23 September 2020

News Flash

स्किझोफ्रेनियावर उपचार

स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बदनामीची भीती वाटते. या आजारांमुळे आपली सामाजिक पत कमी होईल, घरातील विवाह होणार नाही

| June 13, 2015 01:01 am

स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बदनामीची भीती वाटते. या आजारांमुळे आपली सामाजिक पत कमी होईल, घरातील विवाह होणार नाही या दडपणामुळे अशा स्त्रियांना कडीकुलपात बंद ठेवले जाते किंवा गावी पाठवून दिले जाते. त्यांच्या विसंगत वागणुकीमुळे, त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे नातेवाईक त्यांना मारझोडही करतात. माणुसकीच्या नात्यातून नातेवाईकांनी हे टाळायला हवे.

स्कि झोफ्रेनिया ही एक गंभीर मनोविकृती आहे. यामध्ये वागणुकीत बोलण्या-चालण्यात आणि विचारांत जर विचित्र बदल दिसले तर ते लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. पण बरीच लक्षणे अगदी हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे ‘आजकाल मनू थोडी विचित्र वागते. काय झाले आहे न कळे’ असा सोयीस्कर समज करून आपण मनू कधी ठीक होईल याची वाट पाहत बसतो. बऱ्याचदा ही सगळी लक्षणे विपरीत परिस्थितीला कशी अनुरूप आहेत हे नातेवाईक स्वत:लाच समजावत असतात.
कारण आपल्या लेकीला, बहिणीला व आईला मानसिक विकृती आहे हे स्वीकारणे खूप क्लेशदायक आहे. समाज तसाही या आजाराकडे सहानुभूतीने पाहत नाही. हा आजार झालेल्या रुग्णाला लोक टाळतात. त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची थट्टा करतात. सामाजिक दिनक्रम वा उपक्रमातून त्यांना दूर ठेवले जाते. या आजारामध्ये अंधविश्वास, जादूटोणा, भानामती या गोष्टींवर लोक जास्त विश्वास ठेवतात.
माझ्याकडे एक नातेवाईक त्यांच्या मुलीला स्किझोफ्रेनियाच्या उपचारासाठी घेऊन आले होते. ती विचित्र वागायची. हातवारे करायची, कधी पुतळ्यासारखी एकाच जागी तासन्तास उभी राहायची. अचानक लोकांच्या अंगावर धावून जायची. तिच्यात कुणी चेटकीण संचारली आहे, असे समजून शेजारीपाजारी तिला खूप त्रास देत असत. घरच्यांनी तांत्रिकमांत्रिक सगळे केले. पण गावातल्या लोकांचा प्रचंड विरोध व मुलीच्या जीविताला धोका आहे, हे जाणून त्या कुटुंबाने सरळ मुंबई गाठली. गेली दहा-एक वष्रे ते झोपडपट्टीत राहात आहेत.
या आजारात कलंकाचे दुसरे कारण म्हणजे मनोरुग्णाचे लग्न होण्यास समस्या निर्माण होतेच, पण त्यांच्या घरातील इतर व्यक्तींचे पण लग्न होणार नाही, याची कुटुंबीयांना भीती असते. त्यामुळे इतर लोकांना कळू नये म्हणून नातेवाईक मनोरुग्णाला उपचारालाही नेत नाहीत. जितका विलंब करता येईल तितका विलंब केला जातो. ती विचित्र वागते तेव्हा वागते, पण एरव्ही किती व्यवस्थित असते. मानसिक आजार असता तर अशी मध्ये मध्ये व्यवस्थित कशी वागली असती, असा उलटा प्रश्न नातेवाईक विचारतात. आमच्या बाह्य़रुग्ण विभागात एक इंजिनीअर त्यांच्या इंजिनीअिरगला असणाऱ्या मुलीला घेऊन आले होते. याबाबत त्यांची पाश्र्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या बहिणीला स्किझोफ्रेनिया होता. लग्नानंतर सहा महिन्यांतच तिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडले होते. तिला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनातसुद्धा समस्या आल्या. इतक्या विचित्र व भावनांवर ताबा नसलेल्या नणंदेला सांभाळण्याची तारेवरची कसरत त्यांच्या बायकोला जमत नव्हती. सामाजिकदृष्टय़ाही त्यांना खूप सोसायला लागले होते. त्यातच त्यांच्या कन्येचा आता दिसणारा विचित्रपणा, आक्रस्ताळेपणा, प्रसंगी शिवीगाळ व हाणामारी यामुळे ते त्रस्त झाले होते. कन्या तशी बुद्धिवान व अभ्यासातही हुशार होती, पण तिचा एकलकोंडेपणा, विक्षिप्तपणा अगदी लहानपणापासून दिसत होता. घरातल्या एका अनुभवातून असे आजार पुन्हा आपल्या पदरी न पडो असे सगळ्यांनाच वाटत होते. त्या पालकांनी ही आपली एकटी मुलगी थोडी अति वागते, कारण ती खूप लाडावलेली आहे, हट्टी आहे, बंडखोर आहे. पुढेमागे प्रगल्भ होईल असा ‘समज’ करून घेतला. ती रागाच्या भरात आईचे केस पकडून तिला घरभर लोळवत असे. वडिलांना शिव्या देत असे. कधी ओलीचिंब भिजून त्यांच्यासमोर उभी राही व दोघांना जागेवरून हलूच द्यायची नाही. इतक्या विचित्र वागण्याला नॉर्मल समजणे किती महाग पडले त्यांना. म्हणूनच हा आजार आपण जितक्या लवकर ओळखू, तितक्या लवकर उपचारही सुरू करू शकतो. यामुळे या आजाराने त्रस्त लोकांना हा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
या आजाराबद्दल अनेक गरसमज समाजात आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहेत.
० ‘हा आजार असलेली माणसे समाजाला घातक असतात. बेकाबू होतात.’- स्किझोफ्रेनियाचा आजार असलेली माणसे योग्य उपचारांनी इतर सामान्य माणसांइतकी व्यवस्थित राहू शकतात. शास्त्रीयदृष्टय़ा ही माणसे इतर सामान्य माणसांपेक्षा खूप हिंसक असतात असेही नाही. समाजकंटक तर नक्कीच नाही.
० ‘हा डोक्यावर परिणाम झालेला आजार असल्याने यावर उपचार उपलब्ध नाहीत.’ – खेडेगावात या भ्रामक समजुतीमुळे रुग्णाला कित्येक वष्रे उपचार मिळत नाहीत. खरे तर स्किझोफ्रेनियावर उत्तम उपचार आहेत. अनेक नवनवीन औषधे आज भारतातही उपलब्ध आहेत.
० ‘स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसते.’ – या आजाराचा व चारित्र्याचा काहीच संबंध नाही. हे रुग्ण दुबळेही नसतात. केवळ दुर्दैवाने त्यांना हा आजार झालेला असतो. अशा निरागस रुग्णांना योग्य उपचारांची व सामाजिक आधाराची गरज असते.
० ‘हा भूतबाधेचा आजार आहे.’- हा आजार शास्त्रीय आजार आहे. डोपामीन या रसायनाशी संबंधित आहे, म्हणून तंत्रमंत्र वा जादूटोणा-भानामती यात न अडकता रुग्णास वैद्यकीय उपचार द्यावेत. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णामध्ये ‘रात और दिन’ या सिनेमातील नíगस दत्तने साकारलेल्या भूमिकेसारखे ‘डबल’ व्यक्तिमत्त्व आहे, असाही गरसमज आहे. हा गरसमज कदाचित ‘स्किझोफ्रेनिया’ या शब्दामुळे आलेला असावा. हा ग्रीक शब्द आहे व त्याचा अर्थ ‘दुभंगलेले मन’ असा आहे. स्किझोफ्रेनियाला मराठीत आपण ‘छिन्नमनस्कता’ म्हणून ओळखतो. या आजारात आपण पाहिले की रुग्णाचे विचार भावना व वागणे सुसंगत नसते. जैविक कारणे या आजारात अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळेच आनुवंशिकतेचा घटक अधिक महत्त्वाचा ठरतो. आज वैद्यकीय शास्त्रात या रोगाला कारण ठरणारी काही जनुकेसुद्धा शास्त्रज्ञांनी शोधली आहेत. मेंदूतील डोपामीन या रसायनाला कमी करण्यासाठी अ‍ॅन्टी सायकॉटिक्स औषधे दिली जातात. यामुळे स्किझोफ्रेनियाची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतात. अर्थात, आज गोळ्या घेतल्या व उद्या बरे वाटले असे होत नाही. तर तीन-चार आठवडे वा काही महिने गोळ्यांचा परिणामासाठी आवश्यक आहे. साधारणत:        ८० टक्के रुग्णात हा आजार औषधे बंद केल्यावर, तर कधी कधी रोग स्थिरावला आहे म्हणून औषधोपचार कमी केले तर पुन्हा वाढलेला दिसतो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने लागले. स्त्रियांच्या बाबतीत काही वेळा तिचे सासरचे नातेवाईक व नवरा क्वचित भाऊबहिणी कालांतराने दुर्लक्ष करतात. नातेवाईकांसाठी पेलायला दुर्धर असा हा आजार आहे. आपण रोग्याशी कसे वागावे हेच नातेवाईकांना कळत नाही.
मंदाताईंना हा आजार वयाच्या पंधराव्या वर्षांपासूनच होता. जसजशा त्या तारुण्याकडे झुकू लागल्या, इतरांचे संसार पाहू लागल्या, तसतसे त्यांना लग्नाची ओढ लागली. लंगिक भावनांमुळे त्या उत्तेजित होऊ लागल्या. भावाच्या बायकोने त्यांना घरातूनच हाकलले. त्यांच्या बहिणींनाही जड होऊ लागले. ज्या बहिणीकडे राहात होत्या तिला त्या म्हणून लागल्या की तुझा नवरा मला दे. मग त्या बहिणीचे यजमानही त्यांना ठेवून घ्यायला तयार नव्हते. दुसऱ्या एका प्रसंगात तर चाळीस वर्षांची आमची रुग्ण घरातून पळून गेली व एका अनोळखी पुरुषाबरोबर जाऊन राहिली. स्त्रियांसाठी ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. वस्तुस्थितीची जाण नसल्याने त्यांना अशा तऱ्हेने फसविण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. त्यामुळे नातेवाईकांना बदनामीची भीती वाटते. या आजारांमुळे आपली सामाजिक पत कमी होईल. घरातील विवाह होणार नाही या दडपणामुळे स्त्रियांना कडीकुलपात बंद ठेवतात. गावात पाठवून देतात. त्यांच्या विसंगत वागणुकीमुळे, त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे नातेवाईक त्यांना मारझोडही करतात. माणुसकीच्या नात्यातून हे नातेवाईकांनी टाळावे, किंबहुना त्यांना योग्य उपचार द्यावेत. इलेक्ट्रोकन्वसलीसव थिरपी किंवा विद्युत उपचार पद्धतीही स्किझोफ्रेनियाच्या तीव्र लक्षणांत दिली जाते. या आजारात आत्महत्येचे प्रकारही बऱ्याचदा घडतात. कधी भासामुळे, कधी भ्रमामुळे तर कधी आपण अयशस्वी झालो आहोत या उद्वेगापोटी ते घडतात. इतर गंभीर आजाराप्रमाणे या रुग्णास दवाखान्यात दाखल करून उपचार करावे लागतात. बऱ्याच वेळा आजाराची जाणीव नसल्याने थोडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण स्वत:च उपचार थांबवतात व आजार पुन्हा गंभीर स्वरूप धारण करतो. हे रुग्ण जेव्हा पूर्ववत दिसतात तेव्हा त्यांना कामात गुंतवणे व त्यांचे पुनर्वसन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी आज सक्षम पुनर्वसन केंद्रही अस्तित्वात आहेत. हा आजार असलेल्या स्त्रियांसाठी गर्भधारणेनंतर पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात. या काळात स्त्रीला डॉक्टर या आजारावरची औषधे देऊ इच्छित नाहीत. कारण त्यांचा गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच प्रसूतीनंतरही गोळ्यांचे अंश बाईच्या दुधात जास्त प्रमाणात आढळते. या काळात, स्किझोफ्रेनियाची लक्षणे तीव्र प्रमाणात व गंभीर स्वरूपाची असतील तर उपचार पद्धतीत गोळ्यांचे प्रमाणही वाढते. यासाठी स्तनपान टाळण्याचा सल्ला आम्ही स्त्रीला देतो. अर्थात, स्किझोफ्रेनियाचे उपचार देऊन रुग्ण माता असल्यास तिला लवकरात लवकर नॉर्मल पातळीवर आणणे अत्यंत जरुरीचे आहे. बाळाचे योग्य व काळजीपूर्वक संगोपन या मातांना जमेलच असे नाही. बऱ्याच प्रसंगात या रुग्ण माता आपल्या मुलांना मारझोड करतानाही आढळतात. नातेवाईकांचे सहकार्य खूप मोलाचे आहे. नातेवाईकांनी जमल्यास ही जबाबदारी स्वीकारावी.
एकंदरीत लवकरात लवकर उपचार करणे या आजारात जितके आवश्यक आहे, तितकेच दीर्घकाळ उपचारही आवश्यक आहेत. काही दुष्परिणाम असतात. आजकालच्या औषधांत ते कमी आहेत. पण या आजारात रोगाला आवर घालणे हे केव्हाही रुग्णाच्या व नातेवाईकांच्या फायद्याचे आहे. बाई जास्त झोपते, काम करू शकत नाही, मुलांना पाहत नाही म्हणून नातेवाईकांनी उपचार बंद करू नयेत. नातेवाईकांना या रुग्णाच्या आजारात खूप सहन करावे लागते, म्हणून नातेवाईकांसाठी आधार गट खूप उपयुक्त आहेत. स्त्रियांच्या बाबतीत तर त्यांना सांभाळणे व मुलांना सांभाळणे या दोन्ही गंभीर जबाबदाऱ्या पार पाडणे खूप आव्हानात्मक व तितकेच थकविणारे आहे. पण आज आधुनिक उपचार मिळाल्यामुळे हे रुग्ण नियंत्रित राहतात. कित्येक कुटुंबांनी आपल्या रुग्णांबरोबर इतरांसारखे सुखी जीवन व्यतीत केले आहे. म्हणून सहनशीलता, वैद्यकीय शास्त्रावरचा विश्वास व भावनिक आधाराची पुंजी यामुळे याही आजारात आपल्याला आशेचे किरण दिसतात.
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:01 am

Web Title: schizophrenia treatments
Next Stories
1 संशय का मनी आला?
2 स्किझोफ्रेनिया हरवलेली दुनिया
3 अचपळ मन माझे : स्वत:लाच सावरण्याचा काळ
Just Now!
X