22 November 2019

News Flash

सर्वंकष आहार : गृहिणींच्या आरोग्याविषयी

गृहिणींचा रोजचा दिनक्रम घरातील इतर मंडळींवर अवलंबून असतो आणि तेच या स्त्रियांसाठी अपायकारक ठरतं.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री कशेळकर

आज असे दिसून येते गृहिणींचे वजन हे नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त असते. खाण्या-पिण्याची वेळ, शारीरिक व्यायाम यांचा समतोल चुकत चाललाय. गृहिणींचा रोजचा दिनक्रम घरातील इतर मंडळींवर अवलंबून असतो आणि तेच या स्त्रियांसाठी अपायकारक ठरतं. शिळे अन्न खाणे, दोन खाण्यातील जास्त अंतर, नाश्त्याची वेळ चुकवणे, रात्रीचे अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव शरीरावर दुष्पपरिणाम करतो.

वजन जास्त आहे की कमी कसे ओळखावे?

आपले वजन जास्त आहे की बरोबर हे तपासण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे –

वजन (किलोग्रॅम)

उंची (मीटर)* २

उदा. – वजन ५० किलोग्रॅम आणि उंची १५५ सेंमी असेल तर उत्तर = २०.८ जो तुमचा बॉडी मास इंडेक्स असतो.

तो १९ च्या खाली असेल तरअती कमी वजन

१९ ते २५ = वजन व्यवस्थित

२५ ते ३० = अतिवजन

३० पेक्षा जास्त = स्थूल

याप्रमाणे तुमचा बीएमआय करून घ्या.

दुपारी झोपावे की नाही?

जेवण झाल्या-झाल्या लगेच झोपायची अनेकांना सवय असते. त्यामुळे शारीरिक हालचाल मंदावते. पचनशक्तीवर परिणाम तर होतोच. त्याबरोबर उठल्यानंतर जडपणा येतो. त्यामुळे खूप जण संध्याकाळचा व्यायाम करण्याचा कंटाळा करतात. परिणामी  वजन वाढते. त्यामुळे १-२ तास झोपण्यापेक्षा

१० – १५ मिनिटांची विश्रांती पुरेशी असते.

जास्त वजनाने काय होते?

आजकाल पस्तीशी-चाळीशीमध्ये वजन जास्त असल्या कारणाने गुडघेदुखी, कंबरदुखी आणि पाठदुखी अनेकांच्या मागे लागली आहे. वजन जास्त असल्याने त्याचा परिणाम शरीराचा भार सांभाळणाऱ्या गुडघे, पाठीचा मणका यांवर होतो. तसेच अनेक अन्नघटकांच्या कमतरतेमुळे ‘ड’ जीवनसत्व आणि ‘ब १२’ यांची कमतरता भासवते. जगभरातील अनेक संशोधनातून असेही सिद्ध झाले की, बराच काळ वजन जास्त प्रमाणात राहिले तर त्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि पोटाचा कर्करोग वाढण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे अतिवजन घातकच आहे! आजकाल ९० टक्के स्त्रियांमध्ये अतिवजनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचे आजार हे ३० – ४० या वयामध्येच वाढायला लागलेत.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे प्रत्येक गृहिणीने स्वत:साठी वेळ काढणे आणि स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे गरजेचे आणि योग्य प्रमाणात दररोज शारीरिक व्यायाम गरजेचे आहे. आहारातील साखर, मध, गूळ, अतिगोड पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. मैदा आणि मैद्याचे पदार्थ टाळावेत. गृहिणींच्या हातातच घराचे संपूर्ण आरोग्य आहे. त्यामुळे स्वयंपाकात योग्य तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा. उगाचच जाहिरातींना भुलू नये.

दररोज ४० – ४५ मिनीटे व्यायाम करण्यास विसरू नये. एकटय़ाने व्यायाम करायला अनेकांना कंटाळा येतो. पण आजकाल जिममध्ये ‘खास स्त्रियांसाठी वर्ग’ सुरू केले आहेत. अनेक नवीन पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम, ज्यामध्ये योगासने, सूर्यनमस्कार, व्यायामाचे निरनिराळे प्रकार केले जातात. अनेक ठिकाणी स्त्रियांचे गट दररोज चालण्याचा व्यायाम, डोंगर चढण्याचा व्यायाम अशा उपक्रमांत उत्साहाने सहभागी होताना दिसतात.

आज घरातील सर्व कामे मशिनने वाटून घेतली आहेत. घरोघरी जिन्यांचा वापर कमी तर लिफ्ट वापर जास्त होऊ लागला आहे. बाजारात चालत जाण्यापेक्षा दुचाकी / गाडी वापरली जाते. त्यामुळे व्यायाम शून्यच! म्हणूनच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी या काही गोष्टी  लक्षात ठेवाच –

जेवणाच्या योग्य वेळा पाळाव्यात.

अन्न ताजेच असावे. शिळे अन्न टाळावे.

रात्रीची पुरेशी झोप (सलग ७-८ तास)

पुरेसा आणि नियमीत शारीरिक व्यायाम.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 15, 2019 1:48 am

Web Title: sarvkash aahar article by gayatri kheschalkar 9
Just Now!
X