‘‘समद्या जागी शेतमजूर बायांबर लय अन्याय व्हतो. समदं दिसतं. पण तोंडाला टाळं ठोकायचं. गडय़ापरीस जास्ती काम करून घ्येत्यात पन बाईमानूस म्हून मजुरी मात्र कमी देत्यात! वर मुकादमाची मान्सं उठता बसता वरडत ऱ्हात्यात. समदं सहन करायचं. पोटासाठी.. आन् पोरांसाठी!’’- शेतमजूर सरूबाई पाडवे यांची व्यथा..

स काळचं नऊ वाजलं. गेटवर हाजिरी दिली. आन् द्राक्षाच्या मळ्यांत पाय टाकला. एकडाव अख्या मळ्यावर नजर टाकली. जीव लई शांत झाला. येका बाजूला हिरव्या छताच्या सावलीत न्हानी रोपं व्हती, तर दुसऱ्या बाजूला जाळीच्या मांडवावर पसरलेल्या वेलीला द्राक्षाचे मणी फुटले व्हते. समोर काल खुरपणी क्येलेलं काळ्याभोर मातीचं वावर पसरलं व्हतं. माथ्यावर उन्हं चटके देत व्हती. पन ही हिरवी माया बघून जीव गपगार झाला. पायातळीची मातीची चिमूट उचलली. कपाळाला लावली आन् कामाला भिडली.

आमच्या कंत्राटदाराकडं चाळीस शेतमजूर बाया हाएत. ह्य़ा द्राक्षांच्या मळ्यांत धा धा जणींच्या गटाला येक येक काम वाटून दिलंय. काल मी, कमळाबाई, येसू आन् शारदा खुरपणीच्या कामांत व्हतो. धा किलोमीटरच्या दोन लायनीला दोन बाया खुरपणी करत व्हत्या. कालचं काम आज पुरं करायचं हाय!

गेटवर कालवा ऐकला तशी खुरपं खाली टाकून गेटकडं धावलो. शारदाला धा मिनिटं उशीर झाला व्हता तर मुकादम तिला घरी जा म्हनत व्हता. त्याला म्हनलं, ‘‘आरं बाबा जरा तिची परिस्थिती जाण. नवरा नाय. धा दिवसामागं तिचं आप्रेशन झालया. पिठात पाणी कालवून पोरान्ला घालत व्हती. आम्ही बायांनी सोताच्या खर्चानं ज्वारी, बाजरी, तेल, मीठ भरून दिलं तवा दोन घास पोटांत जातायत तिच्या. धा मिनटांसाठी कशापायी खाडा लावतोस तिचा?’’ पन त्यो काय ऐकना. मंग मी बी आवाज चढीवला. चार बाया गोळा झाल्या तसा नरमला. तिला घेतलं कामावर! आप्रेशन झालंय तवाधरनं लय पोट दुखतं तिचं! मंग मुकादमची मान्सं लांब ग्येली तसं तिला म्हनलं, तू बस गुमान बांधावर! तुजं काम आम्ही करू! हो, अस्सं असतंया. शेतमजूर बायांवर लय अन्याय व्हतो. पन तो सोसायचा आन् एकमेकींना सांभाळून घ्यायचं!

कालचीच गोस्ट! धा किलोमीटर खुरपणीचं टारगेट व्हतं. पाऊस वरून कोसळतोय आन् वावरात हा चिखलाचा राडा! गवत बी ह्य़े आस्सं उंच वाढल्येलं! सात वाजंस्तवर काम क्येलं तरी बी अर्धीच गवत कापणी झाली. तर मुकादम लागला वरडाया. ‘‘तुमी बाया लय कामचोर आहात! उन्हाळ्यात काम फटाफट करत व्हता. आन् आज अर्धच वावर झालं? मंग आज मजुरी बी अर्धीचं भेटंल!’ वाटलं त्याला म्हनावं, ‘आरं! वरून पाऊस बदाबदा कोसळतोया. गवत वाढलंय. चिखलातनं पाय उचलना पटापट. तर काम फाष्ट कसं व्हनार? दिवसभर राबून बी मुकादमानं अध्र्या दिवसाचा खाडा लावला पन आमी गप बसलो. जास्ती आवाज क्येला तर बोलनारीला साइडला करत्यात. तिला काम देत न्हाय. निसतं जाग्यावर बसून ठिवतात आन् खाडा लावतात. मंग बाकीच्या बायांची बोलती बंद व्हती.

दुसऱ्या दिवशी खुरपणी आटोपली तशी तीन डोळ्यांवरची डोगरेजची काठी काढाया घ्येतली. छोटय़ा-प्लॅश्टिकच्या बॅगेत माती भरून अशा काठय़ा खोचायला घ्येतल्या. आता थोडय़ा दिवसांनी येकेक काडी फुटली का प्लॅश्टिकची बॅग फाडून ती शेतात न्हेऊन लावायला लागल. मंग त्यावर शरद, फ्लेम, थम्सन, रेडग्लोब अशा द्राक्षाच्या जातीचं कलमं करायचं काम सुरू व्हईल. मन लावून माजं काम चाललं व्हतं. तेवढय़ात मुकादम मजजवळ आला. म्हनला, ‘पलीकडच्या वावरात औषध फवारणीला जा.’ डोगरेजची काठी टाकली आन् मी औषध फवारणीला गेली. छाटणी झाल्यावर रोपांवर औषध लावाया लागतं. त्ये लावाया घ्येतलं आन् त्याचं थेंब तोंडावर उडालं. चेहरा भाजला. कातडं जळालं. तोंड पदरानं पुसलं आन् तशीच फवारणी करत राह्य़ली. तासाभरानं कातडं लय जळाया लागलं. पायांत पेटकं आले. आजूबाजूला पाह्य़लं तर मुकादमची मान्सं न्हवती. म्हनून जरा ईळभर बांधावर टेकली तर पाठीमागून आवाज आला, ‘‘सरूबाय किती येळ बसता? औषध फवारणीचं काम संपलं आसलं तर दुपारहून थिनिंग करायला घ्या पलीकडल्या वावरात!’’  व्हयजी म्हनलं आन् उठले. औषध फवारणी संपली तवर दुपारचा येक वाजला. अध्र्या घंटय़ाची जेवणाची सुट्टी झाली. मी व्हते वावराच्या पार टोकाला! तिथून वडाच्या झाडाखाली पोहोचून, डोणीतलं पाणी काढून हातपाय धुतलं तरी बी हाताला औषधाचा वास येत व्हता. ह्य़े औषध विषारी असतया. हात धुवायला साबण हवा. पन त्यो कधीच नसतोया. तसंच खसाखसा हात धुतला. भाजलेल्या तोंडावर पाणी मारलं आन् घास तोंडात घालनार तर मुकादम वरडत आला, ‘‘चला. कामाला भिडा.’’ तुम्ही बाया लय टाइमपास करता. आता हिथं बोलत बसाल तर एकेकीला माघारी पाठवून देईन! मी डबा बंद केला. पिशवीत भरला. असा दर दिवसाआड डबा माघारी जातो. डोणीतलं पाणी घटाघटा प्यायली आन् भूक मारली. डोळ्यातनं पानी येत व्हतं. म्हनून डोळ्यांवर पानी मारलं आन् लांबच्या वावरांत थिनिंगचं काम सुरू क्येलं. ह्य़ा वावरातली झाडं तीन वर्साची हाएत. हिथं लोखंडी अँगलवर तारा लावल्यात. त्याच्यावर द्राक्षाच्या वेली चढवल्यात. त्यावर आता तीन वर्सानी फळं धरलेत. द्राक्षाचे छोटे छोटे मण्यांचे घोस वेलीला लटकलेत. त्या घोसातल्या आंतल्या साइडच्या मण्यांचं थिनिंग कराया मी घेतलं. एक बंच करायासाठी एक तास त्या घडावर एकटक नजर ठिऊन थिनिंग कराया लागतं. आसं तीन तास केलं काम तसं डोळं दुकाया लागलं. एकटक बघून डोळ्यातनं लय पानी गळाया लागलं. सारकी झाडाकडं वर मान बघून काम करताना मान बी लय दुकाया लागली. खांद्यात कळ आली. तसं कामदाराकडनं स्टुल मागून आनलं. प्रत्येक झाडाम्होर स्टुल ठिऊन थिनिंग करू लागली तसं मान दुकायची थांबली. पन प्रत्येक झाडाम्होरं स्टुल न्यायचं, त्यावर चढायचं.. काम झालं कां उतरायचं.. म्होरल्या झाडापुढं जायचं आसं करता करता गुडघे लय दुकाया लागले. दुपार पत्तुर चांगलं उन्हं व्हतं. अचानक पाऊस कोसळाया लागला. शेतात चिखलाचा राडा झाला. अंगावरची कापडं चिंब भिजली. तशीच सांजपत्तुर थिनिंग करत ऱ्हायली. अर्धा किलो वजनाचा कटर उचलून दिसभर पावसात हुबं ऱ्हाऊन काम केल्यावर सांजच्याला लय थकाया झालं. शेवटच्या झाडाचं थिनिंग करता करता कटरचा चिमटा बसला आन् सर्रकन हात कापला. कळ डोस्क्यांत गेली. तिथलंच मातीतलं येक फडकं उचललं आन् जखमेवर बांधलं. रगात थांबस्तवर येका बाजूला निसती डोळ्यातंनं टिपं गाळत बसून ऱ्हायली. मनांत आलं, गांव सोडलं. हिथं आले त्याला पंचविसावर र्वस झाली. हिथं येऊन तरी काय मिळालं? पंचवीस वर्सामाग फुरसुंगीहून इथं आली ते तिथं कोरडवाहू शेतीत भागना म्हून! कष्टाचं जीणं तिथबी होतं. हीथं बी हाएच! तिथं रात्रीचं येक वाजता गवत कापाया जायची. सकाळी सहा वाजस्तवर गवत कापणी करून घरी यावं तर नवऱ्यानं घरांतलं धान्य दारूवाल्याला दिलेलं असायचं. घरांत धान्याचा कण नसायचा. मजुरी मिळाली असंल तरी भाकरी कोरडय़ासंगं खायची. नायतर नुस्ता चा पिऊन दुसऱ्या शेतावर मजुरीला जायचं. येकदा तर गवत कापताना साप हातांत आला. थंडगार लागलं तसं टाकून दिलं. नशीब माजं जनावर चावलं नाय! निसाटलं हातातून! शेवटी जिवाला कंटाळली आन् हिरीवर जीव द्यायला गेली. उरावर सावकाराच्या कर्जाचा बोजा! त्याचा रोज तगादा! नवरा निसता दारूच्या गुत्यावर पडलेला. हिरीच्या काठावर वाढुळ हुबी ऱ्हायली. ल्हान लेकरं आठवली तशी गुमान माघारी आली. शेवटाला येका जोडीदारनी संग ह्य़ा ठिकाणी द्राक्षांच्या मळ्यांत आली. हिथं.. हिथंच काय समद्या जागी शेतमजूर बायांवर लय अन्याय व्हतो. समदं दिसतं. पण तोंडाला टाळं ठोकायचं. गडय़ापरीस जास्ती काम करून घ्येत्यात पन बाईमानूस म्हून मजुरी मात्र कमी देत्यात! वर मुकादमाची मान्सं उठता बसता वरडत ऱ्हात्यात. समदं सहन करायचं. पोटासाठी.. आन् पोरांसाठी!

आमच्या डोळ्यातली टिपं आन् अंगातला घाम गळतो तवा त्या धान्याला चव येती न्हवं..
माधुरी ताम्हणे  madhuri.m.tamhane@gmail.com