27 January 2020

News Flash

गावाचा विकास ते ग्रामस्थांची प्रगती

सरपंच!

(संग्रहित छायाचित्र)

चारुशीला कुलकर्णी

सरपंचपद मिळाल्यानंतर गावाच्या विकासाबरोबर ग्रामस्थांच्या व्यक्तिगत आयुष्यातही चांगला बदल घडवला तर त्या पदाचा मान राखल्यासारखा तर होतोच शिवाय लोकांमध्येही आदर वाढतो. दिंडोरी तालुक्यातील लखमापूरच्या माजी सरपंच

ज्योती विजय देशमुख यांनी पाणी प्रश्न, स्वच्छतागृहे याबरोबर दारूबंदी करुन अनेक संसार वाचवले, १६ हजार रोपांची लागवड करून स्त्रियांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला आणि बेटी बचाव अंतर्गत मुलींच्या प्रगतीचा मार्ग नक्की केला. या सगळ्या प्रवासात राजकारणालाही सामोरं जावं लागलं. तरीही आदर्श ग्रामपंचायत, आदर्श सरपंच आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

‘ताई नवरा रोज दारू पिऊन येतो. त्याची दशा आणि घराची अवस्था, तुम्ही नाही समजू शकत. वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झालं. तेव्हापासून हे चित्र बदलेलं नाही. एके दिवशी ठरवलं बस्स झालं. आता आर या पार. आपल्या नवऱ्याची जिंदगी सुधरवायची आणि गावात मद्यपान करणाऱ्या इतरांचीही. त्या निश्चयाने आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक चढ-उतार अनुभवले. गावात दारूबंदीसाठी उभारलेला लढा सरपंचपदापर्यंत घेऊन गेला. दारूबंदीपाठोपाठ पाणीपुरवठा योजनेतून टंचाई मुक्ती साधता आली. १६ हजार रोपांची लागवड, संगोपन, स्वच्छतागृहे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ अशी अनेक कामे दृष्टिपथास आली..’

दिंडोरी तालुक्यातील लखमापूरच्या माजी सरपंच ज्योती विजय देशमुख सांगत होत्या. कामांची यादी एका झटक्यात सांगता येते. मात्र, ती पूर्णत्वास नेताना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. अनेक अडचणींवर मात करावी लागली. राजकारणाचे वेगळे पदर अनुभवण्यास मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव. त्याचे सरपंचपद भूषविण्याची संधी दारूबंदीसाठी उभारलेल्या लढय़ातून देशमुख यांना मिळाली. नांदगाव तालुक्यातील मांडवड हे ज्योती यांचे माहेर. वयाच्या चौथ्या वर्षीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबा पोलीस पाटील. त्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. सभोवताली काय घडतंय, काय करायला हवं, असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपोआप मिळत होती. आठवीची परीक्षा झाल्यानंतर घरच्यांनी ज्योती यांचं लग्न लखमापूर येथील विजय देशमुख यांच्याशी लावून दिलं. विजय यांचा शिवणकामाचा व्यवसाय. घरच्यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाकडे दुर्लक्ष केलं. नवऱ्याला झोकांडय़ा देत घरी येताना पाहिलं की, ज्योती यांच्या काळजात धस्स होई. हे किती दिवस चालायचं, हा प्रश्न एकदा स्वत:लाच त्यांनी विचारला. मग यातून बाहेर पडायचं ठरवलं. अगदी लहान मुलांप्रमाणे नवऱ्याला दारू पिऊ नका, अशी विनवणी करण्यापासून ते पुस्तक वाचनातून व्यसनमुक्त कसं होता येईल असे दाखले देण्यापर्यंतचे पर्याय अवलंबले. त्यास यश मिळून विजय व्यसनमुक्त झाले. नवऱ्यात घडवलेला बदल ज्योती यांना गावातील दारूबंदीसाठी प्रेरणा देणारा ठरला. सभोवतालची मंडळी, तरुण पिढी हातभट्टी, देशी दारूच्या नादात बरबाद होत होती. अनेकांचे संसार उघडय़ावर येत होते. गाव व्यसनमुक्त करायचं, हा निश्चय करत त्यांनी कामाला सुरुवात केली. प्रत्येक घरात जाऊन प्रबोधन केलं. प्रारंभी नवऱ्याच्या भीतीमुळे स्त्रिया पुढे येत नव्हत्या. दुसरीकडे देशमुख घरातील सून गावात घरोघरी जाते आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.  टोमणे मारणं झालं. सातत्याने संवाद साधल्याने काही स्त्रिया पुढे सरसावल्या. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर झाला. तेव्हा अवैध धंदेचालकांचा दबदबा होता. पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा पार पडली. पोलिसांनी तुम्हाला माहिती असणारे दारूअड्डे दाखवा. आम्ही लगेच कारवाई करतो, असं सांगताच स्त्रियांनी एकाच दिवशी गावातील अड्डे उद्ध्वस्त केले. लखमापूर ‘दारुमुक्त’ झाले. घराघरातील स्त्रिया आनंदल्या. पण हा प्रश्न पूर्णपणे मिटलेला नव्हता. गावापासून तीन किलोमीटरवर शासनमान्य दारू दुकान होते. ते दुकान बंद करण्यासाठी न्यायालयात पदरमोड करत स्त्रियांची बाजू मांडली. राज्य सरकारकडे दाद मागितली. अथक प्रयत्नांती सरकारने शासनमान्य दारूचे दुकान कायमचं बंद झाल्याचं पत्र पाठवलं.

या यशामुळे गावात ज्योती यांचं महत्त्व वाढलं. दारूबंदीच्या लढय़ाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रभावित झाले. त्यांच्या शाबासकीने ज्योती यांचा उत्साह अधिकच दुणावला. मद्य विक्रेत्यांच्या धमक्यांना भीक न घालता गावात काम सुरू झालं. या घडामोडीत २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं. गावातील ज्येष्ठ मंडळींनी ज्योती यांना राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांच्या मनात राजकारण किंवा सरपंच असं काही नव्हतं. ज्येष्ठांच्या सल्ल्याचा मान राखत माजी सरपंचांच्या विरोधात ज्योती देशमुख यांनी निवडणूक लढविली. २६५ मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.

‘हे सारं आपल्यासाठी स्वप्नवत होतं. ज्या दिवशी मी सरपंच झाले, त्या रात्री झोपच लागली नाही. मी गावासाठी काय करू शकते, शिक्षण तर केवळ आठवीच. पुढे कसं होणार, ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जायला नको, या विचारांचं मनात काहूर माजलं. सक्षमपणे काम करायचं ही खूणगाठ मनाशी बांधून कामाला सुरुवात केली’, असं ज्योती यांनी सांगितलं.

सकाळी गावात भ्रमंती करणं, काय अडचणी आहेत ते जाणून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. जनसंपर्क वाढवताना ज्येष्ठांना मान देऊन त्यांचा सल्ला विचारात घेतला. गावात काहींचा विरोध होता, पण त्यांना सोबत घेत पुढे जायचं म्हणजे कामात अडचणी येणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधली. राजकारणाचे धडे गिरवताना त्यांनी बारीक गोष्टींवर विचार सुरू केला. ग्रामपंचायतीचा खर्च कमी करत महसुलात वाढ कशी होईल, ग्रामस्थांची निकड, विकास कामे करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्रिस्तरीय व्यवस्था समजून घेतली. अल्पावधीत ग्रामपंचायत-जिल्हा परिषद-पंचायत समिती या कार्यालयांमध्ये त्या सहजपणे वावरू लागल्या. अडचणींबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बोलून उत्तरं शोधण्याची धडपड करू लागल्या. गावातील स्त्रियांसमोर पाणीटंचाई आणि स्वच्छतागृह नसणं हे मुख्य प्रश्न होते. धरणातून थेट जलवाहिनी टाकल्यास हा प्रश्न सुटणारा होता. पाठपुरावा करून तो हाती घेतला. त्यावेळी जेसीबी चालविण्यापासून घंटागाडीत जलवाहिनीचे पाइप टाकण्यापर्यंत, खड्डे खोदण्यासाठी उन्हात उभं राहण्यापर्यंतची जबाबदारी ज्योती यांनी शिरावर घेतली. दैनंदिन कामात पती किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांचा कुठेही हस्तक्षेप नव्हता. यामुळे ग्रामस्थांमध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार झाली. ज्योती स्वत: उभं राहून काम करते किंवा करवून घेते, हा विश्वास त्यांच्यात आला. अवघ्या १५ दिवसांत जलवाहिनीचं काम मार्गी लागलं. पाण्याचा प्रश्न मिटला. एरवी स्त्री सरपंच म्हटलं की, पतीच बहुतांश कामं करतात असं जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह अनेकांना वाटे. जलवाहिनीचं लोकार्पण तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांनी ज्योती यांना तुमचे पती कुठे, असा प्रश्न विचारला. यावर पती त्यांचं काम करीत आहेत. आपली कामं आपणच करतो, असं ज्योती यांनी उत्तर दिल्यावर त्यांना सुखद धक्का बसला.

गावात स्वच्छतागृह नसल्याने स्त्रियांची कुचंबणा होत असे. त्यामुळे जलवाहिनीनंतर स्वच्छतागृह बांधणीवर ज्योती यांनी लक्ष केंद्रित केलं. शासकीय योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले. या माध्यमातून गावात १०८ स्वच्छतागृहांची उभारणी झाली. शाळेतही मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांसह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. राजकारण कसं वळण घेतं, याचे अनुभव मिळत होते. एकदा त्यांच्या पतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कचराकुंडी हटविण्याची सूचना केली. त्यामागे त्यांचा वेगळा विचार असेलही. कर्मचाऱ्याने कोणाला न विचारता ती कचराकुंडी हलविली. हा प्रकार अन्य सदस्यांना कळताच त्यावरून राजकारण सुरू झालं. तेव्हा कर्मचाऱ्यांना आपण सरपंच आहोत, पती नाही हे ज्योती यांनी बजावलं. नंतर असा प्रकार पुन्हा घडला नाही.

स्त्रियांच्या हाताला काम मिळावं, पर्यावरण संवर्धन व्हावं, यासाठी ग्रामपंचायत निधीतून ज्योती यांनी गावठाण परिसरात आंबा, आवळा, साग यांची १६ हजार झाडं लावली. त्यांचं संगोपन करण्यात आलं. याच परिसरात रोपवाटिका तयार केली. रोपनिर्मितीचं काम स्थानिक स्त्रियांना दिलं. रोपवाटिकेतून फळ-फुलझाडं मोफत दिली जातात. झाडांना येणाऱ्या आंब्याच्या लिलावातून महसूल मिळू लागला. ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं. यंदा लिलावाचं चौथं वर्ष आहे.

गावची लोकसंख्या, ग्रामस्थांची गरज पाहून गावात आठवडे बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला. ग्रामपंचायत निधीतील १० टक्के रक्कम स्त्रियांसाठी राखीव असते. त्यातून त्यांनी ‘बेटी बचाव’ अभियान सुरू केलं. ज्यांना मुलगी आहे, अशा मुलींच्या नावावर ग्रामपंचायतकडून १० हजार रुपये मुदत ठेव स्वरूपात ठेवले जातात. अनुभवातून वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागल्या.

ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलत ज्योती यांनी तिचं अत्याधुनिक मिनी मंत्रालयात रूपांतर केलं. अनावश्यक खर्चावर नजर ठेवली. ग्रामपंचायतीचा महिन्याकाठी निव्वळ चहावर १५ ते २० हजार रुपये खर्च होता. स्वयंचलित यंत्र बसवून तो कमी केला. ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावं, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयालगत यंत्र बसवत घरोघरी पाण्याचं एटीएम कार्ड वितरित करण्यात आलं. पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. एकापाठोपाठ एक चाललेली कामं काहींच्या नजरेत खुपत होती. व्यसनमुक्तीचं काम समांतरपणे सुरू होतं. एका ठिकाणी अवैधरीत्या विक्री होणारी दारू पकडली. ती दारू स्वत:च्या वाहनात टाकून पोलीस ठाण्यावर नेली. विरोधकांनी गाडीतील दारू आणि गाडी चालविणाऱ्या ज्योती यांचं छायाचित्र काढत अपप्रचार केला. दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या ज्योती यांना याचा प्रचंड मनस्ताप झाला. काम थांबवायचं इथपर्यंत त्यांना नैराश्याने घेरलं. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन स्थिती कथन केली. यामागील खरा चेहरा समोर आणत त्याला पोलिसांच्या हवाली केल्यावर त्यांना समाधान मिळालं. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गावगुंडीचं राजकारण आकलनापलीकडे असतं. काम करणाऱ्याची कोंडी केली जाते. अडचणीत आणण्याचे प्रयत्न होतात. या परिस्थितीत ज्योती यांनी गावात लक्षणीय सुधारणा केल्या. त्या कामांची दखल सरकारने घेतली. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्राम स्वच्छता अभियान, संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता, आदर्श ग्रामपंचायत, आदर्श सरपंच, हागणदारीमुक्त गाव अशा पुरस्कारांचा ग्रामपंचायतीवर वर्षांव झाल्याचं ज्योती या अभिमानाने सांगतात. पुरस्कारांच्या रकमेतून ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं.

सरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना ज्योती यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ती जबाबदारी नेटाने सांभाळली. दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. यामुळे आज मोठी मुलगी पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेत असून लहान मुलगी वरिष्ठ महाविद्यालयात आहे. सरपंचपदी काम करताना शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलं. त्यांनी मुक्त विद्यापीठात कला शाखेत प्रवेश घेतला. सध्या त्या स्वत: कला शाखेत द्वितीय वर्षांचं शिक्षण घेत आहेत. सरपंचपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील निवडणूक त्यांनी पुन्हा लढविली. पुन्हा विजयी झाल्या. सध्या त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत.

सत्ताबदल झाल्यानंतर दारूबंदीसाठीच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावात पुन्हा दारूचं दुकान सुरू व्हावं, असा काही मंडळींचा प्रयत्न आहे. अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी सत्ता महत्त्वाची ठरते, असं त्या बोलून दाखवतात. कोणत्याही राजकीय पक्षांचा झेंडा हाती न घेता ज्योती यांनी आजवर वाटचाल केली. गावाचं भलं व्हावं, यासाठी भविष्यातही काम सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

charushila kulkarni@expressindia.com

chaturang@expressindia.com

First Published on February 16, 2019 1:12 am

Web Title: sarpanch female sarpanch success stories 3
Next Stories
1 शाहीर
2 अनोखं दुकान
3 लोकगीतांचा तरंग
Just Now!
X