26 September 2020

News Flash

मदतीचा हात : ..अवघे चढू ‘सप्तसोपान’

तुम्ही स्मृतिभ्रंशाचे रुग्ण असा किंवा एकाकीपणा सहन करणारे ज्येष्ठ, ‘सप्तसोपान’ तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतं.

| February 8, 2014 04:28 am

तुम्ही स्मृतिभ्रंशाचे रुग्ण असा किंवा एकाकीपणा सहन करणारे ज्येष्ठ, ‘सप्तसोपान’ तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतं. आज अनेक आजी-आजोबा आपलं वृद्धत्व आनंदाने इथे व्यतीत करीत आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत चालणारं शासनाच्या जिल्हा नियोजन समितीतर्फे सुरू करण्यात आलेलं हे केंद्र विनामूल्य आहे. तेव्हा हा ‘सप्तसोपान’ चढायलाच हवा.

एकदा का ‘विस्मृती’ने ज्येष्ठांना गळामिठी घातली की ती शेवटपर्यंत सुटत नाही, मात्र अशा रुग्णांना हवी असते जपणूक आणि मायेची साथ. ती देते ठाण्यातील ‘सप्तसोपान’ ही संस्था. तीही विनामूल्य. केवळ विस्मृतीच्याच रुग्णासाठी नव्हे तर सर्वच गरजू आजी-आजोबांसाठी ती आता ‘डे-केअर संस्था’ झाली आहे. कधीही आलं तरी आपलं म्हणणारी!
ठाणे शहरातील मध्यवस्तीतला भला मोठा परिसर! तिथल्या इंग्रजकालीन भल्या मोठय़ा बंगलेवजा बॅरक्स! दोन बॅरेक्समधल्या जागेत प्रशस्त चौक! चौकात डेरेदार वटवृक्ष! त्याच्याभोवती सिमेंटचा स्वच्छ चौथरा! दोन्ही बंगल्यांच्या पुढे अंगण, पाठीमागे फुलबाग! सकाळच्या कोवळय़ा उन्हात पारावर बसलेली, काठी टेकत एकेकटी अथवा केअर टेकरच्या जोडीने फिरणारी अनेक वृद्धमंडळी दिसतात. कुणी कॅरमचा डाव मांडून बसतात तर कोणी गप्पांचा फड जमवतात. ‘सप्तसोपान’मधील हे नेहमीचं दृश्य!
ज्येष्ठांमधील समस्या सोडवण्याच्या सात पायऱ्या अर्थात ‘सप्तसोपान’ हे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून शासनाच्या जिल्हा नियोजन समितीतर्फे हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. वाढत्या वयातील ज्येष्ठांची स्मृतिभ्रंश (डिमेंशीआ) ही मुख्य समस्या! त्यासाठी ‘डिमेंशीआ केअर सेंटर’ सुरू करणं हा मूळ उद्देश. मात्र जस जसं वय वाढत जातं तसतसं स्मृतिभ्रंशच नव्हे तर फ्रोझन शोल्डर, पार्किन्सन, पाठदुखी, गुडघेदुखी अशा व्याधीही सुरू होतात. या केंद्राची सुरुवात करताना त्या सगळय़ाचा विचार करून इथे डायथर्मी वा लाइट्स दिल्या जाणं, अल्ट्रासाऊंडसारख्या उपचारपद्धती, हलका व्यायाम करण्यासाठी ट्रेडमीलसारखी साधनं, योगासन वर्ग अशा गोष्टींची सोय करण्यात आली. तसंच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या गटामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सायकॅस्ट्रीक नर्स, ऑक्युपेशनल थेअरपीस्ट, समुपदेशक व समाजसेवक आदींचा समावेश आहे.
ज्येष्ठांना पुरवण्यात येणारी ही सर्व सेवा विनामूल्य आहे हे विशेष! त्यामुळे ‘सप्तसोपान’ हे सर्वच थरांतील ज्येष्ठांचं हक्काचं, निवाऱ्याचं केंद्र झालं आहे. सकाळी ९-१० वाजता हा परिसर ज्येष्ठांनी गजबजून जातो. कोणी स्वत: एकेकटे तर स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना त्यांचे नातलग इथे सकाळी सोडून जातात व संध्याकाळी परत घेऊन जातात. इथे आल्यावर बरेचजण आवारात पाय मोकळे करतात. तोवर योगासनांचा क्लास सुरू होतो. अर्थात वयोवृद्ध वा व्याधीग्रस्त या क्लासला न जाता आपापल्या उपचारांसाठी तज्ज्ञांकडे जातात. ज्यांना हलका व्यायाम घेण्याची इच्छा आहे ते तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ट्रेडमीलवर व्यायाम करतात. तर पाठदुखी, फ्रोझन शोल्डर असे व्याधीग्रस्त ज्येष्ठ डायथर्मी वगैरे उपचार घेणं सुरू करतात. त्यानंतर सर्वाचा आवडता कार्यक्रम अर्थात जेवणाची सुट्टी! ही सर्व  ज्येष्ठ मंडळी इथे आपापला जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, औषधांची पेटी वगैरे घरून घेऊन येतात. अंगतपंगत बसते. हसतखेळत जेवण पार पडतं. जेवणानंतरच्या वामकुक्षीसाठी स्वच्छ बेडस् तयार असतात. हवेशीर खोल्यांमधील डुलकीनंतर आराम करून ताजीतवानी झालेली ज्येष्ठ मंडळी आपापल्या आवडीनुसार आपलं मन रमवतात. कोणी पत्त्यांचा डाव मांडतं तर कुणाचा कॅरमचा ग्रुप जमतो. वाचनाची आवड असणाऱ्या मंडळींची पावलं पुस्तकांच्या कपाटाकडे वळतात. कुणाला बागेत रमावंसं वाटतं तर कुणाला वटवृक्षाच्या सावलीत समवयस्कांशी जुन्या आठवणींचा पट उलगडावासा वाटतो. संध्याकाळ झाली की ग्रुपसेशन असतं. त्यात गप्पा, गोष्टी, गाणी ऐकणं, कविता किंवा विनोदी चुटके  एकमेकांना ऐकवणं असा कार्यक्रम इथल्या समाजसेवकांच्या सोबतीने चांगला तासभर रंगतो.
उन्हं कलली की प्रत्येकाला घरी जायचे वेध लागतात. काही ज्येष्ठांसाठी रिक्षाची सोय आहे. तर कोणाला नातलग घेऊन जातात. हिंडते फिरते जेष्ठ घरी जाता जाता वाटेवरच्या गणेश मंदिरात डोकावतात किंवा गणेश उद्यानातल्या बाकांवर वेळ घालवतात. अनेकजण नातवंडांना शाळेत सोडूनसुद्धा इथे वेळ काढतात. वेळेचं कोणतंही बंधन नसल्याने हे ‘डे केअर सेंटर’ सर्वाना अधिक सोयीचं वाटतं. त्यामुळे इथे रोज येणारे ज्येष्ठ जसे आहेत तसेच अंधेरीहून आठवडय़ातून एकदा तरी आवर्जून येणाऱ्या माने आजींसारखे ज्येष्ठही आहेत.
‘सप्तसोपान हे स्मृतिभ्रंशांच्या रुग्णासाठी खरोखरच वरदान आहे. कारण इथे दाखल होताच अशा रुग्णाला पूर्ण तपासणी करून आधी त्यांच्या व्याधीची तीव्रता जाणून घेतली जाते व त्यानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते. काही रुग्ण आपल्या मुलांना किंवा जोडीदारालासुद्धा ओळखत नाहीत. केवळ माणूस म्हणून त्यांचं अस्तित्व असतं इतकंच. अनेक रुग्ण आपला भूतकाळ पूर्णपणे विसरलेले असतात. पण कमीत कमी त्यांना वर्तमानाची जाणीव असते. म्हणजे पाणी प्या म्हटलं की ते पाणी पितात, पण काही जणांमध्ये त्याही पुढची पायरी असते. म्हणजे पाणी प्या म्हटलं की ते पितात, पण नंतर आत्ताच पाणी प्यायलोय हेच ते विसरून जातात. अशांसाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या आकलनशक्ती वाढविणाऱ्या बैठय़ा खेळांचा खूपच उपयोग होतो. इथले थेअरेपीस्ट त्यांना संयमाने हाताळत त्यांच्याकडून पेपर वाचून घेतात. एखाद्या बातमीत ठरावीक शब्द किती वेळा आलाय तो आधोरेखित करायला सांगतात. त्यांच्यासमोर वेगवेगळे ठोकळे ठेऊन त्यात कोणकोणते रंग आहेत ते ओळखणं, त्याप्रमाणे ते वेगळे करणं, दोऱ्यांच्या साहाय्याने पुठय़ांवरील खिळय़ांवर प्राण्यांचे आकार बनवणं, प्लॅस्टिकच्या प्लेटवरील मोकळय़ा जागेत आकारमानाप्रमाणे ठोकळे बसवणं असे खेळ खेळत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर हसत खेळत उपचार करतात. रोजच्या रोज असे खेळ खेळत राहिल्यावर हळूहळू मेंदूला व्यायाम होतो आणि तो कार्यप्रवण होत जातो. विस्मृतीचे रुग्ण हाताळणं हे खूप कठीण असतं. इथल्या तज्ज्ञ व समाजसेवकांच्या चिकाटी आणि परिश्रमाची कसोटीच असते जणू! कारण अनेकदा त्यांना नुकतंच आपण खाल्लंय हे कळत नाही. ते पाच मिनिटंही एका जागी स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यांना कॅरम खेळायला बसवलं तरी सोंगटी बोटाने उडवायची असते, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. पण संयमाने ती त्यांच्याकडून करून घेतली किंवा ड्रॉईंग काढताना एखादं चित्र त्यांच्यासमोर ठेऊन ते काढायला शिकवलं की अशा सातत्याने केलेल्या गोष्टीत आपोआप त्यांचं मन गुंततं व प्रयत्नांनी त्यांच्या स्मरणशक्तीत निश्चितपणे फरक पडतो. असे ज्येष्ठ इथे नियमित आले, उपचार घेतले तर पुढे ते एकटे कोणाच्या सोबतीशिवायही केंद्रात येऊ शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. अर्थात एरव्ही स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना गेटबाहेर एकटं जाऊ दिलं जात नाही. सतत त्यांच्या सोबत केअर टेकर असतात. शिवाय त्यांना ओळखपत्रही दिलं जातं.
 स्मृतिभं्रशाच्या रुग्णाशिवाय इतरही व्याधीग्रस्त ज्येष्ठांची इथे काळजी घेतली जाते. कुबल आजींना ‘पॅरालिसीस स्ट्रोक’ येऊन गेला होता. सुरुवातीला त्या फिजिओथेरपीचे व्यायाम करायला तयारच व्हायच्या नाहीत. त्यांना मसाज, व्यायाम करून इथल्या सेवाभावी मंडळींनी हळूहळू चालायला लावलं. हळूहळू हात धरून चालता चालता आता त्या व्यवस्थित एकटय़ा चालतात. सविता बेनला आधी बोलायची समस्या होती. त्या अस्पष्ट, तुटक बोलायच्या. सतत तक्रार करायच्या. एकटय़ा कुढत बसायच्या. पण इथल्या ऑक्युपेशनल थेरपिस्टनी त्यांना बोलतं केलं. चारचौघांत मिसळायला लावलं. हळूहळू त्या मोकळय़ा झाल्या. आज त्या उत्तम कॅरम खेळतात.
बरेचदा शारीरिक व्याधींमुळे अथवा वयपरत्वे शक्ती क्षीण झाल्यामुळे आपण निरुपयोगी आहोत याची ज्येष्ठांना खंत वाटत असते. त्यामुळे ते तणावग्रस्त होऊन कोषांत जातात. कोणाशी संवाद साधत नाहीत आणि पुढे ते अत्यंत एकाकी होतात. त्यांचं एकाकीपण समजून घेतलं आणि कुटुंबीयांच्याही ते लक्षात आणून दिलं आणि त्यांच्यात संवादाचा पूल उभारला की पुन्हा एकदा हे ज्येष्ठ हसत खेळत मजेत जगू लागतात. विशेषत: विस्मृतीचे रुग्ण त्यांना काय हवंय, काय त्रास होतोय, कुठे दुखतंय हेच सांगू शकत नाहीत. घरी असताना कुटुंबीयांनी ते कसं जाणून घ्यावं, त्यांच्या अडचणी कशी ओळखाव्या व सोडवाव्यात हे ‘सप्तसोपान’मधील सर्वजणच मनोभावे सांगतात. लोकांना पटवून देतात. या सर्व सोयीसुविधांमुळे आज अनेक आजी-आजोबांचं आयुष्य सुसह्य़, आनंदी झालं आहे.    
 ‘सप्तसोपान’चे प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र शिरसाट तळमळीने सांगतात, ‘‘ज्येष्ठांनी इथल्या सर्व विनामूल्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. एखाद्या सामाजिक संस्थेने मदत केल्यास बससेवा सुरू करून ज्येष्ठांची येण्याजाण्याची अडचण सोडवण्याचाही आमचा मानस आहे. ज्येष्ठांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. आपण त्यांच्यासाठी इतकं तरी करू शकतो ना?’’  
 संपर्क  सप्तसोपान
-०२२ -२५८२०७२८,    ९३७३००४६५९

आजी-आजोबांच्या शारीरिक,मानसिक व्याधी दूर करणाऱ्या अनेक संस्था आज कार्यरत आहेत. तसंच त्यांचा एकटेपणा दूर करणाऱ्या, त्यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणाऱ्याही अनेक संघटना आज स्थापन झाल्या आहेत. हे सदर अशाच संस्था, संघटना, गटांची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. तुम्हीही कळवू शकता तुमच्या परिसरातील अशा संस्था वा सोयीसुविधा पुरवणाऱ्या संघटना, गटांची माहिती. ज्यांचा उपयोग आपल्याच आजी-आजोबांना होऊ शकतो. तुम्ही तुमची माहिती या ई-मेलवर पाठवू शकता.
 madhuri.m.tamhane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 4:28 am

Web Title: saptasopan the care organization
टॅग Chaturang
Next Stories
1 संगणकाशी मत्री : तयार करा ई-मेल आयडी
2 गुडघ्यांचे सांधे करा बळकट
3 खा आनंदाने – चवीने खाणार..
Just Now!
X