29 October 2020

News Flash

कोणतंय हे दृश्य विदारक?

या दृश्यांच्या पाठोपाठ आता या क्षणाला आलेलंय अकस्मात एक करुण दृश्य.

मंगेश नारायणराव काळे – mangeshnarayanrao@gmail.com

म्हणजे कोणतंय हे दृश्य विदारक, कवितेत दाखल झालेलं अकस्मात? की एक अख्खा देश झोपलाय थकूनभागून या दृश्यात नि पसरलंय एक कोलाज असंख्य दृश्यांचं, ज्यात कुणी तरी एक परतलेलाय रिकाम्या हातांनी पुन्ह्य़ांदा, तर कुणी दुसरा आशाळभूत पाहतोय आरशात, की असणारेय की नाही अक्स शाबूत उद्या?

म्हणजे हिरावून घेतलंय ताट समोरचं कुणाचं तरी ओरबाडून नि चेहऱ्याच्या जागी बसलीये भूक फणा उगारून नि कुणी तरी एक दुर्दैवी सर्वस्व गमावलेला झुलतोय झाडावर त्यानंच जगवलेल्या नि कुणी एक जो निघाला होता सार्वत्रिक भयानं कोलमोडून. तो तर न्हाईचेय परतलेला घरी नि असंख्य झाले गहाळ रस्त्यावरच ज्यांची गिनतीच झालेली नाही अजून.

म्हटलं तर हे एक सार्वजनिक दृश्यय कवितेत दाखल झालेलं कधीपासून नकळत नि डोळ्यातलं पाणीही गेलंय उडून. कोरडाठाक पडलाय वजूद माणसाचा.

या दृश्यांच्या पाठोपाठ आता या क्षणाला आलेलंय अकस्मात एक करुण दृश्य. ते घडवलं जातंय यंत्रवत अंधारात. म्हणजे घडतंय काही तरी अघटित या लपवून घडणाऱ्या दृश्यात. ज्यात  रचलं जातंय एक सरण, पेटवली जातेय एक चिता. म्हणजे या अगोदरच्या दृश्यात आलेला दिसतोय ना एक जमाव रक्षकांचा तो शिरलाय दबकत चोरपावलांनी झोपलेल्या गावाच्या दृश्यात नि त्यानेच पेटवलीये चूड.  नि पेटलेलाय जाळ निर्मम. त्याच्या काही मिन्टं अगोदरच्या दृश्यात आक्रोशय थिटा. बडवला जातोय ऊर तो दूर केला गेलाय खरं तर दृश्यातून. म्हणजे बंदिस्तच केले गेलेत आवाज तडफेनं.

म्हणजे जो आलाय ना एक मोठा जमाव रक्षकांचा राखीव मागच्या दृश्यातून, तो तर नव्हताच ना आला धावून काही अघटित घडलेल्या  दृश्यात तेव्हा. म्हणजे पोहोचलीच नव्हती ना एक आर्त किंकाळी. पंख छाटताना उमटलेली त्यांच्यापर्यंत. कसा काय राहिला गाफील एक स्वप्न विखंडित होताना नि आता का येतोय इतक्या तडफेनं. तमा न बाळगता कशाचीच?

म्हणजे हा तोच जमावये का रक्षकांचा,  जो येतोय दबकत थिजल्या डोळ्यांनी. म्हणजे जो येतोय ना हजारो वर्षांपासून, दाखल होतोय वर्तमानात नि टाकतो निस्तरून सगळं सगळं नि जातो परतून गारद्यासारखा! नि हा जो काय जाळ दिसतोय ना पेटलेला मध्यरात्री, धुमसणारा सरणावर तो आताचा नाहीये. पुरातन आहे खांडववनातून आणलेला मुठीत भरून, या वर्तमानातल्या दृश्यात. जो खरं तर विझलाच नव्हता कधी किंवा शमलीच नव्हती त्याची तृष्णा, भूक आसुरी.

म्हणजे हा तसा परंपरागत जाळ कुठाय? जो अस्तो सरणावर पेटवलेला, मुखाग्नी अस्तो तो.  साश्रुडोळ्यांनी निरोप देताना दिलेला निसर्गनियम म्हणून नि शोकाकुल झालेलं असतं गाव या दृश्यात. दर्वळत राहातं दु:ख जिथे म्हणजे सगळ्या गावालाच पडलंय सुतक. सगळेचेय आप्त एकमेकांचे. नाहीये कोणताच भेद धर्म-जाती-वंशाचा. कुणीच नाहीये कनिष्ठ-उच्च.

तसे तर काहीच घडत नाहीये या दृश्यात. पाळला जात नाहीये कोणताच रीतिरिवाज. घडतं ते अनाकलनीये सगळ्यांसाठीच. मृत्यू झालाय कुणाचा तरी इतकंच शाश्वतंय या दृश्यात. म्हणजे सगळंच पायदळी तुडवून कशाचा रचला जातोय हा बनाव?

म्हणजे जरी तो असेल ना झालेला मृत्यू अकस्मात कुण्या यत्किंचिताचा. तरी ती घटनाये ना क्रूर. ज्याच्यानं पेटून उठणारेय जाळ, असंख्य डोळ्यांत, बांधली जाणारेय वज्रमूठ नि हादरणारेय तिन्ही लोक. डळमळणारेय सिंहासन इंद्राचं. तर घेतली जाणारच ना प्रिकॉशन, की उच्चारला जाणार ‘ब्र’, त्याआधीच नष्ट झाले पाहिजेत आवाज कायमचे. निरस्त झाला पाहिजे वजूद प्रलंयकारी नि हा तर हक्कचेय ना राजाचा, की ठेवायची असेल सत्ता निरंकुश तर चिरडून टाकले पाहिजे नि विझवला पाहिजे अग्नी प्रदीप्त होणारा डोळ्यात.

म्हणजे हे जे काय घडतंय ना कवितेबाहेरच्या दृश्यात. राजरोस. ते तर कपटंय. कारस्थानंय रचलेलं, असं कितीही म्हटलं ओरडून तरी काय फरक पडणारेय या पाशवी सत्तेला? म्हणजे मृत्यूच तर झालाय ना, तोही एका यत्किंचिताचा. ज्याची नव्हतीच कोणती ओळख नि हेचंय ना वास्तव तर कसं सहन करता येणारेय आताही, की दर्वळत राहावं त्यानं त्यांच्या भूमीत नि म्हणावीत उजेडाची गाणी. नि ठेवावी ओल स्वप्नांसाठी डोळ्यात. राहावं खुशनूमाँ. म्हणजे ही तर हिमाकतच आहे ना केलेली शंबूकाच्या वारसांनी या परमपवित्र भूमीत रामाच्या?

म्हणजे ही जी काय पानंफुलं असतात ना कोवळी गावकुसाबाहेर वाढलेली, तगलेली वाऱ्यावर, ती तर मिलकीयतच असते ना इथल्या भूमिपुत्रांची परंपरागत.

म्हटलं तर हक्कच अस्तो ना त्यांचा, की घ्यावा वाटलं तेव्हा उपभोग. घ्यावं ओरबाडून, तोडावं झाडावरून, टाकावं कुस्करून नि तुडवलं पायदळी , तर कशाचाये गहजब? म्हणजे केलीच आगळीक चुकूनमाकून एखाद्या भूमिपुत्रानं. तालेवार म्हणून उच्चारावा ‘ब्र’!  ठेवावी न्यायाची अपेक्षा!  गृहीत धरावा समतेचा हक्क! तर कसं शक्यय सगळ्या विश्वात डंका वाजवू पाहणाऱ्या स्वयंभू रामराज्याच्या न्यायव्यवस्थेत?

म्हणून तर येतायेत ना ताफे रक्षकांचे या अंधाऱ्या दृश्यात?

म्हणजे फर्मानचेय काढलेले की नष्ट करून टाकायचाये यत्किंचित देह, व्यवस्थेला बोल लावू पाहणारा. कट रचणारा सत्तेच्या विरोधात नि असं तरी कुठे लिहिलेय संहितेत मनूच्या, की झाला एखाद्या यत्किंचिताचा मृत्यू नैसर्गिक किंवा घातपातानं तर त्याला दिला जावा मुखाग्नी परंपरा पाळून? नि हवेतच कशाला आप्त-स्वकीय, बाप, भाऊ . म्हणजे खरं तर हा उद्धारच नाहीये का, की कुण्या यत्किंचितासाठी धावून आलेयेत रक्षक राजाचे नि सगळे नीती-नियम पायदळी तुडवून शिरलेयेत एका अनोळखी गावाच्या दृश्यात सगळ्यांची नजर चुकवून. नि केलीये सगळी जमवाजमव स्वखर्चानं, आप्तस्वकीय नसताना,  ही कृती म्हटलं तर औदार्य दर्शवणारीचेय ना रक्षकांची वर्तमानातली?

प्रश्न इतकाचेय उरलेला या दृश्यात की कुणी दिलाय चितेला अग्नी? म्हणजे हा हात आहे तरी कुणाचा? नि का थरथरतोय त्याचा हात या दृश्यात? म्हणजे तो हादरलाय का आतून नि लाज वाटतेय स्वत:ची, की गदगदतंय त्याचं तुंदिल शरीर, खिदळतंय विकट  हास्यानं विजयी?

म्हणजे हे कोणतंय दृश्य वर्तमानातलंकवितेत दाखल होऊन नासूर झालेलं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:21 am

Web Title: sad fact of life dd70
Next Stories
1 विकृत पौरुष आणि दांभिक समाज
2 जीवन विज्ञान : शरीराची लढवय्यी सेना!
3 यत्र तत्र सर्वत्र : इतिहासकार स्त्रिया
Just Now!
X