|| गायत्री कशेळकर

वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक जडणघडणीत बरेच बदल होत असतात. आजकाल या मुलींमध्ये वयाच्या साधारण १८ व्या वर्षांपासून ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (पीसीओसी) दिसू लागलाय. त्याची मुख्य लक्षणे म्हणजे- १)अँड्रोजन या संप्रेरकाची वाढती पातळी. २) अनियमित मासिक पाळी. ३) सोनोग्राफीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज आढळून येणे. ही तिन्ही लक्षणे आनुवंशिकता, हार्मोन्सच्या पातळीतील चढ-उतार व इन्सुलिनचे शरीरात असणारे अतिरिक्त प्रमाण यामुळे दिसून येतात.

याचा शरीरावर काय-काय परिणाम दिसून येतो? – कमी वेळात अतिरिक्त वजनवाढ, वंध्यत्व, गरोदरपणात होणारा मधुमेह, हृदयविकाराशी निगडित आजार -उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची वाढती पातळी, नराश्य, गर्भाशयाचा कर्करोग. आनुवंशिकता किंवा खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमध्ये अतिरिक्त गोड असणारे पदार्थ म्हणजे ‘हायकार्ब’चा शरीरावर मारा झाल्यास रक्तातील इन्सुलिनच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे अँड्रोजन संप्रेरकाचे प्रमाण वाढते व इस्ट्रोजनचीदेखील पातळी वाढते. या सगळ्याचा परिणाम होतो, तो म्हणजे अतिरिक्त वजनवाढ! आज ८०-८५ टक्के मुलींमध्ये ‘पीसीओडी’ची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामागे बदलती जीवनशैली आहे हे निर्विवाद. चुकीचा आहार, जेवणाच्या अनियमित वेळा, शारीरीक व्यायामाचा अभाव त्याला कारणीभूत आहेच.

जसे मागील लेखात आपण वाचले, ‘फॅड डाएट’ व मानसिक ताण कमी करण्यासाठी चुकीचा आहार घेण्याच्या घातक सवयींमुळे अनेकांमध्ये पोषणमूल्यांची कमतरता दिसून येते. म्हणूनच ‘पीसीओएस’ आणि आहार यांचा समतोल राखण्यासाठी सर्वात प्रथम – अतिरिक्त वजन, अतिप्रमाणात घेतला जाणारा आहार, मूड बदल, मानसिक चढ-उतार यांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

Sarvkash aahar article by gayatri kheschalkar

१) जेवणाच्या अनियमित वेळा- बऱ्याच जणींना सकाळी न्याहारी न करता महाविद्यालयात किंवा कार्यालयाला जाण्याची सवय असते. त्यामुळे चयापचयाचा वेग (शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याची प्रक्रिया) हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे सतत आम्लपित्त, अपचन, गॅसेसचा त्रास जाणवू लागतो. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे पुढे जाऊन दिवसभरात काहीही न खाण्याची इच्छा, मळमळ, उलटय़ा सुरू होण्यास वेळ लागत नाही. तसेच दोन खाण्यातील अंतर जास्त असल्यासदेखील बऱ्याचजणांना त्रास होतो.

हाय ग्लायसेमिक फूड – यांमध्ये मदा, साखर, मध, गूळ, बेकरी पदार्थ यांचा समावेश होतो. या प्रकारच्या पदार्थामध्ये फायबर व प्रथिनांचे प्रमाण अत्यंत नगण्य असते. त्यामुळे असे पदार्थ वारंवार खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच त्याचबरोबर शरीरात अतिरिक्त चरबी जमण्याचे प्रमाणदेखील वाढते. त्यामुळेच जर रक्तातील इन्सुलिन व साखरेच्या पातळीचे गणित चुकले तर वजनवाढ होतेच. बऱ्याचदा जेवायला वेळ नाही असे म्हणता-म्हणता कित्येकजणी ‘रेडी -टू- इट’ च्या आहारी जात हाय ग्लायसेमिक फूड खातात.

आहारातील कबरेदकांचे वाढते प्रमाण  – अनेकांच्या जेवणात कबरेदकांचे प्रमाण (कडधान्य आदी) जास्त तर प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी असते. आपण रोजच्या जेवणामध्ये संपूर्ण दिवसभरात जेमतेम ३० ग्रॅम इतकेच प्रोटिन्स घेतो. आता हेच बघा ना, किती जण प्रत्येक आहारात दूध, दही, ताक, सुकामेवा, सालीसकट डाळी, कडधान्ये, पनीर तसेच मांसाहारी पदार्थामध्ये अंडी, चिकन, मासे यांचा समावेश दररोज न चुकता करतात? बऱ्याचदा सकाळचा नाष्टा असो नाहीतर रात्रीचे जेवण, आपण कबरेदकांचे प्रमाण जास्त असलेल्या खाण्याचाच समावेश करतो. त्यामुळे कबरेदके किती प्रमाणात व कोणत्या स्वरूपात जात आहेत हे बघणे तितकेच गरजेचे आहे. आपल्याकडे जेवणात १ वाटी वरण म्हणजे जेमतेम १ छोटा चमचा डाळ असते बाकी १ वाटी पाणीच असते, मग त्यातून आपल्याला किती प्रथिनं मिळणार? पण त्याबरोबर २ चपात्या किंवा १ वाटी भात आपण घेतोच. त्यामुळे कबरेदके व प्रथिनांचे गणित चुकते.

सकाळी दिवसाची सुरुवातच चहा व कॉफीने करणारे लोक बहुतांश आहेत. त्यातच दूध नको म्हणता-म्हणता दिवसाला ५-६ कप चहा-कॉफी तर होतातच. त्यातच प्रत्येकी एका कपाला २ चमचे साखर या प्रमाणात घेतली तर किती प्रमाणात कबरेदकं आपल्या पोटात जातात! (सरासरी एक छोटा चमचा म्हणजे ५ ग्रॅम साखर. त्यातून साधारण तितकीच कबरेदकं मिळतात आणि  कॅलरीज मात्र भरपूर पोटात जातात. रात्रीच्यावेळी घरातील सर्वजण एकत्र बसून जेवण घेतात. पोळी, भाजी भात हे त्यात असतंच. पण प्रथिनांचे काय याचा विचार केलाय कधी? फळेसुद्धा योग्य वेळी म्हणजेच दोन खाण्यांमध्ये खाणे गरजेचे आहे. आपण फळे ‘डेझर्ट’ म्हणून खाल्ली तर त्यात असणाऱ्या ‘फ्रुक्टोज’ ने वजन तर वाढतंच! ‘कृत्रिम शर्करेने वजन वाढत नाही’ ही समजूत अत्यंत चुकीची आहे. कारण त्यात असणाऱ्या घटकांनी इस्ट्रोजन या संप्रेरकाच्या पातळीत बदल होऊ शकतो.

हे लक्षात ठेवा

  • आहारात दररोज २-३ फळांचा समावेश दोन खाण्यांमध्ये असावा.
  • प्रत्येक खाण्यामध्ये प्रथिनांचा समावेश असावा.
  • मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
  • अ‍ॅसिडिटी वाढवणारे पदार्थ म्हणजेच – जंक फूड, चीज, बटर, शेंगदाणे (अतिप्रमाणातील वापर), कॉफी, चहा, चॉकलेट, तळलेले व मसालेदार पदार्थ यांचा वापर टाळावा.
  • जेवण बनवताना स्वयंपाकात आले, लसूण, सेलरी, घरचे साजूक तूप (२-३ चमचे), मुफायुक्त वनस्पती तेलाचा Monounsaturated fatty acids आरोग्यदायी फॅट समावेश करावा.
  • हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेल्या रेडी-टू-इट पदार्थाची पाकिटे घेणे टाळावे.

वेळेत स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com