‘‘तुम्ही स्त्रियांवरच विनोद का करता आणि मुखपृष्ठावर स्त्रियाच का, असे मला एकदा विचारण्यात आले होते. स्त्रियांच्या विनोदबुद्धीवर आणि खिलाडूपणावर माझा विश्वास आहे. त्या माझे अपराध पदरात घेतात, म्हणून स्त्रियांना पहिलं स्थान दिले आहे.’’ असं म्हणणाऱ्या  शि. द. फडणीस यांनी नेहमीच स्त्रीला, तिच्या अनेकांगी स्वभावाला आपल्या व्यंगचित्रांतून निखळ विनोदी पद्धतीने चितारले आहे. उद्याच्या (५ मे) च्या जागतिक हास्य दिनानिमित्ताने हा व इतर लेख. हसा आणि हसवा हा संदेश देणारे.
मासिकाच्या मुखपृष्ठावर व्यंगचित्र आणण्याची कल्पना प्रत्यक्षात आणायची होती. १९५२चा तो काळ होता. आम्ही कुटुंबीय खरेदी करायला गेलो होतो. दुकानदाराने अनेक कापडं समोर टाकली. सगळ्या कपडय़ांवर मोठमोठय़ा प्रिंटस् होत्या. त्या पाहताना सहज माझ्या मनात आलं, उद्या उंदीर, माजरं असलेली कापडंदेखील येतील. त्यातून विचार सुरू झाला. जर कापडांवर मांजरं आली तर तीही उंदरांच्या मागे लागतील. त्यातूनच मग पुढे बसस्टॉपवर मांजराची प्रिंट असलेली साडी परिधान केलेली स्त्री आणि उंदराची प्रिंट असलेला शर्ट अंगात असलेला तरुण यांचा पाठलाग हा विषय मी चित्रातून मांडला. ‘मोहिनी’ चे ते मुखपृष्ठ. पहिल्यांदाच चित्रपटतारका किंवा सुंदर युवती हा रिवाज बदलून स्त्री वा व्यंगचित्र मासिकाच्या मुखपृष्ठावर आले; तेही रंगीत!
 स्त्री हा विषय घेऊन वा ठरवून मी कधी व्यंगचित्रांची निर्मिती केली नाही. चित्राचा विषय म्हणूनच त्यामध्ये स्त्री आली आहे हे निश्चितपणे सांगता येईल. माझं पहिलं व्यंगचित्र ‘मनोहर’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ‘मुंबईतील हल्लीचे बिऱ्हाड’ हा चित्राचा विषय होता. एकाच खोलीतील अडगळीचा संसार आणि या अडचणीत पाहुणा आल्यामुळे गैरसोय होईल म्हणून नाराज झालेली गृहिणी असा आशय मी त्या चित्रातून मांडला होता. अशा रीतीने माझ्या पहिल्याच चित्रात स्त्री आली. ‘हंस’ आणि ‘मोहिनी’ मासिकांसाठी काही व्यंगचित्रे पाठविली होती. तेव्हा अनंत अंतरकर यांच्याशी परिचय झाला. माझी चित्रे पाहून ‘तुमची कला अमोल आहे, तिची हेळसांड करू नका’, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्याचमुळे मुखपृष्ठावर व्यंगचित्राची कल्पना प्रत्यक्षात उतरली.

व्यंगचित्र हा विषय मी कधीच समोर ठेवला नव्हता. थोडीशी गंमत, करमणूक, मनोरंजन झालं की संपलं असाच माझा समज होता; पण व्यंगचित्रकलेविषयी जे अपसमज आहेत त्यातील हादेखील एक आहे तो म्हणजे यात शिस्त, नावीन्यता आणि सृजनशक्तीला आव्हान नाही. कुणीही व्यंगचित्र काढू शकतो. पँट शिवण्यासाठी एकदा टेलरकडे गेलो. त्याने सांगितल्यानुसार एक महिन्याने ट्रायलसाठी गेलो. तेव्हा ती पँट गुडघ्याखाली आल्याचं ध्यानात आले. तेव्हा आपली चूक मान्य करण्याचं सोडून ‘कार्टूनिस्ट आहात ना मग, अशीच पँट चालेल की तुम्हाला’, असं टेलरनं मला सांगितलं, असंही होतं.
निखळ आनंदाची निर्मिती हेच माझ्या व्यंगचित्रांचे उद्दिष्ट आहे; नव्हे तेच उद्दिष्ट असलं पाहिजे अशी माझी प्रांजळ भूमिका आहे. या जगामध्ये कोणतीही व्यक्ती पूर्ण नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही त्रुटी आहे. विसंगती आहे किंवा अपुरेपण आहे. व्यंगचित्रातून मी ही त्रुटी अधोरेखित करतो. त्यावर माझ्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम करतो. हा माझ्या दृष्टीचा स्वभाव आहे. राजकारणी अनेक घोषणा करतात, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याची पूर्तता होत नाही. एका अर्थाने ही विसंगतीच आहे. त्यामुळे विसंगती आणि विरोधाभास हाच व्यंगचित्राचा विषय होतो.
कोल्हापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी मुंबईच्या सर जे.जे. कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. या माझ्या शिक्षणामध्ये व्यंगचित्र हा अभ्यासक्रम नव्हता. कमर्शियल आर्ट म्हणजे जाहिरातीसाठी कला हा अभ्यासाचा विषय होता. माझ्या पाहण्यात निरनिराळी व्यंगचित्रे आली. आपणही यामध्ये काही करून पाहावे या हेतूने व्यंगचित्रकलेकडे मी छंद म्हणून वळलो, करिअर म्हणून नाही. सुरुवातीला काही व्यंगचित्रे काढली. ती पाहून शिक्षकांनी ‘वेडीवाकडी नाही, तर सरळ चित्र काढण्यासाठी इथे आला आहेस. व्यंगचित्रांमुळे तुझा हात बिघडेल’ असा इशारा दिला होता. तोपर्यंत मी खऱ्या अर्थाने ‘बिघडून’ गेलो होतो, पण हे ‘बिघडणं’ सोपं नाही, असेही त्या वेळी लक्षात आले.
      तुम्ही स्त्रियांवरच विनोद का करता आणि मुखपृष्ठावर स्त्रियाच का, असे मला एकदा विचारण्यात आले होते. स्त्रियांच्या विनोदबुद्धीवर आणि खिलाडूपणावर माझा विश्वास आहे. त्या माझे अपराध पदरात घेतात, म्हणून स्त्रियांना पहिलं स्थान दिले आहे. त्याविषयी तक्रार असण्याचं कारण नाही, असे माझे उत्तर ऐकताच महिलांनी टाळय़ांचा कडकडाट केला. मी स्त्रियांची चित्रे काढली तरी चित्रांतील विनोद कधी बोचरा नव्हता. स्त्रीचे आणि स्त्रीत्वाचे चमत्कारिक, वात्रट अर्थ दाखविणारी आणि मासिकांचा खप वाढविण्यासाठी ‘खिडकी चित्रे’ मी कधीच काढली नाही.
एक ‘न्यूड मॉडेल’ असं चित्र मी काढलं. मात्र, त्या चित्रामध्ये न्यूड हा विषय म्हणून नाही. स्टुडिओमध्ये चित्रकार न्यूड मॉडेलचं चित्र काढत आहे. त्यावेळी पाहुणा आला म्हणून चित्रकार दरवाजा उघडण्यास जातो, तेव्हा चित्रातील तरुणी कॅनव्हास वस्त्रासारखा अंगावर घेते ही कल्पना त्या चित्रातून मांडली होती. त्यामुळे यामध्ये सेक्स अपील नाही, तर कल्पनेचं अपील आहे. दुसऱ्या एका चित्रात एक मांजर म्हणजे मनीमाऊ झोपलेली आहे. तीन-चार पिले दूध पीत असून त्यामध्ये एक उंदराचंही पिलू आहे. या चित्रामध्येही ‘स्त्री’ आहे. ती एका वेगळय़ा अर्थाने माता या नात्यानं आली आहे.
एका चित्राची नायिका तंबोरा घेऊन गाणं गात आहे. डोळे मिटलेले आणि हावभाव पाहून जवळ असलेल्या बालकाला ती का रडतेय हेच कळत नाही. त्यामुळे ते बालक हातातील चॉकलेट आणि खुळखुळा तिला देत आहे, हे चित्र अनेकांना आवडले. हा निरागस विनोद म्हणजे बालकाचा तिच्या गाण्यावरचा अभिप्राय आहे अशी अनेकांची भावना झाली; तर एका चित्रात चंद्रप्रकाशात तो आणि ती नौकेतून विहार करताना तिच्या साडीचे रूपांतर शिडामध्ये झाले आहे, असं दाखवलं आहे. या चित्रामध्ये रोमँटिक मूड असलेली स्त्री आली आहे.
प्रत्येक व्यंगचित्राची एक गोष्ट असते. ती त्यातून व्यक्त होत असते. एक बाई आपल्या व्यसनी नवऱ्याबद्दल संताप कशी व्यक्त करेल हे मी दाखवलं, ते ती कपडय़ासारखा पिळा करून नवऱ्याला कपडे धुवावं तशी आपटते त्यातून. काहीवेळा असं व्यगंचित्राच्या पलीकडे जाऊनही काही मांडणं असतंच. स्त्री एकच, पण वेगवेगळ्या व्यक्ती तिच्याकडे कसं बघतात, असंही एक चित्र मी काढलं. यात चांभाराला तिची तुटलेली चप्पल दिसते. लहान मुलाला तिच्या हातातल्या बकेटमधली खेळणी, एका स्त्रीला तिच्या साडीवरची डिझाइन खुणावतेय तर एका फुलपाखराची नजर तिनं माळलेल्या फुलावर आहे. एक पुरुष मात्र तिच्याकडे एक स्त्री म्हणून बघतोय.
      स्त्रीचा स्वभाव हा माझ्या अनेक व्यंगचित्रांचा विषय आहे. एका जाहीर सभेत एका स्त्रीचं भाषण सुरू आहे आणि तिच्या मागे तिच्या कार्यकर्त्यां स्त्रिया तिच्या साडीला हात लावून त्यावरच्या डिझाइनची चर्चा करताहेत असं चित्र काढलं होतं. गंमत म्हणजे पुण्यातल्या एका संस्थेनं आमच्या अध्यक्षावर तुम्ही चित्र काढलं असल्याची नोटीस त्या मासिकाला पाठवली होती. स्त्रियांचा आणखी एक स्वभावविशेष म्हणजे त्यांना गप्पा मारायला खूप आवडतात. फोनवर तर विशेष. हे लक्षात आलं आणि विचार करू लागलो, की गप्पांच्या नादात ती आपल्या नवऱ्या-मुलांनासुद्धा विसरू शकते. मग त्यातून चित्र साकारलं ते म्हणजे, ती फोनवर गप्पा मारतेय आणि पाठीमागे डायनिंग टेबलवर मुलं आणि नवरा वाट पाहून पाहून शेवटी झोपी गेली आहेत.
   स्त्रियांकडे खूप चांगली कल्पनाशक्ती असते असं मला वाटतं. त्याचाही मी छान उपयोग करून घेतलाय. एक चाळ दाखवली आहे. वरच्या मजल्यावरून वाळत घातलेल्या साडय़ा खालच्या मजल्यापर्यंत आल्या आहेत. तेव्हा तळमजल्यावरची स्त्री त्याचा चक्क पडद्यासारखा उपयोग करते. त्यामुळे दोघींचे उद्देश सफल होताना दिसतात आणि तिच्या कल्पकतेचं हसू येतं.
 आजूबाजूची परिस्थिती व्यंगचित्रे घडवत असतात. तुमच्याभोवती जे घडत असतं, तेच थोडंसं गमतीदार पद्धतीनं मी मांडत असतो. आजच्या नोकरदार स्त्रीची सकाळी स्वयंपाकाची प्रचंड धावपळ असते. नवरा ऑफिसला निघाला आहे. तिलाही सर्व आटोपून निघायचं आहे. मग कल्पना सुचली, तिला जर त्याच्या स्कूटरवर बसून स्वयंपाक करता आला तर.. त्यातून व्यंगचित्र आकाराला आलं.
 प्रत्येक वेळी व्यंगचित्रातून विनोद घडलाच पाहिजे असे नाही. आपल्या संस्कृतीचं आणि स्त्रीच्या कनवाळू स्वभावाचं दर्शन घडवणारं एक चित्र मी काढलं होतं. कल्पना खूप जुनी होती, पण प्रत्यक्षात यायला १५ वर्षे लागली. या चित्रात व्हीनसचा तो हात नसलेल्या स्त्रीचा पुतळा आहे. एक भारतीय स्त्रीचा पुतळा आपले दोन हात तिला देऊ करते, असं ते चित्र होतं. आपल्याकडचं गरजवंताला काही देण्याच्या आपल्या स्वभावातून हे चित्र घडलंय. असं अनेकदा होतं. कल्पना खूप तरंगत असतात मनामध्ये. पण प्रत्यक्षात यायला काही वेळा वेळ लागतोच. कारण मी ठरावीक उद्देश ठेवून व्यंगचित्रकार झालो नाही. कल्पनेत जे आलं ते मांडत गेलो अर्थात वास्तवात जे दिसलं ते समोर ठेवूनच. जेव्हा अमेरिकी किंवा ब्रिटिश व्यंगचित्रं समोर आली. तेव्हा आपल्यालाही असं काही करता येईल असं वाटत गेलं आणि त्यातून अनेक व्यंगचित्र आकाराला आली. विषयाला अनुरूप अशी आधारलेली व्यंगचित्रे मी चितारली; अगदी स्त्रीवरचीही.  निखळ विनोद हीच त्यामागची भावना होती. त्यामध्ये एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि डेकोरेटिव्ह फॉर्म सामावलेला असतो. काही राजकीय टीकाचित्रे मी काढली, पण त्यामध्ये करिअर केले नाही. चित्रकार म्हणून व्यक्त होण्याला मर्यादा पडतात. ती उणीव व्यंगचित्र भरून काढते असेच मला वाटते. व्यंगचित्र हे प्रहार करण्याचे माध्यम आहे असे म्हटले जाते, पण माझी चित्रे प्रहार करणारी नाहीत, तर सुखद आनंददायी आहेत, असे खुद्द व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘फडणीस यांनी चित्रांच्या माध्यमातून मित्र जोडले, पण मी चित्रांतून शत्रू निर्माण केले,’ असेही बाळासाहेबांनी माझ्याविषयीचे गौरवोद्गार काढले आहेत.
सामाजिक विषय मांडल्यामुळे काही चित्रांतून जीवनशैलीविषयीचे भाष्यदेखील झाले आहे. ढोंगीपणावर प्रहार करणारं माझं एक व्यंगचित्र मध्य प्रदेशातील एका मासिकामध्ये प्रसिद्ध झालं होतं. एक हात वर आकाशाकडे असलेल्या तथाकथित साधूचा दुसरा हात भक्त स्त्रीच्या पर्समध्ये जात असल्याचं हे चित्र होतं. साधूंचा मोर्चा आल्यामुळे या चित्राने संपादकांना मनस्ताप झाला. तेच चित्र दोन वर्षांनी ‘मोहिनी’मध्ये प्रकाशित झाले. मात्र, तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. याचं कारण महाराष्ट्रामध्ये विनोदाची चांगली जाण आहे. त्यामुळे हा विषय इथे रुजलेला आहे. आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी विनोदी दृष्टी निर्माण केली आहे.
माझी चित्रे पाहून ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी ‘तुमची चित्रे कवितेच्या अंगाने जाणारी आहेत’, अशी भावना व्यक्त केली. हा माझा नाही, तर या व्यंगचित्रकलेचा गौरव आहे, असंच मला वाटतं.

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
infants with spina bifida surgery possible in the mother s womb
आईच्या गर्भातच होणार बाळावर शस्त्रक्रिया; स्पायना बीफिडाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा