|| अनुराधा गायकवाड

कोल्हापूर, सांगली येथील पूर परिस्थिती नियंत्रणाखाली आलीय, लोक सावरू लागले आहेत.. पण पुढे काय? बदलत्या जागतिक तापमानाच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की, हवामानासंदर्भातल्या तीव्र घटना वाढतच जाणार आहेत.  यापुढे अशा परिस्थितीला तोंड द्यायला आपण तयार आहोत का? कसा काढणार आहोत आपण त्यातून मार्ग?

सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये पूर आला आणि अनेक ठिकाणं पुराच्या पाण्याखाली गेली. अनेक गावं, वाडय़ा, वस्त्या, शहरं व त्यातील अनेक प्रभाग हे साधारणपणे आठवडाभर पाण्याखाली होते. कोल्हापूरला जोडणारे सर्व रस्ते पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ाचं एक बेट तयार झालं होतं. २००५ मधल्या पुराच्या तुलनेत घरांमध्ये शिरलेलं पाणीदेखील खूप जास्त होतं. कोल्हापूर शहरात अनेक घरं दहा ते बारा फूट पाण्याखाली होती. हीच परिस्थिती जिल्ह्य़ात इतर ठिकाणीदेखील होती. शिरोळ तालुक्यात अनेक छोटी गावं पाण्याखाली गेली. या सर्व भागातील नागरिक स्थलांतरित झालं. कोल्हापूर जिल्ह्य़ात एकूण २४९ गावं बाधित झाली तर स्थलांतरित झालेली लोकसंख्या तब्बल चार लाखांपेक्षा अधिक असल्याची आणि इतरही अनेक अनेक प्रकारची माहिती आत्तापर्यंत कानावर आलीच असेल. पूर परिस्थिती नियंत्रणाखाली आलीय, काही ठिकाणी लोक सावरताहेत.. पण यापुढे काय? पुढच्या काळात अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यायला आपण तयार आहोत का? याचा विचार व्हायला हवा.

आत्ताही या पुराचं पाणी घरात येणं म्हणजेच घरात असलेलं सर्व सामान, वस्तू, धान्याची नासाडी. अनेक जणांचं संपूर्ण घर वाहून गेलं. काही ठिकाणी सिमेंट-काँक्रीटची घरेसुद्धा कोसळली. घर स्त्रीसाठी निवारा, सुरक्षा, आसरा अशा अनेक शब्दांनी बांधलेलं असतं. घर पडणं किंवा घरातील वस्तू नाहीशा होणं याच्याशी स्त्रीचं भावनिक नातं असतं. घर पडल्यामुळे स्त्रीचं आर्थिक नुकसान होतं तसंच तिचं भावविश्वदेखील ढवळून निघतं. त्यामुळे आता गरज आहे ती या सगळ्यातून बाहेर पडून नव्या उमेदीने परत आपला संसार उभा करण्याची. घर बांधण्यासाठी, घरातील वस्तू परत मिळवण्यासाठी कदाचित सरकारी किंवा इतर संस्थांमार्फत मदत मिळेलही, पण आता सर्वात महत्त्वाचं आहे ते नवीन सुरुवातीसाठी मनामध्ये नवीन उमेद निर्माण करण्याची!

महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटलं आहे की, एक स्त्री शिकली तर ती सर्व कुटुंबाला साक्षर बनवते. याच विचारांचा आधार घेऊन आज गरज आहे ती स्त्रीने परत खंबीरपणे आपला संसार, घर, गाव, जिल्हा पूर्ववत करण्याची! त्यासाठी तिनं मनानं खंबीर झालं पाहिजे. हा लेख प्रकाशित होईपर्यंत बरीच कुटुंबं आपापल्या घरी गेली असतील. मात्र ज्यांची घरं पूर्णपणे पडली आहेत त्या-त्या व्यक्ती ‘मदत छावणी’मध्ये मागे राहतील. अशा कुटुंबातील स्त्रियांना गरज आहे मानसिक समुपदेशन किंवा ज्याला आपण ‘ट्रॉमा काऊन्सेलिंग म्हणतो त्याची. मनावर अचानक एखाद्या घटनेमुळे आघात होतो त्या वेळेस व्यक्ती मानसिकदृष्टय़ा पूर्णत: खचून जाते. यामध्ये तीन बाबी महत्त्वाच्या असतात : १) घटना अनपेक्षित होती, २) व्यक्ती त्या घटनेसाठी तयार नव्हती, ३) ती घटना घडू नये म्हणून ती व्यक्ती काहीही करू शकत नव्हती.

अशा वेळेस स्त्रीची मानसिक अवस्था फारच विचित्र होते. अनेकदा आहे तसंच बाहेर पडावं लागतं. अंगावरच्या कपडय़ांखेरीज दुसरं काहीच बरोबर नसतं. अशा स्थितीत ‘मदत छावणी’मध्ये, जिथे या सर्व लोकांची राहायची व्यवस्था केलेली असते, तिथे जाऊन राहावं लागतं. या अशा जागा अनेकदा शाळेच्या इमारती किंवा लग्नसमारंभासाठी बांधलेल्या मोठमोठय़ा खोल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी एक कुटुंब म्हणून राहता येत नाही. सर्व स्त्रिया एकीकडे एकत्र तर सर्व पुरुष एकत्रित दुसरीकडे अशी राहायची व्यवस्था केलेली असते. म्हणजेच घरात असलेले सासू, सून, नणंद, जावा असं कोणतंही नातं या शिबिरांमध्ये जपता येत नाही. घरातील रोजच्या सवयीच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीदेखील सांभाळता येत नाहीत. मुलांना आणि कुटुंबीयांना जेवायला वेळेवर वाढणं, त्यांच्या औषधांच्या वेळा सांभाळणं, अशा अनेक गोष्टी पूरग्रस्त म्हणून पूर्णत: विस्कटून जातात. स्त्रियांच्या मनाची घालमेल फारच विचित्र असते.

याचबरोबर विचार करावा लागतो तो ज्या ठिकाणी या स्त्रिया राहतात तेथील वैयक्तिक स्वच्छतेचा. दुसरे कपडे नसतात त्यामुळे तेच ते कपडे घालून अनेक दिवस राहावं लागतं. पुराचं पाणी चहूकडे असलं तरी आंघोळीला पाणी नसतं. पुराच्या काळात पंधरा दिवस कुठेही पाण्याचा पुरवठा नव्हता. त्यामुळे सगळीकडे पाणी पुरवलं गेलं. अशा वेळेस गरोदर स्त्रिया, रजस्वला यांचे प्रश्न फारच वेगळे असतात. पाळी आलेल्या स्त्रियांना शिबिरांमधून सॅनिटरी नॅपकिन्स पुरवले जातात पण स्वच्छतेचे काय? आणि त्यांच्या नष्ट करण्याचं काय? हा प्रश्न अनेकींना संकटात टाकून गेलाच.

पाऊस किती व कसा पडावा हे आपल्या हातात नाही. मुळात खूप पाऊस पडतो तिथे पूर येण्याची शक्यता असते. असे झाल्यास काय करावे याची तयारी वैयक्तिक पातळीवर, शासन पातळीवर, तसंच सामाजिक पातळीवर असणे गरजेचे आहे. लेखामध्ये आपण वैयक्तिक पातळीवर अशा परिस्थितीला तोंड द्यायला काय करू शकतो याचा थोडा विचार करू या.

बदलत्या जागतिक तापमानाच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की, हवामानासंदर्भातल्या तीव्र घटना वाढतच जाणार आहेत. जसं की खूप पाऊस, खूप थंडी, खूप उन्हाळा किंवा अतिशय कमी पाऊस, इत्यादी. या घटना वारंवार होत असतील तर आपण त्यासाठी तयार असलंच पाहिजे. ही तयारी मानसिक पातळीवर तसंच प्रत्यक्ष वस्तुपातळीवर करणे गरजेचं आहे.  प्रत्येक वेळी पूर आला की विस्थापित होणं व प्रापंचिक साहित्य वाहून जाणं हे नित्याचं झालं आहे. मग यातून निर्माण होणारी भीती, असुरक्षा, वाटणारी चिंता, त्यातून निर्माण होणारं भय व मग मानसिक खच्चीकरण असं सगळे होतं. हे थांबवायचं असेल तर पाऊस येणार व त्यामुळे कदाचित पूरसुद्धा येऊ शकतो, हे आपण गृहीत धरलं पाहिजे. या प्रकारेच आपण येणाऱ्या परिस्थितीचा मानसिकदृष्टय़ा सामना तयार राहू शकतो. मात्र त्यासाठी मनाने खंबीर असणं गरजेचं आहे. तसंच, खूप पाऊस पडल्याने नदीतल्या पाण्याची पातळी वाढत असेल तर घरातील मौल्यवान वस्तू, जसं की, दागिने, पैसे व महत्त्वाची कागदपत्रं ज्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक हे सर्व एका पिशवीत घालून आपल्याजवळ ठेवायला हवं. घरातून बाहेर पडावं लागल्यास या सर्व वस्तू आपल्याजवळ असतील तर त्यांचा आपण आपल्या पुढच्या काही तरतुदीसाठी योग्य तो उपयोग करू शकतो. खरं तर अशा प्रकारचं नियोजन हे प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने केलं पाहिजे. गरज पडली तर यासाठी जनजागृती मोहीम राबवणं आवश्यक आहे.

घर सोडावं लागलं तर निवाऱ्याची जागा ही अतिशय महत्त्वाची. शक्यतो नदीच्या पाण्याच्या पातळीने धोका पातळी ओलांडली की घरातून बाहेर पडायची तयारी ठेवावी (या वेळीसुद्धा सुरुवातीला अनेक कुटुंबं घरातून बाहेर पडायला तयार नव्हती. विशेषत: वृद्धांना आपलं घर सोडण्याचा भयंकर त्रास होत होता आणि त्यांनी अनेक सुरक्षा रक्षकांना, इतरांना त्रास दिला, अशाही घटना घडल्या.) त्यासाठी आपल्या गाव किंवा आसपासच्या भागातील उंच जागा, जेथे पाणी येणार नाही, ती शोधून ठेवली पाहिजे. गरज पडल्यास तिथे आसऱ्यासाठी जायची मानसिक तयार करायला हवी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणं धोक्याचं ठरू शकते. अनेकदा पुराच्या पाण्याची पातळी जमिनीवर फक्त आठ ते दहा फूट असली, तरी त्या पाण्याला वेग असतो व अशा पाण्यातून बोटीने प्रवास करणं धोक्याचं ठरू शकतं.

यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करू शकतो का याचा विचार करणं. मुळात पूर येण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यात जसा जास्त पाऊस हा एक मुद्दा आहे तसंच धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचं नियोजन, खुल्या क्षेत्रात पडणारा पाऊस व नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने केलेली बांधकामं अशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपण नदीत, ओढय़ात टाकलेला कचरा, निर्माल्य किंवा इतर गोष्टी, ज्यात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे, याचाही विचार केला पाहिजे. हा कचरा पाइपमध्ये अडकतो व पाण्याचा निचरा होण्यास अडसर ठरतो. मानवाने स्वत:च्या सुखासाठी अनेक गोष्टी निर्माण केल्या. काही गोष्टी या पर्यावरणपूरक नाहीत. त्याच आपल्यासमोर वेगवेगळी संकटं उभी करत आहेत. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करून पर्यावरणाला बाधक असलेल्या गोष्टींचा त्याग करायला हवा.

या सर्व बाबींचा विचार आता स्त्रियांसकट सर्वानीच करणं गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात आपण पूरपरिस्थितीला सक्षमपणे तोंड देत येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास हातभार  लावू शकतो आणि आपल्याच व्यक्ती दुरावण्याचं आणि वस्तू हरवण्याचं नुकसानही टाळू शकतो.

gaikwad.anuradha@gmail.com

chaturang@expressindia.com