संजीवनी केळकर

संगेवाडी गावचं सरपंचपद मिळालं तेव्हा त्या फक्त दुसरी उत्तीर्ण होत्या. अंगठे उमटवत कारभार सुरू झाला, पण त्याच शारदा रणदिवे यांनी आत्मविश्वास जागा करत बारावीपर्यंत शिक्षण घेतलंच, पण बालवाडी प्रशिक्षण, शिवणकाम, शेळीपालन प्रशिक्षण, ‘आशा’ प्रशिक्षणही घेतलं. स्वत:ला वाढवत गावाचाही विकास केला. गाव टँकरमुक्त झाले. गावातील जिरायत शेती बागायती झाली. सिमेंटचे रस्ते केले. ग्रामस्वच्छता अभियानही प्रभावीपणे राबवले. त्या माजी सरपंच शारदा रणदिवे यांचा हा प्रवास.

महिला आरक्षणाचा कायदा झाला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला संगेवाडी, या सोलापूर जिल्ह्य़ाच्या सांगोला तालुक्यातील खेडेगावातून शारदा वसंत रणदिवे यांना मागासवर्गीय महिला सरपंचाच्या निवडणुकीसाठी पक्षाने उभे केले. त्या निवडून आल्या तेव्हा त्यांचे शिक्षण होते दुसरी उत्तीर्ण. अक्षरओळख पूर्णपणे विसरल्या होत्या. सहीऐवजी अंगठय़ाला पर्याय नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. रोज राबावं तेव्हा खावं अशी परिस्थिती.

सरपंच झाल्यावरही त्या रोज शेळ्या घेऊन चारायला रानात जात. पती लोकांच्या शेतात सालावर राबणारा गडी. ग्रामसेवक शारदा यांना शोधत रानात यायचे कारण काय तर चेकवर अंगठा घ्यायला. पण ‘आपण कशावर अंगठा उमटवतोय?’- याचा त्यांना पत्ताच नसायचा. शेजारपाजारच्या आयाबाया म्हणायच्या, ‘‘अगं शारदा, असं अंगठं उठवून एक दिस जाशील खडी फोडाया!’’ ग्रामपंचायतीच्या सभेत तीच तऱ्हा. सतरंजीवर सर्व सदस्य बसलेले असताना या बसणार मान खाली घालून, डोक्यावरून नाकापर्यंत पदर घेऊन, सतरंजीच्या खाली- एका कोपऱ्यात फरशीवर. सभेत काय चाललंय, कोण काय बोलतंय.. काही कळायचं नाही आणि रोज धास्ती वाटायची.. एक दिवस दुसऱ्या कोणाच्या तरी लबाडीपायी आपणच तुरुंगात जाणार.

एकदम अंगावर कोसळलेल्या या सरपंचपदाच्या जबाबदारीने अनेक स्त्रियांची स्थिती अशीच होती. यात बदल व्हावा म्हणून शासनाने ‘ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी प्रशिक्षण’ ही योजना सानुदानित सुरू केली. सांगोला तालुक्यात १९७८ पासून ‘ग्रामीण महिला सबालीकरणा’चे काम करणाऱ्या ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या आमच्या स्त्री संस्थेला शासनाने या प्रशिक्षणासाठी नियुक्त केले. आम्ही संपूर्ण सांगोला तालुक्यातील नवनिर्वाचित स्त्री सदस्यांसाठी योजना तयार करून कार्यान्वित केली. त्यासाठी सर्व स्त्री सदस्यांना प्रशिक्षणासाठी पत्रे पाठवण्यात आली.

शारदा हे पत्र पाहून हादरल्या. संगेवाडी सोडून कधी बाहेर न पडलेल्या शारदा यांना शेजारणीने धीर देऊन, स्वत: तिकिटाचे पैसे देऊन सांगोल्याला प्रशिक्षण स्थानी आणून सोडले. घराबाहेरील जग माहीत नसलेल्या शारदा पुरत्या गांगरल्या होत्या. अगदी केविलवाणा चेहरा करून कशाबशा प्रशिक्षणासाठी बसल्या होत्या. चहासुद्धा प्यायला तयार नव्हत्या. त्यांना हलके हलके प्रशिक्षणासाठी तयार केले आणि ८ दिवसांच्या त्या प्रशिक्षणाने जणू सुरवंटाचे फुलपाखरू झाले. हे प्रशिक्षण शारदांमधला आत्मविश्वास जागृत करून गेला. कोणीतरी आपल्या पाठीमागे उभे आहे हा विश्वास मिळाला आणि त्या आधारावर त्यांनी झेप घेतली. कोणतीही अडचण आली तर संस्थेत उत्तर मिळेल ही खात्री पटली आणि पंख पसरले.

ग्रामपंचायतीच्या सभेत त्या बोलू लागल्या, प्रश्न विचारू लागल्या, पारदर्शकता नसेल तिथे चेकवर आता अंगठा नव्हे- सही करायला ठामपणे नकार देऊ लागल्या. गावाचा पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, घरकुले, आरोग्य सेवा, शाळा सर्व क्षेत्रांत त्यांचा संचार सुरू झाला. गावाला त्यांना मान देणे भाग पडले. जे घडले नव्हते ते घडू लागले.. एक मागासवर्गीय स्त्री गावात ताठ मानेने वावरू लागली. त्यासाठी त्यांनी प्रथम स्वत:ला सक्षम करण्यास सुरुवात केली. सातवीची परीक्षा शाळेबाहेरून दिली. ती पास झाल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची १२ वी पास झाली. त्यानंतर बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण आणि कपडे शिलाईचे प्रशिक्षण तिने संस्थेत घेतले. संस्थेकडूनच शिलाई मशीन बिनव्याजी कर्जाने घेतले आणि स्वत:चे शिलाई प्रशिक्षण वर्ग संगेवाडीत सुरू केले. आपल्या आसपासच्या स्त्रियांमध्ये जागृती करून ४ बचतगट सुरू केले. या गटांना सध्याच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेशी जोडून महिलांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला. अनेक जणींच्या आर्थिक अडचणी दूर केल्या, तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ गावातील गोरगरीब महिलांपर्यंत पोचविण्यात त्यांचा कौशल्यपूर्ण सहभाग मिळू लागला. स्वत:च्या पायावर ठामपणे उभं राहात शारदा यांनी स्वतचे झोपडे होते त्या जागी २ खोल्यांचे घर बांधले, जर्सी गाय घेतली. मुलीला शिकविले. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचे लग्न केले.

गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता. पिण्याचे पाणीच नव्हते. त्या सरपंच असताना जवाहर योजनेतून गावात विहीर बांधली. योजना आणायला, ती मंजूर करायला खूप त्रास झाला. दोन वर्षे विहिरीचे पाणी टिकले. परत ये रे माझ्या मागल्या. मग बंधारा बांधावा असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांची तळमळ बघून संस्थेने बंधाऱ्याच्या तयारीला सुरुवात केली. ओढय़ात खूप जागा शोधल्या. शेवटी गाव व संस्था यांच्या एकमताने ओढय़ामध्ये एक जागा निश्चित झाली. डिझाइन तयार झाले. इंजिनीअर आले, पण खर्चाचा आकडा खूप मोठा होता. ग्रामपंचायतीला तो परवडणे शक्यच नव्हते. मग गावाने श्रमदान करण्याचे कबूल केले. ज्यांना शक्य होते त्यांनी विटा, दगड, वाळू देण्याचे ठरविले. त्या मदतीसाठी वणवण फिरत होत्या, पण पुरेसे पैसे जमत नव्हते. शेवटी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ला मिळालेल्या विद्या केतकर यांच्या देणगीतून बंधाऱ्याचे काम सुरू झाले. बंधाऱ्यामुळे गावच्या पाणीपुरवठय़ाच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढली. गाव टँकरमुक्त झाले. आणि दोन्ही बाजूंच्या २२ विहिरींना भरपूर पाणी आले. गावातील जिरायत शेती बागायती झाली. डाळिंबाच्या बागा लागल्या. उन्हाळ्यात गुरांना पाण्याची सोय झाली. सारा गाव शारदाला मानू लागला. या उदाहरणामुळे प्रेरणा मिळून संगेवाडीच्या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून आणखी ५ बंधारे ओढय़ात बांधून पूर्ण केले आहेत. सरपंचपदाच्या काळात ग्रामस्वच्छता अभियानही त्यांनी प्रभावीपणे गावात राबवले. सिमेंटचे रस्ते केले. गावाच्या आजूबाजूला झाडे लावली.

सरपंचपदाची मुदत संपल्यावरसुद्धा गावातील प्रत्येक महिलेचे घरदार, अंगण स्वच्छ असावे, दारात चार झाडे असावीत, घरी शौचालय असावे यासाठी शारदा प्रयत्नशील असतात. घरात भांडणे झाली तर आधी त्यांनाच बोलावले जाते. काडीमोडाने काही साधत नाही, नवरा-बायकोचे आपसात जुळवून देण्यावर त्यांचा भर आहे. असे ४० ते ५० मागासवर्गीय बायकांचे संसार त्यांनी जोडून दिले आहेत. गटातल्या प्रत्येक स्त्रीजवळ शेळी असावी, कारण ती शेतमजुराची कामधेनू असते, यासाठी त्या प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी स्वत: व गटातील स्त्रियांनी संस्थेतर्फे घेतलेला ‘शेळीपालन प्रशिक्षण वर्ग’ पूर्ण केला.

आरोग्याच्या क्षेत्रातही शारदा सध्या संगेवाडीत महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. संस्थेत मिळालेल्या ‘आरोग्यदूत’ प्रशिक्षणामुळे जागृत झालेल्या शारदा यांना सध्या ‘आशा’ म्हणून शासकीय नोकरी मिळाली असून त्यांनी तालुक्यातील सर्व ‘आशां’च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज त्या फार समाधानी आहेत. बचतगटाने त्यांना पूर्ण बदलविले आहे. संगेवाडीच नव्हे तर बाहेरील अनेक गावांमध्ये समाजप्रबोधनासाठी आता शारदा यांना भाषणासाठी निमंत्रणे येतात. आता त्या सर्व सभा गाजवतात.

ग्रामीण महिला सक्षमीकरणाचे मूíतमंत उदाहरण असलेल्या शारदा रणदिवे यांनी कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील या काव्यपंक्ती सार्थ केल्या आहेत –

सर्वस्व लुटून गेलं तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त ‘लढ’ म्हणा.

sanjeevani.kelkar@gmail.com

chaturang@expressindia.com