अतिरेक्यांची दहशत आणि राज्यातील अस्थिर वातावरणामुळे काश्मीरमधील शैक्षणिक क्षेत्राकडं कमालीचं दुर्लक्ष झालं. दहशतवादी कारवायांमुळे राज्यातील ६४० शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची एक नवी सबा (अर्थात सुबह- सकाळ) होऊन उच्चशिक्षित सबा हाजीने आपल्या गावापासून, ब्रिसवानापासून इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रारंभ केला आहे. आपल्या आवडीचं काम, भरभक्कम पगार, सुखासीन आयुष्य मागे ठेवून, आपल्या गावातल्या मुलांना उच्चशिक्षित करायचं ध्येय आखून त्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या धाडसी  सबा हाजी खानविषयी..
जम्मू-काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात ७२०० फूट उंच पर्वतराजींमध्ये ब्रिसवाना हे छोटंसं गाव आहे. जम्मू-काश्मीरमधलं हे गाव काश्मीर व्हॅलीपेक्षा सर्वस्वी वेगळं आहे, कारण इथले लोक स्वत:ची ओळख पहाडी काश्मिरी असं सांगतात. याच पहाडी प्रदेशात ब्रिसवाना गावातल्या हाजी पब्लिक स्कूलनं अल्पावधीत आपली ओळख निर्माण केलीय, या शाळेनं आणि शाळेच्या निर्माती सबा हाजी या तरुणीनंही..
ब्रिसवाना गावापर्यंत पोहोचणं हेही अत्यंत जिकिरीचं.. जम्मूपासून गाडीने दहा तासांच्या अंतरावर असलेल्या दोडामध्ये आधी जावं लागतं. तिथून खूपशी पायपीट केल्यानंतर पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं ब्रिसवाना गाव भेटतं. या गावात ‘हाजी ट्रस्ट’च्या माध्यमातून सबा ज्ञानदान करते आहेत.  
जीन्स, टी शर्ट आणि डोक्याला हिजाब असा पेहराव केलेली तीस वर्षांची सबा रूढार्थाने शिक्षिका नाही.. पण आपल्या गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, या तळमळीतून ती आपलं सुखासीन आयुष्य सहजपणे सोडून परत आली आहे. ‘सबा’ या शब्दाचा अर्थ सुबह.. म्हणजे सकाळ. पहाडी प्रदेशातील मुलांच्या आयुष्यात तब्बल दोन दशकांनंतर नवी सकाळ आणि शिक्षणाची सुवर्णकिरणे घेऊन सबा परतली आहे.
अतिरेक्यांची दहशत आणि राज्यातील अस्थिर वातावरणामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्राकडं कमालीचं दुर्लक्ष झालं. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमुळे राज्यातील ६४० शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्याचं मानवाधिकार समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. राज्यातील शैक्षणिक स्थिती सुधारणं हे सध्याच्या काळातलं एक मोठं आव्हान इथल्या सरकारपुढं आहे.
सबाचे पालक नोकरीनिमित्त ऐंशीच्या दशकामध्ये दुबईत स्थायिक झाले होते. तिथंच सबाचा जन्म झाला. दहावीपर्यंतचं तिचं शिक्षणही दुबईतच झालं. हाजी कुटुंब वर्षांतून एकदा तरी त्यांचं मूळ गाव ब्रिसवाना आणि आईचं माहेर किश्तवाडा इथं आवर्जून यायचं. त्यामुळं सबालाही आपल्या गावाशी नाळ जुळायला वेळ लागला नाही. तिथं असलेले तिचे भाऊ, बहिणी यांच्यासोबत तिची सुटी आनंदात जायची. या नकळत्या वयापासूनच दोन भिन्न जगांशी सबाचा परिचय होत होता. ती जगत असलेलं सुखासीन, तणावरहित आयुष्य आणि आपले भाऊ-बहीण जगत असलेलं गावातील कष्टमय आणि दहशतीच्या छायेतलं आयुष्य.. त्यामुळं शिक्षणापासून त्यांची होत असलेली फारकत या साऱ्या गोष्टींची तिच्या मनात कुठं तरी नोंद होत होती.
दुबईमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सबाच्या उच्च शिक्षणासाठी हाजी कुटुंब जम्मूला परतलं. सबानं आपलं महाविद्यालयीन शिक्षण बंगळुरू इथल्या बिशप कॉटन इथून पूर्ण केलं. पदवीनंतर तिनं बंगळुरूमध्ये कटेन्ट रायटर म्हणून नोकरी स्वीकारली. आवडीचं काम, भरभक्कम पगार आणि मित्रमत्रिणींचा सहवास या सगळ्यांमुळं ती खूश होती.
२००८ मधली गोष्ट असेल, सबा ऑफिसमध्ये काम करत असताना टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. काश्मीरमधील दहशतवाद आणि त्याचा तिथल्या जनजीवनावर होत असलेला परिणाम सांगणाऱ्या बातम्या होत्या. काश्मीरमधल्या दहशतवादाचा परिणाम राज्यातील मोठय़ा शहरांबरोबरच लहान लहान गावांवरही होत असल्याचं सांगितलं, दाखवलं जात होतं. त्याच वेळी दहशतवाद्यांमुळं किश्तवाडा गावातील जनजीवन विस्कळीत झाल्याची बातमी सांगितली गेली. ही बातमी ऐकून सबा अस्वस्थ झाली. तिचे अनेक नातेवाईक, भाऊ, बहिणी त्याच ठिकाणी होते. त्यांची खुशाली विचारण्यासाठी तिनं लगेचच त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलल्यावर तिला तिथल्या भयानक परिस्थितीची जाणीव झाली. आपण जगत असलेल्या ऐषोरामी आणि सुखासीन आयुष्याबद्दल अपराधीही वाटू लागलं. तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्या अस्वस्थतेतूनच आपण काही तरी करायला हवं हा निर्धारही तिनं केला.
संध्याकाळी घरी परत आल्यावर याबाबत सबा आई-वडिलांशी बोलली आणि आपल्या मूळ गावी परत जाण्याचा निर्णय तिनं सांगितला. आपल्या लेकीच्या मनात असलेली तळमळ पाहून आई-वडिलांनीही तिच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय जेव्हा तिच्या मित्र-मत्रिणींना कळला तेव्हा त्यांनी तिला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण सबाचा निर्धारच होता.. अखेर ऑगस्ट २००८ मध्ये सबा आपल्या मूळ गावी ब्रिसवाना इथं परतली. परतल्यानंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न होताच. आपल्या गावातील लोकांसाठी काही तरी करायचं एवढं नक्की होतं, पण योग्य दिशा सापडत नव्हती.
सबाचे सिंगापूरस्थित काका नासीर हाजी यांच्याशी तिचं बोलणं झालं. सबाच्या या काकांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ‘द हाजी अमिना चॅरिटी ट्रस्ट’ची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून गावातील गरीब कुटुंबांना त्यांना आवश्यक असलेली आíथक मदत केली जाते. दहशतवादामुळं राज्यातील तसेच या परिसरातील शिक्षणाची अवस्था फार वाईट झाली असल्याचं त्यांनीही तिच्या निदर्शनास आणून दिलं. ‘गावात एकच सरकारी शाळा आहे. तिथं येणारा शिक्षक दुसऱ्या गावातून येत असल्यानं शाळा नियमित भरत नाही. त्यामुळे गावातील मुलं शिक्षणाच्या बाबतीत मागास आहेत. जर तुला इथंच राहून काम करायचं असेल तर इथल्या लोकांना, विशेष करून नवीन पिढीला गावाच्या आणि राज्याच्या बाहेर असलेल्या जगाचा परिचय शिक्षणाच्या माध्यमातून करून द्यायला हवा. त्यासाठी या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा हवी. हे काम खूप आव्हानात्मक आहे,’ असंही त्यांनी तिला सांगितलं. काकांचं म्हणणं सबाला पटलं आणि तिला तिच्या कामाची दिशा मिळाली.
दिशा मिळाली असली तरी ते प्रत्यक्षात आणणं कठीण होतं. लोकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणं आणि दहशतवादी कारवायांमधून कामाचा डोलारा उभा करणं तेवढंच असं दुहेरी आव्हान होतं. नासीर यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून सबाच्या कामाला मदत मिळणार होतीच, पण गावातील लोकांनाही ते काम आपलं वाटायला हवं होतं. त्या दृष्टीनं प्रयत्न करून गावकऱ्यांच्या मनात शिक्षणाबद्दलची आत्मीयता निर्माण करण्यात सबा यशस्वी ठरली. तिच्यामध्ये संवादाची हातोटी ही बाब होतीच, शिवाय तिची कामाबद्दलची तळमळही लोकांना दिसत होती. तीस वष्रे शिक्षकी पेशामध्ये काम केलेल्या आई तस्मिना हाजी यांचीही तिला मोलाची मदत मिळाली. सुरुवातीला केवळ छोटा बालवर्ग आणि मोठा बालवर्ग सुरू करत दर वर्षी एक एक इयत्ता वाढवायची असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार हिवाळा संपल्यानंतर मे २००९ पासून हाजी पब्लिक स्कूलच्या पहिल्या दोन इयत्ता हाजी कुटुंबाच्या मूळ घरामध्येच सुरू झाल्या.
शाळा सुरू झाली खरी, पण त्यासोबत अडचणीही होत्याच. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय. त्यामुळं घरातल्या लहान-थोर सगळ्यांनाच शेतीचं काम असायचं. डोंगराळ भाग असल्यामुळं सामानाची घोडय़ावरून ने-आण करण्याचं कामही करायला लागायचं. परिणामी मुलांच्या शिक्षणाबाबत फारशी जागरूकता लोकांमध्ये नव्हती. त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं मोठं आव्हान सबापुढं होतं. शिवाय सरकारी शाळांमधून मुलांना एक वेळेचं जेवण दिलं जात होतं. अर्थात ही शाळा शिक्षक येईल तेव्हाच सुरू असायची. त्यामुळं मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत फारसे सकारात्मक वातावरण नव्हते. तरीही शाळेत मिळणाऱ्या जेवणामुळं हाजी पब्लिक स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करायला पालक फारसे राजी नव्हते. त्यांना कसंबसं राजी करण्यात सबाला यश मिळालं.
  शाळा सुरू करायच्या आधी मुलांना कसं शिकवायचं याचं प्रशिक्षण गावातील दोघांना देण्यात आलं. पहिल्या वर्षी ३० विद्यार्थी आणि दोन स्थानिक शिक्षक यांच्या मदतीने शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी इथं येत असलेले चिमुकले विद्यार्थी आपल्या पालकांशी बोबडय़ा भाषेत इंग्रजीतून संवाद साधू लागले. त्यांच्या या प्रगतीमुळं त्यांच्या पालकांमध्ये आणि एकूणच गावातील लोकांमध्ये शाळेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागलं. त्यामुळं दर वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आजमितीला हाजी पब्लिक स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंत वर्ग भरवले जात असून त्यात २०० विद्यार्थी शिकत आहेत. १५ प्रशिक्षित शिक्षक आहेत. सोशल नेटवìकग साइट्सच्या माध्यमातून या शाळेत देश-परदेशातून नि:स्वार्थी भावनेने काम करायला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.  
 ब्रिसवाना गावाच्या आजूबाजूच्या गावांतील मुलंही या शाळेत शिकण्यासाठी येतात. ज्यांची आíथक परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेतलं जातं, पण ज्यांची परिस्थिती नाही त्या विद्यार्थ्यांना हाजी ट्रस्टतर्फे आíथक मदत केली जाते. शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच इतर गोष्टीही आवर्जून शिकवल्या जातात. आज हाजी पब्लिक स्कूलमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग असले तरी भविष्यात दहावीपर्यंतचे वर्ग तसेच महाविद्यालयही सुरू करण्याचा सबाचा मानस आहे, जेणेकरून परिसरातील मुलांना चांगलं शिक्षण मिळेल.
काश्मीरमधील परिस्थिती किती आणि कशी सुधारतेय, याचं प्रत्येकाचं मूल्यमापन वेगळं असेल; परंतु जी किरणं घेऊन सबा ब्रिसवानामध्ये परतली आहे, त्यामुळं काश्मिरी मुलांच्या आयुष्यात नंदनवन फुलेल, याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही..    
amita.bade@expressindia.com