28 February 2021

News Flash

आपल्या असण्याचा काळ येईल..

अनुराधा पाटील, मराठी कवितेच्या वाटेवरचं एक ठसठशीत नाव.

अनुराधा पाटील

अनुराधा पाटील, मराठी कवितेच्या वाटेवरचं एक ठसठशीत नाव. स्त्रीच्या देहमनातला कोलाहल, साध्यासुध्या माणसांचे संघर्ष आणि जन्म-मृत्यूवरही आशयघन भाष्य करणारी संपन्न भावकविता त्या लिहीत आल्या आहेत.  त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा २०१९ साठीचा मराठी भाषेतला पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची मैत्रीण आणि कवितेच्या वाटेवरच्या सहप्रवासी कथाकार-कवयित्री  नीरजा  यांनी त्यांना जुन्या-नव्या पिढीच्या साहित्यासह समाज, संस्कृती या विषयांवर बोलतं करत साधलेला हा संवाद..

नीरजा : या वर्षीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तुझ्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला मिळाला, त्याबद्दल प्रथम तुझं मनापासून अभिनंदन. मला वाटतं, मराठीत इंदिरा संत यांच्यानंतर कवयित्रीला मिळालेला हा दुसरा पुरस्कार असावा.

अनुराधा पाटील : धन्यवाद नीरजा! मराठीत आतापर्यंत सहा स्त्रियांना हे पुरस्कार मिळालेत. त्यातला सातवा मला मिळाला असून कवितेला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. इंदिरा संत यांना तो पहिल्यांदा मिळाला.

नीरजा : म्हणजे इंदिरा संतांनंतर अनेक कवयित्री लिहीत होत्या आणि अजूनही लिहीत आहेत. तरीही कवयित्रींना दाद मिळायला एवढा काळ गेला. त्याबद्दल बोलच, पण आधी सांग, की कसं वाटलं तुला हा पुरस्कार मिळाल्यानंतर?

अनुराधा पाटील : खरं सांगू का, थोडं संभ्रमाचं आहे याचं उत्तर. कुणालाही होतो तसा मलाही आनंद झालाच अर्थात. पण थोडीशी मी संभ्रमातही होते. म्हणजे अकादमीचे हे जे पुरस्कार आहेत, आत्तापर्यंतचे, ते स्त्रियांना मिळण्याची संख्या इतकी कमी आहे. मुद्दाम असेल, असं नाही म्हणणार, पण थोडंसं सगळीकडं स्त्रियांचं लिखाण किंवा बाकीच्या गोष्टींकडं जसं दुर्लक्ष होतं, तसं इथंही होत असेल. पण इंदिराबाईंनंतर हा पुरस्कार मिळाला, याचा मला स्वाभाविकपणे आनंद झाला.

नीरजा : एकीकडे आपण जात,धर्म, लिंग यावर आधारित समानता मानतो आहोत. मग हे असं का झालं असावं?

अनुराधा पाटील : मला  वाटतं, वस्तुस्थिती काय आहे ते बघितलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं पाहिजे, असं नाही. पण स्त्रिया भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत, आणि वेगवेगळ्या विषयांवर अधिक चांगलं व्यक्त होत आहेत, तरी ही परिस्थिती आहे. साधारणपणे, स्त्रियांकडे, त्यांच्या लिखाणाकडे, एक प्रकारची दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. म्हणजे आपण पाच-पन्नास वर्षांतली गंभीरपणे केलेली किंवा प्रसंगोपात केलेली समीक्षा पाहिली, तर आपल्या लक्षात येईल, की त्यात स्त्रियांना फारसं स्थान नसतं. म्हणजे लिहिणाऱ्या लेखिका-कवयित्रींना.  या पाच-पन्नास वर्षांत कुणी चांगलं लिहिलंच नाही, असं तर नाही.. म्हणजे दुर्लक्ष होतंय, एवढं मात्र खरं.

नीरजा : ज्या काळामध्ये तू लिहायला लागलीस, सत्तरीच्या दशकामध्ये, त्या काळामध्ये अनियतकालिकांची चळवळ जोरात होती. तेव्हा एकूण कवितेचं वातावरण कसं होतं? त्याच्यात स्त्रीचं आणि स्त्रियांच्या कवितेचं नेमकं काय स्थान होतं? आणि तुझ्या लेखनावर त्याचे काही परिणाम होत होते का?

अनुराधा पाटील : मी लिहायला लागले, त्या काळात अनियतकालिकाची चळवळ काही पुरेशी माहीत नव्हती. पण नंतर मी माहिती घेतली. पण त्यातही स्त्रीचं स्थान नगण्य किंवा जवळजवळ नसावंच. का नसेल? तर  चळवळ पुढं नेणाऱ्यालाच ते माहीत असेल कदाचित. पण त्या काळातसुद्धा स्त्रीवादी भूमिकेचा नव्याने उगम होऊनही हे वास्तव होतं. माझ्याआधी प्रभा गणोरकर आणि रजनी परुळेकर लिहीत होत्या. मला समकालीन असलेल्या अरुणा ढेरे आणि मलिका अमरशेख लिहीत होत्या. आमच्यात स्त्रीवादी आणि महानगरी कविता, त्यातल्या प्रश्नांसकट, पहिल्यांदा मलिकाने मांडली. माझ्या लिखाणात ते तसं आलं नाही. अरुणाच्या कवितेत पण ते नव्हतं. आणि माझ्या काळात ज्या कवयित्री लिहीत होत्या, त्यांच्या कवितांमध्येसुद्धा स्त्रीविषयक भान या पद्धतीचं म्हणजे, अगदी वैचारिक पातळीवरचं नव्हतं. सर्वसामान्यपणे स्त्रीपुरुषांच्या नात्यामध्ये जे असतं, म्हणजे त्यातली माघार, त्यातले पराभव, त्यातले अपेक्षाभंग, हे सारं पारंपरिक पद्धतीनंच येत होतं. तरीसुद्धा घरातली आणि नात्यातली घुसमट त्यांच्या आवाक्यानुसार त्या मांडत होत्या. त्याला स्त्रीवादाची पार्श्वभूमी नव्हती. मी लिहिलं तेव्हा माझ्याकडे हे नव्हतं, वयाच्या १७-१८ व्या वर्षी मी कविता लिहायला लागले. मी जिथून आले त्या पार्श्वभूमीमुळे असेल, स्त्रीवाद, त्यातले बदल किंवा त्यातली चळवळ, यातलं खरोखर मला काही माहीत नव्हतं. म्हणजे ज्या वयात एक भान परिपक्व  व्हायला पाहिजे ते त्या वयात नव्हतं. माझी सुरुवातीची जी कविता आहे, म्हणजे बाईवर असेलच, पण ती साधारण प्रेमाची किंवा तत्सम नात्याची, अशीच आहे.

नीरजा : पण तुझ्या जगण्याची आहे ती, असं वाटतं मला..

अनुराधा पाटील : ती तशी होतीच. पण या नात्यांतून बाहेर पडून कवितेकडे पाहायला मला थोडासा वेळ लागला. म्हणजे ‘बाई’कडे वगैरे..मला विचारण्यातही येतं अनेकदा की तुम्ही असं का म्हणता की तुम्ही स्त्रीवादी नाही? तर मी म्हणते, की ज्या लिंगभेदाच्या अनुषंगाने आपण स्त्रीवाद गृहीत धरतो किंवा बाकीची असमानता गृहीत धरतो, त्या अंगाने मी लिहिलं नाही. त्याला कारण माझी पार्श्वभूमी आहे. मी खेडय़ातून आल्यामुळं एक प्रकारे थोडीशी सहमतीची, किंवा सहजपणे स्वीकारण्याची जी सवय लागते, त्यातून मला इकडं वळायला थोडा वेळ झाला. पण, मी आजही स्त्रियांबद्दलच्या जाणिवांची कविता लिहिते. माझ्या कवितेत वावरणाऱ्या बहुसंख्य बायका, चेहरा नसलेल्या, न बोलणाऱ्या आणि ज्यांना स्वत:बद्दल काही सांगता येत नाही, म्हणजे ज्या नुसत्या जगून हळूहळू संपून जातात त्यांच्याबद्दल मी जास्त लिहिते. म्हणून मी त्याला ‘स्त्रीवादी’ असं नाही म्हणत.

नीरजा : तुझ्या एका कवितेत तू असं लिहिलंस, की ‘आपल्यासाठी एवढंच जग, दुसरं चांगलं कुठून आणणार?’ तुझी ती एक ओळच बाईच्या जगण्यातली सगळी हताशा व्यक्त करते.

अनुराधा पाटील : नाहीच आहे त्यांच्याकडे दुसरं जग मग आणायचं कुठून? हे त्यांना कळतं, पण ते दुरुस्त करायचं किंवा बदलायचं आहे, आणि त्या बदलासाठी काय करायचं आहे, हे त्यांना कळत नाही.

नीरजा :  त्यांना नसलं तरी तुला ते कळतं. म्हणूनच मला तुझ्या कवितेमध्ये हताशा जरी दिसत असली, तरी एक आशेचा किरणही दिसतो. तू तुझ्याच एका कवितेत म्हटलं आहेस की ‘पुन्हा आपल्या असण्याचा काळ येईल. पुन्हा भन्नाट वाहतील वारे.’ हा ‘असण्याचा काळ येण्याची’ जी आशा आहे ना, ती टिकवून ठेवतेय स्त्रियांना.

मला आठवतं अनुराधा, १९९१ मध्ये रत्नागिरीला जे ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ झालं होतं, त्यात आपण दोघीजणी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. आधी भेटायचो ते कवितेतून! निमंत्रितांच्या कविसंमेलनात आपण सहभागी होतो. अरुणानं (ढेरे) तुझ्याशी माझी ओळख करून दिली. पहिल्यांदाच भेटूनही जुन्या मत्रिणीला भेटण्याचा आनंद साजरा केला होता आपण. हे नातं मला खूप महत्त्वाचं वाटतं, आपल्या सगळ्याच कवयित्रींमधलं. जेव्हा आपण जुन्या कवयित्रींची उदाहरणं देतो, इंदिराबाई संत, संजीवनी मराठे, शांताबाई शेळके किंवा सरोजिनी बाबर असतील, या लोकांचं जे नातं होतं, तेच कुठे तरी आज लिहिणाऱ्या सगळ्याच कवयित्रींनीही जपलंय..

अनुराधा पाटील : तुला भेटले तेव्हा तू लहानच होतीस खूप. पण तो जो धागा आहे तो इतकी वर्षे उलटलीत तरी जसाच्या तसा अजून आपल्या मनात आहे. रजनी परुळेकर, प्रभा गणोरकर, मलिका अमरशेख, अरुणा ढेरे,

प्रज्ञा पवार, तू आपण साऱ्याच वेगवेगळ्या वयाच्या आहोत. पण वयाचं अंतर ओलांडून, व्यक्ती म्हणून आणि कवयित्री म्हणून जोडणारा जो धागा असतो, बाईला बाई म्हणून जोडणारा तो महत्त्वाचा असतोच, पण या कवितेचा धागा असा आहे, की आपोआपच आपण एकमेकांशी जोडले जातो. मग त्यात थोडे फार विचारांचे मतभेद असतील आणि ते असणारच.

नीरजा : अर्थात! पण मला वाटतं, आपली सगळ्यांची कविता वेगवेगळ्या पद्धतींने वेगवेगळी आहे. पण तरीही, त्यात जे एक मुख्य सूत्र आहे ते स्त्रीच्या जगण्याशी जोडलेलं आहे, कदाचित, म्हणूनच स्त्रिया अशा एकत्र येऊनही, एक अतूट नातं किंवा वेगळा भाव निर्माण होतो त्यांच्यामध्ये, तो मला वाटतं, पुरुषांमध्ये असेलही, पण तो वेगळ्या पद्धतीचा असेल. आपल्यातलं एक जैविक नातं जे आहे ना..ते महत्त्वाचं वाटतं मला.

अनुराधा पाटील : पुरुष जेव्हा असं म्हणतात, म्हणजे लिखाणाशी संबंधित असलेले आणि नसलेलेसुद्धा, की बायकांमध्ये मत्सर जास्त असतो, त्या एकमेकींचा हेवादावा करतात, पण पुरुषही तसेच असतात. ते काही अपवाद आहेत असं नाही. म्हणजे ‘इमेज’ निर्माण करण्यात ते आघाडीवर असतील थोडे आपल्यापेक्षा, की आम्ही कसे नाही असे, पण ते असतात. आणि याचा अनुभव, पुरुषांशी जेव्हा संबंध येतात, मत्री, ओळख होते तेव्हा लक्षात येतं, की हे जी प्रतिमा निर्माण करून आपल्यासमोर उभे आहेत, ती तशी नाहीये. अर्थात त्याचं आपण काही करू शकत नाही.

नीरजा : मी पंचवीसएक वर्षांपूर्वी औरंगाबादला कविसंमेलनासाठी आले होते. त्यावेळी नव्या पुस्तकाची तुझी तयारी चालली होती. मला वाटतं, ‘दिवसेंदिवस’ हा तो संग्रह. त्या संग्रहातील कवितांमागे अनेक आठवणी होत्या. त्याविषयी तू बोलली होतीस माझ्याशी. त्यावर तुला बोलायला आवडेल का आणि एकूणच तुझ्या ‘दिगंत’पासूनच्या काव्यप्रवासाबद्दल?

अनुराधा पाटील : ‘दिगंत’मधल्या ज्या कविता आहेत त्या पाच-सात वर्षांच्या काळातल्या. तेव्हा सगळ्यांसारखीच मी नवोदित होते. याच्या त्याच्या प्रभावाखालच्या, म्हणजे आपण सतरा-अठरा-विशीच्या वयात जसे प्रभावित होतो, तशा पद्धतीच्या कविता होत्या. मग नंतर मला जे थोडंसं भान आलं, विशेषत: भाषिक, त्यानंतर मी जे लिहिलं, तो होता ‘तरीही’.

‘तरीही’च्या काळात कवितांत बदल झालेला आहे, ‘दिवसेंदिवस’च्या काळात असं झालं, की ‘तरीही’चा जो धागा मनात होता तो एकदम तुटला गेला. माझा मुलगा गेल्यामुळं, माझ्या सगळ्या जाणिवा आणि सगळ्या गोष्टी यांत इतकी उलथापालथ झाली की ‘दिवसेंदिवस’मधल्या कविता या सगळ्या जन्म-मृत्यूशी, त्यातल्या जाणिवांशी, आणि मानवी जगण्यातली अगतिकता, माणसाच्या हातात काही नसण्याची भावना, याच्याभोवती फिरत राहिल्या. त्यामुळं झालं असं, की ‘तरीही’ची जी थोडीशी वेगळी शैली होती, ती पूर्ण बदलून लिखाणातला आशय, भावना, व्यक्त होण्याची भाषा हळूहळू बदलत गेली, आणि ‘दिवसेंदिवस’मध्ये ती अधिक तीव्र, अधिक सरळ आणि धारदार झाली. आजही मला ‘दिवसेंदिवस’ वाचताना जाणवतं, की कविता ही भाषिक कृती आहे, असं आपण गृहीत धरलं, तर कुणीही लिहिणारा, तू, मी किंवा कुणीही असेल, त्याला भाषेचं जे भान यावं लागतं, ते मला आलं. कारण बाकीच्या सगळ्या जाणिवा, भावना, म्हणजे राग, लोभ, द्वेष, जगण्याशी निगडित पद्धती, या सगळ्या दीर्घकाळापासून, हजारो वर्षांपासून त्याच आहेत, त्यातले वेगवेगळे घटक बदलून गेल्यामुळे त्यातल्या धारणा आणि काही गरजा बदलल्या. पण ज्याला आपण मूलभूत म्हणू त्या तशाच असल्यामुळं, आणि त्या सगळ्यांनीच मांडायच्या असतील, आपापल्या पद्धतीने, तर तुम्हाला तुमची भाषा घडवावी लागते. ते मग मी माझ्या पद्धतीनं हळूहळू केलं. कारण कवितेची पहिली ओळख भाषेनंच होते, असं मला वाटतं. ते मी करू शकते का, करू शकले का, हे तर वाचक आणि तुझ्यासारखे लोकच सांगू शकतील.

नीरजा : ते केलं आहेसच तू. कारण मला वाटतं तुझा ‘तरीही’, ‘दिगंत’पासून ‘कदाचित अजूनही’ या संग्रहापर्यंत झालेला हा सगळा प्रवास आहे ना, तो व्यक्तिनिष्ठ कवितेकडून आत्मनिष्ठ होण्याचा किंवा ‘स्व’कडून ‘सार्वत्रिकाकडे’ जाण्याचा जो प्रवास असतो त्या प्रकारचा आहे.

अनुराधा पाटील : मला वाटतं, की आपण व्यक्तीकडून समूहाकडे वळतो, समष्टीकडे वळतो. हळूहळू विचारांत जी परिपक्वता येईल, ती वयानुसार, अनुभवानुसार येते. ती परिपक्वता हळूहळू माझ्यातही येत गेली असावी. म्हणजे मी तुमच्या पद्धतीनं, तुमच्या पिढीत जसं लिहिलं गेलं, तसं नाही लिहिलेलं, पण आपापली वृत्ती, स्वभाव, वैचारिकता आणि आपण जगतो तो आपला काळ आणि वातावरण त्यानुसारही लिहिण्यात थोडा फरक पडत असावा, असं मला वाटतं. आधीचा काळ आठवला, तर काळाच्या संदर्भात, इतरही संदर्भात.. कुठल्या कुठून येऊन पोचलो आपण, अनेक अर्थानी, असं वाटतं. जे बदल झाले, बाह्य़ घटकांत, समाजात, ते इतके धक्का देणारे, आणि खरं म्हणजे वाईटसुद्धा आहेत, की ते स्वीकारायला, मान्य करायला आणि ते पचवून पुढं जायलासुद्धा वेळ लागतोय.

शिवाय पिढी दर पिढी जगण्याच्या कल्पना बदलत असतील, तर त्यानुसारही बदल होत गेलेच. म्हणजे उदाहरणार्थ, नव्वदोत्तरीची जी कविता आहे, (असं ते म्हणवून घेतात,) त्या कवितेतसुद्धा, स्त्रियांचे किरकोळच उल्लेख येतात. आणि जे ही सगळी मासिकं, अंक चालवतात, त्यातही कवयित्रींची उपस्थिती फारशी नसते. ते जे सांगतात, म्हणजे, आपण या विषयांवर बोललो नाही.. आधुनिकता, पुरोगामीपणा, आक्रमकता, धीटपणा किंवा लैंगिकता.. आपल्याकडे लैंगिकतेवर लिहिणं-बोलणं, धीटपणाचं वगैरे समजलं जातं जरासं.. खरं तर तसं समजण्याचं काही कारण नाही. आशयाच्या अनुरूप आलं, तर ते आपण स्वीकारतोच. तुमच्या आयुष्याचा, जगण्याचा तो एक महत्त्वाचाच भाग आहे. पण बऱ्याचदा निव्वळ सनसनाटी निर्माण करायची असेल, किंवा नव्या पद्धतीचं, आधुनिक, थकलेलं जगणं दाखवायचं आहे म्हणून स्त्री-पुरुष संबंधांवर वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलं जातं. ते बरंचसं ढोबळ, थोडं बटबटीत असंही असतं. पण या पिढीची ती व्यक्त होण्याची पद्धत आहे. स्त्रियांच्या कवितेत या पद्धतीचा हा थोडासा, धाडसीपणा मी नाही म्हणणार, पण एक नैसर्गिक आणि सहज गरजेचा भाग म्हणेन मी, ते तुझ्या आणि प्रज्ञाच्या कवितेत मी वाचलंय. म्हणजे मलिकाच्या कवितेत तसं नाही. तिचं जरा वेगळं होतं लिखाण. आता ते मला योजना यादवच्या कवितेत दिसतं.

नीरजा : पण तू सुरुवातीला जे म्हटलं आहेस, म्हणजे अनियतकालिकाच्या चळवळी वेळीही हे झालं होतं, की तिथे स्त्रिया अजिबातच दिसत नव्हत्या, आणि आता नव्वदोत्तरी कवितेतही, ठळकपणे दिसत नाहीत. गेल्या दहा वर्षांत, परत मुली जरा बऱ्या लिहायला लागल्यात. म्हणजे अनियतकालिकांची कविता आणि नव्वदोत्तरीची कविता यांचा एक समांतर अभ्यास केला, तर लक्षात येतं की या दोन्ही काळात स्त्रीविषयक खूप कमी लिहिलं गेलं आहे. या काळात लिहिणाऱ्या स्त्रियांसुद्धा फार कमी होत्या म्हणजे ठळकपणे जाणवाव्यात अशा. त्याचं कारण काय असेल असं तुला वाटतं?

अनुराधा पाटील : चांगलं आणि दर्जेदार लिहिणाऱ्यांमध्ये नावं कमीच आहेत. पारंपरिक आशय, तंत्र असलेली कविता खरं म्हणजे, खूप लिहिली जाते, असं आपण सरसकट म्हणतो. त्यातही पुरुष कवी जास्त असतील, पण स्त्रियाही खूप लिहीत आहेत. पण तुला अपेक्षित आहे ती कविता खरोखर कमी आहे, लिहिणाऱ्या स्त्रियाही कमी आहेत. माहीत नाही कमी का लिहिलं जातं, कदाचित असं म्हटलं जाईल, की चांगलं लिहिणाऱ्या आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, तोही एक भाग आहे साहित्यव्यवहारात. पण आता त्या का नाहीत, हे मात्र सांगता येत नाही. कथेचं प्रमाण बरं आहे, बाकीचंही प्रमाण बरं आहे, पण चांगल्या कविता लिहिणाऱ्यांचं प्रमाण, म्हणजे प्रत्येक पिढीत, मी बघत आले आहे, चांगली नावं घ्यायची तर फार कमी नावं  आठवतात मला. ही जराशी चिंताजनकच बाब आहे. म्हणजे मागं गेलो आपण खूप तर इंदिरा संतांपासूनच्या काळात, त्या काळातल्या कालसापेक्ष ज्या काही मर्यादा असतील, त्या वगळल्या तरी, खूप मोठं नावीन्य नव्हतं. इंदिरा संत जर एक टप्पा असतील, तर त्यांच्या काळात त्यांच्या समकालीन आपल्याला पटकन दाखवता येत नाहीत. समजा अनुराधा पोतदार असतील, शांताबाई शेळके असतील, त्यांचा चांगल्या कवयित्री म्हणून कुणी उल्लेख करत नाही. शांताबाईंचा सगळे गीतकार म्हणून उल्लेख करतात. किंवा मग पुढच्या पिढीच्या आणि नंतर आमच्या पिढीत आलं तरी फारशी नावं नाहीतच. मला जरा वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण त्याची कारणं, नेमकी काय आहेत. ती आपल्या मानसिकतेत आहेत, पर्यावरणात आहेत, की अजून काही अदृश्य आहेत? ..

नीरजा : ही कारणं आपल्या साहित्यव्यवहारात आहेत का?  कधीकधी असं होतं का, की अनुल्लेखानंसुद्धा मारलं जातं कवयित्रींना..

अनुराधा पाटील : कधीकधी नाही, तू फारच सौम्यपणाने म्हणालीस, की अनुल्लेखानं मारलं जातं. साधारणपणे दहातल्या आठ वेळेला ते मारलं जातं. गौरी देशपांडे यांनी एक खंत व्यक्त केली होती, की त्यांच्या कोणत्याच पुस्तकांवर पुरुष लेखकांनी, पुरुष समीक्षकांनी समीक्षा केली नाही. चांगलं-वाईट म्हटलं नाही. एक वाचक म्हणून आणि व्यक्ती म्हणून, मला गौरी देशपांडेच्या खूप गोष्टी आणि खूप मर्यादा वेगवेगळ्या कारणांनी जाणवतात. पण गौरीनं जे लिखाण केलं, विशेषत: स्त्रियांसाठी, ते न पुसता येणारं आहे, त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊनसुद्धा! पण समीक्षकांनी कुठं त्यांच्याकडे लक्ष दिलं?

नीरजा : खरं आहे. आता थोडं ज्या संग्रहाला  पुरस्कार मिळाला त्या ‘कदाचित अजूनही’ या विषयी बोलू या. आधीचे चार संग्रह (‘दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’)आणि हा संग्रह यातल्या कवितांचं काय वेगळेपण वाटतं?

अनुराधा पाटील : ‘कदाचित अजूनही’ हा संग्रह २०१७ च्या डिसेंबरमध्ये आला. कवी म्हणून त्याचं वेगळेपण किंवा वैशिष्टय़ सांगणं थोडंसं अवघड आहे, पण वेगळेपण आहेच. कवी म्हणून आपली जी वाढ होते, आपल्यात अनेक अर्थानी जे बदल होतात, ते मला माझ्या या संग्रहात थोडे ठळकपणाने जाणवतात. यात अधिक विविधता आहे. थोडी पर्यावरणाची, किंवा राजकीय जाणिवांसंबंधीची किंवा स्त्रियांबद्दल त्यात येणं गृहीतच आहे. शिवाय मृत्यूशी संबंधित एक वेगळं चिंतनही यात आहे. आणि आजचा धागा म्हणाल तर वर्तमान, समकाळाचा धागा धरून चालताना, त्याचं बोट धरून चालताना मी जे बघते, जगते आहे, त्याची  थोडीशी सावली या संग्रहातल्या कवितांवर पडलेली मला जाणवते.

नीरजा : एक संयत, समजुतीचा सूर तुझ्या कवितेत कायम असतो. तरीही एक आतलं, मी वेदना वगैरे म्हणणार नाही, पण एक आपलं ठसठसणं असतं ना, ते सगळं कुठेतरी अगदी बारकाव्याने व्यक्त होत असतं तुझ्या लिखाणातून. आसपासचं वास्तव कवेत घेऊनही त्यावर तुझी जी प्रतिक्रिया असते, तिच्यात कुठंही बटबटीतपणा नाही. खरंतर समजूत, ती स्वभावातच असते माणसाच्या. किंवा जगण्यामध्ये तुम्ही जे पाहता, त्या जगण्याशीच समजूतीनं घेत जाता.  एक तडजोड म्हणू आपण, त्या जगण्याशी तडजोड करतच समजूत भिनत जाते अंगात. तुझ्यात हा संयतपणा कसा आला?

अनुराधा पाटील : आपलं वाढीचं जे वय असतं, सोळा-सतरापर्यंतचं, ते माझं खेडय़ात गेलं. तिथले सगळे संस्कार, वातावरण, तिथली जगण्याकडे बघण्याची दृष्टी आणि खेडय़ातलं जगणं एक प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतं. एकमेकांना स्वीकारणं, तडजोड करणं. त्या वातावरणात बालपण गेल्यामुळं स्वाभाविकपणेच माझ्यावर या गोष्टींचा दीर्घकाळ पगडा होता. आणि तू आता उल्लेख केलास तसा थोडा स्वभावाचाही एक भाग असतो. म्हणजे मला अनेक गोष्टी समजून घ्यायला, स्वीकारायला आवडतात. पण जर मला काही गोष्टी मिळाल्या नाही तर मी त्या सहज सोडून देते. माझा तो हक्कच आहे आणि मी मिळवीन, असं मला वाटत नाही. माझ्यापर्यंत पोचलं ते माझं, पोचलं नाही ते माझं नाही. अर्थात, हे मी आता बोलताना म्हटलं. पण साधारणत: माझ्या स्वभावाचा तो भाग आहे. म्हणून कदाचित तू संयतपणा हा शब्द वापरलास, तो माझ्या कवितेत उमटत असेल. खूप आक्रमक, धीट असं मी लिहीत नाही. त्यामुळं कवितेला उणेपणा येतो का, मला माहीत नाही.

नीरजा : नाही, नाही. अजिबात उणेपणा येत नाही. तुझी कविता तिच्या पद्धतीने, स्वभावाने व्यक्त होणारी कविता आहे. म्हणजे कवितेच्या स्वभावाने, असं मी म्हणते, तुझ्या नाही.

अनुराधा पाटील : मी सजग झाले, माझ्यात थोडी जाणीव आली, विविध पद्धतीने मी विचार करू लागले, माझ्या मर्यादेत राहून का होईना, तरुण वयात आक्रमक झाले. पण ते वय ओलांडून आल्यानंतर मी नेहमीसारखी शांतपणानेच लिहीत राहिले..

नीरजा : तुला असा अनुभव कधी आलेत का, की एखादा वाचक तुझ्याकडे आलाय आणि ‘जे तुम्ही लिहिताय ते माझंच जगणं आहे’, किंवा ‘आधार देते तुमची कविता मला जगायला,’ असं म्हणालाय?

अनुराधा पाटील : हो, आलेत. विशेषत: मृत्यूसंबंधीच्या कवितांबद्दल बरेच जण सांगतात मला, अगदी अनोळखी लोकही फोन करतात, की तुम्ही अमुकअमुक मांडलं होतं, ते मला खूप आशादायी वाटलं. आपण जे लिहितो ते सगळं खडकावर पेरल्यासारखं वाया जातं, असं मला नाही वाटत नीरजा, त्याचं कुठं तरी एखादं रोप तरी निश्चित रुजून येतं..

म्हणून

हजारो वर्षांपासून

आपण मागतो आहोत

सुईच्या अग्रावर मावेल

एवढी तरी भूमी

पाय टेकण्यापुरती

 

पण हरणारांच्या

बाबतीत तर इतिहासही

निर्दय असतो कायम

म्हणून

मी कविता लिहिते

तेव्हा कृतीच करत असते

माणूसपणाच्या

अधिकाधिक जवळ

जाणारी

 

आणि साजरा होतो

झाडाखाली आसऱ्याला

येणाऱ्या जिवांना

खात नाहीत झाडं

अजून तरी

पुरेसा असतो मला

एवढा दिलासा

जिथं पायांखालची

चिमूटभर माती

उचलून

मी कपाळावर लावते

आणि साजरा होतो

सृजनाचा उत्सव

नव्या नव्या ऋतूंना

जन्म देणारा

– अनुराधा पाटील

wneerajan90@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:20 am

Web Title: sahitya akademi award winner anuradha patil interview abn 97
Next Stories
1 जीवन विज्ञान : अन्न हेच औषध
2 मनातलं कागदावर : ममाचं लग्न..
3 पुरुष हृदय ‘बाई’ : ‘‘मी कमी पुरुषी पुरुष’’
Just Now!
X