‘आपण असं करू या, ज्या गोष्टी मुलं यांत्रिकपणे बोलतात त्या फळय़ावर लिहू. आणि जिवंत वाटणाऱ्या घटनांना व्यक्त करायची संधी देऊ. मुलं आपल्याला त्यांच्या अनुभवविश्वात घेऊन जायला हवीत. मुलांचे हे अनुभव ऐकून इतर मुलंही तयार होतील. घरदारी, आजूबाजूला, समाजात, निसर्गात घडणाऱ्या अनुभवलेल्या घटना मुलं व्यक्त करतील ती या अनुभवमंडपात. आपण नोंदी ठेवूया..’’ शाळेत सुरू झालेल्या अनुभव मंडपची ही गोष्ट..
जाधव सर स्टाफरूममध्ये आले. सगळेच जण तसे निवांत होते. रोज संध्याकाळी जरा विश्रांती झाल्यावर दिवसभरातल्या विशेष नोंदीवर सगळे जण बोलत. या विशेष नोंदी म्हणजे दिवसभर मुलांकडून मिळालेले वेगवेगळे प्रतिसाद. त्यांच्या कृतिरूप किंवा शब्दरूप प्रतिक्रिया. जसजसा हा उपक्रम सुरू झाला तसतसा तो फुलू लागला. मजा येऊ लागली. वातावरणात एकदम बदल झाला. सुरुवातीला जरा कुणी कुणी नाकं मुरडली, पण नंतर मात्र नजरच बदलली. हे कसं काय घडलं? ..
खरं तर नेहमी शाळेची घंटा नि शिक्षकांचं शाळेतून बाहेर पडणं एकाच वेळी घडायचं. त्यांना इतकी का घाई असते घरी जायची? शाळा नेहमी विचार करायची, ‘‘असं का वाटतं सगळय़ांनाच? शिक्षकांनाच वाटतं मग मुलांना का नाही वाटणार? मीच कुठे तरी कमी पडतेय. माझ्याजवळ राहावं, माझ्याकडे आकर्षित व्हावं असं काहीच नाही बहुधा माझ्याजवळ!. काही तरी मला करायलाच हवं..!’’
हे सारं शाळा जाधवसरांकडे बोलली. तेव्हा ते गाडी बंद पडली म्हणून एकटेच व्हरांडय़ात उभे होते. तेव्हाच त्यांच्या मनात हा विचार आला. आपण अजून वेळ द्यायला हवा. आणि इथून बाहेर पडून तरी काही वेगळं आपण करतच नाही. उगाचच घरी जायची धांदल! ते थांबू लागले. हळूहळू एकेक करीत सगळेच थांबू लागले. आणि मग मुलांबद्दलची खास निरीक्षणं व्यक्त करताना मजा येऊ लागली. वर्गातले अनुभव सगळे जण एकमेकांच्यात शेअर करू लागले. आता शाळा आनंदात होती. एरवीच्या गप्पा या काम टाळण्याच्या असायच्या. खरेदीच्या असायच्या. वस्तूंच्या असायच्या. आता मात्र शाळेच्या आवारात मुलांच्या शिकण्याबद्दलच्या शब्दांचे ध्वनी घुमू लागले. मग मात्र या ध्वनींच्या प्रतिध्वनींनी शाळा गाणं गुणगुणू लागली..
 या सगळ्या गोष्टींसाठी निमित्त घडलं एका प्रसंगामुळे. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी विचार न करताच केल्या जातात, मग त्या यंत्रवत होतात. त्यातलाच एक शब्द म्हणजे शिस्त. त्या दिवशी शाळेला वाटलं की आपण मुलांशी बोललं पाहिजे. मुलांना काय वाटतं याचा विचार केला पाहिजे. मुलांकडून शिस्तीची अपेक्षा करणाऱ्या सगळय़ांनीच हा शब्द आचरणात नको का आणायला? खरं म्हणजे शाळेला मुलांशी बोलण्यामागे एक कारण होतं. घटनाच तशी घडली.  शाळेमध्ये घडणाऱ्या अनेक घटना अशा होत्या की ज्यामुळे मुलं ‘बोअर’ होत होती. त्यातली एक घटना म्हणजे ‘अभ्यास.’ वर्गात चौथीच्या मुलानं सरांना विचारलं, ‘सर, तुम्हाला पण रोज आमच्यासारखा अभ्यास हवा. तुम्हाला अभ्यास नाही. मग आम्हालाच का?’ वातावरण एकदम गंभीर झालं. सरांचे हात वळवळले. पण तेवढेच. वातावरणातला ताण सैल करण्यासाठी जाधवसर म्हणाले, ‘‘तुमच्याएवढे असताना आम्हालाही अभ्यास करावाच लागला. म्हणून आम्ही मोठे झालो..’’
‘पण सर! तुम्हीच तर म्हणता मनुष्य कायम विद्यार्थी असतो..’
यावर बोलण्यासारखं काही नव्हतं. परखण्यासारखं मात्र खूप होतं. त्यातलीच एक कृती म्हणजे सगळय़ांनी वर्गातलं अध्यापन सोडून काही काळ त्या व्यतिरिक्त बोलणं.
बराच विचार करून एक दिवस जाधवसर शाळेत आले. आज ते नवीनच कल्पना मांडणार होते. सगळय़ांनाच उत्सुकता होती. कायम त्रासलेल्या, वैतागलेल्या आठवलेबाईही आता उत्साही जाणवू लागल्या. शाळा मनात म्हणाली, ‘ माझ्या ठिकाणी वावरणारी माणसं उत्साही झाली की मीदेखील उत्साही होते.’
 सर म्हणाले,  ‘आपली शाळा, शाळेचं हे प्रार्थना सभागृह! आपण या परिसराला ‘अनुभव मंडप’ म्हणूया. संत बसवेश्वरांनी वापरलेला शब्द आहे हा!’
बाई म्हणाल्या,  ‘‘म्हणजे करायचं काय?  तुमचा काय विचार आहे? अनुभव मंडप हा शब्द ऐकायला छान वाटतोय.’’
‘‘जितका शब्द छान वाटतोय तितकाच अर्थ पण छान करूया. मुलं मुलांचं एक अनुभवविश्व घेऊन शाळेत येतात. या अनुभवात त्यांचा अनेक अंगांनी सहभाग असतो, निरीक्षण असतं, जाणिवा असतात, यातून मुलं अनेक गोष्टी शिकतात. पण आपल्याला ते कसं कळणार? ते कळत नाही तोवर त्याचा इथल्या प्रक्रियेशी आपण संबंध कसा जोडणार? त्यांच्या अनुभवाला त्यांची प्रत्येकाची एक भाषा असते. तीही आपल्याला समजत नाही. खरं तर वर्गात बोलताना आपण आपली भाषा वापरतोच. मुलांच्या या भाषेला संधी मिळाली तर यातून त्यांना पुस्तकाला जोडणं सोपं जाईल.. अहो! परवा पाचवीतला मुलगा म्हणाला, ‘सूर्योदय-सूर्यास्त म्हणण्याऐवजी पृथ्वीची आमच्या गावची सूर्यासमोर यायची वेळ आणि आमच्या गावची सूर्यापुढून जायची वेळ असं का नाही म्हणत? सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही..’ असो. ’’
खरं तर सगळे जण तसे गप्प होते. प्रत्येकाच्या डोक्यात काही तरी सुरू होतं. ‘आपण असं करू या ज्या गोष्टी मुलं यांत्रिकपणे बोलतात त्या फळय़ावर लिहू. आणि जिवंत वाटणाऱ्या घटनांना व्यक्त करायची संधी देऊ. मुलं आपल्याला त्यांच्या अनुभवविश्वात घेऊन जायला हवीत. आपण त्याला धक्का नाही लावायचा. अलगद शिरायचं त्यात!.. मुलांचे हे अनुभव ऐकून इतर मुलंही तयार होतील. घरीदारी, आजूबाजूला समाजात, निसर्गात घडणाऱ्या अनुभवलेल्या घटना मुलं व्यक्त करतील ती या अनुभव मंडपात. आपण नोंदी ठेवूया..’’
शाळा मग म्हणत होती, ‘‘ही खूप छान आयडिया आहे. ‘अनुभव मंडप.’ अरे वा! मुलांचे अनुभव आपल्याला सर्वाशी शेअर करायला मिळणार आता!..वा!’’
‘‘कसा आहे हा अनुभव मंडप? प्रश्न पडलाय ना? मग उत्तर पाहायला या माझ्याकडे,’’ असं शाळा सांगते सगळय़ांना. शाळेच्या मनात बऱ्याच वेळा येतं की मुलं संतांचे अभंग म्हणतात, गातात. कसं छान वाटतं! संतांनी वारकऱ्यांची कशी रचना केली असेल! आपल्या ठिकाणी असणाऱ्या अनुभव मंडपांकडे पाहून शाळेला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. एरवी शाळेत ओळीत रांगेत असणारी मुलं इथे या अनुभव मंडपात वेगळय़ाच रचनेनं बसतात. ओळीत एकाचाच चेहरा दिसतो. मागे फक्त शरीरं उभी असतात. इथे सगळय़ांना सगळय़ांचा चेहरा दिसतो. मजा वाटते मुलांना. दर शनिवारी हा ‘अनुभव मंडप’ मुलांच्या आणि नंतर शिक्षकांच्या अनुभवांनी निनादून जातो. कारण शिक्षकही कुणाबद्दल काय वेगळं जाणवलं याची चर्चा करतात.
हा अनुभव मंडप मुलांसाठी जसा त्या शाळेत आहे तसा शिक्षकांसाठीही. जे जे प्रयोग, उपक्रम शिक्षक करत होते ते त्यांच्याचपुरते न राहता आता सगळय़ांनाच समजतात. अनुभवांची देवाण-घेवाण म्हणजे शिकणंच.
शाळेत आता हा अनुभव मंडप आहे. न बोलणारी मुलंही या अनुभव मंडपात मोकळेपणाने व्यक्त होत आहेत..