14 August 2020

News Flash

साथ मिळाली तर जमतंच!

सरपंच!

(संग्रहित छायाचित्र)

सुवर्णा गोखले

शिवरे गावात पाच महिला सरपंच झाल्या, पण सारिका शंकर बुचडे यांचं सरपंच म्हणून काम लक्षणीय ठरलं ते त्यांनी केलेल्या काही विधायक कामांमुळे. त्यांच्या ग्रामपंचायतीत येण्यामुळे वस्तीचे गावातले प्रतिनिधित्व वाढले होते. छोटय़ामोठय़ा कार्यक्रमांना वस्तीचा सहभाग वाढू लागला. समाज मंदिरात ग्रामसभेचा अजेंडा लावला जाऊ लागला. ग्रामसभेला लोक आवर्जून यायला लागले. त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भरीव कामाची पावती तर गावात फिरताना मिळत होती.

स्त्री सरपंच गावात घडणे आणि ‘ती’ने गावासाठी काम करणे हे गावाच्या पार्श्वभूमीवर खूपच अवघड असते. कारण ग्रामीण समाजाचा विचार केला तर ‘बाई’ला तसा मान कमीच असतो. शहरात एखाद्याने/ एखादीने ठरवले की राजकारणातला ‘रा’ सुद्धा उच्चारायचा नाही तरी दैनंदिन जीवनात स्वयंपूर्ण असल्यामुळे तसे फारसे कोणाचे अडत नाही. रस्त्याने जाणाऱ्या शहरातल्या त्या वॉर्डमध्ये राहणाऱ्या कोणालाही विचारले की, ‘या वॉर्डचा/ची नगरसेवक/सेविका कोण आहे?’ तर जागरूक नागरिक म्हणून जरी मतदान केले असले तरीसुद्धा सगळे बरोबर, लगेच उत्तर देता येईलच असे नाही.

ग्रामीण जीवनात मात्र चित्र वेगळे असते. लोक एकमेकांवर खूप अवलंबून असतात. कायद्याने प्रमाणित नसली तरी पूर्वापार चालत आलेली समाजातली उतरंड अजूनही सगळ्यांच्या मनातून गेलेली नसते. काम देणारा आणि त्याच्याकडे कामाला जाणारा हे एकमेकांना पुरेसे ‘ओळखून’ असतात एवढेच काय पण ते त्यांच्या आख्ख्या कुटुंबाला कधी कधी तर पूर्ण भावकीलासुद्धा ओळखत असतात. गावातल्या राजकारणात हे अंर्तसबंध खूपच महत्त्वाचे असतात. काही जणांना याचे दडपणसुद्धा असते. कोणाला निवडणुकीत उभे करायचे तर काय ‘आडनाव’ असणाऱ्या व्यक्तीने, असा स्वाभाविक विचार होतो. गावाचे जे आडनाव असते त्याला स्वाभाविक पाठिंबा जास्त मिळतो.

या पार्श्वभूमीवर आरक्षणातून त्यातही महिला आरक्षणातून सरपंच झालेल्या मातंग समाजातल्या सारिका शंकर बुचडे हिचं काम वेगळं उठून दिसणारं वाटतं. गेल्या वेळेच्या निवडणुकीत तिच्या वयाच्या बायका घेतल्या तर तीच सगळ्यात जास्त शिकलेली, म्हणजे चौथी झालेली! म्हणून वस्तीने तिला निवडून दिले. खरं तर ‘ती’च्या इच्छेपेक्षा बाकीच्यांच्याच आग्रहामुळे शिवरे गावातल्या ग्रामपंचायतीत ती सदस्य म्हणून दाखल झाली. पाच वर्ष संपली पण फारसा अनुभव मिळाला नाही. ग्रामपंचायतीत ‘हे काय चाललंय’ अशी माहिती घ्यायचीसुद्धा तिची कधी हिंमत झाली नव्हती, विचारली तर कोणी माहिती दिली नसती असं नाही, पण संकोच!

..सारिका गावापासून थोडी लांब वस्तीवर राहात असल्यामुळे गावातल्या माणसात मिसळायची तशी सवयच नव्हती, ती गावातल्या लोकांना नावानिशी ओळखतही नव्हती. अशी ओळख ग्रामपंचायतीत निर्णय येण्यासाठी महत्त्वाची ठरते हेच तिचं या काळात शिक्षण झाले. ग्रामपंचायतीत ‘काय’ माहिती करून घेतली जाते आहे या पेक्षा ‘कोण’ माहिती घेतंय, ‘का’ माहिती घेतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. हे तिला सदस्य असताना पुरेपूर समजलं. सासरे हयात असेपर्यंत पारंपरिक झाडू बनवायचे काम घरात चालायचे, पण थोडीफार शिकलेली असल्यामुळे तिने जातीच्या कामापेक्षा एका छोटय़ाशा मसाल्याच्या कारखान्यात काम करणे स्वीकारले होते. नवऱ्यासारखा तिचाही पगार महिन्याच्या महिन्याला घरात यायचा. त्यामुळे खाऊन पिऊन सुखी घरात ती राहायची. तिला राजकारणाची आवड नव्हती पण गेल्या वेळीसुद्धा कोणीतरी उभे राहायला पाहिजे नाहीतर पद रिक्त राहील म्हणून सारिका खरंतर सदस्य झाली होती.

ग्रामपंचायतीत सदस्य असताना ‘ती’ला वाटायचं ही तर माझी पहिलीच वेळ आहे. माझ्यावर काही ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही. त्यात तिचं घर राजकारणापासून दूर होतं. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्यामुळे महत्त्वाकांक्षेपोटी तिने कधी सदस्य असताना फारसे काही केले नाही. मग पुढच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. शिवरे गावात नऊ प्रतिनिधींची ग्रामपंचायत होती. आणि या वेळी राखीवमधल्या स्त्रीसाठी सरपंचपद होतं. मग वस्तीनं मला उभं करायचं ठरवल्यावर कामाला लागले. आधार कार्ड, जातीचा दाखला, पॅन कार्ड, पडताळणी दाखला सगळं मी काढलं. तयारी केली. मग वस्तीने बिनविरोध निवडून दिलं आणि मी शिवाऱ्याची सरपंच झाले. सारिका शिवरे गावातली पाचवी स्त्री सरपंच होती. सरपंचपदावर स्त्री असणं गावाला नवीन नव्हतं, पण ‘राखीव’मधली स्त्री गाव चालवणार हे नवीन होतं. सरकारचा नियम होता म्हणून वस्तीतली स्त्री प्रथमच सरपंच झाली! काही काही गावांत स्त्रीसाठी राखीव असेल तर हे पद रिक्त राहील असं पाहिलं जातं आणि मग पदावर कोणी नाही म्हणून उपसरपंच (बहुतेकदा पुरुष) कारभार चालवतो. तसे इथे झाले नाही. सारिका सरपंच झाली, पण काम काय करायचं नि कसं करायचं या गोष्टीचं ‘ती’ला दडपण येतंच होतं. गावात पशाने आणि मानापानाने एकापेक्षा एक क्षमता असणारे वरचढ पुढारी होते, राजकारणातले दर्दी होते. ‘कसं काम करते बघू या’ असं बघणारे गावकरीही होतेच. कोणाच्याही वाटेला जायचे नाही हे तिनं पक्कं ठरवलं. सारिका गरजेपुरते बोलून आब राखणारी होती, तिला मदत केली ती गावच्या रुक्मिणीताईने! सारिका तिला वहिनी म्हणते. गेली १५ वर्ष वहिनी तिच्या वस्तीवर येत होती. हिला आणि इतरांना बचत गटात घेत होती. अडीनडीला गटातून लाखो रुपयांची मदत करत होती. या वहिनीमुळे सारिका गटाचे काम करायला बँकेत गेली होती. त्या वहिनीने पण फॉर्म भरायचा ठरवला होता पण गावाच्या लोकांनी मान्य केलं नाही मग एकटीनेच अपक्ष म्हणून लढवलं आणि जिंकून आली. ती वहिनी ‘ती’ची पाठराखीण होती जणू. चार माणसांत वावरलेली. गावाचं राजकारण जवळून ओळखलेली पण तरी अपक्ष! जमली दोघींची जोडी. एरवी एखादा पुरुष सभासद असता तर सोबत कुठं जावं लागलं असतं तर अवघडायला झालं असतं पण वहिनीमुळे सारिका पुढे झाली.

कशी कामाला सुरुवात केली याविषयी सारिकाशी बोलत होते. ती म्हणाली, ‘‘एकटी सरपंच काही करू शकत नाही. म्हणून विरोधकांना सुद्धा धरून दर महिन्याच्या महिन्याला ग्रामपंचायतीतल्या सगळ्या सदस्यांची बैठक घ्यायची नक्की केले. सगळे निर्णय सर्वासमोर एकमताने घेतले गेले. ग्रामसेवक बठकीला कायम हजर असायचा, तो सारं लिहून ठेवायचा. काही जण बठकीत आडवं लावतील का? अशी भीती वाटायची मला, पण प्रसंग आला तर वहिनी पुढे व्हायची. मी तोंड बंद ठेवायला शिकले. मला काय बोलायला तोंड नाही का? पण बोलले तर भांडण होणार, भांडण झाले की काम अडणार.. या गावची कामं या अशा भांडणामुळे किती तरी नडली. मग मी ठरवलं भांडण होण्यापेक्षा बोलायचं नाही पण करायचं.’’ जाताजाता तिने माहिती दिली की गावात नऊ जणांची ग्रामपंचायत असली तरी सभासद आठ आहेत. नवव्या जागेसाठी कोणी उभंच राहिलं नाही, पुन्हा संधी आली तरी तसंच झालं. असे भांडणाला लोक कंटाळले आहेत म्हणा किंवा घाबरले आहेत. बोलता बोलता वहिनी आल्या. दोघींनी मिळून काय काय कामे केली त्याची यादीच सांगितली.

गावाला अभिमान वाटेल असे मोठे मंदिर बांधायचे ठरवले आहे. त्यासाठी देणग्या गोळा करतो आहोत. काही लाख जमवले, काही जमवतो आहोत. हे सांगताना मंदिरामुळे शाळेचे वर्ग पाडावे लागले म्हणून गावकीची तीन गुंठे जागा रीतसर शाळेला दिली. विरोधकांना सांभाळून घेतलं पण गावची हायस्कूल गावाबाहेर जाणार नाही, अशी काळजी घेतली. आता शाळेचे बांधकाम चालू आहे ते आवर्जून दाखवले, गटाराचे काम केले, गावात स्मशानभूमी बांधली, जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक गावाच्या पशांतून घेऊन दिले, फिल्टर बसवला हे सांगितले. या कामासाठी नियोजन करणे पैसे उभे करणे, उभे राहून काम करून घेणे सारे दोघींनी मिळून केले हे सांगताना लेटरहेड पण छापली असे सांगितले. ‘‘आमच्या गावच्या लेटरहेडवर सगळ्या सदस्यांची नावे येतील असे पाहिले. नाहीतर एरवी फक्त सरपंच नि उपसरपंचांचीच नावे असतात.’’ असे छोटे छोटे प्रसंग सांगितले ज्यात ती तिची गुंतवणूक दाखवणारी गोष्ट सारिका उलगडून सांगत होती. वस्तीसाठी स्वतंत्र टाकी बांधून वस्तीला पाण्याची सोय केली हे तिने आवर्जून सांगितलं. यांच्याचमुळे मी सरपंच झाले असे लक्षात ठेवून केले. सारिका बोलता बोलता मध्येच एखादा अनुभव सांगायची. बारीकसारीक स्वत:चं निरीक्षण अगदी नि:संकोच सांगत होती.

बचत गटामुळे तिच्या पाठीशी पण चार लोक आहेत असा सोबतच्या स्त्रियांवरचा विश्वास तिच्यात दिसत होता तरी येणारं दडपण असं शब्दबद्ध होत होतं, ‘‘खुर्चीवर बसल्यावर कोणी सही कर म्हटलं तर अजूनही सही करताना हात थरथरतो. पण वहिनी असली की काळजी नाही वाटत. घेईल सांभाळून असं वाटतं.’ वहिनीवरचा दुर्दम्य विश्वास तिच्या पाठीशी होता. गावातल्या वहिनीची कामामुळे ओळख झाली नव्हती, तर तिच्यामुळे मी अशा कामात आली होती म्हणून ‘ती’चा आधार होता. बाईला बाईची मदत असली की बरं असतं. कोणी पुढारी आला की, आम्ही दोघी जातो त्यांना भेटायला. आता असं कुठे जायला भीती वाटेनाशी झाली.

सारिकाने कामावर सांगून ठेवले होते ग्रामपंचायतीच्या कामासाठी कुठे जावे लागले तर सोडायचे. त्या दिवशीचा खाडा धरला जायचा, त्या दिवशीच्या कामाचे पैसे मिळायचे नाहीत तरी घरून कधी विरोध झाला नाही. घरून पूर्ण साथ मिळाली. लहान वयात लग्न झालं.. आता पोरीचे पण लग्न झाले. पोरं आपापले बघतात.’’

सारिका सांगत होती पण गावात केलेल्या कामावरून तिने गावासाठी न बोलता पुरेसा वेळ दिला आहे हे लक्षात येत होतं. तिच्या ग्रामपंचायतीत येण्यामुळे वस्तीचे गावातले प्रतिनिधित्व वाढले होते. आता छोटय़ामोठय़ा कार्यक्रमांना वस्तीचा सहभाग होता. समाज मंदिरात ग्रामसभेचा अजेंडा आता चिकटवला जायला लागला. तिथूनही ग्रामसभेला लोक आवर्जून यायला लागले. सारिकाला ओळखणारे, तिचा आत्मविश्वास वाढला आहे हे आवर्जून सांगत होते. या वेळच्या पदाधिकाऱ्यांच्या भरीव कामाची पावती तर गावात फिरताना मिळत होती.

तिचं ते रूप पाहून वाटत होतं सावकाश होत आहेत पण ‘महिला राखीव’ जागांमुळे समाजात विधायक बदल नक्कीच घडत आहे!

suvarna.gokhale@jnanaprabodhini.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:06 am

Web Title: sarpanch female sarpanch success stories 2
Next Stories
1 अक्षय दीप
2 परित्यक्ता चळवळ स्त्री-पुरुषांच्या मुक्ततेसाठी
3 सप्तपदीतलं वचन
Just Now!
X