ch19राजस्थानातील रूपकंवर सती प्रकरणामुळे छेडले गेलेले स्वातंत्र्योत्तर काळातील सती प्रथेविरोधातले अभियान सर्व वाग्बाण सहन करीत महिलांनी खूपच धडाडीने चालवले. राजस्थानातील स्त्रियांनी तर खूपच आंदोलने केली. स्वायत्त संस्था व राजकीय पक्षाच्या स्त्रियांनी देशभर मोर्चे काढले..या साऱ्याचा परिपाक म्हणून १९८८ मध्ये सती प्रथेविरुद्ध कायदा संमत झाला.
वृत्तपत्रातून ४ सप्टेंबर १९८७ रोजी एक बातमी झळकली, ती वाचून देशभरातील सर्व लोकांना धक्का बसला. राजस्थानातील जयपूरजवळच्या दिवराला गावात १८ वर्षांची रूपकंवर नामक तरुणी नवऱ्याच्या चितेवर सती गेली.
बातमी वाचल्यावर प्रथम आठवण झाली, राजा राममोहन राय यांची. सती प्रथा १९ व्या शतकापूर्वी कधी तरी चालू होती, पण १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मात्र बंगालमध्ये जवळजवळ रोज एक स्त्री सती जात होती. विधवांच्या आत्महत्येचे (?) प्रमाणही मोठे होते. पतीच्या पश्चात विधवा आपल्या पतीच्या संपत्तीवर हक्क सांगेल म्हणून ती सती जावी किंवा तिने आत्महत्या करावी असे प्रयत्न होत. आपल्या वहिनीला जबरदस्तीने चितेत ढकलण्यात आल्याचे पाहिल्यावर राजा राममोहन राय यांनी सतीला कोणताही शास्त्रीय धार्मिक आधार नाही हे सिद्ध करणारे पुस्तक १८१५ मध्ये लिहिले. प्रतिक्रिया म्हणून १२८ पंडितांनी घोषणापत्रक काढून त्यांना विरोध केला. १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा झाल्यावर अशा अमानुष प्रथांना आळा बसू लागला.
ही प्रथा बंद झाली, अशा भ्रमात असतानाच दिवराला येथील या बातमीने चांगलाच हादरा दिला, परंतु आणखी हादरा म्हणजे स्वातंत्र्यानंतर राजस्थानात अचानक सतीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली होती. रूपकंवर ही अडतिसावी सती होती. यापूर्वीच्या सर्व सतींची माहिती, त्यापैकी किती जणी स्वत:हून सती गेल्या आणि किती जणींना चितेवर जबरदस्ती ढकलण्यात आलं याचा अभ्यास काही स्त्री कार्यकर्त्यांनी केला आहे. आजही अनेक ठिकाणी सती मंदिरे आहेत. तिथे शेकडो यात्री नियमितपणे जातात. मोठमोठाले मेळे होतात. प्रसादाची दुकाने लागतात. नारळ चढवले जातात. कपडे अर्पण केले जातात. चितेचा अग्नी चिरकाल, कायमचा प्रज्वलित ठेवला जातो.
सती प्रश्नावर स्त्री संघटनांनी या घटनेपूर्वी म्हणजे खरे तर १९८३ मध्येच दिल्लीत आवाज उठवला होता. सती प्रथा चालू राहावी म्हणून ‘राणी सती सर्व संघ’ राजस्थान आणि दिल्लीमध्ये सती मंदिरे उभी करण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी दिल्लीमध्ये एक भव्य मंदिर उभे करण्यासाठी सरकारकडून जमीन मिळाल्यावर एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला आणि एक मोठी मिरवणूक त्या जागेपर्यंत काढण्यात आली. याचा पत्ता लागल्यावर घाईघाईने स्त्रियांनी एक समांतर मोर्चा काढला, त्यात मिरवणुकीच्या मानाने स्त्रियाही संख्येने कमी होत्या, म्हणून हा मोर्चा प्रभावहीन झाला. एवढेच नव्हे तर मिरवणुकीतील स्त्रियांनी उलट मोर्चेवाल्या बायकांनाच ऐकवले की हिंदू स्त्री म्हणून त्यांना सती जाण्याचा अधिकार आणि सतीची पूजा करण्याचाही अधिकार आहे. शरमेची गोष्ट म्हणजे या बायका स्त्री कार्यकर्त्यांच्याच घोषणा आपल्या समर्थनासाठी वापरत होत्या. ‘हम भारत की नारी है। फूल नहीं चिंगारी है। ’ ही घटना पुढील संघर्षांची नांदी होती. देवरालात घडलेली घटना फक्तअपवादात्मक आणि राजस्थानापुरती मर्यादित नव्हती, हा भारतामध्ये नेहमीच असलेल्या दोन प्रवृत्तींचा संघर्ष होता. एका बाजूला कट्टर परंपरावादी व दुसऱ्या बाजूला मानवतावादी प्रागतिक विचारसरणी! स्त्रीवादी चळवळींना या संघर्षांत मोठीच टक्कर द्यावी लागली.
रूपकंवर १० वीपर्यंत शिकलेली होती. तिचे सासरे सुमेर सिंह एका शाळेत शिक्षक होते. तिचं लग्न आठ महिन्यांपूर्वी झालं तरी ती लग्नानंतर फक्त वीस दिवस सासरी राहिली होती. एक दिवस तिच्या नवऱ्याच्या पोटात दुखू लागलं आणि दुसऱ्या दिवशी तो इस्पितळात मरण पावला. पहिला रिपोर्ट असं सांगतो की तिने थोडा वेळ शोक केला, मग ती शांत झाली आणि तिने सासऱ्यांसमोर सती जाण्याची आपली इच्छा सांगितली. त्याप्रमाणे तिला नवरीचा पोशाख चढवण्यात आला. चितेवर चढून तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. गायत्री मंत्र जपत जमलेल्या गर्दीला आशीर्वाद दिला व ती शांतपणे ज्वालांनी लपेटली गेली, असे सांगण्यात येत होते. आश्चर्य म्हणजे तिच्या वडिलांना मुलगी सती जाण्याची कल्पना दिली नव्हती.
‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट’ची शाखा विमेन्स मीडिया ग्रुपच्या तीन पत्रकार गीता शेषू, मीना मेनन आणि सुजाता आनंदन दिवरालाला पोहोचल्या त्या वेळी त्यांनी माहिती मिळवली की रूपकंवर सती जायला भाग पाडण्याची तयारी तिचा नवरा गेल्यापासूनच सुरू झाली होती. तिला ही गोष्ट कळताच ती पळाली आणि जवळपासच्या शेतात जाऊन लपली, पण लोकांनी तिला शोधून काढलं. ओढत आणलं, जबरदस्तीने वधू वेष घालून सजवलं आणि तिला चितेवर ढकलण्यात आलं. ती जोरजोरात ओरडत होती आणि बाहेर यायला धडपडत होती, पण चारी बाजूला तलवारी घेऊन उभ्या असलेल्या युवकांनी तिचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. प्रत्यक्षदर्शी अनेकांनी पोलिसांसमोर नंतर सांगितलं की ती ‘बचाव बचाव’ म्हणून ओरडत होती. त्यांनी अशीही कबुली दिली की गर्दी आणि गुलाल उधळल्याने नीट दिसत नव्हतं, पण ‘वाचवा’ म्हणून ती हात उंचावून काही सांगत होती. त्याला गाववाल्यांनी ती आशीर्वाद देत होती असं समजून टाकलं.
सतीबंदी कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाला होता, पण भारतीय दंड संहितेत तो समाविष्ट झालेला नव्हता, त्यामुळे काय करावं हा पोलिसांपुढे पेच होता. स्थानीय प्रशासनाला सती योजनेची माहिती होती. पोलीस जीप थोडय़ा अंतरावर जाऊन तशीच परत आली होती. पुढे दोन आठवडे जनक्षोभाचा रेटा वाढूनही कोणालाही अटक झाली नाही आणि रूपकंवरला गुंगीची अनेक इंजेक्शनं देणारा डॉक्टरही गायब झाला.
घटनेनंतर सात-आठ दिवसांतच देवराला एक तीर्थक्षेत्र बनलं. हजारो लोक तिथे भक्तिभावाने येऊ लागले. ट्रिक फोटोग्राफीने पतीचं डोकं मांडीवर घेऊन ज्वालात बसलेल्या रूपकंवरच्या हजारो फोटोंची विक्री झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि महिला बालविकासमंत्री राज्यमंत्री मार्गारेट अल्वा यांना देशभरातून हजारो तारा पाठवून हस्तक्षेप करण्याची आणि १६ सप्टेंबरला होणारा ‘चुनरी महोत्सव’ थांबवण्याची मागणी करण्यात आली. १४ सप्टेंबरला साडेतीनशे शहरी व ग्रामीण महिला पत्रकार, शिक्षक, महिला डॉक्टर यांनी एक मूक मोर्चा काढला. त्यांनी १६ सप्टेंबरचा सती महोत्सव थांबवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली, पण कोणीही त्यांची व्यक्तिश: भेट घेतली नाही. दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १६ सप्टेंबरला काही सार्वजनिक आयोजन होऊ न देण्याचा आदेश दिला. हा आदेश डावलून हजारो लोक दिवराला येथे चुनरी महोत्सवासाठी जमले. राज्य सरकारने असहाय दर्शकाची भूमिका घेतली. इथे जत्रेसारखी खाण्या-पिण्याची दुकाने, निवासव्यवस्था, लाऊड स्पीकर, कंट्रोल टॉवर, पार्किंग अशी सगळी सतीचा व्यापार करणारी व्यवस्था होती. तीन आठवडय़ांत ५० लाख रुपये ट्रस्टजवळ जमा झाले. ते जप्त करण्याची स्त्री चळवळीची मागणी व्यर्थ ठरली.
ही राजपूत परंपरा आहे, म्हणत सतीचे समर्थन सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करत तिथे हजेरी लावली. यामागे अर्थात हिंदूंची मतं मिळवण्याचा कावा होता. सतीविरोधातले अभियान, राजपूतांच्या विरोधातच जणू चालले आहे असा मोहोल तयार करण्यात आला. बनारस आणि पुरीच्या मुख्य पुजाऱ्यांनी सतीला शास्त्राधार आहे, सतीला कायदेशीर मान्यता मिळावी, किंबहुना हा मुद्दा सरकारच्या अधिकारात नसून पुजाऱ्यांच्या अधिकारात आहे असे म्हटले. ‘विधवांनी सती गेलेच पाहिजे’ अशी प्रतिक्रिया रूपकंवर सती प्रकरणात दिल्यावर धडाडीच्या कार्यकर्त्यां सीमा साखरे यांनी नागपुरात शंकाराचार्य निरंजन देव यांची भेट घेतली. त्यांनी ‘मैं विधवा के साथ बात नहीं करता’ असे म्हणून सीमाताईंना धुडकावून लावले, पण सीमाताईंनी व जवळच्या सर्व स्त्री गटांनी त्यांचा निषेध केला. राजस्थानातल्या सती समर्थन सभेत महिला आंदोलक बाजारू आहेत, पाश्चात्त्य प्रभावाने त्या अंध झाल्या आहेत, त्यांची संस्कृतीवर श्रद्धा नाही, त्या चरित्रहीन आहेत, जयपूरच्या वातानुकूलित घरात बसून दारू पिणाऱ्या आहेत, असे अनेक आरोप केले गेले.
हे सर्व वाग्बाण सहन करीत महिलांनी खूपच धडाडीने हे अभियान चालवले. राजस्थानातील स्त्रियांनी तर खूपच आंदोलने केली, पण राष्ट्रीय स्तरावर सतीविरोधी संघर्षांत एकजूट दाखवून स्वायत्त संस्था व राजकीय पक्षाच्या स्त्रियांनी ६ ऑक्टोबरला देशभर मोर्चे काढले. जयपूरला भरलेल्या प्रचंड मोठय़ा सभेत राजस्थानातील २५ संस्था तर पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, अहमदाबाद येथून आलेल्या ३१ संस्थांचा समावेश होता. यात एका ग्रामीण स्त्रीने राज्य सरकारने योग्य ते पाऊल वेळेवर न उचलल्याने ही घटना घडल्याचे ठणकावून सांगितले. जातिधर्माच्या नावावर स्त्रीचे शोषण होता कामा नये, असे सांगून साहित्यिक लक्ष्मीकुमारी चुडावत म्हणाल्या की सती हा शब्द सन्मान आणि श्रद्धासूचक आहे, तो एका तरुणीला जबरदस्तीने जाळण्याच्या घटनेत वापरू नका. एका अपराधाला सती म्हणून धर्माशी जोडणे ही मानसिकता समस्याकारक आहे.
जयपूरच्या सभेला चार हजार स्त्रिया उपस्थित होत्या, तिथेच त्यानंतर पाच हजार स्त्रियांना आणून सती समर्थनाची सभा घेण्यात आली. या सभेत सर्वपक्षीय नेते आणि धार्मिक गुरू उपस्थित होते. ‘बायकांविरुद्ध बायका’ असं चित्र उभं केलं गेलं.
काही दिवसांतच राज्य सरकारने सतीविरोधी अध्यादेश लागू केला आणि सती निषेध कायदा झाल्याने सतीसमर्थकांचा आवाज बंद झाला. दिवरालात सती मंदिर झाले नाही. ३२ संबंधित लोकांना अटक झाली. या काळात महिलांनी अनेक पत्रके प्रसिद्ध केली, त्यातील एकात विचारलेले प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. स्त्रियांना सधवा किंवा विधवा अशा परस्परविरोधी भूमिकेत का अडकवता? स्त्रीची ओळख आहे तरी काय? गप्प बसून अन्याय सहन करणारी की सन्मानाने जगण्याचा हक्क मागणारी? माणूस होण्याचा हक्क मागणारी? आपली स्वतंत्र ओळख समजण्याचा रस्ता फार अवघड आहे. या रस्त्यावर समाज सरळपणे बाईला का चालू देत नाही? समाजाच्या विरोधाला घाबरून विधवा आपल्या नशिबाला दोष देत त्याबरोबर येणारे अन्याय सहन करतात नाही तर आपले जीवन असहायपणे संपवून टाकतात. नऊ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आणि सर्व आरोपी सुटले! मात्र १९८८ मध्ये सती प्रथेविरुद्ध कायदा संमत झाला.
डॉ. अश्विनी धोंगडे –  ashwinid2012@gmail.com

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
firearms seized in thane marathi news, illegal firearms marathi news
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध