याला हसणारे लोक, त्याचं ते हसणं ऐकूच आलं नाही असं दाखवणारा ऋतु, अकरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ऋतु, अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप  घेतलेला ऋतु.. खूप अस्वस्थ वाटतं आहे. ऋतुच्या वाटेनं चालणाऱ्या माझ्या अनेक मित्रांची आठवण येते आहे.
माझा एक मित्र, ऋतुसारखाच, खूप गुण अंगी असणारा. गे. त्यानं स्त्री पात्र असलेलं एक फार सुंदर नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाविषयी तो नसताना आम्ही सगळे भरभरून बोलत होतो. मी म्हटलं, ‘किती कळली आहे त्यातली प्रत्येक स्त्री त्याला.’ यावर कुणीसं छद्मी हसत म्हणालं होतं, ‘हो ना, इतकी कळली आहे, इतकी कळली आहे की, त्याने साडी नेसूनच ते नाटक लिहिलं असावं असं वाटतं!’ यावर सगळे फिदीफिदी हसले.
पुढे तो किस्सा माझ्या त्या ‘गे’ मित्राला कळला तेव्हा तो त्वेषानं म्हणाला होता, ‘त्यांना म्हणावं साडी न नेसताही स्त्री खूप चांगली कळू शकते!’  त्या रागानंतर त्याच्या डोळ्यात आलेला जखमी, एकटा भाव मी अजूनही विसरू शकत नाही.
काही वर्षांपूर्वी एका बक्षीस समारंभाचं मी सूत्रसंचालन करत होते. तिथे दोन बक्षिसामध्ये सादर होणाऱ्या एका छोटय़ा नाटुकल्यात माझा एक अभिनेता मित्र कुणा ‘एकाची’ नक्कल करत होता. तो कुणी ‘एक’ आमच्याच क्षेत्रातला. तोही गे. अतिशय निर्मितीक्षम. त्याच्या कुठल्याच निर्मितीची दखल न घेता त्या समारंभात फक्त त्याच्या चालण्याबोलण्याच्या पद्धतीची रेवडी उडवत निर्घृण नक्कल केली होती. त्यावर समोर सगळे लोटपोट हसत राहिले. एवढं कसलं हसू येतं आहे सगळ्यांना? एवढं काय विनोदी आहे या सगळ्यात? कुणी मला समाजावेल का? आपण प्रत्येकाला ‘ज्याचं त्याचं’ आहे तसं, कधी ‘असू’ देणार आहोत? ऋतु दमून गेला असेल का? ऋतु अजून खूप जगायला हवा होता. एकोणपन्नास हे जाण्याचं वय नव्हे. त्यानं अजून खूप निर्माण केलं असतं. माझा तो नाटक लिहिणारा मित्रही अचानक अकाली गेला. अशा वेळांना विजय तेंडुलकरांचं ‘शांतता कोर्ट चालू आहे!’ आठवतं. अगदी सहज दुसऱ्याला फिदीफिदी हसणारे, हिंसक पण आतून घाबरट असे हे लोक म्हणजे तेंडुलकरांची ‘शांतता’ मधली पात्रंच वाटतात. तेंडुलकर नेहमी म्हणायचे, ‘स्वत:ची कधीही बेणारे होऊ देऊ नकोस. साळिंदरासारखे काटे काढायला शीक.’
पण साळिंदरासारखे काटे काढत राहाणं फार दमवणारं असतं. ज्या माणसांना सतत दुसऱ्यांपासून स्वत:ला वाचवत काटे काढतच जगावं लागतं, ती वेळेच्या आधी दमून निघून जातात. अशा निघून गेलेल्या माणसांच्या जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर हसणाऱ्या प्रत्येकाची आहे.
हा गुन्हा आपल्याला कबूल आहे काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:01 am

Web Title: rituparno ghosh
टॅग Bollywood
Next Stories
1 अपलक् निद्राहीन
2 अनसूया
3 गिंको बिलोबा
Just Now!
X