||अपर्णा देशपांडे
काळ बदलला तशा सुनांसाठी कायम ‘सासूबाई’च असणाऱ्या ‘अहो आई’ हळूहळू बदलत आहेत. स्त्रियांच्या सर्वांगीण स्वातंत्र्याच्या विकासात सासूची भूमिका फार मोलाची असते, हे त्यांच्याही लक्षात यायला लागलंय.  संसाराबरोबरच करिअरमध्ये मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सुनांचं म्हणूनच या सासूबाईंना कौतुक वाटतं आहे.  कोणत्याही नात्यातील तणावाचं कारण ठरणाऱ्या अपेक्षांना थोडी मुरड घालून सुनांना समजून घ्यायला हवं, हे त्यांनाही उमगायला लागलंय आणि त्यातूनच    ‘अहो आईं’चं एक नवं रूप घडतंय.    

चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या मुलाला संगीताताईंनी फोन लावला. विचारलं, ‘‘काय चाललंय रे..?’’

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

‘‘काही विशेष नाही आई. तिनं भाजी केली, मी बाकीचं आवरतोय. तिच्या आईला बरं नाहीये म्हणून संध्याकाळचा डबा नेऊन देणार आहे .’’

ती स्वत:शीच मस्त हसली. ‘आवरतोय…’ म्हणून सांगतानाचा मुलाचा स्वर तिनं पडताळून पाहिला. अगदी सहज, स्वच्छ स्वर होता. त्यात खंत नव्हती, नाइलाज नव्हता, तक्रार तर नव्हतीच. होता तो सहज स्वीकार. आणि त्याच्यातील ‘जावई’देखील जबाबदार होतोय हेही दिसत होतं. आपण आईबाप म्हणून योग्य ट्रॅकवर आहोत, या विचारानं तिला बरं वाटलं. सुनेची नीट काळजी घेतोय म्हणून तिच्यातल्या सासूला विशेष आनंद झाला.

तिला मैत्रिणींबरोबर वेळोवेळी झालेली चर्चा आठवली. ग्रुपमध्ये सगळ्या साधारण समवयस्क असल्यानं मुलांविषयी चर्चा नेहमीच होत असे. ‘‘आपण मरमर मरायचं, खस्ता खायच्या यांच्यासाठी… पण त्याचं काही नाही! बायको आली की बदलतात एका रात्रीत.’’ किंवा ‘‘दहा वेळा आठवण करून दिली तरी विसरत होता. आता बायकोनं सांगितलेलं कसं न विसरता आणतो! करतो तिच्या पुढे पुढे…’’ हा नकारात्मक सूर तिला आवडायचा नाही. त्या स्वरातल्या कडवटपणाचं तिला वाईट वाटायचं. तिची याबाबत भूमिका वेगळी होती. मुलं आपलं बघून शिकतात यावर तिचा विश्वास होता. आपल्या मुलानं एक समंजस जोडीदार व्हावं, जबाबदार जावई असावं, असं तिला मनापासून वाटत होतं आणि त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालाय असं दिसत होतं. त्याला जसं जमेल, सुचेल, तसा तो बायकोला मदत करत होता. त्याला ते ‘आवश्यक’ वाटत होतं. आणि हा बदल रात्रीतून झाला नव्हता. गेली २५ वर्षं तो आईबाबांना घरी एकत्रित काम करताना बघत होता. ते हळूहळू त्याच्या वागण्यात दिसू लागलं होतं. हा बायकोमुळे बदलण्याचा विषय नव्हता, तर घरातून मिळालेल्या संस्कारांचा होता. कुटुंबातील जबाबदार, समंजस सदस्य म्हणून मुलाची वाटचाल सुरू होणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. ते होत होतं ना? बदल कुणामुळे झाला यापेक्षा बदल झाला हे महत्त्वाचं होतं. स्वागतार्ह होतं. मग कडवटपणा कशासाठी? तिला वाटलं, आपला मुलगा योग्य तेच करतोय याचं समाधान बाळगायचं, की ‘बायको आल्यावरच बदलला’ असं म्हणत स्वत:च्या सुखात स्वत:च मिठाचा खडा टाकायचा, ही ज्याची त्याची निवड  आहे… नाही का?

सुषमाताईंकडेही नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती. ‘‘आई, आज  मी, सोहम आणि ईरा ऑफिसनंतर बाहेर भेटणार आहोत. उशीर होऊ शकतो. आमचं जेवणही बाहेरच होईल. परागला सांगितलंय मी. तो घरीच येणार आहे जेवायला.’’ सूनबाई काव्या सुषमाताईंनी भरलेला डबा बॅगेत कोंबत त्यांना सांगत होती.

‘‘नाहीतर त्यांना घरीच बोलावतेस का? गोदू मावशी आहेच स्वयंपाकाला. साधासा बेत करीन. पराग पण असेल… काय म्हणतेस?’’

‘‘नको आई. तुम्हालाच ऊठबस करावी लागेल उगाच. आणि आम्ही खूप महिन्यांनी भेटतोय, आमच्या गप्पांत पराग कंटाळेल. येते रात्री. बाय बाबा.’’ म्हणत काव्या गेली. तिच्या मागे मागे धावपळ करणाऱ्या सुषमाताई हुश्श करत सोफ्यात बसल्या. बाबांनी आपल्या बायकोकडे कौतुकाचा कटाक्ष टाकला आणि हसले.

‘‘तुम्ही का हसताय?’’

‘‘तुला आठवतं सुषमा, लग्नाआधी तुला किती मैत्रिणी होत्या… किती छान मैत्री होती तुमची. पण लग्न करून तू इतक्या लांब आलीस आणि खूप अंतर पडलं. साधं मैत्रिणीच्या लग्नाला जायचं तर आमच्या खटल्यात अशी अडकलीस तू… आता आठवलं की वाईट वाटतं मला. तेव्हा किती अवघड होतं नाही संपर्क ठेवणं? आणि आता सूनबाई बघ. किती सहज भेटते.फक्त मैत्रिणींनाच नाही, मित्रांनाही! किती बदललंय ना सगळं?’’

सुषमाताईंनी उत्तरादाखल फक्त मान हलवली. बदल तर खूपच झालाय. आता कसं, उचलला फोन की लावला वाटेल त्याला. हवं तेव्हा बोलता येतं. आमचं तसं नव्हतं. आईचा फोन जरी आला तरी शेजारी फोन घ्यायला धावत जावं लागायचं. माहेरच्या संपर्काची ही गत. मैत्रिणी तर दूरच राहिल्या. मग मैत्रीला कधी दुय्यम स्थान दिलं गेलं ते कळलंच नाही. नोकरी पण ‘पार्टटाइम’ होती. जबाबदाऱ्या खूप होत्या, पण नोकरी तशी आरामाची. सुनेचं तसं नाहीये. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या जबाबदारीची नोकरी आहे तिची. प्रचंड तणावाखाली असताना आतली वाफ बाहेर काढण्यासाठी आजच्या तरुणांना मित्रमैत्रिणींची गरज आहे. नाहीतर त्याचे परिणाम त्यांच्या सांसारिक नात्यावर होतील. आपल्या सासूबाई हे नाही समजू शकल्या. पण आपण आपल्या सुनेला नक्कीच समजून घेऊ शकतो… असं मनाशी म्हणत त्यांनी घर आवरायला घेतलं.

राधिकाताईंच्या भिशीच्या ग्रुपची पावसाळी ट्रिप नक्की झाली होती. सगळा बेत मस्त आखून झाला होता. त्या बॅग भरत असतानाच सूनबाईंचा फोन आला. ‘‘आई, मला कॉन्फरन्ससाठी चंदीगढला जायचंय. उद्याच पहाटेची फ्लाइट आहे. सोनूला आईकडे सोडलं असतं, पण तिथे रंगकाम सुरू आहे. त्याची सांभाळणारी बाई अचानक सुट्टीवर गेलीय…’’ सून अडचणींचा पाढा वाचत होती आणि राधिका आता आपल्या अनुपस्थितीत ट्रिपची जबाबदारी कुणाकडे द्यावी, याचा विचार करत सुनेला आश्वस्त करत होत्या. त्यांचे संवाद ऐकणारे सुहासराव सगळं उमजून म्हणाले, ‘‘कधी निघायचंय तुला ट्रिपला?’’

‘‘आज रात्रीच जावं लागणार होतं… आता ऐन वेळी मी मैत्रिणींना येत नाही म्हणून कसं सांगू?’’

‘‘तू बिनधास्त ट्रिपला जा. मी सांभाळेन सोनूला. बिलकूल चिंता करू नकोस. तुला आठवतं राधिका? तुला बरं नव्हतं म्हणून मी सूनबाईला फोन केला होता. आली ती, पण दोन दिवसांनी! तू हिंडतीफिरती झाल्यावर.’’

‘‘आपला पोटचा मुलगा तरी येऊ शकला होता का? तो सिंगापूरला गेला होता ना? सुनेलाच का नावं ठेवतो आपण? तुमच्या अ‍ॅक्सिडेंटच्या वेळी पाच दिवस सुट्टी घेतली होती ना तिनं? लहान मुलाच्या आईला नोकरी करणं म्हणजे सतत तापलेल्या तव्यावर बसण्यासारखं असतं हो! तरीही पोरीनं सुट्टी काढली होती. तिची किती फरपट होते बघतो ना आपण? आपल्याच मुलीचं बघा ना. तिच्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा ती गेली होती का धावत? रजा मिळाली तेव्हा तिच्या सोयीनं गेली ना? सुनेला नावंच ठेवायची म्हटलं तर हजार दुर्गुण सापडतील हो. पण आपण तरी परिपूर्ण आहोत का?’’

‘‘बरोबर आहे तुझं म्हणणं.’’ सुहासराव म्हणाले.

किती समजूतदार भूमिका आहे ना राधिकाताई आणि सुहासरावांची? नात्यात दरी पडण्याचं सगळ्यात मोठं कारण अपेक्षा हेच असतं. कधी एक पाऊल आपण टाकावं, कधी दुसऱ्यानं. आयुष्य खूप गुंतागुंतीचं न करता साधी, सोपी भूमिका ठेवली तर नक्कीच ताण हलका होतो, याचा वस्तुपाठ घालून दिला त्यांनी.

माधवीताईंना चार महिन्यांपूर्वी नवीन सून आली होती. मुलगा बालरोगतज्ञ, तर सून स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ. घराण्याचे सगळे पूर्वापार चालत आलेले कुळाचार, देवधर्म माधवीताईंनी आजवर अगदी नेमानं पाळले होते. घरात कर्मठ आजी असल्यामुळे आता हे सगळं नवीन सुनेनंही करावं अशी त्यांची अपेक्षा होती. ‘‘घराण्याचे सगळे कुळाचार आता इथून पुढे नवीन जोडप्यानं केले पाहिजेत!’’ आजी ठसक्यात म्हणाल्या. ‘‘बोलाव दोघांना. बसा म्हणावं पूजेला. एक दिवस नाही गेलं दवाखान्यात तर काही बिघडत नाही.’’

मुलगा आणि सून हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या गडबडीत होते. त्यांनी अगतिक नजरेनं माधवीकडे बघितलं. गेली तीस वर्षं अजिबात कुरकुर न करता सगळं करणाऱ्या माधवीनं आता मात्र सुनेच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली. ‘‘आई, गुरुजींना बोलावलंय. ते यथासांग सगळं करतील. हे दोघं रात्री घरी आल्यावर प्रसाद घेतील. आज चार बाळंतपणं करायची आहेत तिला! आता तोच धर्म आहे त्यांचा! जा रे तुम्ही. जाताना देवाला नमस्कार करून जा.’’ आणि हळूच सुनेला बाजूला घेत म्हणाल्या, ‘‘बेटा, बाहेरच्या खोलीत तुमच्या अभ्यासाची पुस्तकं आणि इतर बरंच काही सामान पडलेलं असतं. ते मी आवरलं तर कदाचित तुमची घडी विस्कटेल. ते तेवढं मागच्या बाल्कनीत ठेवता का?’’

मुलांना त्यांची चूकही किती सौम्यपणे सांगितली त्यांनी!

जगण्यातील हा सकारात्मक बदल फक्त मोठ्या शहरातच होतोय असं नाही. आमच्या शेजारी एक लग्न झालेलं इंजिनीअर जोडपं आहे. मुलीला आई नाहीये. तर तिच्या बाळंतपणासाठी गावाहून त्याची आजी इथे आलीये. चार महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून नातसून ऑफिसला जाते, तर तिला ‘व्हिडीओ कॉल’ करून बाळ दाखवायचंय, कसा कॉल करायचा, हे विचारायला आजी माझ्याकडे आल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘माझ्या नवऱ्यापुढे मला कधी मान वर करून बोलायलाच नाही मिळालं. आता ही पोरं किती छान राहतात. बरोबरीनं कमावतात. मला असं जगायला नाही मिळालं. पण यांच्याकडे बघून खूप समाधान वाटतं बघ. माझ्या सासूनं मला खूप छळलं. पण या पोरीला मी आजीची माया देणार.’’ जगण्यातला हा सुसंस्कृतपणा कुठून आला असेल या माऊलीकडे?

जोपर्यंत विवाहसंस्था मानली जाईल, तोपर्यंत  ‘सासू’ हे पदही असणारच आहे. स्त्रियांच्या सर्वांगीण स्वातंत्र्याच्या विकासात सासूची भूमिका फार मोलाची असते. मुलगी काय किंवा सून काय, संसारीस्त्रीच्या अडचणी समजून घेण्यासाठी सासूच्या नाही, तर ‘स्त्री’च्या भूमिकेतून जेव्हा विचार होतो, तेव्हा ‘सासूपणा’चं कठीण कवच गळून पडतं. इथे एक स्वच्छ, पारदर्शी, प्रेमळ नात्याची सुरुवात झालेली असते.

जेव्हा एक कर्तृत्ववान स्त्री दुसऱ्या महत्त्वाकांक्षी स्त्रीची बाजू समजून घेऊ शकते, तेव्हा संपूर्ण कुटुंब कात टाकून तजेलदार नात्याची अनुभूती घेऊ शकतं.

adaparnadeshpande@gmail.com