समतेची स्पष्ट ग्वाही देत असताना, रैदास वा रोहिदासांनी कर्मशुद्धीचा आग्रह धरला. विशिष्ट जातीत जन्माला आल्यानं कोणी नीच होत नाही. माणसाला नीच करणारं असतं ते फक्त त्याचं स्वत:चं वाईट कर्म! .. भारतातील अमराठी संतांची, त्यांच्या विचारांची ओळख करून देणारे हे सदर.
रविदास जनमके कारनै होत न कोऊ नीच
नरको नीच करि डारी है ओछे करमकी कीच
विशिष्ट जातीत जन्माला आल्यानं कोणी नीच होत नाही. माणसाला नीच करणारं असतं ते फक्त त्याचं स्वत:चं वाईट कर्म!  
संत रविदास किंवा रोहिदास किंवा रैदास या नावानं प्रसिद्ध असलेल्या एका ईश्वरनिष्ठाचे हे उद्गार आहेत. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात, १३७६ साली रैदासांचा जन्म झाला. वाराणसीजवळच्या मंदूर नावाच्या लहानशा गावातलं मानदास आणि करमाबाई नावाचं चांभार जोडपं म्हणजे रैदासांचे आई-वडील. लहान वयातच स्वामी रामानंद या प्रसिद्ध रामभक्त साधू पुरुषाचे आशीर्वाद रैदासांना मिळाले आणि पुढे रामानंदांच्या प्रमुख शिष्यांमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांचा लौकिकही वाढत गेला. अर्थात, वाढत्या लौकिकाबरोबरच फार मोठय़ा सामाजिक विरोधाला रैदासांना सामोरं जावं लागलं. जातींची घट्ट पकड असलेल्या तत्कालीन समाजव्यवस्थेत जन्मानं चांभार असलले रैदास अतिनीच मानले जात होते. अशा नीचकुलीन माणसानं लोकांना धर्म सांगावा, नीतीचे धडे द्यावेत आणि जीवनशुचितेचा उपदेश करावा हे महापाप असल्याचं सांगत अनेक उच्चवर्णीय लोक काशीनरेश वीरसिंह बंधेला यांच्या दरबारात गेले, पण रैदासांना प्रत्यक्ष भेटल्यावर राजाचाही जातिकुळाबद्दलचा भ्रम दूर झाला.
असं म्हणतात की मेवाडची मीरा रैदासांना भेटली आणि त्यांची शिष्याच झाली. रैदासांविषयीच्या अनेक आख्यायिकांमधली तशीही एक आख्यायिका आहे, पण या आख्यायिकांपलीकडच्या रैदासांनी उत्तर भारताच्या धर्मभूमीवर केलेलं कार्य अधिक महत्त्वाचं आहे. जातींवर आधारलेली उच्च-नीचतेची संकल्पना त्यांनी निर्भयपणे नाकारली. त्याचा परिणाम केवळ परमार्थ क्षेत्रातच नव्हे, तर एकूण समाजाची मानसिकता बदलण्यात व्हावा या तळमळीने कार्य केलं. त्यामुळे जातिभेदांवर प्रहार हा रैदासांच्या विचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
रविदास ब्राह्मन मत पूजिये, जड होवे गुणहीन
पूजहि चरन चंडालके, जड होवै गुन परवीन
असा स्पष्ट उच्चार करण्याचं साहस रैदासांमध्ये आहे. गुणहीन ब्राह्मणाची पूजा करू नका. पण गुणसंपन्न चांडाळाचे पाय धरायलाही मागे-पुढे पाहू नका, असं म्हणणाऱ्या रैदासांनी जीवाला जात नसते, हे जाणलं.  सगळ्यांच्या देहात प्राण आहे आणि सगळ्यांच्या प्राणात एकच परमात्मा आहे.
 ब्राह्मन अरु चंडाल महि ‘रविदास’ नहि अंतर जान
 सह महि एकहि ज्योती है, सब घट इक भगवान
समतेची अशी स्पष्ट ग्वाही देत असतानाच रैदासांनी कर्मशुद्धीचा मात्र आग्रह धरला आहे. ते उच्च-नीचता मानतात, ती कर्मजात आहे. कुकर्म करणारा तो नीच आणि सदाचारी जो, तो उच्च अशी त्यांची वर्णव्यवस्था आहे. ते म्हणतात की, ईश्वरापाशी सगळे सारखेच आहेत. सगळीच त्याची लेकरं आहेत, पण लोकं जातिपातींच्या वेढय़ात अडकून पडतात आणि देवसान्निध्याला मुकतात. जातीच्या रोगानं तर साऱ्या मानवजातीला, माणुसकीलाच खाल्लं आहे.
जनम जात मत पूछिये, का जात अरु पात
रविदास ‘पूत’ सब प्रभुके, कोई नहि जात कुजात
जातपातके फैरमेहि, उरझ रहे सबलोग
मानवताको खात है ‘रविदास’ जातिका रोग
ज्या काळात सामान्य माणसाला धर्माच्या प्रचलित रूपाचा कोणताही आधार मिळत नव्हता, राजकीय अस्थिरता, इस्लामचं आक्रमण आणि कर्मकांडात्मक धर्माचा झेंडा घेतलेल्या निर्मम सनातन्यांनी चालवलेलं शोषण, यांच्यामुळे माणसांना सर्व बाजूंनी हताशा आलेली होती; त्या काळात जातिव्यवस्थेचा फास सैल करून भक्तीच्या सहृदय वाटेवर माणसाला सहजपणे चालवण्याचं काम ज्या ज्या संत सत्पुरुषांनी केलं त्यापैकी एक रैदास होते.
जातिव्यवस्थेचा स्पष्ट आणि निर्भय निषेध तर त्यांनी केलाच, पण इस्लामी धर्माविषयीचं समाजमनातलं भयही त्यांनी काढून टाकलं. एकीकडे जातिभेदांनी पोखरलेला हतबल समाज आणि दुसरीकडे कोणत्याही जातीतल्या माणसाला स्वीकारण्याची तयारी असणारा आक्रमक शासनकर्त्यांचा धर्म! अशा वेळी शतखंडित समाजाला एकत्र बांधण्याचे प्रयत्न केले ते सगळ्या मध्ययुगीन भक्तीपरंपरांनी. रामानंदांचा रामोपासक संप्रदाय त्यापैकीच एक होता आणि रैदास त्याच संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते.
ते समाजातली अस्वस्थता आणि घुसमट पाहत होते, अनुभवत होते आणि लोकांना दिलासा देत सांगत होते की,
मुसलमानोसे दोसती, हिंदुअनसो कर प्रीत
‘रविदास’, ज्योती सब रामकी, सब है अपने मीत
जब सब करि दोड हाथ,पग, दोड नैन दोड कान
‘रविदास’, पृथक कैसे भये हिंदु अरु मुसलमान?
जर सर्वानाच दोन हात, दोन पाय, दोन डोळे आणि दोन कान आहेत तर मग हिंदू आणि मुसलमान वेगळे कसे? ‘स्रष्टा हक भगवान!’ यांचा निर्माता तर एकच आहे. सगळी एकाच मातीची भांडी आहेत. एकाच कुंभारानं केलेली आहेत- ‘सबको एकै घडे कुम्हार!’
त्यामुळे रैदासांनी कबीरांप्रमाणेच राम आणि रहीम यांच्यात भेद मानला नाही.
‘रविदास’, कोई अल्लाह कहे, कोई पुकारे राम
केसव, क्रिस्त, करीम सम, माधव, मुकुंद नाम
नावंच फक्त वेगळी आहेत. केशव म्हणा की करीम म्हणा, सगळे एकच तर आहेत. वेद आणि कुराण वेगळे नाहीत. त्यांचाही उद्देश एकच आहे. माणसाला सुखी करण्याचा उद्देश!
रैदास एकतेचे उद्गाते होते. त्यांनी धर्म आणि कर्म यांच्यातली एकता उलगडून सांगितली. स्वधर्मपालन म्हणजेच नियत कर्माचं पालन. म्हणून धर्म आणि कर्म वेगळं नाही. सुख-दु:खही वेगळं नाही. दोहोंचा समान स्वीकार केल्यानं जीवन सफल होईल. जन्म आणि मरण हेही समान स्वीकारायला हवं. जन्माचा हर्ष नको, मरणाचा शोक नको
‘रविदास’ जन्म कर हरसका, मरनेका कर शोक
बाजीगरके खेलको समझत नाही लोक
रैदासांनी सूफी संतांच्या शब्दांतही ईश्वराची प्रार्थना केली आहे. त्याच्या चरणी सर्वस्व समर्पण करून आपलं त्याला सांगताना ते सहजपणे सूफी संतवचनांची आठवण देणारी रचना करतात.
मैं बेदिनायत बदनजर, दरमंद बरखुरदार
बेअदब, बदवरवत बीरां, बेअकिल बदकार
अशी सूफी साधकांच्या वाणीची झलक जेव्हा रैदासांच्या रचनेत मिळते तेव्हा लक्षात येतं की रैदासांच्या तत्त्वचिंतनाचा स्रोत काही एखाद्या धर्मग्रंथातून आलेला नव्हता किंवा एखाद्या परंपरेतून आलेला नव्हता. तो त्यांच्या व्यापक अशा सामाजिक भानातून आलेला होता. प्रत्यक्ष जीवनानुभवातून आलेला होता.
एकीकडे अत्यंत तन्मयतेने भक्तीच्या उत्कटतेत स्वत:ला विसरून जाणारे रैदास दुसरीकडे अत्यंत प्रखरपणे समाजघातक रूढी-प्रथांचा साहसपूर्ण निषेध करताना दिसतात आणि तुकारामांसारख्या इतर संतांची आठवण आपल्याला वारंवार होत राहते.
रैदासांच्या भक्तीचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांच्या आराध्य दैवताला त्यांनी दिलेलं सर्वव्यापक रूप.  त्यांचा राम पूर्ण ब्रह्म आहे. तो अरूप, अनाम आणि अजन्मा आहे. ज्याला शोधण्यात प्रत्यक्ष ब्रह्मानं जन्म घालवला आहे असा विराट पुरुष म्हणून त्यांनी रामाचं वर्णन केलं आहे.
एका हीन मानल्या गेलेल्या कुळात जन्म घेऊन विचारांचं विशाल आभाळ कवेत घेण्याइतका उच्च पारमार्थिक अधिकार रैदासांनी मिळवला. चमत्कारांचीच गोष्ट करायची तर त्यांचा हाच सर्वात मोठा चमत्कार म्हटला पाहिजे.