08 March 2021

News Flash

गुलाब आणि काटे

सिग्नलसाठी थांबलेली गाडी अचानक सुरू झाल्यामुळे धक्का बसला. हातातली फुले पडू नयेत म्हणून मी त्यावरची पकड घट्ट केली. आणि ‘स्स..’ देठाचा काटा माझ्या बोटात

| September 20, 2014 01:02 am

सिग्नलसाठी थांबलेली गाडी अचानक सुरू झाल्यामुळे धक्का बसला. हातातली फुले पडू नयेत म्हणून मी त्यावरची पकड घट्ट केली. आणि ‘स्स..’  देठाचा काटा माझ्या बोटात रुतला. तीव्र वेदना मनापर्यंत पोहोचली, पण क्षणभरच! दुसऱ्याच क्षणी स्वामीची प्रसन्न मुद्रा डोळ्यासमोर उभी राहिली. आमच्या एका सामूहिक कृतीने माधवनच्या कुटुंबावरचे दु:खाचे सावट दूर झाले होते.. माझा निश्चय झाला होता. आता थांबणे नाही. याच वाटेवरून चालत राहायचे. विखारी शब्दांच्या आणि कटू अनुभवांच्या काटय़ांनी घायाळ केले तरीही!
ऐंशीच्या दशकाची नुकतीच सुरुवात झाली होती. ‘ज्ञानदीप’ कार्यकारिणीच्या सभा दर बुधवारी. आकाशानंद यांच्या उपस्थितीत दादरला व्हायच्या. एकदा बैठक संपवून मी घरी निघाले होते. सवयीने माझी पावले स्टेशनच्या दिशेने पडत होती, पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता. गाडी मिळाली. आश्चर्य म्हणजे खिडकीजवळची एक सीटही रिकामी दिसली. अगदी वाऱ्याच्या दिशेची. खरं तर या सगळ्याची मला किती अपूर्वाई वाटायला हवी होती. पण माझे मन थाऱ्यावर नव्हते ना! बैठकीत झालेल्या वादावादीमुळे मी खूप अस्वस्थ झाले होते.
तसे आम्ही सगळे कार्यकर्ते समविचारी, एकमेकांना सांभाळून घेणारे होतो. समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हायची उत्कट ऊर्मी मनात होती, पण संस्था म्हटली की मतभेद आलेच. एखाद्या मुद्दय़ावरून आमच्यातही वाद व्हायचे, पण त्याचं वादळात रूपांतर होणार नाही याची काळजी घेतली जायची. पण त्या दिवशी मात्र शब्दाला शब्द वाढत गेला. वातावरण तापलं. आमच्या एका कार्यकर्त्यांचं काय बिनसलं होतं कोण जाणे? आल्याआल्याच त्याने एकेकाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मीही त्याच्या तावडीत सापडले. रागाच्या भरात तो जे काही बोलत होता त्यातून व्यक्त होणारा अविश्वास माझ्या मनाला खूप यातना देऊन गेला. त्याच क्षणी मी ठरवून टाकलं. पुरे झालं हे समाजकार्य. राजीनामा देऊन आता यातून मोकळं व्हायचं.
गाडी वेगाने धावत होती. विचारांच्या नादात माटुंगा-सायन कधी मागे पडलं ते कळलंच नाही.     
मी पर्स उघडली. थोडीशी शोधाशोध केल्यावर एक कोरा कागद मला सापडला. त्यावर मी राजीनाम्याचा मजकूर लिहिला. ‘यापुढे संस्थेत राहून काम करणे शक्य नसल्याने मला जबाबदारीतून मुक्त करावे’ अशी विनंती मी संस्थाप्रमुखांना केली. राजीनाम्याच्या पत्राची नीट घडी घालून मी ते पर्समध्ये ठेवलं. खिडकीतून येणारा गार वारा अंगावर घ्यायला किती छान वाटतंय ते आता कुठे माझ्या लक्षात आलं.  
गाडीने कुर्ला स्टेशन सोडलं आणि ती घाटकोपरच्या दिशेने धावू लागली. उतरणाऱ्या बायका दाराशी गर्दी करून उभ्या होत्या. इतक्यात त्यांच्यातल्या एकीने ‘शुक-शुक’ करून माझे लक्ष वेधून घेतले. ‘‘बहेनजी, पहचाना नही क्या?’’ दाक्षिणात्य शैलीमध्ये तिने विचारले.
 ‘‘अरे, मिसेस माधवन्! कैसी हो आप? और स्वामीकी तबीयत अभी कैसी है? ’’ माझे  एकामागोमाग एक प्रश्न.
   ‘‘एकदम अच्छी है अभी. डॉक्टरसाबने उसे स्कूल जानेकी परमिशन भी दी है.’’ मिसेस माधवन् म्हणाल्या.
        ‘‘अरे वा! व्हेरी गुड ’’ मी आनंदाने उद्गारले.
  ‘‘बहेनजी, स्वामी और उसके डॅडी बाजूके डिब्बेमे है, आपको देखकर उनको बहोत खुशी होगी. आप पाच मिनिट के लिए घाटकोपर उतरोगी? प्लीज..’’
  मी क्षणभर विचारात पडले. मिसेस माधवन्चा आग्रह मला मोडवेना. घडय़ाळात बघत मी मनाशी म्हटलं त्या एवढा आग्रह करतायत तर उतरू या. नंतर लगेच दहा मिनिटांनी याच प्लॅटफॉर्मवर येणारी फास्ट कर्जत आपल्याला मिळेल. मी घाटकोपरला उतरले. शेजारच्या डब्यातून उतरलेल्या आपल्या पती आणि मुलाला धावत जाऊन मिसेस माधवन्ने हे सांगितले. ते दोघे लगबगीने मी उभी होते तिथे आले.
        ‘हॅलो मॅडम, स्वामी, आँटीको नमस्ते करो.’ माधवन्ना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
   ‘‘नमस्ते आँटी.’’ स्वामी हात जोडून म्हणाला.
  ‘‘अरे स्वामी, कितने फ्रेश लग रहे हो तुम! लुकिंग चीअरफुल!’’
 ‘‘ये तो आप लोगोंकी कृपा है, आप सब हमारी मदद नही करते तो स्वामीके हार्टके ऑपरेशन के लिए अमरिका जाना इम्पॉसिबल था’’ गळा दाटून आल्यामुळे मिसेस माधवन्ना पुढे बोलता येईना.
 ‘‘ये क्या भाभीजी, माधवनजी इतनी सालोंसे हमारे ऑफिसमे काम कर रहे है. उनकी मदद करना हमारा फर्जही था.’’ त्यांचा हात हातात घेऊन मी म्हणाले.
 माधवन्च्या डोळ्यातही कृतज्ञतेची भावना होती. शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी! मिसेस माधवनने एका गजरे विकणाऱ्या मुलाला थांबवलं. त्याच्या टोपलीतले गजरे संपले होते. गुलाबाची फुलं मात्र होती. मिसेस माधवन्नी दोन गुलाब विकत घेतले आणि त्या स्वामीला म्हणाल्या  ‘बेटा, ये फुल आँटीको दो और थँक्स बोलो..’ स्वामीच्या चेहऱ्यावर उमललेलं हास्यही गुलाबासारखंच होतं.. मोहक आणि प्रसन्न!माधवन कुटुंबीयांचा निरोप घेऊन मी गाडीत चढले. दोन महिन्यांपूर्वीच्या त्या आठवणींनी मनात गर्दी केली. माधवन् माझे ऑफिसमधले सहकारी. त्यांच्या बारा वर्षांच्या मुलाला हृदयविकार आहे आणि शस्त्रक्रियेसाठी त्याला अमेरिकेला नेण्याची गरज असल्याचे जेव्हा ऑफिसमध्ये कळले तेव्हा आम्ही सगळेच खूप अस्वस्थ झालो. खर्चाचा आकडा ऐकून आमच्या तोंडचे पाणीच पळाले. माधवन् तर पूर्णत: खचून गेले होते. त्यांचे बँकेतील सेव्हिंग आणि पत्नीचे दागिने विकून आलेले पैसे एकत्र केले तरी निम्मी रक्कमसुद्धा उभी राहत नव्हती. शेवटी आम्ही दोघातिघांनी प्रयत्न करायचे ठरवले. डॉक्टरांनी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. आम्ही झपाटून कामाला लागलो. ऑफिसमध्ये लिस्ट फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विनंती केली. सगळ्यांनी सढळ हाताने मदत केली. मुख्यमंत्र्यांना विनंती-अर्ज पाठवला. लायन्स-रोटरी क्लब्ज, महालक्ष्मी-सिद्धिविनायक मंदिरांचे विश्वस्त अशा अनेक ठिकाणी संपर्क साधून मदतीसाठी आवाहन केले. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले. आवश्यक तेवढी रक्कम जमा झाली आणि स्वामी अमेरिकेला रवाना झाला. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. तो मुंबईला सुखरूप परत आला. माधवन् रजेवर होते. त्यांनी फोन करून ही आनंदाची बातमी ऑफिसमध्ये कळवली. आपल्या एकुलत्या एका मुलाला जीवनदान मिळाल्याचे सांगताना त्यांचा स्वर भावनावेगाने थरथरत होता. आणि आता तर त्यांचे हर्षोत्फुल्ल चेहरे मी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून माझे मनही समाधानाने भरून आले होते. थोडय़ा वेळापूर्वीचे नैराश्य, उद्विग्नता यांचा आता तिथे मागमूसही राहिला नव्हता. मी हातातल्या गुलाबाच्या फुलांकडे पाहिले. किती सुंदर दिसत होती ती! त्यांचा रंगही नेहमीपेक्षा वेगळा होता. फिक्कट पिवळा, किंचित केशरी छटा असलेला. या क्षणी माझ्या मनाला व्यापून राहिलेला आनंदही असाच.. या गुलाबांसारखा नव्हता का? देखणा आणि दुर्मीळ!
 सिग्नलसाठी थांबलेली गाडी अचानक सुरू झाल्यामुळे धक्का बसला. हातातली फुले पडू नयेत म्हणून मी त्यावरची पकड घट्ट केली. आणि ‘स्स..’  देठाचा एक तीक्ष्ण काटा माझ्या बोटात रुतला. तीव्र वेदना मनापर्यंत पोहोचली. पण क्षणभरच! दुसऱ्याच क्षणी स्वामीची प्रसन्न मुद्रा डोळ्यांसमोर उभी राहिली. आमच्या एका सामूहिक कृतीने माधवन्च्या कुटुंबावरचे दु:खाचे सावट दूर झाले होते.
 ‘‘दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना’’ या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात असे क्षण खूप मोलाचे समाधान देऊन जातात. माझा निश्चय झाला. आता थांबणे नाही. याच वाटेवरून चालत राहायचे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी प्रामाणिक राहून.. विखारी शब्दांच्या आणि कटू अनुभवांच्या काटय़ांनी घायाळ केले तरीही!
मी पर्स उघडली. राजीनाम्याचे पत्र बाहेर काढले. त्याचे तुकडे करून बाहेर भिरकावून दिले. स्वामीने दिलेले ते सुंदर गुलाब मी अलगद पर्समध्ये ठेवले.. देठावरच्या काटय़ासहित!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:02 am

Web Title: rose and thorn
टॅग : Chaturang
Next Stories
1 माझ्याही गोंदणाची कहाणी
2 लय-तालाचा मेळ
3 पंचकोश संकल्पना
Just Now!
X