साधना तिप्पनाकजे

अरुणाताईंनी योग्य नियोजनासह सर्व कामं दिलेल्या वेळेत उत्कृष्टपणे करवून घेतली, परिणामस्वरूप यंदाच्या प्रजासत्ताकदिनी त्यांच्या गावाला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ स्वच्छता अभियानात जिल्हापातळीवर प्रथम पारितोषिक मिळालं. तर वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हा पातळीवर ‘कै. आबासाहेब खेडकर’ तिसरं पारितोषिक मिळालं. गावात पूर्ण प्लास्टिक बंदी, शाळांमध्ये मुलांसाठी सोयी, सुटलेला पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे डांबरीकरण, घरकुल योजना आदींमुळे सातारा जिल्ह्य़ातल्या खोजेवाडीच्या ग्रामपंचायतीतलं चित्र बदललंय. त्या सरपंच अरुणा जाधव यांचा हा प्रवास.

सातारा जिल्ह्य़ातल्या खोजेवाडी गावच्या सरपंच अरुणा जाधव यांचा कार्यकर्ती म्हणून प्रवास सुरू झाला तो बचतगटांच्या निर्मितीपासून. बचतगट तयार करणे, त्यांचे हिशेब तपासणे, वेळच्या वेळी नोंदी करणे या कामांपासून ते बचतगटासाठीच्या प्रशिक्षक अशी कामं करता करता त्या गावातल्या अधिकाधिक स्त्रियांशी जोडल्या जाऊ लागल्या. त्यांच्या प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळेच त्या सरपंच म्हणून आज खोजेवाडीचा कारभार उत्तमपणे सांभाळत आहेत.

त्या लहान असतानाच वडिलांचं निधन झालं, आईनंच चारही मुलांना प्रचंड कष्ट करत दहावीपर्यंत शिकवलं. त्या वेळी इच्छा असूनही परिस्थितीमुळे अरुणाताईंना पुढचं शिक्षण घेता आलं नाही. मात्र रीतीप्रमाणे त्यांचं लग्न झालं आणि त्या खोजेवाडीत आल्या. सुरुवातीला संसार आणि दोन मुलांच्या देखभालीत पाच वर्षे गेली. मग जरा मोकळा वेळ मिळू लागला, तसं अरुणाताईंना ‘काहीतरी केलं पाहिजे, उगीच वेळ वाया नको घालवायला’ असं वाटू लागलं. मग त्यांनी तीन महिन्यांचं अंगणवाडी सेविका प्रशिक्षण घेतलं. परंतु वय लहान असल्याने त्यांना ती नोकरी मिळू शकली नाही.

त्यानंतर दोनच वर्षांनी, २०१३ मध्ये, पंचायत समितीच्या बचतगटाच्या गट समन्वयक पूनम गायकवाड ग्रामपंचायतीत आल्या असताना त्यांनी अरुणाताईंना बचतगटांविषयी सविस्तर माहिती दिली. त्याआधारे अरुणाताईंनी गावात १५ बचतगट सुरू केले. या बचतगटांना २०१४ पासून कर्ज मिळायला सुरुवात झाली. गावात दहा वर्षांपासून दोन बचतगट होते. पण सदस्या वयस्कर असल्याने गटाच्या नोंदी व्यवस्थित ठेवू शकत नव्हत्या. अरुणाताईंनी या बचतगटांच्याही नोंदी, हिशोब व्यवस्थित करून दिल्या. यातल्या ‘राजमाता बचतगटा’ला सलग दहा वर्षे सुरू असणारा, प्रत्येक स्त्रीच्या दहा-दहा शेळ्यांचं नीटपणे व्यवस्थापन, नोंदी ठेवणारा म्हणून शासनाचा सर्वोत्कृष्ट बचतगटाचा पुरस्कारही मिळाला.

बचतगटाच्या कामांच्या निमित्ताने अरुणाताईंचं पंचायत समितीत येणं-जाणं वाढू लागलं. तसं त्यांना शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती होऊ लागली. विशेषत: स्त्रिया आणि आरोग्य याविषयीच्या जास्तीतजास्त योजनांची त्या माहिती घेऊ लागल्या. ही माहिती त्या गावातील इतर स्त्रियांपर्यंतही पोचवू लागल्या. अरुणाताई आणि बचतगटातल्या स्त्रिया ग्रामपंचायतीकडून या योजनांची मागणी करू लागल्या आणि त्याची अंमलबजावणीही होऊ लागली. स्त्रियांचा उत्साह वाढू लागला. नोव्हेंबर २०१५ मध्ये बचतगटांच्या प्रशिक्षणाकरता जे प्रशिक्षक लागतात, त्या प्रशिक्षक पदाकरता शासनातर्फे अरुणाताईंची निवड झाली. यानंतर ताई वेगवेगळ्या गावांमध्ये बचतगटांच्या प्रशिक्षणाकरता जाऊ लागल्या. त्याच्या संभाषणकौशल्याचा परिणाम म्हणून बचतगटांची संख्या वाढू लागली. दरम्यान, अरुणाताईंना आपल्या अपुरं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावंसं वाटू लागलं. रात्र महाविद्यालयात प्रवेश घेऊन, २०१७ मध्ये त्या बारावी उत्तीर्ण झाल्या.

ऑक्टोबर २०१७ मध्ये खोजेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. या वेळचं सरपंचपद इतर मागास वर्गातील स्त्रियांकरता राखीव होतं. गावातल्या दोन्ही राजकीय पक्षांनी अरुणाताईंचं नाव सरपंचपदाकरता सुचवलं. राजकारणात येण्याचा तोपर्यंत अरुणाताईंचा  विचार नव्हता. त्यांनी सर्वाना नम्रपणे नकार दिला. मात्र काही गावकरी आणि त्यांचे मोठे दीर यांनी त्यांना समजावलं, ‘‘इतकी वर्ष स्त्रियांसाठी इतकं विधायक काम करत आहेस, संघटना बांधत आहेस, मग संपूर्ण गावाकरता काम करण्याची संधी मिळत आहे तर का नको म्हणतेस?’’ अखेरीस अरुणाताई तयार झाल्या आणि त्यांनी थेट सरपंचपदासाठी निवडणुकीचा अर्ज भरला. दोन उमेदवारांचा पराभव करत अरुणाताई सरपंचपदी निवडून आल्या. पदभार स्वीकारण्याच्या दहा दिवस आधी एका शासकीय कार्यक्रमाकरता गावात जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी आले होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अरुणाताईंना गावात स्वच्छता अभियान राबवण्याकडे आणि गांडूळ खत प्रकल्प उभारण्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. पदभार स्वीकारल्यावर अरुणाताईंनी पहिलं काम गांडूळ खताकरता शेड बांधण्याचंच केलं. याकरता चौदाव्या वित्त आयोगातील २०१६-१७ या वर्षांतला निधी वापरण्यात आला.

गावात दहावीपर्यंत शाळा आहे. यातल्याच निधीतून शाळेत डिजिटल शिक्षणाकरता दोन एलईडी टीव्ही देण्यात आले. ग्रंथालयात कपाट आणि पुस्तके देण्यात आली. गावात तीन अंगणवाडय़ा आहेत. या तिन्ही अंगणवाडय़ांमध्ये मुलांना बसण्याकरता बाकं, गणवेश आणि स्वयंपाकाकरता गॅसजोडणी देण्यात आली. गावात संपूर्ण प्लास्टिक बंदी केली. गावाकरता घंटागाडी बुक केली. या गाडीकरता एक लाख रुपये कमी पडत होते. मग ग्रामपंचायतीच्या बँकेतल्या एका कायम मुदतीच्या गुंतवणुकीचा वापर करण्यात आला. या रकमेतून मग गाडीची पूर्ण रक्कम देण्यात आली. या घंटागाडीमुळे गावातला ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येतो आणि त्याची विल्हेवाट लावण्यात येते. घंटागाडी आणि गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पामुळे गावातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला. गाव पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. ऊस, सोयाबीन, ज्वारी, टोमॅटो, आलं, वांगी ही मुख्य पिकं आहेत. गांडूळ खताची विक्री खोजेवाडीत आणि आजूबाजूच्या गावांतही होते. यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं.

त्यांच्या गावाहून सातारा २५ किलोमीटर अंतरावर आहे. पण गावातून थेट बससेवा नव्हती. त्यामुळे साताऱ्याला जाणाऱ्या बस आधीच भरून यायच्या, त्यामुळे खोजेवाडीच्या प्रवाशांचे हाल व्हायचे. अरुणाताईंच्या प्रयत्नांनी गावातून साताऱ्याकरता सकाळ-संध्याकाळ एक-एक फेरी अशी थेट बससेवा सुरू झाली. अरुणाताईंनी पुढचं काम हातात घेतलं जलसंधारणाचं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजने’अंतर्गत चार विहिरी बांधण्यात आल्या. त्यांना भरपूर पाणी लागलं. आधीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेल्या ‘जलयुक्त शिवार योजने’तील बंधाऱ्याचंही काम पूर्ण झालेलं असल्याने गावात पाणी पुरेशा प्रमाणात आहे. अरुणाताईंनी बौद्ध वस्तीत पाण्याची टाकी बांधली. गावातील रस्त्यांचं संपूर्ण डांबरीकरण करण्यात आलं. गटारं बंदिस्त करण्यात आली. पुढच्या टप्प्यात अंगणवाडय़ांमध्येही एलईडी टीव्ही देण्यात आले. गावात ‘रमाई आवास योजने’अंतर्गत पाच घरं तर पंतप्रधान आवास योजनेतून २० घरे झाली आहेत. स्मशानभूमीत तीन दाहिन्या बसवण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचीही सुधारणा अरुणाताईंनी करवून घेतली. संपूर्ण केंद्राची दारं, खिडक्या जीर्ण झाल्या होत्या. यामुळे स्त्रीरुग्ण आणि स्त्री कर्मचाऱ्यांची खूप गैरसोय व्हायची. सगळीकडे चांगल्या दर्जाचे दरवाजे आणि खिडक्या बसवण्यात आल्या. त्याबरोबरच वॉश बेसिन, प्रसूतिकक्षात शौचालयाची सोय करण्यात आली. रंगरंगोटीही करण्यात आली.

गावची अडीच-तीन एकर गावठाणाची जमीन पडून आहे. या जागेत जलशिवाराचा बंधारा असूनही पुष्कळ जमीन मोकळी आहे. याआधीच्या सरपंचांनी तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न केला पण ही झाडं जगली नाहीत. अरुणाताईंनी श्रमदानानं खड्डे खणून ‘प्रतिष्ठान’ जातीची चिंचेची रोपं लावली. जेणेकरून गावच्या उत्पन्नात वाढ होईल. पाणीपुरवठय़ाचा पंप जळाल्याने महिनाभर पाणी न मिळाल्याने बरीचशी रोपं करपली. आता कृषी खात्याच्या मदतीने या जागेत पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या ओसाड माळरानाला हिरवंगार करण्याचा चंग अरुणाताईंनी बांधला आहे.

पूर्वी ग्रामसभांमध्ये राजकीय पक्षांची भांडणंच जास्त व्हायची. बचतगटाच्या रेटय़ाने महिलासभा व्हायच्या पण नावापुरत्या. आता महिलासभा चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. ग्रामसभेत आता भांडणं होत नाहीत तर विकासकामांवर चर्चा होतात. ‘महिला व बालकल्याण विकास निधी’तून स्त्रियांकरता कापडी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. गावातल्या काही स्त्रियांचा गैरसमज होता, की स्त्रियांना रोजगाराकरता ग्रामपंचायत शिलाई मशीन देतं आणि आपली ग्रामपंचायत आपल्याला देत नाहीये. मग एका महिलासभेला पंचायत समिती महिला सभापतींना बोलावून स्त्रियांसमोर स्पष्ट करण्यात आलं की, राज्य आणि केंद्र सरकारची योजना ग्रामपंचायत राबवते. याबाबतीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला अधिकार आहेत. वैयक्तिक लाभाच्या सरकारी योजनांकरताही अरुणाताई ग्रामपंचायतीद्वारे गावकऱ्यांना सहकार्य करतात.

सरपंचांसह सत्ताधारी गटाचे सहा आणि विरोधी गटाचे चार असे एकूण दहा जण ग्रामपंचायतीत आहेत. अरुणाताईंची काम करण्याची पद्धत, कामाची तडफ, सर्वाशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे विरोधी गटानेही कधी कामात आडकाठी केली नाही. एखादा विषय बठकीत मांडल्यावर सर्वानुमते त्यावर निर्णय घेण्यात येतो. ‘विरोधासाठी विरोध’ हे खोजेवाडीच्या ग्रामपंचायतीतलं चित्र अरुणाताईंमुळे बदललंय. अरुणाताईंच्या या गतिमान कामांचं फलित गावाला मिळालं. योग्य नियोजनासह त्यांनी सर्व कामं दिलेल्या वेळेत उत्कृष्टपणे करवून घेतली. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी त्यांच्या गावाला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियाना’त जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक मिळालं. तर वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हा पातळीवर ‘कै. आबासाहेब खेडकर’ तिसरं पारितोषिक मिळालं. अजून त्यांचा तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. गावातील स्त्रियांकरिता ठोस रोजगारनिर्मिती व्हावी यासाठीची योजना त्यांना राबवायची आहे.

आज जेव्हा कोणत्याही शासकीय कार्यालयात अरुणाताई जातात, तेव्हा तेथील अधिकारी ‘खोजेवाडीच्या सरपंच अरुणाताई’ असं संबोधतात तेव्हा आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटतं. बचतगट कार्यकर्ती असताना बुजरी असणारी अरुणा, ‘यशदा’च्या प्रशिक्षणामुळे कामात वाघ झाल्याचं अरुणाताई स्वत:च सांगतात. सध्या अरुणाताई दूरस्थ शिक्षणपद्धतीद्वारे पदवीच्या दुसऱ्या वर्षांची परीक्षा देत आहेत. आणि अर्थातच राज्यशास्त्र हा त्यांचा विशेष विषय आहे.

अरुणाताई स्त्री सरपंचांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल पोटतिडकीने बोलतात. सरकारची किंवा सगळ्यांची अपेक्षा असते की, महिला सरपंचाने रोज १० ते ५ या वेळात ग्रामपंचायत कार्यालयात बसलं पाहिजे. सरपंचांना गावच्या लोकसंख्येनुसार पंधराशे-सोळाशे रुपये मानधन मिळतं. कामाकरता, प्रशासकीय कार्यालयात किंवा इतरत्र जाण्याचा प्रवासखर्च त्यांना स्वत:च करावा लागतो. अनेक स्त्री सरपंच आर्थिकदृष्टय़ा मागास आहेत. आरक्षणामुळे त्या पदावर आल्या मात्र रोजंदारीवर मोलमजुरी किंवा इतर काहीतरी काम करणाऱ्या या सरपंचांचा रोजगार बुडतो. ताई म्हणतात, ‘‘शासनाने सरपंचांचं मानधन वाढवलं तर या स्त्रियांना गावविकासाचं काम करताना आणखी बळ येईल.’’

त्याचा विचार नक्की व्हायला हवा..

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com