साधना तिप्पनाकजे

विरोध हीच संधी मानून केवळ स्वत:चीच नव्हे तर गावाची प्रगती करणाऱ्या पुण्यातल्या मुळशी तालुक्यामधील दारवली गावातल्या माजी सरपंच जयश्री ओव्हाळ. ग्रामसेवक, उपसरपंच यांच्याबरोबर जवळजवळ ९० टक्के लोक विरोधात असताना केवळ जिद्दीच्या जोरावर ग्रामविकास करत लोकांची मने जिंकणाऱ्या, त्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या जयश्री ओव्हाळ यांच्या जिद्दीची ही गोष्ट.

तप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर सभा लोक सभा निवडणूक २०२४
“…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!
gourav vallabh Congress ex leader
‘सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही’, काँग्रेसवर आरोप करून गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
bhiwandi lok sabha seat marathi news, badlapur congress leaders marathi news
“…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही
Ashok Chavan On Congress
“…तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, अशोक चव्हाण यांचे विधान चर्चेत

जयश्री ओव्हाळ, दहावी उत्तीर्ण फक्त. दारवली गावातली एक सर्वसामान्य स्त्री. ज्याचा कधी कल्पनेतही विचार केला नाही ते सरपंचपद त्यांच्या वाटय़ाला आलं खरं, पण ते पद काटय़ाकुटय़ाचं आहे हेही लक्षात आलं. उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या विरोधालाच त्यांनी एक संधी मानली आणि तो स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्नही मानला. विरोधावर मात ग्रामविकासातूनच होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी गावातल्या लोकांचे एक एक प्रश्न सोडवत त्यांची मनं जिंकली. स्वत: पदवीपर्यंत पोहोचल्याच, पण गावालाही विकासाच्या वाटेवर आणून सोडलं. त्या सरपंचाची ही गोष्ट!

देशात २०११ मध्ये जनगणना झाली. पण पुण्यातल्या मुळशी तालुक्यामधील दारवली गावात जातिनिहाय गणना झालीच नाही. यामुळे गावातील मागासवर्गीयांची संख्या सरकारदरबारी नोंदवली गेली नाही. याचा फटका गावात मागासवर्गीयांच्या योजनांना बसला. गावात २०१४ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या स्त्रीकरता राखीव होतं. दारवली गावातला मुख्य व्यवसाय शेती. स्त्रिया एकत्र येऊन गटागटाने एकमेकींच्या शेतात एकत्रितपणे शेतीकाम करतात. यातल्या २० स्त्रियांनी एकत्र येऊन गावातला पहिला मागासवर्गीय महिला बचतगट ‘नाबार्ड’च्या मदतीनं स्थापन केला. गटाने चांगलं काम करायला सुरुवात केली. एकदा बोलताबोलता गावात जातिनिहाय मोजणी झाली नाही, याबद्दल या गटातल्या सगळ्या जणींच्या मनात खदखद असल्याचं जाणवलं. त्यातल्याच एक जयश्री ओव्हाळांनी घरी येऊन ही खदखद पतीकडे व्यक्त केली. त्यांच्या पतीचं बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालंय. ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी जयश्रीताईंना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. सांगितलं, ‘‘जर मागासवर्गीय आरक्षण मिळालं नाही म्हणून कोणीच उभं राहिलं नाही तर सरपंचपद खुल्या वर्गाला जाईल. त्यामुळे तू तरी उभी राहा आणि आपले हक्क मिळवण्याकरता प्रयत्न कर.’’ जयश्रीताईं साशंक होत्या. मात्र बचतगटातल्या स्त्रियांनीही जयश्रीताईंना निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आग्रह केल्यावर त्या तयार झाल्या आणि खुल्या जागेवरून सदस्य म्हणून निवडून आल्या.

सात सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये त्या एकमेव अनुसूचित जातीच्या सदस्य होत्या. २०१४ मध्ये ग्रामपंचायत सदस्यच मतदान करून सरपंचांची निवड करत असत. जयश्रीताईंनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला आणि त्यांच्यावर अर्ज मागे घेण्याकरता एक व्यक्ती दबाव टाकू लागली. पण जयश्रीताईंनी माघार घेतली नाही. त्या सरपंचपदी निवडून आल्या. दबाव टाकणारी व्यक्ती उपसरपंच झाली. एकूण सात सदस्यांपैकी एक उपसरपंच, एक सदस्य विरोधी पक्षातील आणि पाच सत्ताधारी असं ग्रामपंचायतीचं चित्र होतं.

उपसरपंच गावात सरपंचाविषयी विरोधी मत तयार करू लागले. ‘एक स्त्री, दहावी शिकलेली, गावकारभार कसा करणार? तिला योजना कळणार का? सरकारी कार्यालयात जाऊन बोलता तरी येईल काय? निधी आणेल का?’ या मुद्दय़ांवरून ते गावात विरोधी मत तयार करू लागले. वातावरण तापू लागलं. जयश्रीताईंनी मनाशी खूणगाठ बांधली, अजिबात घाबरायचं नाही. त्यातच भर म्हणजे ग्रामसेवक कसली कागदपत्रे दाखवायला, माहिती सांगायला तयार नसत. उपसरपंचाचा राजीनाम्याकरता दबाव वाढू लागला. जयश्रीताईंना हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न वाटला. पदावर आल्यावर दोन महिन्यांनी पंचायत समितीतर्फे सरपंचांचं प्रशिक्षण घेण्यात आलं. अधिकारी विजय जाधव यांनी चांगलं मार्गदर्शन केल्याचं जयश्रीताई आवर्जून सांगतात. तिथेच त्यांनी ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पुस्तिका’ घेतली. पती मुलांसह तीस माणसांचं त्यांचं कुटुंबही सोबत उभं राहिलं. जयश्रीताईंना बळ आलं.

पती आणि मुलांनी मिळून जयश्रीताईंना ‘मुंबई अधिनियम पुस्तिका’ समजावून सांगितली. यातून जयश्रीताईंना त्यांच्या कामांची आणि अधिकारांची जाणीव होऊ लागली. उपसरपंचांनी गावातलं वातावरण भलतंच तापवल्याने गावातल्या जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. कोणत्याही समारंभात, अगदी लग्नकार्यातही, लोक त्यांच्याशी बोलायचे नाहीत. मग मात्र जयश्री जिद्दीने पेटून उठल्या. हा विरोध नाहीसा केलाच पाहिजे. त्यासाठीचा मार्ग ग्रामविकासातून जातो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याकडे लक्ष केंद्रित केलं.

गावात दोन वाडय़ा आहेत. व चार वस्त्या आहेत. उपसरपंचाच्या वाडीत पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. २५ वर्षांपासून वाडीत पुरेसं पाणी नसल्याने खूप हाल व्हायचे. जयश्रीताईंनी हेच काम पहिल्यांदा हातात घेतलं. पावणेदोनशे लोकवस्तीची ही वाडी मुख्य गावापासून जरा लांबच्या अंतरावर आहे. जयश्रीताईंनी नळपाणी योजनेमार्फत, वाडीतल्या प्रत्येक घरात नळाचं कनेक्शन दिलं, घरात पाणी आलं तसं वाडीतल्या स्त्रियांचा आनंद गगनात मावेना. सगळ्याजणींनी जयश्रीताईंचे तोंडभरून आभार मानले. जी वाडी त्यांना इतके दिवस टाळत होती, तीच वाडी आता त्यांना सन्मानाने वागवू लागली. जयश्रीताईंनी पहिला गड जिंकला होता.

दुसरा प्रश्न होता पथदिव्यांचा. २०११ ला गावाकरता पथदिव्यांची योजना मंजूर झाली होती. पण अंमलबजावणी नव्हती झाली. ग्रामसेवक आणि इतर शासकीय अधिकारीही या दिरंगाईबद्दल काही माहिती देत नव्हते. जयश्रीताई आता ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स चाळू लागल्या. ३२ खांबांची योजना तर मंजूर झाली, पण ग्रामपंचायतीनं काही रक्कम भरणे आवश्यक होते. सर्व माहिती घेऊन जयश्रीताई वीज वितरण कार्यालयात गेल्या. अगदी पुण्यातील रास्तापेठ इथल्या कार्यालयापर्यंत जाऊन त्यांनी पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीच्या वाटय़ाची रक्कम भरली गेली. २०१५-१६ ला गावात एलईडी पथदिवे बसवण्यात आले. ग्रामविकासाची आणखी एक पायरी चढली गेली.

ग्रामसेवक कसलीही माहिती देत नव्हतेच, शिवाय गावातला विरोधही पूर्णत: मावळला नव्हता. त्यावर काम करून दाखवणे हाच उपाय होता. तेच उद्दिष्ट जयश्रीताईंनी डोळ्यासमोर ठेवलं. त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने एक युक्ती सांगितली. तिने त्यांना इंटरनेट वापरण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर ते कसं वापरायचं ते शिकवलं. तोपर्यंत फोनचा वापर त्या फक्त बोलण्याकरता करत होत्या. इंटरनेटच्या माध्यमातून त्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्यांचे लाभार्थी कसे ठरवावेत, गावविकासाच्या अनेक गोष्टी, असं सगळं जाणून घेऊ लागल्या. ग्रामसेवकाकडून असहकार असल्याने, त्या विविध शासकीय विभागांमध्ये जाऊन, अधिकाऱ्यांना भेटून माहिती घेऊ लागल्या. कधी यश यायचं तर कधी अपयश. रमाई योजना, श्रावणबाळ योजना, निराधार महिला योजना अशा योजनांचा लाभ लाभार्थीना मिळवून दिला. ‘रमाई योजने’अंतर्गत १२ कुटुंबांना घरकुल मिळालं तर ‘यशवंत योजने’अंतर्गत दोन जणांना घरकुल मिळालं. पण मग या घरकुल योजनांना सुरुवातीला गावातूनच विरोध होत होता. गावकऱ्यांना वाटलं की, लाभार्थ्यांना गावच्या पशाने घरं बांधून द्यायची आहेत. मग जयश्रीताईंनी ग्रामसभेत सरकारी योजना काय आहे हे सविस्तरपणे गावकऱ्यांना समजावून सांगितली. त्यानंतर विरोध मावळला. इंटरनेट शिकल्यामुळे माहितीचं भांडारच त्यांच्या हाती लागलं. जयश्रीताईंमधला बुजरेपणा कमी होऊ लागला. आता ताई ज्या विषयाचं काम आहे, त्याचे बारीकसारीक तपशील गोळा करून सरकारी अधिकाऱ्यांसमोर जाऊ लागल्या. ताईंची एवढी तयारी पाहून सरकारदरबारी कामांना वेग मिळू लागला. अधिकाऱ्यांकडून संबंधित कामांची माहिती सहजपणे मिळून कामं पटापट होऊ लागली.

ग्रामसेवक ग्रामसभेला तर यायचे नाहीतच, पण कोणतेही सहकार्य नव्हते. त्यांची बदली झाली, पण त्यानंतर तीन महिने झाले तरी त्यांनी पदभार सोडला नाही की गावाकडेही फिरकले नाहीत. अशात पंचायत समिती अध्यक्षांकडून खरीप हंगामाची बैठक आयोजित करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक आणि शेतकरी यांनी या बठकीला उपस्थित राहायचं होतं. जयश्रीताईंना शेजारील गावच्या सरपंच मत्रिणीकडून याची माहिती मिळाली. त्या बठकीत पोचल्या. बठकीला जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्व सरकारी अधिकारीही उपस्थित होते. या बठकीत जयश्रीताईंनी गावात ग्रामसेवक नसल्याचं आणि त्यामुळे गेले तीन महिने होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती सर्वाना स्पष्टपणे सांगितली. याची तातडीने दखल घेत, दारवली गावात संध्याकाळीच नवीन ग्रामसेवक रुजू झाले. नवीन ग्रामसेवक कार्यतत्पर होते. त्यांची चांगली मदत जयश्रीताईंना होऊ लागली.

गावचं उत्पन्न वार्षिक सात लाख रुपये होतं. त्यातील चार लाख रुपये पाण्याच्या बिलावरच खर्च होत होते. उरलेल्या रकमेतून गावात विकासकामं कशी होणार? पाण्याचा वापर तर सर्वजण मुबलक करत होते. प्रत्येक घरामागे वार्षिक साडेतीनशे रुपये एवढीच पाणीपट्टी गावाला होती. ग्रामसभेत पाणीपट्टी वाढवण्याचा विषय चर्चेला घेतला. वैयक्तिक नळ असणाऱ्या घराला वार्षिक एक हजार रुपये तर सार्वजनिक नळाचा वापर करणाऱ्या घराला जुनी साडेतीनशे रुपये इतकी पाणीपट्टी आकारण्याचं सर्वानुमते ठरलं. गावात ८० टक्के लोकांच्या घरात शौचालयं नव्हती. विविध योजनांचा लाभ घेताना लोकांनी घरात शौचालय असल्याचं खोटंच लिहून दिल्याचं कागदपत्रांवरून जयश्रीताईंच्या लक्षात आलं. गावकऱ्यांना ‘हागणदारीमुक्त गावा’बद्दल त्या सांगू लागल्या. काही जणांना पटलं, त्यांनी शौचालय बांधले. पण काहींचा विरोध होताच. जयश्रीताई गटविकास अधिकाऱ्यांशी बोलल्या. त्यातल्या एक स्त्री अधिकारी गावात आल्या. त्यांच्या हस्ते उघडय़ावर शौच करणाऱ्यांना गुलाबाचं फूल देण्यात आलं. गावात परत समरप्रसंग निर्माण झाला. तेव्हा त्या गटविकास अधिकाऱ्यांनी आणि जयश्रीताईंनी मिळून आरोग्याची काळजी आणि शौचालयाचं महत्त्व पटवून सांगितलं. शिवाय ‘तुमच्या आरोग्याकरता सरकारच तुम्हांला पैसे देत आहे. मग तुम्ही का विरोध करता?’ असं विचारलं. अखेरीस गावकरी तयार झाले. गावात शंभर टक्के शौचालयांचा निर्माण आणि वापर सुरू झाला.

दारवली गाव शेतीवर अवलंबून. उन्हाळ्यात शेतीकरता पाण्याची समस्या असायची. गावाजवळून ओढा वाहतो. जयश्रीताईंनी तंटामुक्तीचा निधी ओढय़ावर बांध बांधण्याकरता वापरायचं ठरवलं. तंटामुक्तीतील एक लाख रुपये बांधाकरता वापरण्यात आले. आज शेतीला बाराही महिने पुरेसं पाणी मिळतं आहे. जयश्रीताई एक-एक विषय हातावेगळे करत होत्या. गाव कचरामुक्त करायचं असं त्यांनी ठरवलं. त्यांच्या गावापासून जवळच ‘इनोरा’ या कचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या संस्थेचं कार्यालय आहे. जयश्रीताई त्या संस्थेत जाऊ लागल्या. महिलासभेमध्ये ‘कचरा व्यवस्थापन’ हा विषय मांडण्यात आला. स्त्रियांनी ‘इनोरा’च्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्यांना हा प्रकल्प खूप आवडला. गावातील स्त्रियांनी गांडूळ खत निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं. स्त्रियांचा उत्साह पाहून ‘इनोरा’ संस्थेनं गावात प्रकल्प राबवण्याचं ठरवलं. ‘मर्सडिीज बेन्ज’ कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून गावातल्या प्रत्येक घरात दोनशे लिटरचे ड्रम दिले. आज गावातल्या प्रत्येक घरात गांडूळ खत निर्मिती होते आहे. स्त्रिया फळभाज्या, पालेभाज्या करत आहेत. ‘प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि स्त्रिया स्वयंपूर्ण झाल्याच पाहिजेत,’ असं जयश्रीताई जोरदारपणे म्हणतात. गावाजवळील सिम्बॉयसिस संस्थेत चौदाव्या वित्तआयोगातून पंचवीस विद्यार्थ्यांना एमएससीआयटीचं प्रशिक्षण देण्यात आलं, तर ३५ स्त्रियांना ब्युटीपार्लर आणि शिवणकामाचं प्रशिक्षण देण्यात आलं.

गावात गेली २० वर्षे दगडखाण सुरू आहे. या दगडखाणीला सरकारच्या सर्व परवानग्या असल्या तरी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगीच नाही. ग्रामपंचायतीत नोंदही नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला या खाणीचा काहीच महसूल मिळत नाही, असं ताईंच्या लक्षात आलं. ग्रामसभेत हा विषय घेऊन ही खाण बेकायदेशीर असल्याचा ठराव संमत करण्यात आला. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल करण्यात आलं. सहा महिने खाण बंद झाली. सध्या हे प्रकरण कोर्टकचेरीत अडकून राहिलं आहे. गावाने याकरता वकिलाची नेमणूक केलीय.

ही कामं करत असताना ताईंनी नेहमीच त्यांच्या सहकारी सदस्यांना विश्वासात घेतलं. चार सदस्यांचा त्यांना नेहमी पाठिंबा असायचाच. यात तीन स्त्रिया आणि एक पुरुष होते. पण विरोधातल्या दोघांनाही त्यांनी विश्वासात घेतलं. बहुमताच्या जोरावर ताईंचे प्रस्ताव आणि कामं मंजूर व्हायची. त्यांच्या कामाची तडफ आणि यश पाहून साडेतीन वर्षांनंतर उपसरपंचानेच त्याच्या पदाचा राजीनामा दिला. हा ताईंची मेहनत, कामं आणि ताठ मानेने जगण्याची जिद्द याचाच विजय होता. ताईंना परिस्थितीमुळे इच्छा असूनही पुढे शिकता आलं नव्हतं. १९९८ मध्ये त्या दहावी झाल्या. मुलांच्या आग्रहाने २०१८ मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा देत त्या साठ टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. आता त्या बी.ए. च्या पहिल्या वर्षांच्या अभ्यासाची तयारी करत आहेत.

गेल्या महिन्यात पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. गावातल्या प्रत्येकाच्या तोंडात आता जयश्रीताईंचंच नाव आहे. एकेकाळी एकटं पाडणारा गाव, आता जयश्रीताईंना निवडणुकीला उभं राहण्याचा आग्रह करत होता. पण आता जयश्रीताईंना त्यांचं आकाश विस्तारायचं आहे. ‘गावात करू शकतो तर तालुक्याला पण करू या’ हा आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे.

जिद्द असेल तर माणूस विरोधावर मात करून यशस्वी होऊ शकतो, हे जयश्रीताईंनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com