एकविसाव्या शतकातील १४  वर्ष उलटून गेली. गेली १००-१२५ वर्षे स्त्रीप्रश्न, स्त्रीशोषण, स्त्रीजाणिवा, स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद यांसारख्या शब्दांची जडीबुटी उगाळून उगाळून स्त्री-पुरुष दोघांनाही पाजली. तरीही पुरुषसत्ताक व्यवस्था उलथून पडली नाही. सत्तरच्या दशकात सुरू झालेल्या चळवळीनंतर बाईचा वनवास संपेल, तिला तिचं स्वत्व सापडेल असं वाटलं होतं. पण काही अपवाद वगळता तिच्या जगण्यात विशेष फरक झाल्याचं दिसत नाही. सावित्रीबाईंनी तिला दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र यामुळे तिचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे ती विचार करायला लागेल, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होईल, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागेल, एवढंच नाही तर या समाजात तिला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान मिळेल अशी स्वप्नं गेली काही वर्षे आपण पाहतो आहोत आणि तरीही रोज वर्तमानपत्रातून तिच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येताहेत. स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या समाजाची मानसिकता संपलेली नाही, याचे पुरावे मागे ठेवून जाताहेत. पुरुषांची मानसिकता ज्या प्रमाणात अपेक्षित होती त्या प्रमाणात बदलली नाही हे सत्य आहेच, पण स्त्रीची मानसिकता तरी बदलली आहे का? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? ज्या मुली किंवा स्त्रिया चळवळींशी जोडलेल्या आहेत किंवा स्वत:च्या जगण्याचा विचार करताहेत तसा विचार चळवळीपासून दूर राहिलेल्या स्त्रिया करताहेत का? त्या खऱ्या अर्थानं सक्षम झाल्या आहेत का? की अजूनही त्यांचे पाय दोन्ही दगडांवर आहेत? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या? आधुनिक होऊ  पाहणाऱ्या या स्त्रिया या परंपरेशी स्वत:ला नेमक्या कशा जोडून घेताहेत? प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरं मात्र अपेक्षित होती तशी मिळत नाहीत.
 स्त्रीला तिच्या स्वत्वाचं भान यावं म्हणून सुरू झालेली स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आजच्या नव्या स्त्रीला खरंच कळली आहे? ती तिच्यापर्यंत पोचली आहे का? आधुनिकतेचा खरा अर्थ तिला समजला आहे का? की तो केवळ बदललेला पोशाख, राहणीमान आणि बोलण्या-चालण्यात आलेला चमकदारपणा इथंवरच सीमित झाला आहे?
आज कॉर्पोरेट क्षेत्रात लीलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्गशीर्षांतले गुरुवार भक्तिभावानं करते, आपल्या जगण्यातून खास वेळ काढून हळदीकुंकू करते किंवा विज्ञान शिकवणारी शिक्षिका ‘नेमकी पाळी आल्यानं या वेळचा गुरुवार मिळाला नाही’ अशी तक्रार करते, महाविद्यालयातील प्राध्यापिका आठवडय़ाचे रंग ग्रहांप्रमाणे ठरवून त्या त्या वारी त्या विशिष्ट रंगांचे कपडे घालून येतात तेव्हा आपण कोणत्या काळात आहोत हेच कळत नाही.
आजच्या या स्त्रीची नेमकी काय गोची झाली आहे? परंपरा म्हणजे कर्मकांड, धार्मिक कृत्यं एवढाच अर्थ कळलेल्या या स्त्रीला आपल्या संस्कृती आणि परंपरेमध्ये आपल्या भाषा, कला, साहित्य, आपला इतिहास, भूगोल, आपलं सार्वजनिक जीवनातील चारित्र्यं, आपली विचारसरणी, आचारसरणी या साऱ्याचा समावेश असतो याची जाणीव आहे का? तिचं एकूण वर्तन पाहता ती या साऱ्यापासून कोसो दूर आहे, असं वाटत राहतं. आज आजूबाजूला भेटणाऱ्या स्त्रियांचं जे चित्र दिसतं आहे ते अस्वस्थ करणारं आहे. नवश्रीमंत वर्गातील मुली या फॅशन, पार्टीज करायला मिळणं म्हणजे स्वतंत्र होणं, असं समजायला लागल्या आहेत आणि मध्यमवर्गातील मुली एकीकडे या सगळ्याकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत आणि दुसरीकडे त्यांच्या आईवडिलांनी जे तथाकथित  परंपरेचे स्वरूप त्यांना सांगितलं आहे त्यात अडकून पडल्या आहेत. म्हणजे हॉट पँट घालून बीचवर जायचं आणि नववारी नेसून, नथ वगैरे घालून मंगळागौर आणि सत्यनारायण करत आपण आधुनिकता आणि परंपरा दोन्हीची छान सांगड घालू शकतो, असा आभास निर्माण करायचा असं काहीसं झालं आहे.
मला वाटतं, आजच्या या आधुनिक होणाऱ्या मुलींनी परंपरांचे अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आता त्यांनी कर्मकांडातून बाहेर यायला हवं, व्रतवैकल्यांच्या जंजाळातून स्वत:ला सोडवायला हवं. बाईला येणारी पाळी हा निसर्गधर्म आहे आणि त्याचा शुद्ध-अशुद्धतेशी आणि शुभाशुभाशी काही संबंध नाही हे समजून घ्यायला हवं. बलात्कार करणारा हा दोषी असतो, जिच्यावर तो झाला आहे ती नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बाईसाठी तयार केलेल्या पावित्र्याच्या आणि योनिशुचितेच्या भ्रामक कल्पनांतून तिनं स्वत:ला सोडवायला हवं.
 आपल्याला स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करायचं आहेच, पण त्याचबरोबर स्वत:वर प्रेम करायलाही शिकायला हवं. त्रास अनेक गोष्टींचा होत असतो. त्यातून मार्ग काढायला हवाच, पण तो निघत नसेल तर खचून न जाता स्वत:ला सावरायला शिकायला हवं. आपलं जगणं अधिकाधिक सुसह्य़ करण्यासाठी आपले आनंद आपणच शोधायला हवेत. ते कोणीतरी आपल्या पदरात टाकेल म्हणून वाट न पाहता आपण स्वत:च ते मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. स्त्रीत्वाचा खरा अर्थ जाणून घेतला तर कदाचित आपण स्वत:ला सापडूही. पण जर समाजाच्या पारंपरिक चौकटीत अडकून पडलो तर अधिकाधिक अंधश्रद्ध होत जाऊ. बायकांना या चौकटीत अडकवून ठेवण्याचा डाव फार पूर्वीच स्मृतिकारांनी खेळला आहेच. पण त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. त्यासाठी आता आपल्याला बहुश्रुत व्हायला हवं. विचार करायला लावेल असं काही तरी वाचायला हवं, पाहायला हवं आणि त्यासाठी वेळ काढायचा असेल तर प्रथम या अशा कर्मकांडातून स्वत:ची सुटका करून घ्यायला हवी. आपल्याकडच्या ८० टक्के स्त्रिया आजही यात अडकल्या आहेत. त्यात शिक्षिकांची संख्याही खूप मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना नवी पिढी घडवायची असेल तर त्यांनी स्वत: यातून बाहेर यायला हवं. नव्या वर्षांत आपण हे नक्की करू या. त्यासाठी सर्वाना शुभेच्छा.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!