घरातील वृद्ध मंडळी जोपर्यंत स्वत:चं स्वत: करू शकतात तोपर्यंत काळजी नसते, पण जेव्हा ते परावलंबी होतात तेव्हा घरातल्या इतरांना आपल्या दैनंदिनीत बदल करावा लागतो, काही तडजोडी कराव्या लागतात. कुठे बाहेरगावी जायचं असल्यास त्यांना कुठे ठेवावं असा प्रश्न उभा रहातो. अशा वेळी काही दिवस, एखादा महिना त्यांच्या देखभालीची व्यवस्था इतरत्र झाली, तर घरच्यांना दिलासा मिळू शकतो. अशीच काही दिवसांसाठी त्यांची व्यवस्था करणाऱ्या ‘कंपॅनिअन हेल्थ केअर फाऊंडेशन’विषयी..
 आजी-आजोबांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणाऱ्या अशा संस्थांविषयी, व्यवस्थांविषयी दर पंधरवडय़ाने..
एका रुग्णाचं तीन खोल्यांचं छोटं घर. घरात आजोबा, मुलगा, सून आणि त्यांची बारावीतली मुलगी. मुलगी दहावीला मेरिटला आलेली. बारावीला उत्तम गुण मिळवून मेडिकलला जायचं हे तिचं स्वप्न! आजोबा वयस्क! त्यांच्या व्याधीमुळे ते सतत रात्रीबेरात्री टॉयलेटला जायचे. टॉयलेट बेडरूमसमोर असल्याने त्या मुलीचं लक्ष विचलित होई. ती अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकली नाही. त्याचा तिच्या मार्कावर परिणाम झाला. मेडिकलऐवजी तिला फार्मसीकडे वळावं लागलं. याचं सर्वात जास्त अपराधीपण आजोबांना वाटू लागलं आणि ते आजारी पडले.
अशी कुचंबणा सहन करणारे वृद्ध ना हॉटेलमध्ये मुक्कामाला जाऊ शकत, ना त्यांना काही काळापुरता का होईना नातलगांकडे मुक्काम करता येत. सद्यस्थितीत पती-पत्नी दोघेही व्यवसायानिमित्त सकाळीच घराबाहेर पडतात ते रात्री उशिरा घरी परततात. अशा वेळी मनात असलं तरी जवळच्या आप्तांची जबाबदारी घेणं अवघड होऊन बसतं. पूर्वीच्या काळी ज्येष्ठांना नातलगांकडे अगत्याने बोलावलं जाई. तीर्थयात्रेला नेलं जाई. त्यानिमित्ताने त्यांना रोजच्या रुटीन आयुष्यात थोडा बदल, विरंगुळा मिळे. ज्येष्ठांना असा बदल मिळावा, हीच ‘कंपेनिअन हेल्थ केअर फाऊंडेशन’च्या स्थापनेमागची डॉ. सुहेल लंबाते यांची संकल्पना. त्यातून या फाऊंडेशनचा जन्म झाला. गेली वीस र्वष ते कळवा इथे प्रॅक्टिस करतात. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध! त्यांच्या संवेदनशील मनाने रुग्णांच्या घरातील ज्येष्ठांच्या समस्या टिपल्या आणि त्यावर ते विचार करू लागले. अर्थात डॉक्टरांनी ज्येष्ठांबरोबरच त्यांच्या आप्तांचाही विचार केला. एखाद्या कुटुंबाला पंधरा-वीस दिवसांसाठी बाहेरगावी जायचं असेल तर घरातल्या वृद्ध व्यक्तीला कुठे ठेवायचं हा यक्षप्रश्न असतो. नोकरचाकरांवर सोपवून जाताना धाकधूक वाटते. त्यासाठी पर्यायी व्यवस्था हवी. अनेकदा मुलं परगावी, परदेशी असतात. वृद्ध इथे एकटे राहात असतात. हल्ली अविवाहित, घटस्फोटित, विधुर, विधवा स्त्री-पुरुषांनाही स्वतंत्र राहाणेच पसंत असते. अशा एकटय़ा ज्येष्ठांसाठी किमान तात्पुरती निवास व्यवस्था असावी. हाच यामागचा उद्देश.
 ‘‘हा विचार प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी ज्येष्ठांच्या अनेक संस्थांना मुद्दाम भेटी दिल्या. त्यातून मला दोन गोष्टी जाणवल्या. एक तर आपली संस्था कधीही वृद्धाश्रम होऊ नये. ती ज्येष्ठांची गरजेपुरती सोय करणारीच संस्था असावी. तसेच तिथे स्वच्छतेला आणि सेवेला प्राधान्य असावं. त्यासाठी कर्मचाऱ्यांना पुरेसं आणि वेळेवर वेतन देणं गरजेचं आहे. त्यामुळे आमची संस्था आजही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालते.’’ डॉ. सुहेल लंबाते या फाऊंडेशनमागचा विचार सांगतात.
मुळात हे आरोग्यधाम आहे. हा वृद्धाश्रम नाही, कारण अनेकदा वृद्धाश्रमात ज्येष्ठांना कायमस्वरूपी ठेवलं जातं. जमलंच तर मुलं त्यांना भेटायला जातात, नाही तर जातही नाहीत. हा अनेक वृद्धाश्रमांचा कटू असला तरी सत्य अनुभव आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी डॉक्टर नातलगांच्या राहत्या घराचं अ‍ॅड्रेस प्रूफ, पॅन कार्ड घेतात. त्याच्या पत्त्याची खातरजमा करतात. नंतरच ज्येष्ठांना प्रवेश दिला जातो. ‘‘सुदैवाने आजवर अशी फसवणुकीची एकही घटना घडलेली नाही.’’ डॉ. लंबाते सांगतात,  ‘‘ज्येष्ठांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करायचं नक्की केलं आणि जागेचा शोध सुरू झाला. एका मजल्यावरचे किमान दोन ते तीन प्लॅटस् हवे होते. मुंबईसारख्या शहरांत जागांचे भाव तर गगनाला भिडलेले. लोकांनी देणग्या देण्याचं कबूल केलं, पण आयत्या वेळी हात आखडते घेतले. खूप दिवसांनी जॉर्ज चॉकोची ही जागा दृष्टीस पडली. जागा हवेशीर. इमारतीला लिफ्ट, वॉचमन आणि सीसीटीव्हीची व्यवस्था! इमारत रस्त्याला लागून असली तरी वातावरण शांत. ज्येष्ठांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम! सुदैवाने मालकांनी वाजवी भाडय़ात पहिल्या मजल्यावरचे तीन फ्लॅटस् संस्थेला दिले आणि ‘कंपॅनिअन हेल्थ केअर फाऊंडेशन’च रीतसर स्थापना झाली.
‘हेल्थ केअर’ची उत्साहात स्थापना झाली. डॉक्टर, त्यांचा स्टाफ तिथे येऊन बसू लागले. जागेची रंगरंगोटी झाली. सेंटर सुरू झालं. चार महिने उलटले तरी कोणीही तिथे फिरकलं नाही. वीज, पाणी, स्टाफचा पगार खर्च चालूच होता. डॉक्टरांचे स्नेही रुग्ण भेट द्यायचे सेंटरला! रोजचा प्रश्न- आज काय प्रगती? स्टाफचा नकार. ते डॉक्टरांना धीर द्यायचे. ‘डॉक्टर, काळजी करू नका. पुढे बेडस् कमी पडतील.’ प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य! हीच सकारात्मक सदिच्छा! आणि एक दिवस ८५ वर्षांच्या कुलकर्णी आजी इथे राहायला आल्या. तो दिवस डॉक्टर, त्यांचा स्टाफ आणि सुहृद अतिशय आनंदाचा होता.
 आज हे हेल्थ सेंटर वृद्धांनी गजबजलेलं आहे. महिना तत्त्वावर राहाणारे ज्येष्ठ जर हिंडतेफिरते असतील तर रुपये बारा हजार मोजतात. ज्यांची अंथरुणावर सर्व सेवा करावी लागते. त्यांना रुपये पंधरा हजार मोजावे लागतात. अशा रुग्णांसाठी डिपॉझिट वीस हजार आहे, तर मोजक्या दिवसांसाठी वास्तव्यास येणाऱ्या ज्येष्ठांना दर दिवशी ५०० रुपये द्यावे लागतात. यामध्ये चहा, नाश्ता, जेवणाचा व रुग्णसेवेचा समावेश असतो.
 दररोज सकाळी डॉक्टर न चुकता वैद्यकीय तपासणी करतात. डॉ. लंबातेच्या  ‘शुभ प्रभात’ने ज्येष्ठांचा दिवस सुरू होतो. एकदा एका आजोबांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी स्वत:च्या ओळखीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्ण लवकर बरा झाला. बरेच वेळा हॉस्पिटलमधून नुकत्याच डिसचार्ज मिळालेल्या रुग्णांची काळजी घेणारं घरी कोणी नसतं त्यांचं पथ्यपाणी, वेळेवर औषध देणं यामुळे इथे त्यांच्या तब्येतीला लवकर आराम पडतो. इथे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा स्पर्धा असलेल्यांना पथ्याचं जेवण दिलं जातं. एक आजी त्यावरून पहिल्या दिवशी खूप भांडल्या. तुम्ही फार शहाणे आहात, असंही डॉक्टरांना सुनावलं, पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं इथे आपली डाळ शिजणार नाही. आता त्या आनंदाने जेवतात. एका आजोबांचं हिप बोन फॅ्रक्चर होतं. त्यांना उठताबसताना त्रास व्हायचा. घरी टॉयलेटला लागलं की सुरुवातीला घरची माणसं तत्परतेनं ओ द्यायची. पुढे ते दुर्लक्ष करायला लागल्यावर आजोबांची चिडचिड होऊ लागली. घरातलं वातावरण बिघडलं. त्यामुळे तब्येत सुधारण्याऐवजी बिघडू लागली. अशा वेळी ते इथल्या ‘आरोग्यधाम’मध्ये आले. इथले कर्मचारी उत्तम प्रशिक्षित आहेत. त्यांच्या काळजी घेण्याने आजोबा लवकर ठीक झाले. अशा वेळी घरची मंडळी डॉक्टरांना आणि स्टाफला मनापासून धन्यवाद देतात. अनेकदा डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफची संयमाची परीक्षाच असते. एक आजोबा ‘शी सू’ एकाच वेळी करायचे. एकदा तर त्यांनी डायपर फाडले. शी संपूर्ण भिंतीला फासली. अशा अवघड प्रसंगांमध्ये स्टाफला अत्यंत संयमाने हाताळण्याची तारेवरची कसरत करावी लागते. इथे एक आजी स्मृतिभ्रंशाच्या विकाराने ग्रस्त आहेत. त्या दर वेळी मला चहा मिळाला नाही, कोणी जेवण दिलं नाही, अशा तक्रारी करतात. एका आजोबांचा सतत जीव घाबरा होतो. ते वेळीअवेळी डॉक्टरांना बोलवून घेतात. इथे आल्यावर कळतं, की त्यांना फक्त गॅसेसचा त्रास झालाय; पण डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ हे सर्व सहजगत्या स्वीकारतात, कारण मुळात सगळ्यांनीच हे कार्य स्वेच्छेने स्वीकारलं आहे. डॉक्टरांचे पेशंट्स व हितचिंतक त्यांच्यासाठी स्वखुषीने इथे येतात, वृद्धांची देखभाल करतात. एक कर्करोगपीडित महिला तर इथल्या कामाने इतकी प्रभावित झाली की, तिने इथे विनामूल्य सेवा देण्याची तयारी दाखवली. इथे एक पंचाऐंशी वर्षांच्या आजी आहेत. पंधरा दिवसांसाठी त्याचा मुलगा आणि सून बाहेरगावी गेले आहेत. त्यांना म्हटलं, ‘इथे तुम्हाला खाणपिणं व्यवस्थित मिळतं का? तुमची नीट काळजी घेतली जाते का?’ त्यावर आजी चटकन म्हणाल्या, ‘सगळं छान आहे हो. इथे राहायला आवडतं मला, पण सुनेची आठवण येते ना! ती कधी भेटणार मला?’’
  एकूण इथे काही काळापुरतं वास्तव्य असलं तरी ज्येष्ठांना घरच्या मंडळींची आठवण येतेच. मिसेस सिंहासनेंचे वडील पंचाण्णव वर्षांचे! त्यांना चार दिवस बाहेरगावी जायचं होतं. वडील राहिले. निघताना लेकीने विचारलं, ‘कसं वाटलं इथे?’ ‘सगळं चांगलं होतं गं! पण कैदेत डांबल्यासारखं वाटलं ना!’ लेकीच्या लक्षात आलं. आजोबा रोज बाजारात जातात. घराजवळच्या कट्टय़ावर मित्रमंडळींत गप्पाष्टकं झोडतात! ते सगळं मिळालं नाही म्हणून ते बिथरले, पण ‘‘मी नसताना मला त्यांना सेफ झोनमध्ये ठेवायचं होतं. तो हेतू साध्य झाला.’’ मिसेस सिंहासने म्हणतात.
हा ‘सेफ झोन’ ज्येष्ठांना मिळवून देणारे आणि त्यांच्या आप्तांना निश्चिंत करणाऱ्या डॉक्टर लंबातेंना या कार्यातून काय मिळतं, असं विचारलं, तर ते हसत म्हणतात, ‘ज्येष्ठांचे सकाळच्या प्रहरी मिळणारे आशीर्वाद आणि त्यांची ‘गुड मॉर्निग’ करतानाची हातमिळवणी मला दिवसभर चार्जर्ड ठेवते.’    
चौकट –
आम्हाला कळवा तुमच्या परिसरात असलेल्या अशा संस्थेविषयी जे वृद्धांसाठी काम करतात, वेगळ्या योजना राबतात, त्यांना आनंदी करण्यासाठी झटतात.
ज्येष्ठ नागरिक अर्थात आमचे समस्त आजी-आजोबा! तुमच्यासाठी हे खास पान. तुम्हाला आवडेल, जपून ठेवावंसं वाटेल असं. तुमचं डाएट, तुमचा व्यायाम, इतकंच नव्हे तर तुमच्यासाठी महत्त्वाचे कायदे, तुमच्या गरजेच्या सरकारी योजना, बँकांच्या स्कीम्स, एनजीओ प्रकल्प, इतकंच नाही तर आम्ही तुम्हाला संगणक वापरायलाही शिकवणार आहोत. आणि खास वाचकांचा मजकूर- नवीन काय शिकलात-  ‘आनंदाची निवृत्ती’. याशिवाय आजी-आजोबांच्या स्फूर्तिदायक कथा, ‘वयाला वळसा’ या सदरातून. तेव्हा आजी-आजोबा, सब कुछ तुमच्यासाठी! वाचनाचा भरपूर आनंद घ्या. आणि लिहा आणि प्रसिद्ध झाल्याचा आनंदही अनुभवा. दर शनिवारी, विविध सदरांसह.