सूरदासांचं जीवन म्हणजे प्रेमभक्तीनं उचंबळणारा एक सागरच बनला. एकीकडे भगवंत निर्गुण, निराकार आहे आणि तोच आपल्या सच्चिदानंद रूपात आविष्कृत होताना नित्यवृंदावनात गोप-गोपींसह नाना प्रकारच्या लीला रचतो आहे, असा त्यांचा विश्वास आहे म्हणून निर्गुण ब्रह्माचं स्वरूप समजून घेऊन मी cr10सगुण ब्रह्माची पदं गातो आहे, असं ते म्हणत राहिले.
सूरदास भास्कराप्रमाणे, चंद्रम तुलसी होत
तारा केशवदास, चमकती इतर कवी खद्योत
अर्थात सूरदास कवितेच्या नभांगणातले सूर्य आहेत आणि तुलसीदास चंद्र, केशवदास ताऱ्यांप्रमाणे चमकणारे आहेत आणि इतर कवी म्हणजे इथे-तिथे प्रकाशणारे काजवे.
खरे कवी तीनच आहेत- ते तिघे म्हणजे तुलसी, केशव आणि सूर होत.
कविताशेती हेच लुटविती
उरले सुरले धान वेचिती बाकी कवी मजूर
असे सूरदासांच्या कौतुकाचे किती तरी दोहे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दीर्घजीवी लोकप्रियतेची आणि त्या लोकप्रियतेला कारण असणाऱ्या त्यांच्या रसमधुर कवितेची ती साक्ष आहे. उत्तरी भारताचे मध्ययुगीन जनमानस त्या कवितेनं प्रभावित केलं आहे. तिथल्या साहित्याला, संगीताला आणि नृत्याला तिनं प्रभावित केलं  आणि मुख्य म्हणजे तिथल्या भक्तीपरंपरेला प्रभावित केलं आहे.
असं म्हणतात की सूरदास जन्मांध होते. त्यांचा जन्म १४७८ मधला. आग्रा आणि मथुरा यांच्याजवळच्या प्रदेशात सीही नावाच्या गावी जन्मलेला हा आंधळा मुलगा. सहा वर्षांचा असतानाच घरदार सोडून निघाला आणि सहा कोसांवरच्या दुसऱ्या गावी जाऊन राहिला. कुणी असंही म्हणतात की, हा मुलगा जन्मत:च अंध नव्हता. तो घर सोडून निघाला तेव्हा एका कोरडय़ा विहिरीत अडकून पडला. तिथे त्याची सुटका केली प्रत्यक्ष श्रीकृष्णानं. ते देवरूप पाहिल्यावर आणखी काहीही पाहणं नको, म्हणून त्या मुलानं आपले डोळे फोडून घेतले आणि तो अंध झाला.
आख्यायिका दूर सारली तरी सूरदास बालपणापासूनच अंध होते हे खरं. पुष्कळदा असं घडतं की, एका इंद्रियाची शक्ती गमावलेल्या माणसांची दुसरी इंद्रियं अधिक तल्लख होतात. सूरदासांच्या बाबतीत तसंच घडलं असावं. त्यांना उत्तम रीतीचं संगीताचं ज्ञान होतं आणि शकुन सांगण्याची उपजत शक्ती होती. त्या शक्तीनं त्यांना लोकांचं प्रेम दिलं, आधार दिला आणि उपजीविकाही दिली. त्यांना एका जमीनदारानं एक झोपडी बांधून दिली आणि तिथे वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत स्वत:च रचलेली पदं गात भगवद्भक्तीत रंगलेले सूरदास ‘स्वामी सूरदास’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्याभोवती काही शिष्यमंडळी गोळा झाली आणि थोडी धनसंपत्तीही गोळा झाली.
एक दिवस सूरदासांनी हा सगळा बांध मोडला. ती कुटी, ते शिष्य, ती संपत्ती सगळं सोडून ते आधी मथुरेच्या विश्रांत घाटावर आणि नंतर मथुरा-आग्रा रस्त्यावरच्या एका लहानशा घाटावर- गऊघाटावर जाऊन राहिले. तो गऊघाट सूरदासांच्या नावानं धन्य होऊन गेला. आयुष्याचा पुष्कळ काळ याच घाटावर त्यांनी व्यतीत केला. इथेच त्यांना त्यांचे गुरू भेटले; नव्हे गुरूनेच त्यांना शोधून काढलं. पुष्टिमार्ग या नावानं प्रसिद्ध असलेल्या संप्रदायाचे प्रवर्तक श्रेष्ठ भक्ती आणि आचार्य वल्लभ व्रजभूमीकडे जाता जाता गऊघाटावर थांबले आणि त्यांनी सूरदासांची भेट घेतली. भगवंतांपाशी लीनतेनं मुक्तीची याचना करणारी त्यांची पदं ऐकली आणि त्यांना लीनतेखेरीज भक्तीचे इतर उल्हसित रंग दाखवणाऱ्या पुष्टिमार्गी उपासनेची दीक्षा दिली.
वल्लभाचार्याची भेट आणि त्यांनी दिलेली दीक्षा ही सूरदासांच्या आयुष्यातली फार महत्त्वपूर्ण गोष्ट ठरली. माणसाच्या- अगदी पूर्वप्रसिद्ध आणि लोकप्रिय माणसाच्या बाबतीतही असं घडतं, घडू शकतं की त्याच्या संचिताला अकस्मात एखादा प्रेरक स्पर्श घडतो आणि त्या स्पर्शानं सगळं पूर्वसंचित नवं होतं. उजळून जातं. त्याच्या असण्याला आणि करण्याला अर्थ मिळून जातो. सूरदासांजवळ भावसंपन्न अंत:करण होतं, काव्याची प्रतिभा होती. रागदारी संगीताची जाण होती आणि भक्तीची समर्पणवृत्ती होती. वल्लभाचार्यानी या सगळ्याला कृष्णवेध दिला. ऐहिकात जन्म घेणारी प्रेमभावना भक्तीचा हात धरून उत्तुंग अशा मुक्तीपर्यंत कशी पोहोचू शकते याची जाणीव त्यांनी सूरदासांच्या मनात निर्माण केली.
सूरदासांचं त्यानंतरचं जीवन म्हणजे प्रेमभक्तीनं उचंबळणारा एक सागरच बनलं. खरं तर तो काळ वैष्णवांच्या विविध संप्रदायांनी गाजता ठेवलेला काळ होता. माध्व होते, निंबार्क होते, चैतन्य होते, ढट्टी होते, राधावल्लभीय होते. या सर्वाच्या तत्त्वज्ञानामध्ये आणि उपासनांमध्ये असलेल्या विविधतेच्या पलीकडे जात जणू सर्वाचं प्रतिनिधित्व करणारी कविता सूरदासांनी गायली आहे. एकीकडे भगवंत निर्गुण, निराकार आहे आणि तोच आपल्या सच्चिदानंद रूपात आविष्कृत होताना नित्यवृंदावनात गोप-गोपींसह नाना प्रकारच्या लीला रचतो आहे, असा त्यांचा विश्वास आहे म्हणून निर्गुण ब्रह्माचं स्वरूप समजून घेऊन मी सगुण ब्रह्माची पदं गातो आहे, असं ते म्हणत राहिले आहेत.
वल्लभाचार्य आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र गोस्वामी विठ्ठलनाथ यांनी गोवर्धन पर्वतावर श्रीनाथांचं म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर बांधून तिथे वैष्णव संघटनांचं कार्य सुरू केलं होतं. त्या मंदिरातल्या सेवेची जबाबदारी त्यांनी सूरदासांना दिली होती. प्रारंभी फक्त कृष्णसंबंधी असणारे मंदिरातले नित्य-नैमित्तिक विधी आणि उत्सव यांना विठ्ठलनाथांनी राधेच्या जन्मोत्सवाची जोड दिली आणि पुष्टिमार्गी भक्तीमध्ये शृंगाराचं माधुर्य मिसळलं. सूरदासांनी या सांप्रदायिक उपासना मार्गावरून चालताना हरि-लीलेचं रहस्य जाणून घेतलं आणि वात्सल्य, प्रेम आणि सख्य भावनांचं अतिसूक्ष्म, अतिवेधक आणि अतिउत्कट दर्शन घडवलं.
सूरदास आपल्या युगातले एक श्रेष्ठ भक्त कवी गणले गेले. गोस्वामी विठ्ठलनाथांचे पुत्र गोस्वामी गोकुळनाथ यांनी आपले वडील आणि आजोबा यांच्या साडेतीनशे भक्तांची चरित्रं वर्णन केली आहेत. त्या भक्तांचे मुकुटमणी सूरदास समजले जातात. विठ्ठलनाथांनीही आपल्या शेकडो भक्तांमधून आठ श्रेष्ठ भक्तांची निवड केली होती. ‘अष्टछाप’ भक्त कवी म्हणून ते प्रसिद्ध झाले. सूरदास त्यांच्यापैकी एक भक्त होते.
शंभराहून अधिक वर्षांचं आयुष्य सूरदासांना मिळालं. त्यांचा काळ म्हणजे मुगल सम्राट अकबर आणि त्याचा पुत्र जहांगीर यांचा काळ. या दोघांनीही वल्लभाचार्याचा आणि त्यांच्या संप्रदायाचा आदर केला. त्यांना दानं दिली. अनेक सोयी-सुविधा दिल्या. असं म्हणतात की, सूरदास आणि अकबर यांची भेट झाली होती आणि अकबर सूरदासांच्या पदांनी भारावून गेला होता. या संबंधीच्या कथा काय किंवा सूरदासांच्या आयुष्यातल्या इतर चमत्कार कथा काय, त्यांच्या खरे-खोटेपणाची चर्चा आज महत्त्वाची वाटत नाही. खरं तर महत्त्वाचं हेच की, या जन्मांध माणसाचे अंत:चक्षू फार तेजस्वी होते. परमात्म्याच्या सगुण लीला आनंदानं पाहता पाहता त्याच्या त्या पलीकडच्या निर्गुणरूपावर ते स्थिरावले होते. त्यांचं शतायू आयुष्य म्हणजे त्याच निर्गुण रूपाचा स्वत:मध्ये झालेला साक्षात्कार आणि त्या साक्षात्कारी अनुभवाचा त्यांच्या वाणीमधून झालेला दिव्य असा सहजोच्चार.

शब्द शब्द उजळला, गुरूने रहस्य समजावले
मला मी माझ्यातच पाहिले
असा आत्मप्रत्यय आलेला हा भक्त कवी म्हणजे मध्ययुगीन व्रजभूमीचं वैभव ठरला. ‘सूरसागर’ या नावानं प्रसिद्धी पावलेला त्याचा पदसंग्रह म्हणजे वैष्णवांच्या भक्ती परंपरेचा एक मौलिक वारसा ठरला. त्याची कृष्णभक्ती म्हणजे भगवद्पूजकांचा परमादर्श ठरली आणि त्याचं रसमधुर, सर्वागसुंदर काव्य म्हणजे अनेक कलांचं प्रेरक स्थान ठरलं.
डॉ. अरूणा ढेरे –  aruna.dhere@gmail.com

Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स