05 August 2020

News Flash

मी शाळा बोलतेय! मुलांची पुस्तकं

शाळेचं पहिलं पुस्तक तयार झालं नि ग्रंथालयात त्याची नोंद झाली. मुलांनी तयार केलेली पुस्तकं हा शाळेचा 'अभिमान' होता. मुलांनी प्रकाशक म्हणून शाळेचं नाव टाकलं, लेखक

| August 16, 2014 01:01 am

शाळेचं पहिलं पुस्तक तयार झालं नि ग्रंथालयात त्याची नोंद झाली. मुलांनी तयार केलेली पुस्तकं हा शाळेचा ‘अभिमान’ होता. मुलांनी प्रकाशक म्हणून शाळेचं नाव टाकलं, लेखक म्हणून आपली नावं, किंमत, चित्रंपण मुलांची! हे करताना वर्ग एकत्र आला. वर्गात चैतन्याला उधाण आलं.
ती एक शाळा. अगदी वेगळी, कारण तिथली प्रत्येक गोष्ट वेगळी. त्यातही वेगळेपण होतं ते तिथल्या लायब्ररीत. काय होतं हे वेगळेपण? तिथली पुस्तकंच वेगळी होती. कुठल्याही दुकानात मिळणारी ती पुस्तकं नव्हती, कारण ती पुस्तकं होती मुलांनी तयार केलेली. अकल्पनीय वाटतंय ना सगळं? खरंच आहे, कारण कृत्रिम रंगीबेरंगी जगात हे खरं न वाटणारं आहे. मुलांनी तयार केलेली पुस्तकं जरा खडबडीत, नीटपणे बाइंडिंग न केलेली होती. मात्र पुस्तकांतला आशय विलक्षण होता. शाळेतला हा वेगळेपणा एका शिक्षकांनी या शाळेला सांगितला आणि हे कामच सुरू झालं. म्हणून ही गोष्ट आहे या शाळेतल्या मुलांनी तयार केलेल्या पुस्तकांची.
मुलं खूप काही करतात, नव्हे मुलंच खूप करतात, हा या शाळेचा विश्वास होता. म्हणून शाळेनेही एक गमतीशीर गोष्ट केली. शाळेने स्वत:चं असंच ग्रंथालय तयार केलं. त्याचीच ही गोष्ट. खूप वर्षांपूर्वी शाळा अपुरी होती. ना ग्रंथालय, ना तिथे प्रयोगशाळा, ना खेळाचं सामान, होत्या फक्त वर्गखोल्या, पण या शाळेतले शिक्षक खूप तळमळीने काम करणारे होते. त्यांच्या मनातही खूप काही कल्पना होत्या, काय काय घडलं या शाळेत? शाळा सांगू लागली.
एक दिवस सरांनी मुलांना प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला वाचायला काय काय आवडतं?’’ सगळी मुलं फक्त सरांच्या तोंडाकडे पाहू लागली. एका मुलानं विचारलं, ‘‘काय काय म्हणजे काय?’’
‘‘म्हणजे कोणती कोणती पुस्तकं तुम्ही वाचलीत?’’
‘‘सर, आम्ही पुस्तकंच नाय वाचत. आम्ही शेतं बघतो, पक्षी-प्राणी पाहतो, नदीत डुंबतो, रानावनात हिंडतो, मज्जा करतो..’’ मुलांचं बोलणं ऐकताना सरांच्या मनात काही वेगळाच प्रकाश पडत होता. हा प्रकाश कल्पनेचा होता. सर मनातल्या मनात म्हणाले, यांना तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण जे वाचतो ते ही मुलं प्रत्यक्ष जगतायत. यांचं जगणंच समजावून घेऊ, त्यांना त्यांच्या शब्दांत मांडायला सांगू.. सर विचार करत होते. जे घडलं ते न ठरवताच घडलं.
सरांच्या लक्षात आलं. आपण मुलांना वाचनासंबंधी विचारतोय, पण मुलं नेमकं वाचणार काय? त्यांना आवडेल असं इथं किती आहे? विचार करू या त्यांच्या आवडीचा. शाळा विचार करू लागली. सरांनी पाचवीच्या वर्गात एक गोष्ट सांगितली, पण गोष्ट अर्धीच सांगितली. गोष्ट इतकी छान सांगितली की, मुलं ‘सर, पुढची गोष्ट पुढची गोष्ट’ म्हणून ओरडू लागली. सर म्हणाले, ‘‘आपण एक गंमत करू या. तुम्ही तुमच्या मनाने गोष्ट पूर्ण करा. प्रत्येकाने ती गोष्ट पूर्ण करायचीच. लिहून काढू या आपण! चालेल?’’ काही मुलांनी होकार दिला. काही मुलं म्हणाली, ‘‘सर! आम्ही तोंडी सांगू, लिहीत नाही.’’ थोडा वेळ दिला गेला. सरांनी मुलांनी लिहिलेल्या गोष्टी एकत्र केल्या..
 नववीच्या वर्गातला अक्षय. अक्षर सुंदर, कलाकार मुलगा. सरांनी अक्षयच्या हातात गोष्टी लिहिलेले कागद दिले. अक्षयने ते सर्व कागद एकत्र केले. पुन्हा छान लिहून काढले. एक पुस्तकच तयार झाले. पुस्तकाला नाव द्यायला हवं. त्यानंच खूप विचार केला नि ‘अपूर्णपूर्ण’ असं नाव पुस्तकाला दिलं. सरांनी हे पुस्तक प्रार्थनेच्या वेळी सर्वाना दाखवलं नि लेखकवर्गाचं अभिनंदन केलं. शाळेचं पहिलं पुस्तक असं तयार झालं नि ग्रंथालयात त्याची नोंद झाली.
यामुळे वेगळंच चैतन्याचं वारं संचारलं. शिक्षक एकत्र बसले नि पुस्तक म्हणजे काय हे मुलांना समजावून देता येईल का यावर विचार करू लागले. यातून एक सुंदर टिपण तयार झालं. शाळेने बाल लेखक मेळावा आयोजित करायचे ठरवले नि लगेच सगळी मंडळी कामाला लागली. शाळेशेजारीच तीन पर्णकुटय़ा होत्या. तिथं मुलं एकत्र जमली. हा मेळावा तीन दिवसांचा होता, पण सलग तीन दिवस नाही तर महिन्याच्या अंतराने तीन दिवस. पहिल्या भेटीत शिक्षकांनी विविध भाषांतल्या सुंदर सुंदर भाषांतरित कथा, कविता जमवल्या होत्या. त्यातली व्यक्तीची, घटनांची गुंफण त्यांनी समजावून सांगितली. शब्दरचनेबद्दल बोलले; कथा, कविता, गोष्ट, नाटुकली याविषयी सोप्या भाषेत चर्चा झाली. आपण आणि आपल्या अवतीभोवती अशा घटना घडत असतात हे शिक्षकांनी समजावून सांगितलं. त्यावर मुलांनी घरातली माणसं, गावातली माणसं, प्राण्यांचं विश्व, शेतीवाडी, माणसाला याबद्दल वाटणारे प्रेम अशा किती तरी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. कुणी आजीच्या कविता म्हणून दाखवल्या, तर कुणी आजोबा म्हणत असलेली रानातली गाणी. कुणी लग्नाच्या वेळी गायली जाणारी गाणी, तर कुणी सणावारी म्हटली जाणारी गाणी म्हणून दाखवली. हे ऐकून सर म्हणाले, ‘‘हेच आपण एकत्र करू, पुस्तक होईल याचं.’’ दुसरे सर म्हणाले, ‘‘आज आपण पुस्तकाच्या रूपात वाचतो. पूर्वी लोक ऐकून वाचायचे, एवढे अभंग! पण लोकांचे ऐकून पाठ झाले..’’ मुलांचे डोळे लक्ष देऊन ऐकत होते. डोळ्यांत वेगळीच चमक होती. हे तर आपल्याला माहीत होतं, फक्त असं कुणी त्यांना थेट सांगितलं नव्हतं इतकंच! एक मुलगा म्हणाला, ‘‘सर! आमची भाषा वेगळी.’’
 ‘‘अरे, तीपण भाषाच, ज्या भाषेत तुम्ही ऐकता-बोलता त्याच भाषेत बोलायची लाज वाटत होती.’’ सरांच्या बोलण्यानं वेगळाच विश्वास वाटला. मुलं कामाला लागली.
‘‘पुढच्या मेळाव्याला येताना असं जे जे सुचेल ते ते तुम्ही लिहून आणायचं. आपण बरोबर महिन्याने भेटणार आहोत.’’ या वाक्यानं समारोप झाला नि महिन्यानंतर याच वाक्याने सुरुवात झाली. ज्याला जसं जमेल तसं त्यानं लिहून आणलं होतं. कुणी छान चित्र, कुणी छान रानातल्या कविता. प्राण्यांचं त्यांना माहीत असणारं विश्व साकार झालं. हे सगळं काही उत्तम साहित्यगुण असणारं होतं असं नाही, पण आपणही लिहू, आपल्या अवतीभोवतीला समजून घेऊ हा आत्मविश्वास बळावला. तिसऱ्या मेळाव्याला जमलेल्या साहित्याचं संकलन झालं.
मुलांनी तयार केलेली पुस्तकं हा शाळेचा ‘अभिमान’ होता. मुलांनी प्रकाशक म्हणून शाळेचं नाव टाकलं, लेखक म्हणून आपली नावं, किंमत, चित्रंपण मुलांची! हे करताना वर्ग एकत्र आला. वर्गात चैतन्याला उधाण आलं नि सरांनाही समजलं नाही, आपला वेळ किती छान जातोय हे! यातूनच नवनव्या कल्पनांना जन्म मिळाला.
एक दिवस तर विलक्षण प्रश्न आठवीच्या मुलांनी सरांना विचारला, ‘‘आमचा अभ्यास जर आम्ही ठरवू शकतो, तर आमची पुस्तकंही आम्ही तयार करू?’’ या प्रश्नानं सगळ्यांना धक्का बसला. असं चालेल का? परवानगी मिळेल का? अशा प्रश्नापासून सुरुवात होण्यापूर्वीच सर म्हणाले, ‘‘हो चालेल ना! पण मला सांगा असं तुम्हाला का वाटलं?’’ ‘‘या पुस्तकांचा कंटाळा येतो. मग त्याचाच अभ्यास का करायचा?’’
शाळेच्या मनात आलं, मुलं म्हणतायत तसं मुलांनी केलं तर! संधी द्यायलाच हवी! शिक्षक वर्गात गेले. आपापल्या विषयावर वारंवार अनेक मुद्दय़ांवर चर्चा होऊ लागली. सुरुवात झाली मातृभाषेपासून. आधी मुलांनी कवितांचे संकलन केलेच होते. यात पाचवीने निसर्ग कविता, सहावीने देशभक्तीपर कविता, सातवीने अभंग, आठवीने आवडत्या कविता, तर नववीने सामाजिक कविता असे विषय घेऊन संकलन केले होते. पाचवीच्या वर्गाने प्रत्येक संकलनातील त्यांना आवडणाऱ्या दोन दोन कविता घेतल्या. कथांच्या निवडीसाठी नववीने काम केले आणि प्रवासवर्णनाचे काम दहावीच्या मुलांनी केले, तरी काय करायचं याला आकार येईना.
म्हणून नववीकडून पाचवीकडे जायचं असं ठरलं. आधी मराठीचं पुस्तक तयार करायचं ठरलं. मुलांनी गट केले. आपल्या पुस्तकात काय काय असेल या अपेक्षांचे संकलन झाले. कविता कशा हव्यात, गोष्टी कोणत्या हव्यात, नाटय़ उतारे किती हवेत, कसे हवेत, चित्रं हवीत असा अनेक अपेक्षांचा संच तयार झाला. कामाला सुरुवात झाली. मुलं म्हणाली, ‘‘सर! पहिले पहिले धडे अगदी जुन्या मराठीचे नकोत हा!’’
‘‘त्याशिवाय पूर्वी आपली भाषा कशी होती हे समजणार कसं?’’
‘‘सर! ते स्वाध्यायात / वाचनात टाकू या आपण! शिवाय सर जिथं इंग्रजी प्रथम आहे त्यांच्या पुस्तकात कुठं असं जुनं इंग्लिश येतं.’’
‘‘अरे! आपण मराठी भाषिक आहोत..’’ पुस्तक करण्याच्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या. ३/४ महिन्यांची मुदत देण्यात आली नि ऑक्टोबरमध्ये नववीचे मराठीचे पुस्तक तयार झाले. हा सारा उपक्रम पाहून शाळेच्या आनंदाला उधाण आलं. इतर वर्गाचेही काम सुरू झाले होते. इतर विषयांचाही आपोआप विचार सुरू झाला. त्यातल्या काही प्रतिक्रिया अशा होत्या-
 आमच्या गावचा इतिहास आम्ही तयार करू,  आमच्या गावचा भूगोल आम्ही तयार करू,  परिसरातील आजूबाजूच्या निसर्गातल्या विज्ञानाचा शोध घेऊ.
यात किती योग्य, किती अयोग्य, यापेक्षा नक्की काय तयार होईल, यापेक्षा मुले काही करायच्या निमित्तानं एकत्र बांधली जाऊ लागली नि शाळेत रेंगाळू लागली, कल्पनांच्या भराऱ्यात शाळा मनोमन तरंगू लागली. हे खूप महत्त्वाचं वाटलं शाळेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: school and its intresting library books
Next Stories
1 ‘मी’ मला सापडले
2 .. झिजणे कणकण
3 आपलेपण.. घरानं दिलेलं
Just Now!
X