22 July 2019

News Flash

गणोरीची ‘छाया’

सरपंच!

(संग्रहित छायाचित्र)

साधना तिप्पनाकजे गणोरीतली एक गृहिणी ते काश्मीरमध्ये आठ दिवस राहून चार जिल्ह्य़ांमधील सरपंचांना प्रशिक्षण देणारी स्त्री, हा छाया खंदारे यांचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. पुलवामा, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपुरा या चार जिल्ह्य़ांतील साधारण ५०० सरपंचांना त्यांनी पंचायतराज, सरपंचपद, त्यातली आव्हानं आणि जबाबदाऱ्या याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली गणोरी गावाचा विकास होतो आहे. शिक्षण, आरोग्यकेंद्र, रोजगार यांचे चित्र बदलत आहे.

त्या छाया खंदारे यांचा प्रवास –

गेले काही दिवस पुलवामा हे नाव आपल्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. याच पुलवामा हल्ल्याच्या अवघ्या दहा दिवस आधी, अमरावतीतल्या (तालुका भातकुली) गणोरी गावच्या सरपंच छाया खंदारे तिथल्या सरपंचांना प्रशिक्षण देण्याकरता गेल्या होत्या. जम्मू-काश्मीर ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालय व राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू आणि काश्मीर राज्यात सरपंचांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या या कार्यशाळांमध्ये राज्यातील दोन आणि राजस्थानातील एक सरपंच प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते. या तिघांपैकी छाया खंदारे या एकटय़ाच महिला सरपंच होत्या.

गेल्या वर्षी हैद्राबादमध्ये ‘यशदा’तर्फे राष्ट्रीय पातळीवर सरपंच प्रशिक्षण कार्यशाळा झाली होती. त्यावेळी आपल्या गावाबाहेरील इतर सरपंचांना मदत करायला, सरपंचपदाविषयी माहिती द्यायला आपण तयार आहात का या विनंतीला त्यांनी होकार दिला आणि त्याचा परिणामस्वरूप म्हणजे त्या काश्मीरमध्ये पोहोचल्या. गणोरीतली एक गृहिणी ते काश्मीरमध्ये आठ दिवस राहून चार जिल्ह्य़ांमधील सरपंचांना प्रशिक्षण देणाऱ्या

छाया खंदारे हा त्यांचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. पुलवामा, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपुरा या चार जिल्ह्य़ांतील साधारण ५०० सरपंचांना त्यांनी पंचायतराज, सरपंचपद, त्यातली आव्हानं आणि जबाबदाऱ्या याबद्दल मार्गदर्शन केलं.

गणोरी गावच्या सरपंचपदी छाया खंदारे यांची मे २०१५ मध्ये बिनविरोध निवड झाली. छायाताइर्ंचा तोपर्यंत कधी बचतगटाशीही संबंध आला नव्हता. घर आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या यात त्या मग्न होत्या. गावकऱ्यांनीच त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. हो-नाही करत छायाताई तयार झाल्या. गावची जबाबदारी घेत आहोत तर ती व्यवस्थित पार पाडलीच पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे ही स्पष्टता घेऊनच त्यांनी कामाला सुरुवात केली. याआधीही गावात आरक्षणामुळे दोन महिला सरपंच झाल्या होत्या, पण त्या नामधारीच होत्या. आपण ‘खऱ्या’ सरपंच व्हायचं असं छायाताईंनी ठरवलं. गावात याआधी कधीच महिला सभा झाली नव्हती. छायाताईंना मात्र शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या पंचायत प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे ग्रामसभांसह महिला सभांचीही ताकद माहीत झालेली होती. त्यांनी पंचायतराज माहिती पुस्तिकेला आपला शिक्षक मानलं. गावात ११ महिला बचतगट होते. छायाताईंनी या बचतगटांमधील महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली. गावविकासातला महिलांचा सहभाग या संदर्भात त्या त्यांच्याशी बोलू लागल्या. बचतगटातल्या महिलांना छायाताईंबद्दल विश्वास वाटू लागला. महिलांनी गावातील अवैध धंद्यांबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यांनी छायाताईंना साथ द्यायचं ठरवलं. शिक्षण आणि आरोग्य या दोन मुख्य प्रश्नांपासून कामाला सुरुवात करायची होती.

सर्वात गंभीर प्रश्न होता तो दारूचा. गणोरी गावात दारू आणि जुगारामुळे झालेली दोन पिढय़ांची वाताहत त्यांना अस्वस्थ करत होतीच. स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असताना, दारू विक्रेता त्याची दारूची गाडी समोरून नेत असल्याचं बघून त्या खूप संतापल्या. गावातली दहावीची मुलं शाळेत जाताना आधी गुत्त्यावर जाऊन ३-४ घोट घेत मगच पुढे जायची. गावातल्या महिला यामुळे जेरीस आल्या होत्या. छायाताईंनी बचतगटांच्या महिलांना गोळा केलं. पहिली महिला सभा आयोजित करण्यात आली आणि त्यात दारूबंदीचा ठराव संमत झाला. मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचं आणि चारही गुत्तेवाल्यांचं साटंलोटं होतं. छायाताईंसोबतच या महिलांनाही धमकावण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण सगळ्या जणी धाडस दाखवत एकजुटीने उभ्या राहिल्या. सर्व महिलांनी पोलीस आयुक्तांकडे जात हे प्रकरण मार्गी लावलं. गावातले अवैध धंदे आता बऱ्यापैकी बंद झालेत. दारूबंदी अजून झालेली नाहीये, पण त्याकरता प्रयत्न सुरू आहेतच. एका ग्रामपंचायत सदस्याचाच बीअरबारचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळून लावला गेला हे आणखी एक विशेष काम.

गावातले तंटे मिटून एकोपा वाढावा याकरता ताईंनी अनेक उपक्रम राबवलेत. ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम त्यांचाच. शिवाय मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात निकोप स्पर्धा असावी याकरता निबंध, वक्तृत्व, नृत्य, गायन आणि क्रीडा स्पर्धाचं आयोजन या दरम्यान करण्यात येतं. सर्व वयोगटांकरता विविध कार्यक्रम सादर केले जातात. रोज आरती होते. विशेष म्हणजे दर दिवशी वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींना आरतीचा मान देण्यात येतो. दहाही दिवस सर्व गावकरी उत्साहाने सहभागी होतात.

महिला सभेच्या आधी महत्त्वाच्या विषयांकरता छायाताई एक किचन कॅबिनेट बैठक घेतात. गणोरीच्या महिला आता एकटय़ा नाहीत. त्या सर्व गोष्टी संघटितपणे करतात. गावात शंभर एकर शासकीय जमिनीवर गिट्टी/खडी खाण आणण्याचा एका प्रस्थापिताचा  प्रस्ताव होता. मात्र छायाताईंकरता गावचं पर्यावरण आणि गावकऱ्यांचा विश्वास अधिक महत्त्वाचा होता.  प्रस्थापित मंडळींचा विरोध, सातत्याने संवाद करून त्यांच्याच सहकार्याने छायाताईंनी तो नीटपणे हाताळला. आता गावात प्राथमिक आरोग्यकेंद्रही येऊ घातलय. ताईंनी गेल्या वर्षीच मंत्रालयात जात आरोग्यकेंद्रासाठी मंजुरी मिळवलीय. मागच्याच २० फेब्रुवारीपासून तात्पुरत्या प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या कामाला ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये सुरुवात झालीय. आरोग्यकेंद्राकरता ३ कोटीं रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, जागाही नक्की झालीय. पण प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊन प्राथमिक आरोग्यकेंद्र कार्यान्वित होण्यास, सरकार दरबारच्या अधिकाऱ्यांमुळे वेळ लागतो आहे. दरम्यान, लोकांचे हाल होऊ नयेत याकरता त्यांनी तात्पुरतं प्राथमिक आरोग्यकेंद्र सुरू केलं. आठवडी बाजाराला लागूनच हे तात्पुरतं आरोग्यकेंद्र आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रांत शौचालये असणे आवश्यक आहे. याकरता त्यांनी स्वच्छ भारत अभियान आणि लोकसहभागाद्वारे निधी मिळवला.

अडीच हजार लोकवस्तीच्या गणोरीत छायाताईंच्या कार्यकाळात महिला सभा आणि ग्रामसभांना पूर्ण कोरम असतो. छायाताईंच्या कामामुळे त्यांना गावकऱ्यांची चांगली साथ मिळते. त्यांनी मांडलेले गावविकासाचे प्रस्ताव १०० टक्के संमतीनं मंजूर होत आहेत. गावात भांडणतंटय़ांचं प्रमाणही कमी झालंय. गावात गेल्या काही वषार्ंत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली. याचे परिणाम गावाला आता जाणवू लागलेत. १०० एकर जमीन पट्टय़ावर त्या आता वृक्षलागवड करणार आहेत. वनहक्क समितीतही १०० टक्के महिलांचाच समावेश असण्यावर त्या जोर देतात. गावातल्या प्राथमिक शाळेची १९४२ मध्ये बांधलेली इमारत धोकादायक झाली होती. छायाताईंनी शाळेकरता १४ लाख रुपयांचा निधी मिळवला. नवीन इमारतीचं बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्त आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत छायाताईंनी सुरक्षिततेकरता शेणखताच्या खड्डय़ांवर झाकणांची मागणी केलीय. अपंगांकरता वेगळ्या शौचालयाचीही मागणी त्या करत आहेत. ‘संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान’मध्ये त्यांच्या गावचा समावेश झालाय. गावातल्या पाणीटंचाईवर मात करण्याकरता एमआरजीएफ योजनेंतर्गत विहिरीकरता निधी मंजूर झालाय. पुढच्या महिन्यात बांधकामाला सुरुवात होईल. आता त्यांचं लक्ष्य आहे ‘स्मार्ट व्हिलेज’. याबद्दल त्यांची आखणी सुरू आहे. संपूर्ण गाव ‘वायफाय कनेक्ट’ करण्याचा त्यांनी प्रस्तावही मांडलाय. ‘सरल विकास आराखडय़ा’द्वारे महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याकरता, शेळीमेंढीपालन प्रशिक्षण सुरू आहे.

३४ वर्षांच्या छायाताईंनी कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना गावगाडय़ात घेतलेली झेप कमालीची कौतुकास्पद आहे. गावगाडा ओढताना त्या घरची आघाडीही समर्थपणे सांभाळतात. त्यांचे पती नोकरीनिमित्त सुरतला होते. पण गेली दोन वर्षे किडनीच्या विकाराने आजारी असल्यामुळे ते घरीच असतात. परिणामी, घराची आर्थिक जबाबदारीही छायाताईंवर आलीय. ती पेलताना त्यांनी घरच्या शेतीतही लक्ष घालायला सुरुवात केली. बचतगटातल्या महिलांना एकत्र करून बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी आइस्क्रीम आणि कुल्फी बनवण्याचा लहानसा उद्योगही सुरू केलाय.

आजवरच्या धडपडीचा लेखाजोखा विचारला असता आशाताई सांगतात, ‘महिलांनी कामांचा प्राधान्यक्रम बदलला. भ्रष्टाचाराचं कुरण असलेलं रस्तेबांधणी, बांधकाम फक्त हीच कामे म्हणजे विकास नव्हे तर शिक्षण, आरोग्यकेंद्र, दारूबंदी ही पुरुष लोकप्रतिनिधी काहीसं दुर्लक्ष करत असलेली कामे पटलावर अग्रक्रमाने येऊ लागलीत. कारण यामुळेच सुदृढ, सशक्त पिढी घडते.’

इतके स्पष्ट विचार असणाऱ्या आशाताईंची भविष्यातली धडपडही नक्कीच सफळ संपूर्ण होईल याची खात्री पटते.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 16, 2019 12:58 am

Web Title: sarpanch female sarpanch success stories 5