News Flash

मी, रोहिणी.. : सारं कसं शिस्तबद्ध!

‘गांधी’ चित्रपटाचा मुहूर्त २७ नोव्हेंबर १९८० ला झाला. हो.. ‘मुहूर्त’ झाला! म्हणजे छोटीशी पूजा, नारळ वाढवून. भारतीय रिवाजानुसार.

रोहिणी हट्टंगडी

रोहिणी हट्टंगडी – hattangadyrohini@gmail.com

‘‘गांधी चित्रपट पाहताना त्यातील दृश्यं इतकी सुंदर आणि हुबेहूब पूर्वीचा काळ उभा करणारी कशी होऊ शकली, असा प्रश्न पाहाणाऱ्याला पडतो. त्यामागे अनेक कारणं आहेत. अगदी बारीकसारीक संदर्भाचा अभ्यास करण्यापासून चित्रीकरणात आयत्या वेळी कोणत्या तरी वस्तूची गरज भासेल, म्हणून त्याचाही आधीच विचार करून ती तयार ठेवण्यापर्यंतची शिस्त मला या चित्रपटामुळे करिअरच्या अगदी सुरुवातीला अनुभवायला मिळाली.  हा ‘अभ्यास’ या चित्रपटातल्या माझ्या भूमिके साठी उपयुक्त ठरलाच, पण अंगवळणी पडलेली ती शिस्त पुढेही प्रत्येक पावलावर उपयोगास आली..’’

‘गांधी’ चित्रपटाचा मुहूर्त २७ नोव्हेंबर १९८० ला झाला. हो.. ‘मुहूर्त’ झाला! म्हणजे छोटीशी पूजा, नारळ वाढवून. भारतीय रिवाजानुसार. मग छोटा सीन चित्रित के ला गेला. त्या दिवशी मी फक्त हजर होते. माझं काम चार-पाच दिवसांनी असणार होतं. अखेर प्रत्यक्षात माझं चित्रीकरण सुरू झालं, स्क्रिप्ट आधीच मिळालं होतं. कामाचं नियोजनही मिळालं. माझ्या चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी माझ्या खोलीत ‘कॉलशीट’ आलं. ‘युनिट’मधल्या प्रत्येकाला रोज मिळायचं. त्यात त्या दिवशी लागणाऱ्या सर्व बारीकसारीक गोष्टी लिहिल्या होत्या. अगदी तारीख, सीन नंबर, कलाकार, त्यांच्या वेळा, कपडेपटासाठी, रंगभूषेसाठी, नेपथ्यासाठी सूचना, अगदी तपशिलात!

मला सकाळी सहाचा ‘कॉल टाइम’ होता मेकअपसाठी. दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये संपूर्ण युनिट राहात होतं. तिथेच पहिल्या मजल्यावर मेकअप, हेअर ड्रेसिंग, कपडेपट अशा सगळ्यासाठी खोल्यांची व्यवस्था केली होती. माझा ‘सूट’ तिसऱ्या मजल्यावर होता. फक्त लिफ्टनं खाली उतरायचं! निघतच होते आणि अचानक फोनची बेल वाजली. मी फोन उचलला आणि पलीकडून असिस्टंटचा आवाज आला ‘‘रोहिणी, वुई आर वेटिंग फॉर यू!’’ घडय़ाळात पाहिलं, सहा वाजून तीन मिनिटं झाली होती. मनात म्हटलं, ‘‘ब्रिटिशांच्या वक्तशीरपणाचं उदाहरण मिळालं बाई तुम्हाला. यापुढे लक्षात ठेवा!’’ लगोलग खाली उतरले. जाऊन प्रथम ‘सॉरी’ म्हणाले. तयार होऊन खाली तळमजल्यावर आले. ट्रान्सपोर्ट मॅनेजरनं गाडी बोलावली. होय, हेही एक ‘डिपार्टमेंट’ होतं. युनिटसाठी, कलाकारांसाठी गाडय़ा, बस, चित्रीकरणस्थळावर ‘व्हॅनिटी व्हॅन्स’, ड्रायव्हर्स, सगळ्याची जबाबदारी त्याची. त्यांच्या वक्तशीरपणाचा असाच अनुभव आणखी एकदा अनुभवला. तयार होऊन गाडीसाठी खाली उतरले. मॅनेजर म्हणाला, ‘‘पाच मिनिटं दे. युनिट पण आता निघणार आहे.’’ मी जरा बाजूला बसले आणि विश्वास नाही बसणार, पण अख्खं युनिट, अगदी कॅमेरामन, दिग्दर्शकासकट, पाच मिनिटांच्या आत एक-एक करून अगदी घडय़ाळ लावून आल्यासारखे आले आणि रवाना झाले! एक बस आणि दहा-बारा गाडय़ा निघाल्या आणि लगेच माझी गाडी निघाली पण!

तर, मी सेटवर पोहोचले. सेट आश्रमाचा होता. साबरमती आश्रमाचा! पंधरा दिवसांपूर्वी बेन    (किं ग्जले) आणि मी, आम्हाला एक जण बरोबर देऊन अहमदाबादला पाठवलं होतं साबरमती आश्रम बघायला, त्यामुळे तो मनात ताजा होता. हुबेहूब आश्रम. इंचाचाही फरक नाही. भाज्यांचे वाफे केले होते आणि त्यात भाज्या उगवल्याही होत्या. कुठल्याही कामात चालढकल माहितीच नव्हती. यमुनेच्या काठी बदरपूर गावाजवळ हा सेट उभा केला होता. यमुनेच्या पार सूतगिरण्यांचा ‘कटआऊट’ लावला होता.. हो, कॅमेरा फिरताना जागा रिकामी रिकामी नको वाटायला! मुंबईजवळ दक्षिण आफ्रिकेचा ‘फिनिक्स आश्रम’ उभारला होता. तिथेही गाढवांना झेब्य्रांसारखे पट्टे रंगवून सोडलं होतं! प्रत्येक चित्रीकरणस्थळ, त्या-त्या जागा इतक्या काळजीपूर्वक निवडल्या होत्या! भारतात पाच ठिकाणी चित्रीकरण झालं. दिल्लीला दोन महिने, मुंबईमध्ये दीड महिना, पुण्यात पंधरा दिवस, पटना आणि राजस्थानला प्रत्येकी आठ दिवस. दक्षिण आफ्रिकेचे सीन्स मुंबईजवळ, काही पुण्यात. धावत्या आगगाडय़ांचे शॉट्स जे आपण चित्रपटात पाहातो ती एकच आगगाडी एका बाजूनं दक्षिण आफ्रिकेची आणि एका बाजूनं भारतीय अशी रंगवली होती. त्या वेळच्या मोटारगाडय़ा कालानुरूप इथे नव्हत्या तर इंग्लंडहून मागवल्या होत्या. कुठेही कमी राहाता कामा नये!

प्रत्येक डिपार्टमेंट नवीन नवीन अनुभव देत होतं. जेवणही दोन पद्धतीचं ‘वेस्टर्न’ आणि ‘इंडियन’! त्यासाठी दोन वेगळ्या व्हॅन्स. सुरुवातीला सगळेच नावीन्य म्हणून दुसऱ्या पद्धतीचं जेवत होते. नंतर आले मूळपदावर! व्हॅनवर मेनू लिहिलेला असायचा. रांगेत उभं राहून आपापलं जेवण घ्यायचं आणि जेवणासाठी खास उभ्या केलेल्या पेंडॉलमध्ये जेवायचं. अर्थात व्यवस्थित टेबल-खुच्र्या असायच्याच. सर्वजण, अगदी सर रिचर्डसह सगळे तिथेच जेवायचे. जेम्स कॅलेहॅन (युनायटेड किं ग्डमचे माजी पंतप्रधान)- सर रिचर्डचे मित्र. त्यांनाही त्या रांगेत पाहिलंय मी. जेवणाच्या सुट्टी नंतर ‘ब्रेक ओव्हर’ असं कोणीही ओरडायचं नाही. जो तो आपलं झालं की नेमक्या वेळात आपापल्या कामाला हजर असायचा. चित्रीकरणाच्या ठिकाणी एक डॉक्टर, एक परिचारिका आणि रुग्णवाहिका तैनात असायची. डॉक्टर तिकडचाच, पण भारतीय होता.

‘गांधी’  फिल्मचं दुसरं युनिटही होतं. त्याचे दिग्दर्शक गोविंद निहलानी होते. मुख्य युनिट काम करत असताना दुसरं महत्त्वाचं चित्रीकरण त्यांच्याकडे असायचं. गांधीजी भारतभर फिरले त्या वेळची काही महत्त्वाची दृश्यं, छोटे प्रसंग चित्रित करणं त्यांचं काम होतं. चित्रपटात एक प्रसंग आहे जिथे चंपारणहून एक माणूस गांधींना भेटायला येतो. तो सीन रिचर्डना हवा तसा घेता आला नाही. मग तो चित्रित करायची जबाबदारी गोविंदजींना दिली. माझी मोकळी तारीख बघून, मला रीतसर विचारून तो सीन घेण्यात आला. (खरंतर मी तिथेच होते.  युनिटबरोबरच राहात होते. दुसरं काहीही काम करत नव्हते. पण तुमचा मोकळा वेळ तुमचा आहे, तो आम्ही वापरणार म्हणून ही परवानगी!) असंच एकदा चित्रीकरण चालू असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास रिचर्ड माझ्याजवळ आले आणि अगदी हळू आवाजात म्हणाले, ‘‘रोहिणी, आज आपल्याला शिफ्ट वाढवावी लागणार आहे आठ वाजेपर्यंत. तुला चालेल ना?’’ मी नकळत ‘हो’ म्हणून मान डोलावली. नंतर विचार करत राहिले, ‘आपण शिफ्ट वाढवतोय’ असं नाही सांगितलं त्यांनी! मला विचारलं! समोरच्याच्या वेळेचा मान ठेवावा, त्याला गृहीत धरू नये, हा आणखी एक धडा मी शिकले. तर तो सीन.. फार काही मोठा नव्हता. नदीत आम्ही बायका कपडे धुतोय आणि पलीकडून एक माणूस विचारतोय की मला गांधींना भेटायचंय. पण तो प्रसंग आकर्षक करण्यासाठी, वातावरणनिर्मितीसाठी पक्ष्यांच्या थव्यांवरून चित्रित करणं सुरू करून आमच्यावर यायचं, असा घ्यायचा होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास पक्ष्यांचे थवे यायला सुरुवात होते असा अभ्यास झाला होता. चार-साडेचार वाजल्यापासून आम्ही तयार होतो. न जाणो लवकर आले तर? यमुनेच्या पात्रावरून उडणाऱ्या पक्ष्यांबरोबर कॅमेरा आमच्यावर! पण कधी पक्षी कॅमेऱ्याबाहेर, तर कधी फारच छोटा थवा, तर कधी फार खालून किंवा फारच वरून उडताहेत असं होत होतं. क्षितिजावर ठिपके दिसले की ‘आले आले’ असा ओरडा व्हायचा. की तयार व्हायचं, आपापलं काम करायचं आणि गोविंदजींच्या ‘ओके’ची वाट बघायची. तेव्हा फिल्म ‘डेव्हलप’ झाल्याशिवाय कळायचं नाही. त्यामुळे  कॅमेरामनचं, दिग्दर्शकाचं समाधान झालं तरच ओके! दहा-बारा ‘टेक्स’नंतर ‘ओके’ मिळाला आणि उजेडही कमी झाला. केवढा तो प्रयत्न.. पण चित्रपटाची प्रत्येक ‘फ्रेम’ महत्त्वाची असते ना!

असाच एक प्रसंग आठवतोय. तोच चंपारणहून आलेला माणूस गांधीजींना तिथली परिस्थिती सांगून तिकडे या अशी विनंती करतोय. त्या प्रसंगात गांधीजी झोपाळ्यावर बसले आहेत आणि समोर बैठकीवर हा माणूस जेवतोय असं दाखवायचं होतं. पण त्याचबरोबर ‘बा’ म्हणजे मी फ्रेममध्ये दिसायला हव्यात असं रिचर्डना वाटत होतं. रिचर्डनी मला विचारलं, ‘‘हे असं आहे.. अशी फ्रेम आहे. तू मला दिसायला हवी आहेस.. काय करशील?’’ ते एक दिग्दर्शक, स्वत: अभिनेता असून मला हे विचारलं जात होतं! म्हटलं, हा माणूस जेवतोय म्हणजे स्वयंपाक झाला आहे. काही वाढायला यायचं म्हणजे हालचाल होणार.. ती नको होती सीनच्या मूडप्रमाणे. पोळ्या लाटायच्या तर चूल भिंतीपाशी हवी. म्हटलं, बादलीसारखी सिंगल चूल मिळाली तर स्वयंपाकघराच्या मध्यावर बसू शकते. झालं. सूचना लगेच अमलात आली आणि सीन त्यांच्या मनासारखा झाला. पण सांगायची गोष्ट अशी, की ती तशी चूल पण तयार होती. ‘सेट डेकोरेटर’ असंही एक डिपार्टमेंट होतं. सेट उभारल्यानंतर त्याला ‘सजवण्यासाठी’! त्यांनी या गोष्टी आपल्या अभ्यासानुसार तयार ठेवायच्या. आणि हे सेट डेकोरेटर्स होते अमाल अलाना आणि निसार अलाना. अमाल ही स्वत: दिग्दर्शक आणि निसार नेपथ्यकार (डॉक्टर असूनही). कुठून कुठून काय काय जमा केलं होतं त्यांनी. याचमुळे वातावरण निर्मिती होते.

वातावरण निर्मितीवरून आणखी एक प्रसंग आठवला, विदेशी कपडय़ांच्या होळीचा. त्या प्रसंगात प्रथमच माझं ‘वय’ दिसणार होतं आणि वाक्यं पण असणार होती. चारच वाक्य, पण माझं प्रथम चित्रीकरण होणार होतं. रिचर्डनी दोनतीनदा माझ्याकडून वाक्यं म्हणवून घेतली. शब्दोच्चार नीट होताहेत ना ते बघायला! (आम्ही करत होतो त्याचं ‘डबिंग’ होणार नव्हतं. ‘सिन्क साउंड’ असणार होतं. म्हणजे त्या वेळी तुम्ही जे बोलाल तेच ‘फायनल’. म्हणून जरा सावधानता.) सीन सुरू होतो तेव्हा मी माईकसमोर बैठकीवर बसलेली. ती चार वाक्यं बोलून मी उठून मागे जाऊन बसते, मग गांधीजी माईकसमोर येतात, भाषण करतात आणि मंचाच्या समोर असलेल्या कपडय़ांच्या ढिगाला आग लावली जाते. वय दाखवण्यासाठी मी गुडघ्यावर हात ठेवून जमिनीला दुसऱ्या हातानं रेटा देत उठले. रिचर्डच्या ते लक्षात आलं. त्यांनी माझ्याकडे बघून हलकेच स्मित करून मान डोलावली! नटाला आणखी काय हवं असतं? असो. सीन संपत आला होता, आता फक्त कपडय़ांची होळी राहिली होती. पुरुषभर उंच ढीग होता. अर्थात एवढे कपडे नव्हते. मोठा पत्र्याचा कोन उलटा ठेवून त्यावर कपडे टाकले होते आणि होळी पेटल्यावर काही लोक अंगावरचे कपडे उतरवून ‘भारतमाता की जय’ म्हणत होळीत फेकताहेत असं चित्रित करायचं होतं. होळी पेटली, व्यवस्थित पेटल्यावर ‘अ‍ॅक्शन’ म्हटलं गेलं, ‘भारतमाता की जय’ ओरडत लोकांनी कपडे फेकायला सुरुवात केली आणि काय सांगू, असा सरसरून काटा आला अंगावर! ही तर पुनर्निर्मिती होती. पण काय मन:स्थिती झाली असेल त्या वेळी लोकांची! अप्रत्यक्षपणे अनुभवली मी.

‘गांधी’ चित्रपट खूप लक्षात राहातो आणि आपलासा वाटतो त्याला आणखी एक कारण आहे. काही काही प्रसंगांमध्ये जी रचना होती ती प्रत्यक्ष त्या वेळचे फोटो समोर ठेवून केलेली आहे. म्हणजे सरहद गांधी आणि गांधीजी पाठमोरे जातानाचा शॉट असो की अगदी अंत्ययात्रेच्या वेळी कोण कुठे बसलं होतं ते असो. त्या फोटोंबरहुकूम! गांधींवरच्या पुस्तकांची एक भली मोठी पेटी तिथे असायची आणि एक तज्ज्ञ.. संदर्भासाठी.

कल्पना करा, मी हे सगळं अनुभवलं जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वी माझ्या करिअरच्या सुरुवातीला. हा अनुभव माझ्या पुढच्या वाटचालीसाठी शिदोरीच की!

लिहीन ते कमीच वाटतंय.. इतके अनुभव, इतक्या आठवणी! चित्रीकरणाच्या, ‘प्रीमियर’च्या.. आणखी एक लेख तो बनता हैं!.. हो ना?!

(फोटो- इंटरनेट-गूगलवरून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:39 am

Web Title: rohini hattangadi sharing her memories me rohini dd70
Next Stories
1 वसुंधरेच्या लेकी : बालीच्या बालिका
2 गद्धेपंचविशी : पाय जमिनीवर ठेवणारी ‘पंचविशी’!
3 पडसाद : बहुरंगी चतुरंग!
Just Now!
X