गायत्री कशेळकर

गर्भवती अवस्थेत एकवेळच्या खाण्यातून उत्तम प्रतीची कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा ताळमेळ साधल्यास त्याचा उपयोग बाळाच्या वाढीकरिता नक्कीच होतो. प्रत्येकाच्या उष्मांकांची गरज भिन्न असते. अतिप्रमाणात किंवा दुप्पट खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम आईच्या आरोग्यावर व बाळाच्या वाढीवर होऊ शकतो. -गर्भवतीचा आहार या विषयाचा हा भाग २

त्या दिवशी मेधा आणि सियाचे संवाद सहज कानावर पडले. मेधा विचारत होती, ‘‘आता गर्भवती अवस्थेत संपूर्ण नऊ महिने दुप्पट खावे लागणार गं. दूध भरपूर प्यावे लागणार.’’ ऐकून मनात विचार आला, अनेक आई होणाऱ्या, होऊ घातलेल्या स्त्रियांपुढे अनेक प्रश्न असतात. हे नऊ महिने नेमके काय आणि किती खावे? कारण हे नऊ महिने गर्भवाढीकरिता आणि आईचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता (प्रसूतीदरम्यान) गरजेचे असतात. मागील लेखात (२० एप्रिल) आपण अन्नघटकांचे महत्त्व याची माहिती घेतली. या लेखात बऱ्याचदा विचारले जाणारे काही प्रश्न पाहू.

प्र. १ : गर्भवती स्त्रीने या अवस्थेत दुप्पट खाल्ले पाहिजे का?

उत्तर : याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. गर्भवती अवस्थेत सुरुवातीचे काही महिने अनेकींना उलटय़ा, मळमळ, अपचन, बद्धकोष्ठता यांसारखी लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा भूकही मंदावते. अशा वेळी साधे अन्नदेखील खाववत नाही. गरोदरपणात नेहमीच्या उष्मांकांपेक्षा जास्तीच्या तीनशे कॅलरीज घेणे गरजेचे आहे. परंतु जेवणाचे प्रमाण वाढवण्याऐवजी त्याची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. म्हणजेच एक वेळच्या खाण्यातून उत्तम प्रतीची कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा ताळमेळ साधल्यास नक्कीच त्याचा उपयोग बाळाच्या वाढीकरिता होतो. प्रत्येकाच्या उष्मांकांची गरज भिन्न असते. अतिप्रमाणात किंवा दुप्पट खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम आईच्या आरोग्यावर व बाळाच्या वाढीवर होऊ शकतो.

प्र. २ : गर्भवती अवस्थेत हळद-केसर घालून दूध प्यावे म्हणजे बाळ गोरे होते, हे खरे आहे का?

उत्तर : नाही. बाळाचा रंग हा आनुवंशिकतेवर अवलंबून असतो. कोणत्याही प्रकारची औषधे व अन्न यांनी आपण गुणसूत्रे (वर्णाशी निगडित) बदलू शकत नाही. हळद-केसर घालून दूध प्यायल्याने पचनाला फायदा होतो. दोन्ही पदार्थामध्ये असणाऱ्या घटकांमुळे गर्भवती अवस्थेत होणारी जळजळ, अ‍ॅसिडिटीसाठी फायदा होतो. तसेच रात्री जेवणानंतर हळद-दूध-केसर घेतल्याने झोपही शांत लागते.

प्र. ३ : गरोदरपणात स्त्रीने मासे खाल्ल्यास त्याचा परिणाम म्हणून बाळाच्या त्वचेवर पुरळ उठते का? तसेच बाळाच्या जन्मानंतर त्वचेसंबंधी काही त्रास होतो का?

उत्तर : गर्भवती स्त्रीने मासे खाल्ल्याने बाळाला त्रास होतो याविषयी कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु मासे हे उत्तम प्रतीचे प्रथिने, लोह, झिंक असलेले आहेत जे बाळाच्या शारीरिक वाढीकरिता गरजेचे आहे. तसेच माशांमध्ये ‘ओमेगा – ३’ हा उत्तम प्रतिचा स्निग्ध पदार्थ असतो, जो मेंदू व डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. माशांमधून अन्न विषबाधा होऊ नये म्हणून काळजी मात्र आपण घेऊ शकतो. मासे नेहमी ताजे बघून घ्यावे व व्यवस्थित शिजवून खावे. मासे खाताना व खाल्ल्यानंतर दूध व दुधाचे पदार्थ घेऊ नये. त्यामुळे विषबाधा होऊ शकते. कच्चे व शिळे मासे खाणे टाळावे.

प्र. ४ : गरोदरपणात आईने अंडी, दूध, गहू खाल्ल्याने बाळाला त्रास होतो?

उत्तर : नाही. अंडी ही उत्तम प्रथिनयुक्त आहेत. एका अंडय़ातून साधारण सहा गॅम्र प्रथिने मिळतात. तसेच इतर जीवनसत्त्वे व खनिजे (मिनरल्स) मिळतात. अंडय़ातून कोलीन मिळते जे बाळाच्या मेंदूचे आरोग्य व वाढीकरिता अत्यंत उपयोगी ठरते. अंडं हे नेहमी पूर्णपणे शिजवलेल्या स्वरूपात खावे. कच्च अंडे खाल्ल्याने त्यातून विषबाधा व पोटाचे विकार होऊ शकतात. दुधातून प्रथिने, उत्तम प्रतीची कबरेदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, कॅल्शियम व प्रथिने मिळतात. त्यामुळे बाळाच्या हाडांच्या वाढीकरिता व आईची हाडे मजबूत राहण्याकरता मदत होते. प्रथिनांमुळे गर्भाशय, बाळाला होणारा रक्तपुरवठा व पेशी इ. उत्तम राहते.

प्र. ५ : गरोदरपणात संरक्षित अन्न (प्रिझर्वड फूड), डबाबंद खाद्यपदार्थ, गोठवलेले अन्न खावे की नाही?

उत्तर : संरक्षित अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. जर ते नीट काळजीपूर्वक खाल्ले नाही तर, अन्न जितके शिळे तितकाच त्यातील उपयुक्त अन्नघटकांचा ऱ्हास होण्याची शक्यता जास्त असते. अन्न नेहमी ताजे व गरम खाणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीतजास्त पौष्टिक व निरोगी अन्नघटक शरीराला मिळतात. त्यातून आईचे आरोग्य उत्तम राहते व बाळाची वाढ व शारीरिक आरोग्य उत्तम होते. डबाबंद प्रक्रियेमध्ये अन्नातील ‘सी’ जीवनसत्त्व व फोलेट या अन्नघटकांचा ऱ्हास होतो. तसेच अन्नाला विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो.

प्र. ६ : ‘गर्भवती अवस्थेत कमी खावे

म्हणजे आईचे वजन अतिरिक्त वाढत नाही’ हे खरे आहे का?

उत्तर : गर्भवती स्त्रीचे वजन साधारणत: १२-१५ किलो वजन वाढणे अपेक्षित असते. परंतु आहार चुकीच्या पद्धतीने घेतल्यास शरीरात चरबी वाढून वजन अतिरिक्त वाढण्याची शक्यता असते. मात्र कमी खाणे हा त्यावर पर्याय असू शकत नाही. कारण गर्भवती स्त्रीला योग्य प्रमाणात उष्मांक व इतर उपयुक्त अन्नघटक मिळणे गरजेचे आहे. अतिरिक्त वजन टाळण्यासाठी आहारातून अतिगोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ वर्ज्य  करावेत.

प्र. ७ : गर्भवती अवस्थेत पपई टाळावी का?

उत्तर : कच्च्या पपईमध्ये – कायमोपॅपीन हा घटक आहे ज्यामुळे गर्भावस्थेतील प्रथम तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. परंतु पिकलेली पपई चौथ्या महिन्यानंतर थोडय़ा प्रमाणात खाल्ल्यास त्याने कोणताही धोका नाही. पपईमधून ‘अ’, ‘सी’ जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ मिळतात जे बाळाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

प्र. ८ : गरम व मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गर्भपात होतो का?

उत्तर : योग्य प्रमाणात मसाले व गरम अन्न खाल्ल्याने गर्भपात होत नाही. परंतु अतिमसालेदार पदार्थ गर्भवती अवस्थेत खाणे धोक्याचे ठरू शकते. कारण या काळात आम्लपित्त व अपचनाचा त्रास होत असतो. अशा वेळी अतिमसालेदार पदार्थाने त्या बाईला त्रास होऊ शकतो.

गर्भावस्थेत अनेक प्रश्न, शंका येणारच. त्या मनातच ठेवू नका किंवा स्वत:च्या मनाने त्यावर उपायही शोधू नका. त्यापेक्षा योग्य त्या व्यक्तीकडून त्यांचे निरसन करून घ्या. बाळ निरोगी असणे हे जितके महत्त्वाचे तितकेच त्याच्या आईचे आरोग्यही. तेव्हा योग्य खा. निरोगी राहा.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com