साधना तिप्पनाकजे

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांमध्ये पुरानं थैमान घातलं. आरे गावही पुराच्या कचाटय़ात सापडलं. पण सर्व दिशेने मदतीचा ओघ येत राहिला, वाढतच होता. तेव्हा सरपंच साक्षीताईंनी ग्रामसभेत गावकऱ्यांशी बोलून महत्त्वाचा निर्णय घेतला, प्रत्येक बाधित कुटुंबाला पुढील सहा महिने पुरेल इतके जिन्नस उपलब्ध झाले आहे, त्यामुळे आपण यापुढे येणारी मदत थांबवावी आणि मदतकर्त्यांना दुसऱ्या गावांकडे मदत पोचवण्याची विनंती करावी.’ त्यांच्या या सर्वसमावेशक स्वभावामुळे अन्नधान्य व इतर नाशवंत वस्तूची नासाडी तर टळलीच उलट गरजवंतांपर्यंत ती पोचली. हा निर्णय घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या करवीर तालुक्यातल्या आरे गावच्या सरपंच साक्षी कुंभार यांच्याविषयी..

लोकप्रतिनिधी क्रियाशील असला, की गावच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातात. त्यात हा लोकप्रतिनिधी स्त्री असेल तर अनेक अडचणी, आव्हानं समोर येऊनही सर्वाना एकत्र घेऊन गावचा विकास, आपत्ती व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने होते, साक्षी कुंभार या सरपंचांबद्दल जाणून घेतल्यावर या गृहीतकावरचा विश्वास अधिकच दृढ होतो.

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांमध्ये पुरानं थमान घातलं. साक्षी कुंभार यांचं गावही पुराच्या कचाटय़ात सापडलं. कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या करवीर तालुक्यात आरे गाव वसलंय. गावच्या पूर्वेकडून भोगावती तर पश्चिमेकडून तुळशी अशा दोन नद्या वाहतात. गावच्या दोन्ही बाजूने नद्या वाहत असल्याने आरे गाव एखाद्या बेटासारखं आहे. असं असलं तरी आजवर गावात कधी पाणी शिरलं नव्हतं. गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. उंच सखल अशा भागात गावातल्या वाडय़ा वसलेल्या आहेत. काही वाडय़ांमधले अंतरही बऱ्यापैकी आहे. ५ आणि ६ ऑगस्टला अतिवृष्टी आणि धरणांचं सोडलेलं पाणी यामुळे या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केलं. गावकऱ्यांना काही कळायच्या आतच गावात पाणी शिरलं. त्यात वीजही नव्हती.

साक्षीताईंच्या घरातही पाणी शिरलं पण त्यांनी आधी गावाची काळजी घेत ग्रामसेविका आणि सहकाऱ्यांच्या साथीनं गावकऱ्यांना वरच्या भागात असणाऱ्या शाळेत हलवलं. काहींचे नातेवाईक उंच भागात राहात होते, त्यांची तिथे सोय झाली. साक्षीताईही सुरुवातीला शाळेतच राहिल्या. शाळेत आणि नातेवाईकांकडे निवाऱ्याची सोय झाली तरी नेसत्या वस्त्रानिशी लोक घराबाहेर पडले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रामधून विद्यार्थिनींकरता शाळेत सॅनिटरी पॅड येत असतात. साक्षीताईंनी तातडीने शाळेतला सॅनिटरी पॅडचा साठा उघडत काही गरजू स्त्रियांना दिला. त्यांच्या या समयसूचकतेमुळे स्त्रीवर्गाची गैरसोय टळली.

गावातल्या तीनशे कुटुंबांना या पुराचा तडाखा बसला. चाळीस घरं पूर्ण जमीनदोस्त झाली. १२० घरांची पडझड झाली. आठ दिवस गावात पुराचं पाणी साचून होतं. पाण्यामुळे गावाकडे कोणीच पोहोचू शकलं नाही. वरच्या भागातल्या गावकऱ्यांनीच धान्य पुरवून शाळेत आसरा घेतलेल्या गावकऱ्यांच्या जेवणाची सोय केली. पुराची तीव्रता राज्यभर कळल्यावर मदतीचे ओघ सुरू झाले. आरे गावातही मदत येऊ लागली. सर्वाना समान मदत मिळावी याकरता साक्षीताईंनी सहकाऱ्यांच्या मदतीने पटापट निर्णय घेतले. सर्वपक्षीय मदत समिती बनवण्यात आली. स्वयंपाकापासून रोजच्या वापराच्या लहानमोठय़ा सर्वच वस्तू मदत स्वरूपात येऊ लागल्या. ही मदत शाळेजवळील गोदामात एकत्र करण्यात आली. साक्षीताईंनी रेशिनग व्यवस्थेप्रमाणे ही मदत देण्याचे ठरवले. एका नोंदवहीत बाधित कुटुंबाचं नाव आणि सदस्यसंख्या नोंदवण्यात आली. आलेल्या मदतीचं दर माणशी प्रमाण काढून त्याप्रमाणे मदत वाटप करण्यात आली. यामुळे सर्वाना या मदतीचा समान लाभ मिळाला.

मदतीचा ओघ वाढतच होता. तेव्हा साक्षीताईंनी ग्रामसभा बोलावली आणि एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येक बाधित कुटुंबाला पुढील सहा महिने पुरेल इतके जिन्नस उपलब्ध झाले आहेत त्यामुळे आपण आता येणारी मदत थांबवावी आणि मदतकर्त्यांना दुसऱ्या गावांकडे मदत पोचवण्याची विनंती करावी असा निर्णय घेण्यात आला. यामुळे अन्नधान्य व इतर नाशवंत स्वरूपाची मदत अतिरिक्त होऊन वाया गेली नाही शिवाय गरजवंतांपर्यंत ती पोचली. काही पूरग्रस्त गावांमध्ये गेल्यावर किंवा वाटेत मदत पळवण्याचे प्रकारही समोर येत होते. अशा वेळी साक्षीताईंनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यातल्या समान न्यायाची चुणूक दाखवतो. संपूर्ण गावाचाही याला पाठिंबा मिळाला. गावाबाहेर ग्रामपंचायतीने येणाऱ्या मदतीबद्दल आभार मानत ‘आता जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत पुरे’ असा फलक लावला.

गाव शेतीवर अवलंबून असल्याने गावात पशुधनही मोठय़ा प्रमाणावर होतं. उरल्यासुरल्या पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न होता. याकरता जनावरांना पशुखाद्याची मदत मिळणे आणि घरं उभारणे याकरता आर्थिक मदत देण्याचं आवाहन गावातर्फे करण्यात आलं. ही आर्थिक मदत कोणत्या बँक खात्यात टाकायची याचीही सविस्तर माहिती देण्यात आली. या खात्यात मदतकर्त्यांनी आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय घर, शेती आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीने करून देण्यात आले आहेत.

गावावर आलेल्या या मोठय़ा संकटाला धीराने सामोऱ्या जाणाऱ्या साक्षीताईंचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. बारावी झाली आणि दोन वर्षांतच, २००५ मध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर आरे गावात आल्यावर सुरुवातीची दोन-तीन वर्ष संसाराचे धडे गिरवण्यात गेली. गावात ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या कार्यकर्त्यां होत्या. त्या गावातल्या स्त्रियांना एकत्र बोलावत असत. ग्रामपंचायतीकडून महिला बालकल्याण निधी घेऊन ‘मराआं’ कार्यकर्त्यां शिवणकाम आणि इतर प्रशिक्षण घ्यायच्या. कोणत्याही पदावर नसताना या कार्यकर्त्यां गावातल्या स्त्रियांसाठी खटाटोप करतात. आपणही त्यांना साथ दिली पाहिजे, असं साक्षीताईंना वाटलं. मग साक्षीताईही या बठकांना जाऊ लागल्या. त्यांना स्त्रियांचे अधिकार, गावगाडा, याविषयी माहिती मिळू लागली. साक्षीताईंची भीड चेपू लागली. त्या महिला सभेत प्रश्न उपस्थित करू लागल्या. चार लोकांच्या समोर येऊन बोलण्याचा त्यांना आत्मविश्वास आला. प्रश्नांची जाण येऊ लागली. हळूहळू त्या आंदोलनाच्या तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागल्या. पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये स्त्रियांशी संबंधित बाबींची निवेदनं देणं, एखाद्या विषयावर धरणे आंदोलनात सहभागी होणं, यात लागल्या. गावातल्या त्यांच्या कुंभारवाडीतलं कोणी अशा गोष्टींमध्ये नव्हतंच. घरातल्या मंडळींनी साक्षीताईंची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं.

ऑगस्ट २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. साक्षीताईंनी प्रत्यक्ष कारभारात सहभागी होण्याचं ठरवलं आणि निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. साक्षीताई ७-८ वर्ष करत असलेलं काम आणि लोकसंपर्क यांचा उपयोग त्यांना प्रचाराच्या वेळी झाला. त्यांनी त्यांच्या समाजातील लोकांना एकत्र केलं आणि त्यांना विश्वास दिला, की त्या चांगलं काम करतील. गावकऱ्यांनी त्यांना चांगली साथ दिली आणि साक्षीताई सदस्यपदी निवडून आल्या. सरपंचपद ओबीसी प्रवर्गातील स्त्रीकरता राखीव होतं. दोन ओबीसी स्त्रिया निवडून आल्या होत्या. यातल्या एक साक्षीताई होत्या. ‘समाजातील निवडून आलेल्या सर्वाना संधी मिळू देत, त्यांनाही कामाची आवड आहे, समाजात एकोपा राहू देत,’ अशी एक ना अनेक कारणं सांगत, आरक्षित पदाची कारकीर्द विभागली जाते. राज्यात बऱ्याच ठिकाणी आरक्षणातून येणाऱ्या सरपंच, पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा महापौर या पदांवर येणाऱ्या व्यक्तीला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यायचा नाही. त्याच प्रवर्गातील आणखी एखादी व्यक्ती निवडून आलेली असते. त्या व्यक्तीलाही पदाची भुरळ दाखवून अर्धा-अर्धा कार्यकाळ भागीदारीत द्यायचा खेळ प्रस्थापितांकडून खेळण्यात येतो.

प्रस्थापितांच्या हातातल्या दोऱ्यांवरची पकड सल होत नाही. अडीच-अडीच वर्ष सरपंचपद वाटून घ्यायचा खेळ इथेही खेळण्यात आला. आरे गावातल्या सरपंचपदाची कारकीर्द अडीच-अडीच वर्षांकरिता दोन्ही सदस्यांमध्ये वाटण्यात आली. निवडणूक झाल्यावर आधी सरपंच बनलेल्या ताईंचं राजीनामा देणं काही कारणास्तव सहा महिने लांबलं. मग ऑगस्ट २०१८ मध्ये साक्षीताई सरपंचपदी आल्या. सदस्य असताना आणि सरपंचपदी आल्यावर साक्षीताई ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रशिक्षण कार्यक्रम’अंतर्गत तीन प्रशिक्षणांत सहभागी झाल्या. साक्षीताई सरपंचपदी आल्यावर वित्तआयोगात मंजूर झालेली कामं त्यांनी पूर्ण करून घेतली. कुंभारवाडय़ात गटारं बंदिस्त करणे, शाळेची सुधारणा ही कामं केलीच. त्या लोकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या गरजा जाणून घेतात. बचतगटांचं प्रमाण गावात कमी होतं. साक्षीताईंनी स्त्रियांचे बचतगट बनावेत याकरता मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं. गावातील स्त्रियांना बचतगटाचं प्रशिक्षण देण्याकरता वध्र्याहून स्त्रिया आल्या. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी गावात २० बचतगट स्थापन झाले असून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आलीय.

साक्षीताईंना सुरुवातीला गावविकासाची कामं करताना, गावातील अतिक्रमण काढताना विरोध झाला. हा विरोध पक्षांतर्गतही होता. पण साक्षीताईंनी सगळ्याला धीराने तोंड दिलं. त्यांच्यासोबतची स्त्री शाखेची फळी मजबूत होती. गावविकासात कोणतीही तडजोड करणार नाही हे त्यांचं ध्येय होतं. गावकारभारात शिस्त यावी याकरता त्यांनी घरपट्टी वेळेवर न भरणाऱ्यांना दंड आकारण्यास सुरुवात केली.

पूर यायच्या आधी रस्ते बांधणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन ही कामे मंजूर झाली. पण पुरामुळे काही नवीन समस्या सुरू झाल्यात. पूर ओसरल्यावर साक्षीताईंनी सर्वासोबत मिळून स्वच्छता मोहीम राबवली. सतत आठ दिवस जंतुनाशक फवारणी केली. देणगीदार, मदतकर्त्यांना ग्रामपंचायतीकडून आभाराची पत्रं पाठवण्यात आली. युवा कार्यकर्त्यांची टीम बनवून या सर्व देणगीदार आणि मदतकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. सर्व कामांमध्ये सगळ्या गावाला सहभागी करून घेतलं आणि प्रत्येकावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या. गावच्या ग्रामसेविका दीपा यादव आणि तलाठी नरेंद्र झुंबड यांचा विशेष उल्लेख साक्षीताई करतात. गावातली नियमित कामं असोत, की आताचं पूर आपत्ती निवारणाचं काम असो, सर्व प्रशासकीय बाबींमध्ये या दोघांचं खूप चांगलं सहकार्य त्यांना मिळतं.

साक्षीताईंमध्ये हे नेतृत्वगुण आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आहे. गावासाठी उत्तम ते ते सर्व करण्याचा ध्यास त्यांना लागलाय. त्याला आडकाठी करणाऱ्यांशी संवाद साधत, वेळप्रसंगी कठोर होत, त्या तो विरोध मोडून काढतात. गावच्या सर्वागीण विकासाचा वारू आता कुणी रोखू शकणार नाही, हे नक्की!

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com