गायत्री कशेळकर

दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर कॉलेजमध्ये पदार्पण करताना प्रत्येकालाच शालेय जीवनातून मुक्तता मिळते. कारण कॉलेजमध्ये गेल्यानंतरचे स्वातंत्र्य काही वेगळेच असते. बंधन सैलावते. नवीन मित्र-मत्रिणी, क्लासेस, कॉलेजच्या वेळा, कॅम्पस सगळ्यांशी जुळवून घेता-घेता वेळही छान जातो, आणि कॅन्टिनमध्ये हळूहळू पावले वळू लागतात. बऱ्याचदा जेव्हा कॉलेजमधील तरुण-तरुणी, आहाराविषयी सल्ले घेण्याकरिता येतात तेव्हा यात बदलत्या जीवनशैलीप्रमाणे त्यांच्या आहारामध्येदेखील खूप बदल दिसून येतो.

हळूहळू पाश्चात्त्य संस्कृतीचा कल आपल्याकडे वाढायला लागला आहे. आहारातील चपाती, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी याची जागा आता ब्रेड, नुडल्स, पास्ता यांनी घेतली आहे. ‘हॅ! कॉलेजमध्ये कोणी डबा नेतं का? आता मी काही शाळेत जाणारी राहिली नाही.’ असे म्हणता म्हणता सर्रासबाहेरील पदार्थाना मागणी वाढू लागली आहे. बाहेरील खाद्यपदार्थाच्या रंगरूपाला भुलून त्यावर ताव मारता मारता आपण किती कॅलरी घेतल्या याचा अंदाज कधी बांधला आहे का? घरातील साजूक तूप, दही, दूध, ताक यांची जागा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या योगर्ट, चीज, मार्गारीन, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ यांनी मिळवली आहे. यात असणाऱ्या ‘ट्रान्स फॅट’ने पुढे तरुण वयातच हृदयाचे आजार, कोलेस्टेरॉलची वाढती पातळी यांसारखे आजार का होणार नाहीत? त्याचा दोष आपण मात्र घरी वापरणाऱ्या फोडणीच्या तेलालाच देत राहतो हो की नाही?

‘घरचे तेच तेच खाऊन कंटाळा आलाय आता’, ‘कॉलेज व क्लासेसमध्ये वेळच होत नाही’ असे म्हणता म्हणता किती पटकन वडापावच्या गाडीसमोर उभे राहून आपण ५ मिनिटांमध्ये वडापाव खातो. पण तीच ५ मिनिटे फळाच्या गाडीसमोर उभे राहून एखादे फळ खायलादेखील लागतात याचा विचार केलाय कधी? शालेय जीवनात सायकल नाही तर पायी चालत जाणे हा एकमेव मार्ग असे. परंतु आता आम्ही कॉलेजला जातो, लायसन्ससाठीदेखील योग्य वय म्हणत ८०-९० टक्के मुले दुचाकी घेतातच. मग तर विचारायलाच नको. पायी आम्ही चालतच नाही. मग व्यायामाचे काय?

या सर्व गोष्टींचा परिणाम तरुण पिढीवर म्हणजे सतत चिडचिडेपणा, मूड जाणे, स्वभावात अचानक बदल होणे यांसारखी लक्षणे अगदी लहान वयात दिसायला लागतात. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, एकाग्रता कमी होणे, कॉलेजला दांडी मारणे. याचा परिणाम पुढील करियरवर होऊ लागला आहे. त्यातच या वयात धूम्रपान, दारू, तंबाखू याचे सेवन याची सवय लागते जे पुढे जाऊन अनेक रोगांना आमंत्रित करू शकते. आपण जे खातो त्याप्रमाणेच त्याचे परिणाम आपल्याला शरीरावर दिसून येतात. सध्या जमाना ‘रेडी टू इट’चा आहे. ‘बस्स! २ मिनिट में तय्यार’ असे म्हणता म्हणता आपण प्रिझव्‍‌र्हेट्व्हिज व अतिमीठयुक्त पदार्थाच्या आहारी जायला लागलो आहे. अतिमीठ असलेल्या पदार्थाची चटक लागली तर घरचे पदार्थ आवडेनासे होतात. चायनीज पदार्थाचे उदाहरण बघा ना, त्यात वापरण्यात येणारे अजिनोमोटोमुळे सर्व तरुणवर्ग त्याकडे धावतो. त्याच्या अतिसेवनामुळे त्याचा परिणाम म्हणजे त्याने हाडांना इजा होते, ती लवकर ठिसूळ होतात.

स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला की आपण पटकन एका क्लिकवर घरी जेवण मागवतो. परंतु अशा प्रकारचा आहार परिपूर्ण नसतो. केवळ पोट भरले म्हणजे त्यातून सर्व प्रकारचे न्यूट्रियंट मिळाले असे होत नाही. सध्या फॅड डाएटचे प्रमाण कॉलेज तरुण-तरुणींमध्ये वाढतच चालले आहे. अनेकजण असे फॅड डाएट करून चुकीचा मार्ग अवलंबून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणकोणते फॅड डाएट आहे ते आपण बघूच.

(अ‍ॅटकिन्स डाएट) – यामध्ये लो-कार्ब घेण्याचा सल्ला देतात. यामध्ये संपूर्ण दिवसभरात फक्त २० ग्रॅम कार्ब दिले जातात. त्याचबरोबर अतिरिक्त प्रमाणात प्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ घेण्यास सांगतात. यामुळे कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी होते असा समज आहे. परंतु अशा प्रकारचे डाएट कधीही मनाने ठरवून करू नये; अन्यथा त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. अशा प्रकारचे डाएट न्यूरोलॉजी रुग्णांमध्ये फीट्स कमी करण्याकरिता दिले जाते. त्याआधी बऱ्याच शारीरिक चाचण्या करून हे डाएट किटो डाएट तज्ज्ञ डाएटिशियन, न्यूरॉलॉजिस्ट किंवा फिजिशियन यांच्या देखरेखीखाली करण्याचा सल्ला दिला जातो.

साऊथ बीज डाएट – यामध्ये कमी कार्ब, कमी स्निग्ध पदार्थ व जास्त प्रमाणात प्रोटिन्स देण्याचा सल्ला दिला जातो. हे डाएट दक्षिण फ्लोरिडा येथील डॉक्टरांनी शोध लावला आहे. यामध्ये कमी प्रमाणात कार्ब व स्निग्ध पदार्थ देऊन जास्त प्रमाणात प्रोटिन्सचा सल्ला देतात; जेणेकरून कॅलरीज जाळण्याचे काम लवकर होते व प्रोटिन्समुळे पोट लवकर भरल्याचे जाणवते.

वेगन डाएट – यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, उदाहरणार्थ – पनीर, दही, तूप, तसेच अंडी, मासे, चिकन हे खाण्यातून वर्ज्य. फक्त कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे व गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कॅल्शियमची आहारात कमतरता होते व त्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो.

५:२ डाएट – या प्रकारच्या डाएटमध्ये आठवडय़ातील पहिले ५ दिवस नेहमीप्रमाणे जेवण, नंतर उरलेले २ दिवस ५००- ६०० कॅलरीज एवढेच जेवण घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पेप्टाइड या हार्मोनमुळे पोट भरल्याचे समाधान मिळते, त्यामुळे आपोआपच कमी खायला लागतात. यामुळे न्यूट्रियंटची कमतरता तसेच अ‍ॅसिडिटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनरल मोटर्स डाएट – यामध्ये एक दिवस केळं सोडून कोणतीही फळे, दुसऱ्या दिवशी कच्च्या किंवा शिजवलेल्या भाज्या, तिसऱ्या दिवशी फळे व भाज्या, चौथ्या दिवशी फक्त केळं व दूध, पाचव्या दिवशी २८५ ग्रॅम चिकन, मटण, मासे + ६ टोमॅटो, सहाव्या दिवशी मांसाहार + भाज्या व सातव्या दिवशी ब्राऊन राईस, फळांचा रस व भाज्या.

या प्रकारच्या डाएटमुळे अनेक अन्नघटकांची कमतरता होऊन अशक्तपणा, हिमोग्लोबीनची कमतरता दिसून आली आहे. परंतु अशा फॅड डाएटमुळे कधीच वजन कमी होत नाही.

वेळेवर घेतलेला पौष्टिक आहार + पुरेसा व्यायाम + पुरेशी विश्रांती हेच सर्वात उत्तम!

हे लक्षात ठेवा –

डाएटला कोणतेही शॉर्टकट पर्याय नसतात.

प्रत्येकानेच आहार, व्यायाम याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.

रेडी टू इट पदार्थापेक्षा ताजी फळे, भाज्या, घरचे ताजे अन्न महत्त्वाचे.

खाण्याच्या दोन वेळांमध्ये जास्त अंतर ठेवू नये.

आहारात अतिमीठयुक्त, अतिगोड पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा.

आपण जेव्हा बाहेर/हॉटेलमध्ये जातो तेव्हा पटकन तळलेले पदार्थ, जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खातो. बघू त्यांना काय पर्याय असू शकतो.

बाहेरील खाद्यपदार्थाची पसंती     हेल्दी पर्याय/ सकस व पौष्टिक पर्याय

१.  भरपूर तेल/ बटर घालून केलेला पराठा  १.  गव्हाची चपाती/ फुलका

२.  वडापाव/ बर्गर/ तळलेले पदार्थ २.  पॅनकेक/ धिरडे

३.  भरपूर तेल व मसालेदार भाज्या किंवा ग्रेव्ही    ३.  सॅलॅड / कोशिंबीर

४.  भेळ/ शेवपुरी ४.  कडधान्यांची भेळ/ कुरमुऱ्यांचा चिवडा

५.  ब्लॅक टी/ ब्लॅक कॉफी ५.  कोकम ज्यूस / ग्रीन टी

६.  सोडा/ शीतपेय       ६.  नारळाचे पाणी / लिंबू पाणी

७.  फळांचा रस  ७.  फळे

८.  लस्सी       ८.  साधे ताक.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com