कबीर सगळ्या जगण्यातली व्यर्थता सांगतो.  म्हणतो, मी तीर्थामध्ये स्नान करून पाहिलं, मी मूर्तीची पूजा करून पाहिलं, पण सगळाच पोकळ कारभार. मग मी स्वत:लाच शोधत गेलो आणि माझा ईश्वर मला माझ्यातच सापडला. ‘तेरा साहब है घर माँ ही’ हे मी प्रत्येकालाच सांगतो आहे.

क बीर एखाद्या लहानशा लेखात किंवा एखाद्-दुसऱ्या ग्रंथात मावणारा नाही. अरबी भाषेत ‘कबीर’ या शब्दाचा अर्थ आहे ‘महान’. कबीरानं आपलं नाव सार्थ केलं आहे. त्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याचे आध्यात्मिक अनुभव, त्याच्या विचारांची खोली आणि व्यापकता, त्याच्या वाणीची सरलता आणि कृतीची प्रांजल सहजता- त्याच्या महानतेला कोणत्याही बाजूनं जोखलं तरी ती अधिक उजळच होत राहते.
कबीर मोठा महान आहे, तसा मोठा विलक्षणही आहे. तो धूसरातून चालत येतो आणि पुन्हा धूसरातच निघून जातो. स्वत:विषयीच्या सगळ्या नोंदींना पुसून जाणारा त्याच्यासारखा दुसरा संत नाही. त्याचा काळ, त्याच्या जन्म-मृत्यूची ठिकाणं, त्याचे आई-वडील, जात-धर्म, गुरू, संसार- कोणत्याच गोष्टीची निश्चिती होऊ शकत नाही. अनेक तर्क, पुष्टीची अनेक प्रमाणं आणि अनेक रूढ समजुती! मतामतांच्या गलबल्याच्या पार पलीकडे दिसतो कबीर. त्याच्या उपलब्ध जुन्या चित्रांमध्येही तो नक्की कसा ते कळत नाही. गळ्यात तुळशीच्या की रुद्राक्षांच्या माळा घालून बसलेला दिसतो तो एखाद्या चित्रात आणि एखाद्या चित्रात सूफी संतासारखी उंच टोपी घालून, दाढी वाढवून असलेला.
कबीर कुठल्याच एका बिंदूवर स्थिर होत नाही. ओल्या वाळूवरच्या लाटेसारखं आयुष्य त्याचं! शंख-शिंपले वेचावेत तशा दंतकथा तेवढय़ा वेचता येतात. त्याही एकमेकींना छेदत राहणाऱ्या. कुणी त्याला ब्राह्मण विधवेचा सोडून दिलेला मुलगा मानतात, तर कुणी नीरू आणि निमा या विणकर जोडप्याचा तो मुलगा आहे, असं म्हणतात. कुणी त्याला स्वामी रामानंदांचा शिष्य मानतात तर कुणी त्याला उस्ताद शेख तकींचा शिष्य मानतात. कुणी त्याची जात गुलाहा म्हणजे विणकराची समजतात तर कुणी त्याला जुगी किंवा जोगी म्हणतात- कबीर खरं तर कोणत्याच चौकटीत सामावत नाही. कोणत्याच बंधनात अडकत नाही, कोणताच शिक्का मारून घेत नाही.
‘कबीर आपला आहे’ असा दावा हिंदू आणि मुस्लीम दोघांनीही केला. दंतकथा अशी आहे, की त्याच्या मृत्यूनंतर त्याचं दहन करायचं की दफन याचा वाद पेटला पण प्रत्यक्ष शवावरची चादर दूर केली तर तिथे कबीराचा देह नव्हताच. होता फक्त फुलांचा ढीग! इतकी अन्वर्थक दंतकथाही क्वचितच निर्माण झाली असेल! कबीराच्या जगण्याचा आशय इतक्या काव्यात्म रीतीनं व्यक्त करणारी ही दंतकथा म्हणजे जशी लोकप्रतिभेची देन आहे, तशीच ती कबीराच्या सगळ्या अस्तित्वाचाच अर्थ व्यक्त करू पाहणारी आहे.
कबीराच्या जन्म-मृत्यूच्या बिंदूंची निश्चिती करता येत नसली, तरी तो पंधराव्या शतकात होऊन गेला हे नक्की. रैदास त्याच्या समकालीन होता, गरीबदास किंवा तुकाराम त्याच्या समकालीन होता असं म्हणता येतं, पण तेही अगदी चाचपडतच म्हणावं लागतं. इतिहासाच्या ज्या अंधारलेल्या वाटेवर आपला उजेडाचा शब्द घेऊन कबीर चालला, त्या शब्दांच्या उजेडात त्याच्या व्यक्तिगत चरित्राचा तपशील फारसा दिसत नाही.
तो उजेड पडतो त्याच्या हृदयावर आणि त्याच्या बुद्धीवर. विचार-भावनांचं त्याचं सगळं आंतरविश्व त्या उजेडात पाहता येतं. ते जगही मोठं रहस्यमय जग आहे. तिथे भरून राहिलेल्या आध्यात्मिक आशयात कधी औपनिषदिक अद्वैतवाद चमकतो, तर कधी इस्लामचा एकेश्वरवाद चमकतो, कधी वैष्णव भक्तीचा रंग तर कधी तांत्रिक सिद्धांचा रंग, कथा नाथपंथी जोग्यांची वाणी तर कधी सूफी तत्त्वज्ञानाचे स्वर! स्वत:ला गवार म्हणवणाऱ्या या संताने बौद्धांच्या शून्य संकल्पनेपासून सहजियांच्या प्रेमभक्तीपर्यंत अनेक संकल्पनांचा ठाव घेतला आहे.
निर्गुण आहे कबीराचा ईश्वर. देश, काल, जीव-जगत सगळ्यांच्या पलीकडचा आहे तो.
बाये न दाहिने, आगे न पीछू
अरध न उरध, रूप नहिं कीछू
माय न बाप, आव नहिं जावां
ना बहु जण्याँ न को वहि जावां
   उजवीकडे ना डावीकडे, कुठेच नाही तो. पुढेही नाही, मागेही नाही. वरही नाही की खालीही नाही. त्याला आई-बाप नाहीत, त्याला उत्पत्ती-विलय नाही. कबीर कधी त्याला अल्ला म्हणतो, कधी राम म्हणतो. पण तो प्रत्येक दिखाव्याला, प्रत्येक कर्मकांडालाही फटकारतो, राम आणि रहीम जर सर्वत्र भरून आहे तर बांग देऊन, ओरडून कशाला हाक मारता त्याला? तो काही बहिरा-मुका नाही.
मुल्ला कहाँ पुकारै दूरी
राम-रहीम रह्य़ा भरपूरी
आणि तो असंही म्हणतो की, मी मुळी नमाज पढत नाही की पूजाही करत नाही. कारण तो निराकार माझ्यातच आहे. भ्रम नाहीच उरलेला कुठला.
पूजाँ करूँ न निमाज गुजारूँ
एक निराकार हिऱ्दै नमसकारूँ
कहै कबीर भरम सब भागा
एक निरंजनसू मन लागा
कबीर सगळ्या जगण्यातली व्यर्थता सांगतो. त्याच्या अनुभवातलं जग म्हणजे ‘आसू का दरिया’ आहे ‘दुख का सागर’ आहे. पलीकडे जायचं तरी कसं? तीर्थयात्रा करणं, हठयोग आचरणं हे काही उपयोगाचं नाही. कबीर म्हणतो, मी तीर्थामध्ये स्नान करून पाहिलं, मी मूर्तीची पूजा करून पाहिलं, मी वेद-पुराणं वाचून पाहिलं. पण सगळाच पोकळ कारभार आहे हे माझ्या ध्यानात आलं. मग मी स्वत:लाच शोधत गेलो आणि माझा ईश्वर मला माझ्यातच सापडला. ‘तेरा साहब है घर माँ ही’ हे मी प्रत्येकालाच सांगतो आहे.
कबीराच्या वाणीत एकीकडे सगळ्या ढोंगी उपचारांवर प्रहार करण्याचा कठोर सपकारा आहे आणि दुसरीकडे आंतरवाटा चालताना दिसलेले उजेडाचे कवडसे धरताना, खोल मनातळातून आत्मज्ञानाचे झरे उमळून आलेले बघताना आलेला अतीव मृदू असा भावाचा फुलोरा आहे.
राजकीय अस्थिरता, सूफी आणि चिश्ती संतांच्या निमित्तानं वाढणारा इस्लामचा प्रभाव, वेगवेगळ्या सांप्रदायिक मतप्रणालींनी निर्माण केलेलं कमालीचं संभ्रमित वातावरण- कबीर या सगळ्या मलिनतेला दूर भिरकावत आपल्या मस्तीत चालला. सर्व प्रकारच्या ऐहिक लिप्ताळ्यापासून दूर राहिला तो. त्याच्या बायकोचं नाव लोई होतं असं म्हणतात. कमाल आणि कमाली या नावानं एका मुलानं आणि एका मुलीनं त्याचा वंश पुढे नेला असंही सांगतात.
पण खरं सांगायचं तर कबीरपंथ आजतागायत अस्तित्वात असला, तरी कबीराच्या मागे-पुढे कोणी नाही.
अवधू, कुदरतकी गति न्यारी
रंक निवाज करै वह राजा, भूपति करै भिखारी
अशा दैवाचे खेळ पाहतानाही ‘मन मस्त हुआ तब क्यों बोले?’ असं म्हणत आपल्याच अंतरंगात बुडून जाणारा, आणि
रस गगन गुफा में अजर झरे
बिन बाजा झनकार उठे जहाँ, समुझि परै जब ध्यान धरै
असा अनुभव घेणारा कबीर एकटाच आला आणि एकटाच गेला. त्याचे दोहे- त्याची अवधी, भोजपुरी, खडी, पंजाबी, मारवाडी, हिंदी, उर्दू, फारसी अशी नाना भाषांची झलक असलेली वाणी थोडी अवघड आहे. पण तिनं संपूर्ण उत्तरी भारताच्या साहित्यावर कित्येक शतकं प्रभाव गाजवला आहे आणि आंतरिक शांतीच्या शोधात निघालेल्या प्रत्येकाला शतकांच्या सीमा पुसून एका दिवे लागलेल्या मुक्कामाची वाट दाखवली आहे.   
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com