साधना तिप्पनाकजे

लताताई त्यांच्या जन्मगावाच्या सरपंच झाल्या, त्याला चार वर्ष झालीत. दरवर्षी महिला बालकल्याण निधीमधून गावातील स्त्रियांकरता आरोग्य शिबिरांचं आणि शेतीशाळांचं आयोजन करण्यात येतं. लताताईंनी स्त्रियांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक मिळावी याकरता गावात आणखी एक विशेष गोष्ट सुरू केली. कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर, त्या कुटुंबाचा गावासमोर सत्कार करण्यात येतो. सातारा जिल्ह्य़ातील भालेघर गावच्या सरपंच लता गोळे यांच्या कामाविषयी..

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
fruit sale cess evaders
फळे विक्री उपकर बुडवणाऱ्यांवर कारवाई, एपीएमसी प्रशासनाचा निर्णय; प्रामुख्याने आंब्याच्या जातीचा उल्लेख करणे अनिवार्य
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका
Panvel, sheva village, Air Force Station, Suspicious Individual, Arrests, Trespassing, Roaming, Restricted Area, marathi news
हवाई दलाच्या प्रवेश निषिद्ध परिसरात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल

नुकताच सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा शासननिर्णय झाला आहे. हे स्वागतार्ह आहे. बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या कामांकरता सरपंचांना पदरमोड करून जावं लागतं. काही सरपंचांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्याकरता हा भार सहन करणं खूप कठीण होतं. त्यामुळे मानधनवाढीसोबतच ते वेळेत मिळणंही गरजेचं आहे. आजच्या आपल्या सरपंचांना मिळणारं सरपंच म्हणून मिळणारं मानधन त्या गावाकरताच खर्च करतात. अपुऱ्या लोकसंख्येमुळे गावाला पुरेसा निधी मिळत नाही आणि गावाचं उत्पन्नही तुटपुंजं आहे. गावच्या विकास निधीकरता आपलं मानधन देऊन खारीचा वाटा उचलणाऱ्या या सरपंच आहेत, लता गोळे.

सातारा जिह्य़ातील जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत भालेघर वसलंय. डोंगराच्या मधल्या पट्टय़ात हे गाव आहे. पायथ्यापासून गावाकडे यायला सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि गावापासून डोंगरमाथा सात किलोमीटर अंतरावर आहे. साधारण साडेतीनशे लोकवस्तीच्या या गावात उत्पन्नाचं साधन कोरडवाहू शेती. तीपण स्वत:पुरतीच. जास्तीचं उत्पन्न नाही. गावातला तरुण वर्ग नोकरीनिमित्ताने सातारा, पुणे, मुंबई या शहरी भागांत वसलेला. त्यामुळे गावात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. लहानसहान गोष्टींकरता गावकऱ्यांना डोंगर उतरून खाली यावं लागतं. काही काळ बससेवा सुरू होती, पण मर्यादित प्रवासी संख्येमुळे एसटीने सेवा बंद केली. भौगोलिक परिस्थितीमुळे कोणत्याही कामांकरता इथल्या सगळ्याच गोष्टींवर मर्यादा येतात. लताताईंचं माहेर आणि सासर दोन्हीही भालेघरमध्येच. त्यामुळे त्यांना इथल्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. त्यांचे यजमान शिक्षक असल्यामुळे शासनाच्या काही योजनांची, त्यातून मिळणाऱ्या लाभांची त्यांना थोडीफार माहिती होती.

२००५ च्या सुमारास लताताईंनी स्त्रियांकरता बचतगट सुरू करण्याचे ठरवले. लताताईंनी गावातल्या स्त्रियांना एकत्र केलं आणि बचतगटाविषयी माहिती दिली. स्त्रियांना त्यांची कल्पना पटली. गावात स्त्रियांचे तीन बचतगट सुरू झाले. पण भौगोलिक परिस्थितीमुळे काही वस्तू बनवून खाली विक्रीकरता किंवा प्रदर्शनात भाग घेणे कठीण होते. मग लताताईंनी यावर मार्ग काढला. आपण किमान आपली बचत तर करूयात. आपल्या अडीअडचणीला तरी उपयोग होईल, असं लताताईंनी त्यांना सांगितलं. तांदूळ, गहू पिकत असला, तरी कुटुंबापुरतंच उत्पन्न निघतं. या बचतीमुळे मग बऱ्याचशा स्त्रियांच्या गरजेला बचतगटातून साहाय्य मिळू लागलं. केवळ शेतीमध्येच गुंतून असलेल्या गावातल्या स्त्रिया, बचतगटाच्या निमित्ताने एकत्र जमू लागल्या. त्यांची सुखदु:खं आपसात वाटू लागल्या.

तरुण पिढी शिक्षण-रोजगारानिमित्त गावाबाहेर असल्याने इथल्या आणखीही काही समस्या होत्याच. नोव्हेंबर २०१५ मध्ये गावात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीवर्गाकरता राखीव होतं. गावात लताताईंच्या नावाची चर्चा सुरू झाली. गावातल्या सर्वाशीच लहानपणापासून परिचय. ‘बचतगटाच्या कामामुळे आपली मुलगी गावासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करेल,’ हा विश्वास गावकऱ्यांना वाटत होता. त्यामुळे त्यांनी लताताईंना निवडणूक लढवायचा आग्रह के ला.  स्वत:चा प्रभाग सोडून, दुसऱ्या प्रभागातून त्या उभ्या राहिल्या आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. पुढे सरपंचपदीही निवडून आल्या. ग्रामपंचायतीच्या कामाविषयी त्यांना आजूबाजूच्या सरपंच आणि ग्रामसेवकाकडून थोडीफार माहिती मिळू लागली. गावात पाण्याची भीषण टंचाई होती. चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे लताताईंनी निवडून आल्यावर गावाला पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे याकडे लक्ष दिलं. गावाकरता कूपनलिका मंजूर झाली होती, पण निधीअभावी काम रखडलं होतं.

गावातल्या त्या दोन व्यक्तींशी बोलून लताताईंनी त्यांना अडचण सांगितली. त्यांनी या कामाकरता आर्थिक मदत करण्याचे ठरवले. कंत्राटदारालाही गावाची पाणी समस्या आणि निधीची चणचण सांगितली. गावातल्या दोन व्यक्तींकडून पैसे घेऊन कंत्राटदाराला अर्धी रक्कम देण्यात आली. कंत्राटदाराने कूपनलिकेचे काम पूर्ण केले. गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतर दोन वर्षांनी निधी आल्यावर कंत्राटदाराची पूर्ण रक्कम त्याला देण्यात आली. या वर्षी पाऊस थांबल्यावर गावातली मोडकळीस आलेली पाण्याची टाकी नव्याने बांधण्यात येणार आहे. याकरता ‘राष्ट्रीय पेयजल योजने’तून निधी मंजूर झाला आहे. गावात स्मशानभूमीची सोय नव्हती. पाणीपुरवठय़ाचं काम झाल्यावर २०१६ मध्ये गावाबाहेर स्मशानभूमी बांधण्यात आली.

गावात इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर मुलं खाली पायथ्याशी असणाऱ्या शाळेत ६ किमी अंतर चालत जातात. या इमारतीची दुरुस्तीही बाकी होती. लताताईंनी याकडेही लक्ष दिलं. इमारतीचं छत दुरुस्ती करून दारं, खिडक्या नवीन बसवण्यात आले. ताईंनी त्यांच्या पहिल्या वर्षांच्या मानधनाच्या रकमेतून शाळेच्या भिंतींचं रंगकाम केलं. भिंती नुसत्या रंगवल्या नाहीत तर त्या बोलक्याही केल्या. लोकवर्गणीतून शाळेत प्रसाधनगृहं बांधण्यात आली. दुसऱ्या वर्षांच्या मानधनातून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘क्रीडा गणवेश’ घेऊन दिले. चौदाव्या वित्त आयोगातून अंगणवाडी आणि शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आलं आहे. गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी गावाला कमी प्रमाणात मिळतो. तरी गावात कामं तर असतातच आणि काही प्राथमिक गोष्टींची आवश्यकता असते. निधीच्या कमतरतेमुळे कामांचा वेग मंदावतो. याकरता लताताईंनी त्यांच्या मानधनाची रक्कम गावाच्या विकासाकरताच खर्च करण्याचे ठरवले. लताताईंनी तिसऱ्या वर्षांच्या मानधनाच्या रकमेत शक्य तेवढे एलईडी दिवे घेऊन गावातल्या रस्त्यांवर बसवले. चौथ्या वर्षीच्या मानधनातून त्यांनी वृक्षलागवडीकरता रोपं घेतली.

गावात सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांची काही कामं झालीत तर काही प्रस्तावित आहेत. गावापासून डोंगरमाथा ७ किमी अंतरावर आहे. या डोंगरमाथ्यावर एक गाव आहे. या गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. त्यामुळे लताताईंनी भालेघर गावातून डोंगरमाथ्यापर्यंत पायवाट व्यवस्थित बांधली. यामुळे भालेघरहून डोंगरमाथ्यावरही जाणं जरा सोयीचं झालंय.  या मार्गावर व्यवस्थित रस्ता बांधण्याकरताही प्रस्ताव देण्यात आला आहे. हा रस्ता झाल्यास मुलांना एखाद्या गाडीने शाळेत जायला सोयीचं होईल. पायथ्यापासून भालेघर ६ किमी अंतरावर आहे. बरीच वर्ष देखभालीअभावी या रस्त्याची दुर्दशा झाली होती. वनखात्याच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. वनखातं आणि ग्रामपंचायतीने श्रमदानाने मिळून नुकताच दोन टप्प्यांत हा रस्ता डांबरी केलाय. डोंगरात भालेघरलाच समांतर आणखी एक गाव आहे. ही दोन्ही गावं काँक्रीटच्या रस्त्याने जोडण्यात आलीत. गावात एका भाडय़ाच्या खोलीत अंगणवाडी भरत असे. ताईंनी गावात अंगणवाडीची स्वतंत्र इमारत बांधली. गावात ग्रामपंचायत आहे, पण तिचं कार्यालय मात्र दुसऱ्या गावात होतं. भालेघरच्या ग्रामसेवकाकडे इतरही गावं होती. डोंगरांमधून तिथे येणं त्रासदायक असल्याने ग्रामसेवक केवळ आठवडय़ातून एक-दोनदाच गावात येत असत. गावकऱ्यांचं काही काम असल्यास, कोणताही दाखला काढायचा असल्यास, ग्रामसेवकाच्या मागे दुसऱ्या गावात जायला लागायचे. यात वेळ, श्रम आणि पसा सगळंच वाया जायचं. या ग्रामसेवकांचा मनमानी कारभारही वाढू लागला होता. गावच्या प्रश्नांकडे किंवा कामकाजाकडे ग्रामसेवकांचं लक्षही नसायचं. लताताईंनी याबाबत प्रशासनात तक्रार केल्यावर प्रशासनाने कारवाई केली. आता भालेघरचे ग्रामसेवक गावातच येतात. गावाशी संबंधित कार्यालयीन कागदपत्रं, दाखले सर्व गावातील ग्रामपंचायत कार्यालयातच मिळतात.

पूर्वी ग्रामसेवक आणि माजी सरपंच गावात ग्रामसभा आणि महिलासभा झाल्याचं कागदोपत्रीच दाखवत असत. प्रत्यक्षात कधीच झाल्या नाहीत. लताताई निवडून आल्यावर प्रजासत्ताकदिनी गावात पहिल्यांदा महिलासभा आणि ग्रामसभा झाली. आता गावात विशेष ग्रामसभा नियमित होत आहेत. पण मासिक ग्रामसभेचं प्रमाण अजूनही सुधारायला हवं असं लताताई सांगतात.

गावातल्या सहा निराधार स्त्रियांच्या कागदपत्रांची पूर्तता करून लताताईंनी निवृत्तिवेतन सुरू करवून दिलं. यापूर्वी या योजनेचा लाभ गावातल्या कोणत्याच निराधार स्त्रीला मिळाला नव्हता. गावात घरकुल योजनेतून दोन घरकुलं झाली आहेत. लताताई सरपंच झाल्यापासून, दरवर्षी महिला बालकल्याण निधीमधून गावातील स्त्रियांकरता आरोग्य शिबिरांचं आणि शेतीशाळांचं आयोजन करण्यात येतं. लताताईंनी स्त्रियांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक मिळावी याकरता गावात आणखी एक विशेष गोष्ट सुरू केली. कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर, त्या कुटुंबाचा गावासमोर सत्कार करण्यात येतो. गावातली गटारं दुरुस्त करण्यात आली. बंदिस्त गटारं, स्मशानभूमीचं सुशोभीकरण ही कामं प्रस्तावित आहेत. गावापासून दीड किमी अंतरावर काळेश्वरी देवीचं मंदिर आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ता गावकऱ्यांच्या शेतांच्या कडेने जातो. हा रस्ता बांधल्यास गावकऱ्यांना शेताकडे जाणंही सोयीचं होईल. त्यामुळे या रस्त्याचाही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे.

लताताई त्यांच्या जन्मगावच्या सरपंच झाल्या, त्याला चार वर्ष झालीत. ‘गावातला बदल तर दिसतोय, पण त्यांच्या स्वत:मध्ये काय बदल झालाय?’ असं विचारल्यावर त्या सांगतात, ‘‘माझा आत्मविश्वास वाढलाय. पूर्वी गाव कसा चालतो याच्यासह बाहेरचीही काही माहिती नव्हती. ते आता माहिती झालं. गावाला उत्पन्न कसं मिळतं, त्याचा वापर कामांसाठी कसा होतो हे कळू लागलं. माझ्या प्रयत्नांमुळे निराधार स्त्रियांना निवृत्तिवेतन चालू झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्फूर्ती देतो. स्त्री सरपंचाकडे स्त्रिया त्यांच्या अडचणी मोकळेपणाने व्यक्त करतात. स्त्रिया आता चावडीवर येऊ लागल्या. पहिल्यांदा पंचायत समितीत, जिल्हा परिषदेमध्ये गेल्यावर बावचळल्यासारखं व्हायचं. पण आता धीट झाले. अधिकाऱ्यांचीही चांगली मदत मिळते.’’

गावविकासासोबतच लताताईंच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि समाधान हेच तर ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीचं फलित आहे.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com